Monday, March 30, 2026
कानोली-गजरगाव-सरंबळवाडी ग्रामीण मार्गच्या रस्त्याचे उदघाटन
आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
आजरा तालुक्यातील कानोली-गजरगाव-सरंबळवाडी जोड रस्ता या ग्रामीण मार्ग क्र. 13 रस्त्याच्या उदघाटन सोहळा कानोली (ता. आजरा) येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुषमा सुभाष पाटील होत्या. उदघाटन सोहळा आजरा नगरीचे नगराध्यक्ष अशोकआण्णा चराटी व भारतीय जनता पक्षाचे नेते जयवंत सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या कामी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व जयवंत सुतार यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे. ओढ्यावरील मोरी बांधकाम आणि रस्ता कामासाठी 60 लाखाचा निधी खर्च झाला आहे.
यावेळी बोलताना चराटी म्हणाले, जयवंत सुतार यांनी तालुक्यात अनेक गावात पाठपुरावा करून निधी आणला आहे. सुतार यांच्या कामाबाबत कौतुक केले. गावाच्या विकासासाठी पाठपुरावा केला जाईल. सुतार म्हणाले निवडणुकीत पराभव झाला म्हणून खचणारा मी नाही, यापुढेही विकासाची कामे सुरूच राहतील अशी ग्वाही दिली. आम. शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून गावातील विकास कामे मार्गी लावली जातील असे सांगितले. यावेळी पं. स. सदस्य समीर पारदे, उपसरपंच चंद्रकांत पाटील, संभाजी सरदेसाई, निवृत्ती शेंडे, ग्रा. प. सदस्य सुधीर पाटील, अनिल पाटील, दिलीप पाटील, श्रीपती देसाई, पी. एम. आपगे, चंद्रकांत पाटील, गोपाळ भोगण, शहाजी भोसले, विलास मुरुकटे, आनंदराव कातकर, संदीप देसाई, हर्षवर्धन महागावकर, अनिल नाईक दयानंद बुगडे, अमोल सुतार, ठेकेदार सचिन पवार, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सुभाष पाटील यांनी मानले.
×××××××××××××××××××××××××
पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्हाभर राबविणार : मंत्री हसन मुश्रीफ, मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजनाही प्रभावीपणे राबविणार
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क
संपूर्ण जगासाठीच सूर्य हा मोफत ऊर्जेचा कधीही न संपणारा अखंड नैसार्गिक स्त्रोत आहे. याचा पुरेपूर वापर करित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली "पी. एम. सूर्यघर योजना" संपूर्ण जिल्ह्याभर घरोघरी राबविण्याचा निर्धार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात ना. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रामुख्याने उपस्थित होते .
ते म्हणाले, या योजनेमुळे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून निर्माण झालेली वीज संबंधिताला मोफत मिळेल.अनुदान वजा जाता सुरुवातीची तीन वर्षे साधारणता दरमहा वीज बिला एवढाच हप्ता बसेल. त्यानंतर दरमहा येणारे वीज बिल शून्य होईल.पर्यायाने,पर्यावरणाच्या संरक्षणालाही हातभार लागेल.पी.एम.सूर्यघर योजनेच्या आढाव्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्त्यांचा आढावा घेताना श्री मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांना शेताकडे ये- जा करण्यासाठी,वैरण व गोठ्यांमधून दूध आणण्यासाठी, बी-बियाणे व खतांच्या वाहतुकीसह काढणी केलेली पिके वाहनांमधून घर व विक्रीसाठी नेण्याकरिता तसेच वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांसह विशेषत: माता-भगिनी व शाळेला ये जा करणाऱ्या बालकांसाठी पाणंद रस्ते म्हणजे जणू जीवनमार्गच आहेत. ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे वाद नसतील म्हणजेच पर्यायाने त्यांची संमती असेल अशा सर्व ठिकाणी प्रशासनाच्या सहाय्याने पाणंद रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येणार आहेत. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सोय होणार असल्याने शेतकऱ्यांनी आप-आपसातील वाद मिटवून या योजनेचा वापर प्रभावीपणे करावा .या अभियानाचा प्रारंभ येत्या १९ एप्रिलपासून कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा आदी मतदारसंघातून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करणार असल्याचे ना. मुश्रीफ म्हणाले. तसेच दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढून संबंधितांना न्याय द्यावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तर पाणंद रस्त्याबाबत येथे 8 दिवसांमध्ये दर निश्चिती केली जाईल. तसेच ग्रामपंचायतीकडून या रस्त्याच्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रस्ताव मागविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिली .
पाणंद रस्त्यांसाठी १४ योजनांमधून निधी.....!
या अभियानांतर्गत पाणंद रस्ते हे शंभर टक्के यांत्रिकीकरणातून होणार आहेत.पाणंदी तयार करण्यासाठी सी.एस.आरसह १५ वा वित्त आयोग, खासदार व आमदार यांचा स्थानिक विकास निधी, ग्रामपंचायतींना जन सुविधांकरीता मिळणारे अनुदान तसेच मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांकरीता मिळणारे अनुदान, जिल्हास्तरीय खनिज विकास निधी, ग्रामपंचायतींना मिळणारे महसुली अनुदान, ग्रामपंचायतींचे स्व- उत्पन्न, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून उपलब्ध होणारा निधी,ग्रामीण भागात गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे म्हणजेच 25:15, इतर जिल्हा योजना, अनुसूचित व आदिवासी क्षेत्रासाठी पेसा अंतर्गत उपलब्ध निधी, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम, भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना, आदिवासींसाठी नाविन्यपूर्ण योजना यासारख्या विविध १४ शासकीय योजनांतून निधी उपलब्ध होणार असल्याचे ना. मुश्रीफ म्हणाले. या आढावा बैठकीसाठी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्रीमती वर्षा शिंगण, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, महावितरण अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, रोहयो उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
××××××××××××××××××××××××
घरगुती-व्यावसायिक गॅस पुरवठा सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कंपन्यांना निर्देश
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्ह्यात अचानक वाढलेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या मागणीमुळे पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटना आणि गॅस पुरवठादार कंपन्यांची बैठक पार पडली. यावेळी घरगुती सिलेंडरचा शंभर टक्के घरपोच पुरवठा, औद्योगिक क्षेत्रे, हॉटेल व रेस्टॉरंट्ससाठी उपलब्धतेनुसार वितरण आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी पाईपद्वारे गॅस जोडण्या देणे यावर चर्चा झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गॅस एजन्सींना ग्राहकांना पूर्णपणे घरपोच गॅस सिलेंडर वितरीत करण्याचे कडक निर्देश दिले. कुठेही अवैध विक्री किंवा पुरवठा होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. आवश्यकतेनुसार गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलीस आणि पुरवठा शाखेची मदत घेऊन नियंत्रण राखण्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगुले, माजी अध्यक्ष आयुषचंद्र धोतरे, गोशिमाचे उपाध्यक्ष संजय देशिंगे यांच्यासह एचपी, भारत गॅस आणि इंडेन गॅस कंपन्यांचे जिल्हा प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत कंपन्यांनी घरगुती सिलेंडरचा पुरवठा पूर्वपदावर येत असल्याचे सांगितले, तर व्यावसायिक गॅसचे २० टक्के वाटप शनिवारपासून सुरू झाल्याची माहिती दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील औद्योगिक व्यवसाय, हॉटेल व रेस्टॉरंट्स आणि पर्यटकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता शासनाच्या सूचनांनुसार आणि उपलब्ध पुरवठ्यानुसार २० टक्के मर्यादेत व्यावसायिक सिलेंडर सुरळीत वितरण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कंपन्यांना निर्देश दिले. सद्या वापराच्या मर्यादेतील २० टक्के पुरवठा चालू ठेवण्याचे आणि उपलब्धतेनुसार त्यात वाढ करण्याचे कंपन्यांनी मान्य केले. जिल्हाधिकारी यांनी औद्योगिक क्षेत्रे, हॉटेल व रेस्टॉरंट्सना पाईपद्वारे गॅस पुरवठा देण्यास प्राधान्य देण्याचे सांगितले. यासाठी दोन्ही महानगरपालिकांशी चर्चा करून माहिती द्यावी आणि आवश्यक कामांसाठी डीम्ड परवानग्या देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विविध उद्योग व व्यवसायांतील कामगार व परप्रांतीयांसाठी ५ किलोचे गॅस पुरवठा सुरू ठेवावा आणि संबंधित कंपन्यांनी त्यांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत चुकिच्या पद्धतीने गॅस पुरवठा, ब्लॅकमार्केटिंग, बुकिंगशिवाय किंवा ओटीपीशिवाय वितरण असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी यांनी इशारा दिला. शंभर टक्के घरगुती गॅस घरपोच पोहोचवण्याचे पुन्हा एकदा सांगितले. या बैठकीतून जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले की, घरपोच सिलेंडर मिळत असल्याने कळविलेल्या तारखेपूर्वी एजन्सीजकडे गर्दी करू नये. दिलेल्या वेळेनुसार गॅस घरपोच देण्यात येत आहे.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
कोल्हापूर जिल्ह्यात अचानक वाढलेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या मागणीमुळे पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटना आणि गॅस पुरवठादार कंपन्यांची बैठक पार पडली. यावेळी घरगुती सिलेंडरचा शंभर टक्के घरपोच पुरवठा, औद्योगिक क्षेत्रे, हॉटेल व रेस्टॉरंट्ससाठी उपलब्धतेनुसार वितरण आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी पाईपद्वारे गॅस जोडण्या देणे यावर चर्चा झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गॅस एजन्सींना ग्राहकांना पूर्णपणे घरपोच गॅस सिलेंडर वितरीत करण्याचे कडक निर्देश दिले. कुठेही अवैध विक्री किंवा पुरवठा होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. आवश्यकतेनुसार गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलीस आणि पुरवठा शाखेची मदत घेऊन नियंत्रण राखण्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगुले, माजी अध्यक्ष आयुषचंद्र धोतरे, गोशिमाचे उपाध्यक्ष संजय देशिंगे यांच्यासह एचपी, भारत गॅस आणि इंडेन गॅस कंपन्यांचे जिल्हा प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत कंपन्यांनी घरगुती सिलेंडरचा पुरवठा पूर्वपदावर येत असल्याचे सांगितले, तर व्यावसायिक गॅसचे २० टक्के वाटप शनिवारपासून सुरू झाल्याची माहिती दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील औद्योगिक व्यवसाय, हॉटेल व रेस्टॉरंट्स आणि पर्यटकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता शासनाच्या सूचनांनुसार आणि उपलब्ध पुरवठ्यानुसार २० टक्के मर्यादेत व्यावसायिक सिलेंडर सुरळीत वितरण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कंपन्यांना निर्देश दिले. सद्या वापराच्या मर्यादेतील २० टक्के पुरवठा चालू ठेवण्याचे आणि उपलब्धतेनुसार त्यात वाढ करण्याचे कंपन्यांनी मान्य केले. जिल्हाधिकारी यांनी औद्योगिक क्षेत्रे, हॉटेल व रेस्टॉरंट्सना पाईपद्वारे गॅस पुरवठा देण्यास प्राधान्य देण्याचे सांगितले. यासाठी दोन्ही महानगरपालिकांशी चर्चा करून माहिती द्यावी आणि आवश्यक कामांसाठी डीम्ड परवानग्या देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विविध उद्योग व व्यवसायांतील कामगार व परप्रांतीयांसाठी ५ किलोचे गॅस पुरवठा सुरू ठेवावा आणि संबंधित कंपन्यांनी त्यांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत चुकिच्या पद्धतीने गॅस पुरवठा, ब्लॅकमार्केटिंग, बुकिंगशिवाय किंवा ओटीपीशिवाय वितरण असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी यांनी इशारा दिला. शंभर टक्के घरगुती गॅस घरपोच पोहोचवण्याचे पुन्हा एकदा सांगितले. या बैठकीतून जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले की, घरपोच सिलेंडर मिळत असल्याने कळविलेल्या तारखेपूर्वी एजन्सीजकडे गर्दी करू नये. दिलेल्या वेळेनुसार गॅस घरपोच देण्यात येत आहे.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मारकासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय; आजऱ्यात बैठक
आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मारकासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय आजरा येथे झालेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकुंददादा देसाई होते. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी समितिच्या कामाचा आढावा घेत यावर्षीचा पुरस्कार आणि स्मारकासाठी पाठपुरावा करण्याबद्दल मत मांडले. मागील पुरस्कार देताना गव्हाणकरांच्या विचार आणि व्यवहाराच्या आधारे काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्याना, कलावंतांना आपण आजपर्यंत पुरस्कार दिले. यावर्षीचा पुरस्कार त्याआधारेच दिला जाणार आहे. त्याची निवड लवकरच आपण करावी.
मुकुंददादा देसाई म्हणाले की महागोंड येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी या स्मारकासाठी दोन कोटी रुपये निधी घोषित केला होता. त्याचा पाठपुरावा करून स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल असे बघावे. प्रा. मीना मंगळूरकर, संजय घाटगे, विक्रम देसाई, संजय तरडेकर, काशिनाथ मोरे, कृष्णा सावंत, रणजित कालेकर, रोहित शेंडे, अमित सामंत, शिवाजी गुरव इत्यादी उपस्थित होते. सुरवातीला डॉ नवनाथ शिंदे यांनी इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रध्दांजलीचा ठराव मांडला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठक सुरू झाली.
यावर्षीच्या पुरस्काराबद्दल कांही नावाची चर्चा झाली पण अंतिम निर्णय बुधवार दि १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता जनता बँक आजरा येथे होणाऱ्या समितीच्या व्यापक बैठकीत घेण्याचा निर्णय झाला.
××××××××××××××××××××××××××××
Sunday, March 29, 2026
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे आजरा नगरपंचायतीस कचरा व्यवस्थापन व विकासकामांसाठी निधीची नगरसेवक बामणे व कुंभार यांची मागणी...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.....
आजरा शहरातील वाढत्या कचरा व्यवस्थापनाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक व नगरसेविकांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. नगरसेवक परशुराम वैजू बामणे, नगरसेविका डॉ. सौ. स्मिता सुधीर कुंभार (परळकर) तसेच डॉ. श्रदानंद ठाकुर, सुधीर कुंभार, अतुल पाटील (अध्यक्ष रवळनाथ कॉलनी), मयूर परळकर व अमोल जाधव तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन आजरा शहरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले.
आजरा शहराची स्थायी लोकसंख्या सुमारे २४ हजार असून दररोज १४ ते १५ हजारांची तरंगती लोकसंख्या शहरात येत असते. शहराची भौगोलिक रचना गुंतागुंतीची असल्याने कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थेत मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. नगरपंचायतीकडे आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री अपुरी असून, जुन्या कंत्राटाची मुदत संपल्यामुळे नवीन निविदा प्रक्रियेतही अडथळे येत आहेत. परिणामी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आजरा नगरपंचायतीस कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थेसाठी तातडीने निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, आजरा नगरपंचायत वार्ड क्र. १५ मधील उर्वरित गटार बांधकाम व रस्त्याच्या कामांसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची वैयक्तिक मागणी नगरसेवक परशुराम बामणे यांचे कडुन करण्यात आली. पालकमंत्र्यांनी या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले त्याच बरोबर रस्ते आणि पाणी पुरवठा योजनेबाबत ही चार्चा करणेत आली शहरातील रस्ते आजून पूर्ण का झाले नाहीत असे मंत्री महोदयांनी विचारणा केली. त्या वेळी काही रस्ते आपुर्ण आहेत आणि जे रस्ते झाले आहेत त्या ठिकाणी पाण्याची पाईप लाईन रस्त्याच्या मधून गेले मुळे त्या ठिकाणी पाण्याची गळती काढण्यासाठी सिमेंटचा रस्ता फोडून पाईपची गळती काढावी लागत असे अन्याय निवारण समितीने पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी पालकमंत्री म्हणाले की संबंधितांच्या बरोबर चर्चा करून सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिल्याची माहिती प्रतिनिधींनी दिली.
×××××××××××××××××××××
Friday, March 27, 2026
इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे : आ. राजेश क्षीरसागर
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
इराण, अमेरिका-इस्राईल यांच्या युद्धामुळे सध्या सर्वत्र इंधन टंचाई जाणवत आहे. तथापि देश आणि राज्याकडे सुमारे दोन महिने पुरेल इतका इंधनसाठा (पेट्रोल - डिझेल, गॅस) आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. जिल्ह्यात गॅस व पेट्रोल टंचाई संदर्भात विविध अफवा पसरलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज आढावा बैठक घेण्यात आली.
सध्या गॅस व पेट्रोल तसेच डिझेल टंचाईच्या अनुषंगाने नागरिक पॅनिक झाले आहेत. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिक गॅस सिलेंडरसाठी तळपत्या उन्हात तासंन तास उभे राहतात. त्यासाठी संबंधित गॅस एजन्सीने पिण्याचे पाणी तसेच या ग्राहकांसाठी सावलीची सोय करावी. यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यांना आदेश द्यावेत असे सांगून शहरी भागातील नागरिकांनाही रॉकेल देण्यासंदर्भात आपण लवकरच अन्न नागरी पुरवठा विभागाशी बोलणार असल्याचे आमदार क्षीरसागर यावेळी म्हणाले. घरगुती गॅस साठा पुरेशा प्रमाणावर आहे तसेच जिल्ह्यात गॅस पुरवठ्याबाबत परिस्थिती नियंत्रणात आहे. कोल्हापूर शहर व जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नसल्याचे सांगून शाळा, हॉस्टेल, हॉस्पिटल या ठिकाणी प्राधान्याने गॅस पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी या बैठकीत दिली. या बैठकीसाठी हर्षल सुर्वे, शिवाजी जाधव, रणजीत जाधव, कमलाकर जगदाळे, दीपक चव्हाण, राजू भुरी, निलेश हंकारे, दुर्गेश लिंगराज, रमेश खाडे, उदय भोसले, सुनील खोत, किशोर घाडगे, सुनील जाधव, सुरेश माने, अनिल पाटील, धीरज मुळे, अर्जुन आंबी, पूजा रांगणेकर, अमरजा पाटील, पूजा भोर, मंगल कुलकर्णी, प्रीती अतिग्रे यांच्यासह पेट्रोल - डिझेल, गॅस डिलर असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
×××××××××××××××××××××××××××××
Thursday, March 26, 2026
रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली “पीएम-राहत" योजना प्रभावीपणे राबवा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, न्यूज नेटवर्क.....
रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने दीड (१.५०) लाख रुपया पर्यंतचे उपचार पूर्णतः निशुल्क (cashless) उपलब्ध करून देण्या-या “पीएम-राहत” योजनेच्या प्रभावी अमलबजावणीत राज्य आरोग्य हमी सोसायटीची भुमिका महत्वाची असुन, रूग्णाला “गोल्डन अवर” मध्ये तातडीचे उपचार देवून मृत्यूदर कमी करण्यास वाचनबद्ध व्हावे असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी मंत्रालयात आयोजित जनआरोग्य योजनेच्या बैठकीत केले आहे. केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी “Prime Minister - Road Accident Victims Hospitalisation and Assured Treatment (पीएम -राहत ) योजना आणली आहे. या योजने अंतर्गत “आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” व “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना” अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या राज्यातील कोणत्याही रुग्णालयात दाखल झालेल्या अपघातग्रस्तांना तातडीने ७ दिवसांपर्यंत दीड (१.५०) लाख रुपया पर्यंतचे उपचार पूर्णतः निशुल्क (cashless) देण्यात येणार आहेत. अनेकदा अपघात झाल्यावर आर्थिक अडचणींमुळे उपचारास विलंब होतो. वेळेत उपचार मिळत नाहीत. “पीएम-राहत” योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास अपघाती मृत्युचे प्रमाण कमी होईल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
पीएम -राहत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत राज्य आरोग्य सोसायटीच्या प्रशासनाची भुमिका महत्वाची असुन, रूग्णाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी अंगीकृत रुग्णालयात दाखल करणे. पोलिसांकडून अपघाताची खात्री करून उपचारांना मान्यता देणे, PM-RAHAT योजनेअंतर्गत उपचारास मंजूरी देणे व मंजूर दावे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सादर करण्याची आरोग्य सोसायटीची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात (पीएम -राहत ) योजना राबवण्यासाठी परिवहन विभागाच्या अखत्यारीतील “राज्य रस्ते सुरक्षा परिषद” ही नोडल एजन्सी नियुक्त करण्यात आली असुन, योजनेची अंतिम देयके परिवहन विभागामार्फत दिली जातात. रस्ते अपघातानंतर 24 तासांच्या आत रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व अपघातग्रस्त भारतीय तसेच परदेशी नागरिकांनाही “पीएम राहत” योजनेचा याचा लाभ मिळणार आहे. उपचार खर्च अपघाताच्या तारखेपासून कमाल 7 दिवसांपर्यंत कव्हर केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत डिझिग्नेटेड व नॉनडिझिग्नेटेड रुग्णालयांमध्येही उपचार करता येणार आहेत. PMJAY व MJPJAY व PM RAHAT योजनेत सामाविष्ट अंगीकृत रुग्णालये ही DESIGNATED रुग्णालये आहेत. या व्यतिरिक्त सर्व रुग्णालये NONDESIGNATED रुग्णालये आहेत. या सर्व रुग्णालयात अपघात ग्रस्त रुग्णास STABILAIZATION TREATMENT देणे अपेक्षित आहे. STABILIZATION TREATMENT नंतर रुग्णास पुढील उपचारांसाठी DESIGNATED अंगीकृत रुग्णालयात शिफ्ट करणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 112 या Emergency Response Support System (ERSS) क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच या योजनेचे माहिती सर्व नागरिकापर्यन्त पोहचवावी असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. या बैठकीला आरोग्य सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आणासाहेब चव्हाण, नागरी आरोग्य अभियान आयुक्त सुनील भोकरे, जन आरोग्य योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानंद जगताप, आरोग्य विभागाच्या सह संचालिका डॉ. सुनीता गोल्हाईत व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
×××××××××××××××××××××××××
घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये व्यावसायिक वापर प्रतिबंधित; वडणगे (ता. करवीर) येथील राजवाडा हॉटेलवर कारवाई
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
जीवनावश्यक वस्तू व सेवा (नियमन) कायदा, १९५५ च्या कलम ३ व ७ अंतर्गत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कोणत्याही व्यावसायिक अस्थापनांमध्ये वापर पूर्णपणे प्रतिबंधित आहे. या कायद्याचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या करवीर तालुका, वडणगे गाव परिसरातील हॉटेल राजवाडा वर दि.25/03/2026 रोजी रात्री 8.00 सखोल कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी कोल्हापुर यांचे दि.06/03/2026 चे परिपत्रकानुसार कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन, हॉटेल्स तसेच कॅटरिंग सेवा देणा-या अस्थापनांनी व्यवसायीक गॅस सिलेंडरचाच वापर करणे बंधनकरक आहे. तथापी अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तरी घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायिक वापर करणे हा जीवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 अंतर्गत दंडनीय गुन्हा असुन तसेच सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. या संदर्भाने अमोल येडगे जिल्हाधिकारी कोल्हापुर व जिल्हा पुरवठा अधिकारी, मोहिनी चव्हाण यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी विकास देसाई व पुरवठा निरीक्षक सचिन लामखडे यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. तपासात ६ घरगुती १४.२ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडर हॉटेलच्या स्वयंपाकघरात व्यावसायिक वापरासाठी सापडले. हे सिलेंडर तात्काळ जप्त करण्यात आले असून, करवीर पोलीस स्टेशनमध्ये हॉटेल मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर सर्व व्यावसायिक यांनी गॅस कंपन्यांकडून पुरवठा केलेले घरगुती गॅस सिलेंडर केवळ घरगुती वापरासाठीच असून व्यावसायिक ठिकाणी कमर्शियल सिलेंडरचाच वापर करणेत यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापुर यांचेकडुन करण्यात येत आहे.
×××××××××××××××××××××××××
‘गोकुळ’ परिवारामार्फत ना. हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात व सेवाभावी वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम संघाचे माजी चेअरमन, ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील, चेअरमन नविद मुश्रीफ तसेच संचालक मंडळ, कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील म्हणाले कि, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेले वरदान असून त्यांचा कार्यकाळ खऱ्या अर्थांनी विकास पर्व ठरला आहे. समाजातील वृद्ध, अपंग, निराधार व रुग्ण घटकांसाठी त्यांनी सातत्याने संवेदनशीलतेने काम केले असून समाजातील प्रत्येक घटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले असल्याचे मनोगत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या वाढदिवसाच्या निमित्ताने गोकुळ परिवाराच्यावतीने ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालय येथील प्रागणांमध्ये औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथील रुग्ण, नातेवाईक व कर्मचारी यांना मोफत फळे तसेच सुगंधी दूध वाटप करण्यात आले. जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना, कोल्हापूर (बालकल्याण संकुल) येथे मुलांसाठी जीवनावश्यक असणाऱ्या व दैनंदिन वापराच्या वस्तूंचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास गोकुळचे पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांद्वारे गोकुळ परिवाराने वाढदिवस साजरा करण्याचा एक आदर्श निर्माण केला आहे. याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, बालकल्याण संकुलच्या मानद कार्यवाह श्रीमती पद्मजा तिवले, पी. के. डवरी, सचिन माने, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. पी.जे.साळुंके, सहा. व्यवस्थापक संकलन दत्तात्रय वागरे, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, डॉ. एम. पी. पाटील, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
××××××××××××××××××××××××××
Wednesday, March 25, 2026
कोल्हापूर विमानतळ विकासासाठी ५० कोटी : पालकमंत्री आबिटकर; विस्तारीकरणाच्या कामास मिळणार गती
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क...
कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० कोटींचा निधी मंजूर केला असून या निधीमुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांना गती मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. मंजूर निधीतून कोल्हापूर-हुपरी मार्गावरील वळतीकरण, रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विमानतळावरील सध्याची १३७० मीटर धावपट्टी वाढवून ती २३०० मीटरपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त ६७ एकर जमिनीची गरज होती. जिल्हा प्रशासनाने जवळपास तीन वर्षे प्रक्रिया राबवून ही जमीन संपादित केली. यापूर्वी ताब्यात दिलेल्या जमिनीबरोबरच उर्वरित ६७ एकर जमीन २० जानेवारी २०२५ रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या ताब्यात देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, विस्तारित क्षेत्रातून जाणाऱ्या कोल्हापूर-हुपरी रस्त्याचा प्रश्न सुटल्याशिवाय जमीन ताब्यात घेण्यास प्राधिकरणाने नकार दिला होता. आता त्यासाठी निधी मंजूर झाला असून या रस्त्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. धावपट्टी २३०० मीटरपर्यंत वाढल्यानंतर मोठ्या आकाराची विमाने कोल्हापूर विमानतळावर उतरू शकणार आहेत. त्यामुळे मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांसोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या शक्यताही निर्माण होणार आहेत.
राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी शासनाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली आहे. त्याअंतर्गत राज्य शासनाने विविध विमानतळांच्या विकासासाठी १६९ कोटी २१ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली असून यामध्ये कोल्हापूर विमानतळासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी कोल्हापूर-हुपरी रस्त्याचे वळतीकरण करणे आवश्यक आहे. या कामासाठी भूसंपादन, नवीन रस्ता बांधकाम तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा अस्थापना खर्च या सर्व बाबींसाठी मंजूर निधीचा वापर करण्यात येणार आहे. या कामांमुळे विमानतळ विस्तारासाठी आवश्यक जमीन उपलब्ध होणार असून भविष्यात मोठ्या विमानांची सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. कोल्हापूरसह पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड तसेच दक्षिण महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना अधिक पर्यटक आकर्षित होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, शासनाने मंजूर केलेला निधी ३१ मार्च २०२६ पूर्वी संबंधित विकासकामांसाठी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले असून खर्चाबाबत उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
××××××××××××××××××××××××××
कोल्हापूर जिल्ह्यात अफवांमुळे पेट्रोल पंपांवर मागणी व पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने प्रशासनाकडून निर्बंध; नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घेण्याचे आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क...
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर (पुरवठा शाखा) यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार, कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तथापि, समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असून मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, ज्यामुळे मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आणि इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून काही निर्बंध लागू केले आहेत. या आदेशानुसार आता दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत आणि तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 2000 रुपयांपर्यंतच इंधन भरता येईल. कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना इंधन पुरवठ्यात प्राधान्य दिले जाईल. तसेच, प्रत्येक पेट्रोल पंपाने आपल्याकडील शिल्लक साठा, प्राप्त झालेला साठा आणि मागणी केलेल्या साठ्याची माहिती दर्शनी भागातील फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील. सर्व पेट्रोल पंपधारकांनी या आदेशाचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. हा आदेश 25 मार्च 2026 पासून तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून तो 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहील.
××××××××××××××××××××××××××××××
Tuesday, March 24, 2026
लघुलेखन परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी 30 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या माध्यमातून शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (GCC-TBC) लघुलेखन परीक्षा व ऑनलाइन दरवर्षी जून व डिसेंबर महिन्यात घेण्यात येतात. माहे जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 10 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahaamrut.org.in/) ऑनलाईन पद्धतीने 30 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पुणे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले.
ही योजना खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. पात्र गटांमध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी आदींचा समावेश आहे. ऑनलाइन अर्जासोबत गत आर्थिक वर्षाचे (सन 2025-26) अथवा पुढील आर्थिक वर्षासाठी (सन 2026-27) लागू असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा EWS प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, लक्षित गटाची जात नमूद असलेला शासकीय पुरावा (उदा. T.C./L.C./ शालेय निर्गम उतारा इ.), परीक्षा (माहे जानेवारी 2026) उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व बँक खाते तपशीलासाठी बँकेचे पासबुक/रद्द केलेला धनादेश (Cancelled Cheque) याची स्पष्ट प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
××××××××××××××××××××××××××
Saturday, March 21, 2026
कोल्हापूरच्या धान्य महोत्सवात पहिल्याच दिवशी ५० लाखांहून अधिक उलाढाल; कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक २१ व २२ मार्च २०२६ रोजी 'जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय महोत्सव राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील स्मृती सदन येथे पार पडत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज, २१ मार्च रोजी कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड आणि उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाला ग्राहकांनी पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद दिला असून, अवघ्या एका दिवसात तब्बल ५० लाख रुपयांहून अधिक उलाढाल झाली आहे. या धान्य महोत्सवामध्ये ग्राहकांना शेतकऱ्यांकडून थेट १००% शुद्धतेचे धान्य आणि ओडीओपी (ODOP) व जीआय (GI) मानांकन प्राप्त दर्जेदार शेतीमाल खरेदी करण्याची संधी मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूरचा सेंद्रिय गूळ, काकवी, पाटगावचा मध, आजरा घनसाळ आणि विविध प्रकारचे तांदूळ थेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इतर जिल्ह्यांतील प्रसिद्ध शेतीमालही ग्राहकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये सोलापूरची ज्वारी, साताऱ्यातील 'फळांचे गाव' असलेल्या धुमाळवाडी येथील द्राक्षे, अंजीर, वॉटर ॲपल, कलिंगड, पेरू, डाळिंब, खरबूज, वाईगाव हळद, खपली गहू, पाटगाव मध, देशी अंडी आणि विविध प्रक्रियायुक्त पदार्थांचा समावेश आहे. महोत्सवामध्ये बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले 'रेडी टू सर्व्ह' खाद्यपदार्थ आणि कृषी विभागाच्या विविध प्रकल्पांतर्गत तयार झालेले प्रक्रियायुक्त पदार्थही ग्राहकांना पाहण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आणि आस्वाद घेण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उद्या, २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता कृषी विभागातर्फे एका विशेष 'पौष्टिक तृणधान्य रॅली'चे आयोजनही करण्यात आले आहे. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पौष्टिक तृणधान्यांच्या वापराबाबत जनजागृती करणे आणि महिला शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ही बाईक रॅली प्रामुख्याने महिला बाईक रायडर्सची असणार आहे. रॅलीचा मार्ग दसरा चौक, बिंदू चौक, उमा थिएटर चौक, बागल चौक, जनता बाजार चौक ते व्ही. टी. पाटील स्मृती भवन (समारोप) असा राहील. महिला शेतकऱ्यांचा सन्मान आणि आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या रॅलीला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या दिवसाच्या प्रचंड यशानंतर, सर्व कोल्हापूरकरांनी २२ मार्च रोजीही या धान्य महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन दर्जेदार शेतीमालाची खरेदी करावी आणि या उपक्रमास असाच उदंड प्रतिसाद द्यावा. तसेच, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपला दर्जेदार शेतीमाल या प्रदर्शनात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
××××××××××××××××××××××××××
रमजान ईद व गुढीपाडवा निमित्त ‘गोकुळ’ च्या दुधाची विक्रमी विक्री; रमजान ईद दिवशी २५ लाख ४५ हजार लिटर दूध विक्रीचा ‘गोकुळ’ चा नवा उच्चांक
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, (गोकुळ) कडून रमजान ईद व गुढीपाडवा या दुहेरी सणांच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या विक्रीत यंदा उल्लेखनीय वाढ नोंदवण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी लक्षात घेऊन गोकुळने संकलन व वितरण यामध्ये प्रभावी नियोजन केले याच नियोजनबद्ध कामगिरीमुळे रमजान ईद दिवशी २५ लाख ४५ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली असून हा गोकुळच्या इतिहासातील एक दिवसाचा उच्चांक ठरला आहे. तसेच गुरुवार दि.१९/०३/२०२६ इ.रोजी साजऱ्या झालेल्या गुढीपाडव्यानिमित्य १८ लाख लिटर्स दूध विक्री झाली असून श्रीखंड व बासुंदी या सारख्या दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीत उच्चांकी वाढ झाली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संघाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ व गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला व रमजान ईद दिनानिमित्य गोकुळ परिवाराच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघ हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ आहे. सणासुदीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर दुधाचा सुरळीत पुरवठा करणे ही उल्लेखनीय बाब आहे. गोकुळने शेतकरी आणि ग्राहक यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. या यशामध्ये दूध उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान असून, गोकुळ परिवाराच्या एकजुटीचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “रमजान आणि गुढीपाडवा या सणांच्या पार्श्वभूमीवर गोकुळ परिवाराने एकजुटीने काम केले. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला सातत्यपूर्ण व दर्जेदार पुरवठा, तसेच अधिकारी व कर्मचारी, वितरकांचे योग्य नियोजन यामुळेच ही विक्रमी विक्री शक्य झाली. गोकुळचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना योग्य दर देत ग्राहकांपर्यंत दर्जेदार दूध पोहोचवणे हा आहे. भविष्यातही याच ध्येयाने अधिक सक्षम सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
गुढीपाडवा व रमजान ईद हे पवित्र सण या दिवशी गोडधोड करण्यासाठी दुधाला मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी असते. यावेळी रमजान ईद निमित्य २५ लाख ४५ हजार ०४७ लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात झाली. गेल्यावर्षी रमजान ईदला २३ लाख ६३ हजार १७० लिटर्स दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये १ लाख ८१ हजार ८७७ लिटर्सची वाढ झाली. तसेच झालेल्या गुढीपाडव्यादिवशी १८ लाख लिटर्स दूध विक्री तसेच श्रीखंड व बासुंदी विक्री मध्ये उच्चांकी वाढ झाली असून गोकुळने सातत्याने प्रगतीचा आलेख उचावत नवीन मानदंड निर्माण केला आहे. या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, वितरक, दूध संस्था, कर्मचारी, अधिकारी, केंद्र चालक, वाहतूक ठेकेदार व हितचिंतक मोलाचे योगदान आहे. सर्व घटकांच्या समन्वयातून गोकुळने विक्रीत उल्लेखनीय वाढ सद्य केली आहे. तसेच चेअरमन नविद मुश्रीफ यांनी भविष्यात प्रतिदिन २७ लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय, दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्य करू असा विश्वास व्यक्त केला. रमजान ईद दिनानिमित्त दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, वितरक, व संघाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, प्रकाश आडनाईक, कैलास मोळक, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच मार्केटिंग विभागाचे अधिकारी व कर्मचारी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
×××××××××××××××××××××××××××
Friday, March 20, 2026
विद्या मंदिर शेळप शाळेत महिला मेळावा उत्साहात संपन्न
आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
विद्या मंदिर शेळप (ता. आजरा) शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हळदी-कुंकू व महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती आजराच्या उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार होत्या.
कार्यक्रमानिमित्त महिलांच्या संगीत खुर्ची, मकडी चाल, फुगे फोडणे व जोडीदाराच्या मदतीने फुगा घेऊन धावणे या फनी गेम्स घेण्यात आल्या. मुख्याध्यापक संभाजी बापट यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेने वर्षभरात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच भविष्यातील येणाऱ्या समस्यांचा वेध घेऊन शाळा विद्यार्थ्यांप्रती गुणवत्तापूर्ण शिक्षणावर कसा भर देत आहे याची माहिती दिली. स्पर्धेमधील विजेत्या माधवी तेजम, अंकिता नार्वेकर, अश्विनी डोंगरे, सोनाली माडभगत, नीता नवार, कविता पाटील यांना उपसभापतींच्या हस्ते बक्षीस वितरण केले. महिला आरोग्य व आजची स्त्री या विषयावर हाळोली शाळेच्या अध्यापिका अर्चना पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिला बचत गट व महिलांना येणाऱ्या समस्या याबाबतीत महिलांनी पंचायत समितीशी संपर्क करावा असे आवाहन उपसभापतीनी केले. महिलांच्या समस्या सोडवण्यास नेहमीच प्राधान्य दिले जाईल असे उपस्थित महिलांना आश्वासन दिले. उपसभापतीनी शाळा व कामकाजाची पाहणी करून शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी गौरव उद्गार काढले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच अर्जुन बागडी व ज्येष्ठ सदस्य श्री. सुधाकर पाटील, महिला सदस्या उर्मिला गुंजाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयसिंग पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सूत्रसंचलन परमेश्वर नलवडे यांनी केले तर आभार रवींद्र नावलकर यांनी मानले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
उतूरच्या महिला आता कबड्डीच्या मैदानात.....
आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
उत्तूर (ता.आजरा ) येथील महिला पारंपरिक सामाजिक बंधने तोडून कबड्डीच्या मैदानात बाजी मारत आहेत. कब्बडी खेळणा-या या महिलांनी कौटुंबिक आणि सामाजिक अडथळ्यांवर मात करून आत्मसन्मान आणि शारीरिक क्षमता सिद्ध केली आहे. हा खेळ त्यांच्यासाठी सक्षमीकरणाचे साधन बनला आहे.
राजश्री शाहू महाराज कला अकादमीच्या कार्यकर्त्या निता घोरपडे यांनी उत्तूर गावातील तळागळातील महिलाना कबड्डी खेळण्यासाठी प्रोत्साहीत केले. त्यांचा एक संघ तयार केला. या महिलांनी येथील कन्या विद्यामंदिरच्या पटांगणावर रोज रात्री एक तास सराव केला.यामुळे या महिलांचा शारीरिक तंदुरुस्तीबरोबर आत्मविश्वासही वाढला. सोनारवाडी (ता. चंदगड) येथे महिलांच्या कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नामांकित संघ यामध्ये सहभागी झाले होते. या संघातील तगड्या महिला पाहून आपला यांचेसमोर टिकाव लागणार नाही अशी भावना तयार झाली. मात्र निता घोरपडे यांनी सर्वाना धिर देवून मैदानात उतरवले. या नवख्या महिलांचा खेळ पाहून प्रेक्षकांनी दाद दिली. या खेळात उत्तूरच्या महीला संघाला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. संघातील सर्व खेळाडूंचा सन्मान पत्र व मेडेल देऊन सन्मानित करण्यात आले. या संघात अश्विनी कृष्णा शिंदे, सुनीता दशरथ आरेकर, ऋतुजा रजिंद्र चव्हाण, शीतल बाळकृष्ण भाईगडे, वैशाली राजेंद्र बामणे, मनिषा गजानन कुंभार, आयेशा विश्वास माने, स्वाती बाहुबली हजारे, सवीता गणपती चव्हाण यांचा समावेश आहे. तेजस्वीनी राजेंद्र बामणे यांनी मार्गदर्शक (कोच) म्हणून काम पाहिले.
×××××××××××××××××××××××××
Thursday, March 19, 2026
यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी नको, सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे; जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे १ एप्रिल रोजी होणाऱ्या श्री जोतिबा देवाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पूर्वतयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत असून, या पार्श्वभूमीवर एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या प्रमुख उपस्थितीत जोतिबा डोंगरावर ही बैठक पार पडली. या यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमधून लाखो भाविक येत असल्याने यंदाचे नियोजन अधिक प्रभावीपणे आणि वेळेत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि तहसीलदार माधवी शिंदे यांनी यापूर्वीच सर्व विभागांना मागील वर्षीच्या यात्रेदरम्यान केलेल्या कामकाजाचा आणि कार्यवाहीचा सविस्तर आढावा दिला.
बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष डोंगरावरील विविध ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली. यात्रेदरम्यान पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्लास्टिक वापराबाबत कडक निर्बंध घालण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, डोंगरावर स्वच्छता राखण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पिण्याचे पाणी आणि शौचालय व्यवस्थेची ठिकठिकाणी सोय करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. विशेषतः दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगांचे योग्य नियोजन करून त्या ठिकाणी सावली आणि पाण्याची व्यवस्था करण्याबाबत त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून मार्गदर्शन केले. बैठकीत ग्रामस्थांकडून श्री. जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा मंजुरी मिळाल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. या बैठकीत प्रामुख्याने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन, आरोग्य सुविधांसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व सीपीआर रुग्णालय, आणि प्रवासाच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व केएमटी परिवहन विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. त्याचप्रमाणे डोंगरावरील वीज पुरवठा, प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हा होमगार्ड, स्थानिक ग्रामपंचायत वाडीरत्नागिरी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत आणि सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा, यासाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केले.
×××××××××××××××××××××××××
आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त ८ कोटी ४७ लाखाच्या ठेवी जमा
आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एका दिवसात १ हजार ४७९ नवीन खाती उघडून तब्बल ८ कोटी ४७ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. सध्या बँकेकडे १ हजार १२८ कोटी रूपयाच्या ठेवी व ७६८ कोटी रुपयाची कर्जे असून एकूण मिश्र व्यवसाय १ हजार ८९६ कोटी इतका झाला आहे. त्याबाबत बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, व्हा. चेअरमन संजय चव्हाण व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले व सर्वांना बँकेच्या वतीने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
बँकेने केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP तसेच राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना या केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदान योजना तसेच अॅपलच्या कोणत्याही प्रोडक्ट्ससाठी माफक व्याजदरात अॅपल कर्ज योजना व पर्यटकांसाठी हमसफर कर्ज योजना राबविल्या आहेत. बँकेमध्ये आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून बँकेत सेव्हिंग खाती उघडण्याची सुविधा आहे. मोबाईल बँकिंग, IOS application, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsapp Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत याचा फायदा ग्राहकांनी घ्यावा असे मत बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी यांनी व्यक्त केले.
×××××××××××××××××××××××××××××
स्वामी विवेकानंद नागरी पतसंस्थेचे गुढीपाडवा मुहूर्तावर एकाच दिवशी ३ कोटी ५५ लाख ठेव संकलन
आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा या संस्थेने गुढीपाडव्याच्या मंगल पर्वावर रू. ३ कोटी ५५ लाख २० हजार ३५० इतक्या विक्रमी ठेव संकलनाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. गुढीपाडवा हा नवसंवत्सराचा उत्सव असुन या शुभमुहूर्तावर संस्थेच्या सभासद, ठेवीदार, खातेदार यांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाच्या जोरावर संस्थेने अवघ्या एका दिवसात तब्बल रू. ३ कोटी ५५ लाख २० हजार ३५० इतके ठेव संकलन करत संस्थेच्या आर्थिक बळकटीकरणाचा व आपल्या विश्वासार्हतेचा ठसा उमटवला आहे.
सभासदांचा आणि ठेवीदारांचा वाढता विश्वास हीच संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद आहे. सभासदांच्या हिताचे दृष्टीने व संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी संस्था सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबवते. संस्थेच्या संचालक मंडळाच्या नियोजनबध्द कार्यपध्दती आणि सभासदांच्या विश्वासामुळेच हे विक्रमी ठेव संकलन करणे साध्य झाल्याचे संस्थेचे चेअरमन दयानंद सिध्दाप्पा भुसारी यांनी सांगितले या ठेव संकलनामुळे पतसंस्थेच्या आर्थिक स्थैर्यात आणखी भर पडली आहे तसेच समाजाला आर्थिक दृष्टया भक्कम आधार देण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी संस्था कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेकडे एकूण रू. १९० कोटींच्या ठेवी, रू. १५३ कोटी कर्जवाटप, ऑडिट वर्ग सतत 'अ' असून एकूण ९ शाखा कार्यरत आहेत. सर्व ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेला राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संस्थेच्या सर्व शाखांकडे ऑनलाईन वीज बिल, फोनबिल, डीटीएच रिचार्ज, सोनेतारण कर्जाची सोय, मनिट्रान्स्फर करणेची सोय, एनईएफटी, आरटीजीएस, क्यू आर कोड, आयएमपीएस, एसएमएस इ. अनेक सुविधा सभासदांकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून सभासदांना जलद व ऑनलाईन सेवा देणेसाठी संस्था लवकरच कोअर बँकिंग सिस्टीम लागू करत आहे. संस्थेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक यांनी संस्थेवर दाखविलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल व कर्मचारी यांनी ठेव संकलनासाठी केलेल्या विशेष परिश्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन दयानंद सिध्दाप्पा भुसारी, व्हा. चेअरमन सुधीर बाबुराव कुंभार, सरव्यवस्थापक अर्जुन रामा कुंभार व संचालक मंडळ यांनी सर्वांचे आभार मानले.
××××××××××××××××××××××××××
जनता सहकारी गृहतारण संस्थेमध्ये गुढीपाडव्याला १ कोटी ३५ लाख ९१ हजार रुपये ठेवींचे संकलन
आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
जनता सहकारी गृहतारण संस्था मर्या., आजरा संस्थेमध्ये गुढीपाढव्यानिमित्त ७ शाखांमध्ये मिळून तब्बल १ कोटी ३५ लाख ९१ हजार इतक्या ठेवींचे संकलन झाले, अशी माहिती जनता सह गृहतारण संस्थेचे चेअरमन मारुती मोरे यांनी दिले.
चेअरमन मारुती मोरे म्हणाले, शाखा आजरा, गडहिंग्लज, कोल्हापूर, गारगोटी, इचलकरंजी, सांगली, पाटणे फाटा (ता. चंदगड) या शाखेमधून वरीलप्रमाणे ठेवी जमा झाल्या असुन याकामी संस्थेचे संचालक मंडळ, सर्व शाखांचे संचालक मंडळ व मुख्य कार्यालय अधिकारी, सर्व शाखांचे शाखाधिकारी व स्टाफ यांनी विशेष प्रयत्न करुन ठेवीचे संकलन केले, याबददल संस्थेचे चेअरमन मारुती मोरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व ठेवीदारांचे आभार व्यक्त केले.
×××××××××××××××××××××××××
Tuesday, March 17, 2026
कोल्हापूर जिल्ह्यात ‘व्हिजन फॉर ऑल’ उपक्रमाची सुरुवात ५,२८० विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असूनही आर्थिक अडचणीमुळे चष्मा घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने ‘व्हिजन फॉर ऑल’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत आर.बी.एस.के. कार्यक्रमातून शासकीय व निमशासकीय शाळांमधील गरजू मुला-मुलींना मोफत चष्मे देण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ५ हजार २८० विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले आहेत. तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे – आजरा १९९, भुदरगड १७४, चंदगड २८, गडहिंग्लज २१२, गगनबावडा १८, हातकणंगले ६८४, कागल १८७, करवीर ४०५, पन्हाळा ४६३, राधानगरी ६३२, शाहूवाडी २३१, शिरोळ ८४०, कोल्हापूर महानगरपालिका ५१९ व नगरपालिका क्षेत्रात ६८८ विद्यार्थ्यांना चष्मे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने उपस्थित होते.
दि. १४ मार्च रोजी हॉटेल वृषाली येथे झालेल्या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये कु. मुक्ती राजू भस्मे (इंदुमती गर्ल्स हायस्कूल), कु. संध्या शिवाजी गवळी (जरगनगर विद्यालय), कु. माहिन जमीर शिकलगार (जरगनगर विद्यालय), इमामहुसेन मलिक पठाण (टेंबलाईवाडी विद्यालय), माधव कैलास सूर्यवंशी (वीर ककया विद्यालय), मेघराज कुमार कांबळे (गोविंद पानसरे विद्यामंदिर) आणि जय धोडीराम शिंदे (कोटितीर्थ विद्यालय) या विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी मदत होणार असून त्यांच्या दृष्टी आरोग्यातही सुधारणा होण्यास हातभार लागणार आहे.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
नेदरलॅन्ड्सच्या तज्ज्ञांकडून ‘गोकुळ’च्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मार्गदर्शनामुळे पशुधन विकासाला चालना; शेतकऱ्यांना होणार थेट लाभ....
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्यावतीने दुग्ध व्यवसाय आणि पशुधन व्यवस्थापन क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नेदरलँड्समधील पी.यू.एम. (प्रोजेक्ट आउट सेंडर मॅनेजर्स) या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने गोकुळ दूध संघातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले दहा दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. या प्रशिक्षणासाठी नेदरलँड्सचे अनुभवी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. एर्विन द. विथ यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते विकास कक्ष, ताराबाई पार्क येथे डॉ. विथ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, प्रकाश पाटील तसेच संघाचे अधिकारी उपस्थित होते.
गोकुळ संघाने पी.यू.एम. संस्था नेदरलँड्स सोबत १८ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२७ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी सहकार्य (फ्रेमवर्क) करार केला असून या करारानुसार दर दोन महिन्यांनी विविध विषयांतील तज्ज्ञ गोकुळ संघात येऊन मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे गोकुळच्या पशुवैद्यकीय पशुपालन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन मिळणार आहे. या करारांतर्गत पहिल्या टप्प्यातील “जनावरांची दूध उत्पादकता वाढविणे व गोठा व्यवस्थापन” या विषयावर दि. ६ मार्च ते १७ मार्च २०२६ या कालावधीत प्रशिक्षणाचे आयोजन स्व. आनंदराव पाटील-चुयेकर प्रशिक्षण केंद्र, ताराबाई पार्क येथे पार पडले. या प्रशिक्षणात संघातील एकूण ४३ पशुवैद्यकीय अधिकारी सहभागी होते. प्रशिक्षणा दरम्यान गोकुळ मार्फत सद्या चालेल्या पशुसंवर्धन विभागातील कामकाज तसेच दूध उत्पादक पातळीवरील अडचणी यांची माहिती देण्यात आली. तसेच दूध उत्पादक स्तरावरील अडचणीवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन व उपाय सुचवले. प्रत्यक्ष गोठा भेटी, प्रात्यक्षिके, सादरीकरणे (प्रेझेंटेशन) आणि गटचर्चा यांच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आली.
तसेच या प्रशिक्षणादरम्यान जनावरांची उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना, जनावरांच्या हालचाली व आरोग्य निरीक्षण, वांझपणाच्या समस्या व त्यावरील उपाय, वासरांचे संगोपन, जनावरांना योग्य वेळेत माजावर आणण्याची कार्यपद्धती, गोठा व्यवस्थापनातील सुधारणा तसेच उष्णतेमुळे जनावरांवर होणाऱ्या ताणाचे व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन कसे करावे, त्यांच्या अडचणी ओळखून त्वरित उपाययोजना कशा कराव्यात याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमामुळे गोकुळ संघातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान अद्ययावत होणार असून त्याचा थेट फायदा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. उत्पादनवाढ, जनावरांचे आरोग्य सुधारणा आणि गोठा व्यवस्थापनातील कार्यक्षमता वाढ यामुळे दुग्धव्यवसाय अधिक सक्षम व फायदेशीर होण्यास मदत होणार आहे. पुढील दोन वर्षांच्या कालावधीत या कराराअंतर्गत पशुधन व्यवस्थापन, प्रजनन क्षमता सुधारणा, जनावरांचे आरोग्य, खाद्य व चारा व्यवस्थापन तसेच विपणन व धोरणात्मक नियोजन या विषयांवरही पी.यू.एम.कडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ संघाने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. मात्र, मागील काही वर्षांत पशुपालन क्षेत्रात काही आव्हाने जाणवत होती. विशेषतः जनावरांमध्ये वांझपणाचे प्रमाण वाढणे, दूध उत्पादनात अपेक्षित वाढ न होणे, गोठा व्यवस्थापनातील काही त्रुटी तसेच उष्णतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर होणारा ताण या समस्या शेतकऱ्यांसमोर होत्या. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. गोकुळ दूध संघाचे पशुवैद्यकीय क्षेत्रातील कामकाज, शिस्तबद्ध सेवा आणि शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी पाहूनच नेदरलँड्समधील पी.यू.एम. या संस्थेने गोकुळची निवड केली, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ही निवड गोकुळच्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील दखल असल्याचे द्योतक आहे. या उपक्रमामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान वाढून शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळणार असून दूध उत्पादन वाढ, पशुधन विकासाला चालना मिळण्यास निश्चित मदत होईल. असा आम्हाला विश्वास आहे. भविष्यातही अशा आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून गोकुळ संघ अधिक सक्षम, आधुनिक व स्पर्धात्मक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.प्रकाश साळुंखे, डॉ.दयावर्धन कामत, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.तानाजी कडवेकर, डॉ.सुभाष गोरे, डॉ.रणजीत चोपडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
×××××××××××××××××××××××××
पर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
पर्यटन संचालनालयामार्फत नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे विभागातील इच्छुक युवक, युवतींसाठी Tourist Guide Training आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये पर्यटन स्थळांवर मार्गदर्शन, आदरातिथ्य सेवा व पर्यटन संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पर्यटन स्थळांची माहिती करून देण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत पर्यटन सुलभ मार्गदर्शक (टूर गाइड) तयार करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी गुगल फॉर्मवर अर्ज करावेत, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक भरत लांघी यांनी केले.
पुणे प्रादेशिक विभागातील (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर) इच्छुक उमेदवारांना सहभाग घेता येणार आहे. पुणे प्रादेशिक विभागातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांबाबत पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी एकूण 200 युवकांना प्रशिक्षण देण्यात येईल. पर्यटन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 45 वर्षे असावे व उमेदवार किमान कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. ग्वाल्हेरचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अॅन्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट (आयटीटीएम) तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. सात दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थीना पर्यटन प्रमाणपत्र संचालनालयाकडून देण्यात येईल. सिंहस्थ कालावधीत टूर गाइड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. फिरस्तीची आवड असलेल्या युवकांनी प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. लांघी यांनी केले आहे. इच्छुक नोंदणीसाठी गुगल फॉर्मवर उपलब्ध करून दिली असून, 20 मार्च अखेर दुपारी 3 वाजेपर्यंत दिलेल्या मुदतीत अर्ज करायचा आहे. अर्जाची निवड प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केली जाईल. इच्छुकांना https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbn0rmXID8oR8hfCD_Zdx1PyHbLDcUeAynPwPWHs5RgVKG4Q/viewform?usp=publish-editor लिंकवर नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक पर्यटन कार्यालय, पुणे दूरध्वनी क्र. 8080035134 वर संपर्क साधावा.
××××××××××××××××××××××××××
Monday, March 16, 2026
कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन....
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले.
जिल्हा प्रशासन व पुरवठा विभाग यांच्यामार्फत सर्व गॅस एजन्सींवर सतत देखरेख ठेवण्यात येत असून प्रत्येक वितरकाला संबंधित तालुक्यांतील गॅस एजन्सी आणि ग्राहकांशी नियमित संपर्क ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोणत्याही विक्रेत्याकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने विक्री करणे किंवा अन्य गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अत्यावश्यक सेवा जसे की हॉस्पिटल तसेच विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृहे यांना गॅस सिलिंडरचा पुरवठा प्राधान्याने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी घरगुती गॅसचा काळाबाजार, साठेबाजी किंवा जादा दराने विक्री होत असल्यास त्याबाबत प्रशासनास कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांनी आपल्या तक्रारी 0231-2655579 तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक 8390732026 या हेल्पलाईन क्रमांकावर नोंदवाव्यात. तसेच संबंधित ठिकाणाचा पत्ता, फोटो किंवा उपलब्ध माहिती या क्रमांकावर पाठवावी. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
××××××××××××××××××××××××××××××
Subscribe to:
Posts (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...