Thursday, August 29, 2024

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरचे कार्य आदर्शवत : आमदार प्रकाश आबिटकर; आजरा येथे वाचनालयाच्या अद्यावत इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरचे कार्य आदर्शवत : आमदार प्रकाश आबिटकर; आजरा येथे वाचनालयाच्या अद्यावत इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ  
आजरा, वृत्तसेवा :

आजरा तालुक्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक चळवळीला बळकटी देण्याचे काम श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरने केले आहे. तालुक्याच्या वाचन संस्कृतीला बळ मिळावे म्हणून ग्रामीण भागात वाचनालय उभारणीस श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरने नेहमीच मदत केली आहे. त्याचबरोबर वाचन मंदिर नेहमीच विविध उपक्रम राबवत असते हे कौतुकास्पद आहे. या वाचन मंदिरचे सर्वच कार्य आदर्शवत आहे. हा आदर्श साऱ्यांनीच घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते आजरा येथे श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या अद्यावत इमारत बांधकामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रो. डॉ. अशोक बाचूळकर होते. आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या अद्यावत इमारतीसाठी नगर विकास विभागाच्या विशेष घटक योजनेतून आमदार आबिटकर यांच्या प्रयत्नातून  चार कोटी पन्नास लाख रुपये मंजूर झाले. या इमारत बांधकामाचे भूमिपूजन आमदार आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
 स्वागत व प्रास्ताविकात वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. बाचुळकर यांनी वाचनालयाच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच वाचनालयाच्या माध्यमातून आगामी काळात फिरते ग्रंथालय व अद्यावत स्पर्धा परीक्षा विभाग सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले. आमदार आबिटकर पुढे म्हणाले, नवीन वास्तूच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढविण्यास हातभार लागणार आहे. वाचनाचा छंद जोपासला गेला पाहिजे कारण वाचनामुळे समृद्धता येते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात वाचन संस्कृतीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. वाचनालयाची उभी राहणारी नवीन वास्तू आजऱ्याच्या सौंदर्यात भर घालणारी ठरणार आहे. विकास कामांच्या बरोबरच इतर कामाकडेही लक्ष देता आले याचे समाधान असल्याचेही आमदार आबिटकर यांनी सांगितले. अण्णाभाऊ संस्था समूहप्रमुख अशोक चराटी म्हणाले, आजरा तालुका वासियांनी वाचन संस्कृती टिकून ठेवली आहे. याचा तालुक्याच्या जडणघडणीला फायदा झालेला आहे. सुधीर कुंभार म्हणाले, मतदार संघाचा सर्व अंगाने विकास कसा करावा हे आमदार आबिटकर यांनी दाखवून दिले आहे. असा आमदार आम्हाला लाभला हे आमचे भाग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता राजेंद्र सावंत यांनी वाचनालयाच्या नवीन इमारतीची तांत्रिक माहिती दिली. यावेळी जयवंत पन्हाळकर यांनी वाचनालयासाठी एक लाख एक हजार रुपयांची देणगी जाहीर केली. यावेळी माजी नगराध्यक्षा ज्योस्ना चराटी, विलास नाईक, डॉ. अनिल देशपांडे, विजय पाटील, राजू होलम, शिवशंकर उपासे, जी. एम. पाटील, दशरथ अमृते, अनिकेत चराटी, संजय सावंत, परशुराम बामणे, मारुती मोरे, विक्रम देसाई, महादेव टोपले, आदमसाब मुराद, नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे,  जितेंद्र भोसले, संतोष भाटले, विजय थोरवत, धनंजय पाटील, सुभाष विभुते, वामन सामंत, ग्रंथपाल  चंद्रकांत कोंडुसकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सदाशिव मोरे यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी इंजल यांनी आभार मानले.
=============

Wednesday, August 28, 2024

आजऱ्यातील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या अद्यावत इमारत बांधकामाचा गुरुवारी भूमिपूजन

आजऱ्यातील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या अद्यावत इमारत बांधकामाचा गुरुवारी भूमिपूजन 
आजरा, वृत्तसेवा :

आजरा शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीचे प्रेरणास्थान व 131 वर्षाची परंपरा असलेल्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या अद्यावत इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ गुरुवार (दि. 29) रोजी सकाळी 9.00 वाजता संपन्न होणार आहे. राधानगरी भुदरगड आजराचे कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत गंगामाई वाचनमंदिरचे अध्यक्ष प्रो. डॉ. अशोक बाचुळकर हे असणार आहेत. या वाचन मंदिराची सुसज्ज इमारत उभी राहावी यासाठी आमदार आबिटकर यांनी चार कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
 श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर हे तालुकास्तरीय वाचनालय असून याची स्थापना 1889 साली झाली आहे. 134 पुस्तके व काही नियतकालिके यामाध्यमातून सुरु झालेल्या या वाचनालयात आजघडीला तीस हजारहून जास्त ग्रंथसंपदा आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठी तसेच हिंदी व इंग्रजी भाषेतील दर्जेदार ग्रंथ उपलब्ध आहेत. ग्रंथालयाच्या संदर्भ ग्रंथ विभागात एक हजार हून अधिक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. वीस हुन अधिक दैनिके व शंभरहून अधिक नियतकालिके ग्रंथालयात नियमित येतात. या ग्रंथालयाच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थी, अभ्यासक,   संशोधक तसेच साहित्यिक यांना सेवा दिली जाते. वाचकांना ग्रंथालय सेवा देण्याबरोबरच ग्रंथालयातर्फे वाचन संस्कृती व ग्रंथालय चळवळ वाढीसाठी नियमितपणे विविध सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये ग्रंथ प्रदर्शन, चर्चासत्र, व्याख्यानमाला, विविध शालेय स्पर्धा, साहित्य पुरस्कार, ग्रंथालय पुरस्कार असे विविध उपक्रम राबवण्यात येतात. अशा या आजरा शहरासह तालुक्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मापदंड ठरणाऱ्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या नूतन इमारतीसाठी निधी मिळावा अशी तालुकावासियांची मागणी होती. याला अनुसरून राधानगरी भुदरगड आजाराचे कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर यांनी चार कोटी पन्नास लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी संपन्न होत आहे. वाचन मंदिरची निर्माण होणारी नवी वास्तू सर्वसोईंनीयुक्त अशी तयार होणार आहे. वाचन मंदिराची नवी इमारत आजरा तालुक्याच्या सांस्कृतिक चळवळ व वाचन संस्कृतीला बळकटी देणारी ठरणार आहे. 
===================

Monday, August 12, 2024

आजरा एसटी आगारात शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी प्रवासी राजा दिन

आजरा एसटी आगारात शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी प्रवासी राजा दिन 
आजरा, वृत्तसेवा :

 आजरा एसटी आगारात "प्रवासी राजा दिन" व "कामगार पालक दिन" साजरा करणेत येणार आहे. प्रवासी व कामगारांच्या समस्यांचा स्थानिक पातळीवर निपटारा करणेसाठी सदर उपक्रम राबवणेत येणार आहे. हे दोन्हीही उपक्रम शुक्रवार (दि. 16 ऑगस्ट) रोजी होणार आहेत.

आजरा आगारात शुक्रवार (दि 16) रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत प्रवाशांच्या लेखी तकारी स्विकारल्या जातील व त्यावरील उपाययोजनांबाबत विभाग नियंत्रक मार्गदर्शन करतील. दुपारच्या सत्रात, दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत आगारातील एसटी कर्मचा-यांच्या व्यक्तीगत अथवा संघटनात्मक समस्या ऐकुन घेवून त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाईल. प्रवाशी व कर्मचा-यांनी आपल्या तकारी अथवा समस्या लेखी स्वरुपात नेमून दिलेल्या वेळेत आगारात देणेत याव्यात असे आवाहन आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी केले आहे.
================

Friday, August 9, 2024

म्हैस दूध वाढीसाठी आणखी प्रयत्नांची गरज : गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे; आजरा येथे गोकुळ दूध संघाची संपर्क सभा

म्हैस दूध वाढीसाठी आणखी प्रयत्नांची गरज : गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे; आजरा येथे गोकुळ दूध संघाची संपर्क सभा 
आजरा, वृत्तसेवा :

 कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) म्हैस दूध ही ओळख आहे. गोकुळ दूध संघाला आजरा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात म्हशीच्या दुधाचा पुरवठा होतो. मात्र गेल्या काही वर्षात तालुक्यातून पुरवठा होणाऱ्या म्हशीच्या दुधाचे प्रमाण घटत चालले आहे. यासाठी तालुक्यातून म्हैस दूध वाढीसाठी आणखी प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले. ते आजरा येथे संस्था प्रतिनिधींच्या संपर्क सभेत बोलत होते. 
 स्वागत व प्रास्ताविक करताना  गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर तालुक्यातील एकूण दूध उत्पादनाचा आढावा घेतला. श्रीमती रेडेकर म्हणाल्या, तालुक्यात एकूण 321 दूध संस्था आहेत. तालुक्यातून 42,168 लिटर दुधाचा पुरवठा गोकुळ दूध संघाला होतो. यापैकी 72 टक्के म्हशीचे तर 28 टक्के गायीचे दूध आहे. गोकुळच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी गोकुळच्या यशस्वीतेचा आलेख वाढतच चालला आहे. त्यामुळे सध्या गोकुळची वार्षिक उलाढाल 3670 कोटी पर्यंत गेली आहे. यावेळी श्रीमती रेडेकर यांनी गाय दुधाप्रमाणे म्हैस दुधाला सुद्धा शासनाकडून अनुदान मिळावे व गोकुळ दूध संघाने वाडी-वस्तीवरील दूध संस्थांना पशुखाद्य देण्याबाबत नियोजन करावे अशा मागण्या केल्या. यावेळी अध्यक्ष अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी), संचालिका अंजनाताई रेडेकर यांचा संस्था प्रतिनिधींच्या वतीने सत्कार करण्यात आला. नॅशनल डेअरी असोसिएशनचा बेस्ट वुमन फार्मर अवॉर्ड मिळाल्याबद्दल पेद्रेवाडीच्या सरपंच लता रेडेकर, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श गोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल पेरणोलीचे दत्तात्रय पाईम, महापुरात चांगले काम करणारे सुपरवायझर, दूध वाहतूक ठेकेदार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्पादकांना आर्थिक मदतीचे वाटप देखील करण्यात आले. 
 अध्यक्ष अरुण डोंगळे पुढे म्हणाले, आजरा तालुक्याच्या दूध उत्पादन वाढीमध्ये माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. दूध व्यवसायात ग्रामीण भागातील महिला तळमळीने काम करत असतात. महिलांच्या योगदानामुळेच दूध व्यवसायाला समृद्धी आली आहे. त्यामुळे आता दूध वाढीचे आव्हान पेलताना महिलांनी दूध व्यवसायासाठी प्रशिक्षित होण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, आजरा तालुक्यातील म्हैस दुधाचे प्रमाण चांगले आहे हे कौतुकास्पद आहे. गोकुळ संघाच्या संदर्भात आजरा तालुक्याचे कामकाज चांगले आहे. दूध संघाच्या विविध योजनांचा लाभ दूध उत्पादकांनी चांगल्या प्रकारे घेऊन दुधाचे उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे. यावेळी तुळसाप्पा पोवार, शिवाजी कोंडुसकर, के. व्ही. येसणे, सुभाष देसाई, विजय देसाई, मारुती येझरे यांनी विविध प्रश्न मांडले. अध्यक्ष डोंगळे व दूध संघाचे अधिकारी यांनी संस्था प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी संचालक नाविद मुश्रीफ, बाबासाहेब चौगुले, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, करणसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, एस. आर. पाटील, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, प्रकाश पाटील, किसन चौगुले, नंदकुमार ढेंगे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, आजरा जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंद देसाई, रणजीत देसाई, दीपक देसाई, राजाराम पोतनीस, रवींद्र भाटले, अशोक तर्डेकर, शिवाजी गिलबिले, भीमराव वांद्रे, किरण पाटील, सुधीर पाटील यांच्यासह गोकुळ दूध संघाचे अधिकारी, आजरा तालुक्यातील दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी आभार मानले.
==================

Wednesday, August 7, 2024

आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, कागल येथेही आयुर्वेद महाविद्यालय

आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, कागल येथेही आयुर्वेद महाविद्यालय
 मुंबई, वृत्तसेवा :

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय आणि आजरा तालुक्यातील उत्तूर येथे योग व निसर्गोपचार महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी (दि. 7) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            कागल येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय आणि तितक्याच रुग्ण खाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी आवश्यक जागा उपलब्ध करून देतील.  यासाठी एकूण 487 कोटी 10 लाख रुपये खर्च येईल.

            उत्तूर येथे 60 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय तसेच तितक्याच खाटांचे रुग्णालय सुरु करण्यात येईल.  यासाठी देखील कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नि:शुल्क जागा उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी एकूण 182 कोटी 35 लाख रुपये खर्च येईल.
===========

Saturday, August 3, 2024

"गोकुळ" शीतकरण केंद्र लिंगनूर गणेशोत्सव मंडळ अध्यक्षपदी अजित पाटील

"गोकुळ"  शीतकरण केंद्र लिंगनूर गणेशोत्सव मंडळ अध्यक्षपदी अजित पाटील 
गडहिंग्लज, वृत्तसेवा :

 कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ (गोकुळ) शीतकरण केंद्र लिंगनूर (ता. गडहिंग्लज) गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अजित पाटील यांची तर उपाध्यक्षपदी जोतिराम कुंभार यांची निवड करण्यात आली. लिंगनूर शीतकरण केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. सन 2024-25 सालचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे. 
या वर्षीचा 2024-25 सालाकरिता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार व सदस्य यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष - अजित पाटील, उपाध्यक्ष - जोतिराम कुंभार, खजिनदार - दत्तात्रय लांडे, सदस्य - अनिल नवाळे, सिद्धेश्वर घुगरे, पांडुरंग कुंभार, समीर शिंदे, किरण डोमने, संदेश शिवणे, आनंदा मोदर, चंद्रकांत शिंदे, आप्पासो गायकवाड, सुनिल रेडेकर, प्रकाश चांदेकर, मधुकर ढोकरे, रवींद्र जाधव, साधना शिंदे
यावेळी शाखाप्रमुख शशिकांत गायकवाड, उपअधिकारी विद्यानंद शिंदे, उपअधिकारी संजय सावंत, युनियन प्रतिनिधी संभाजी देसाई, राजेंद्र पारदे, रवींद्र बामणे, दादासो मांडवकर, रणजीत शिंदे, विश्वास चव्हाण, विजय केसरकर, अमोल एकल, संजय पाटील, सुजित देसाई,  अनिल शिउडकर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
================

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...