Wednesday, February 26, 2025

कोवाडे येथील सुरेश देशमुख नेट परीक्षा उत्तीर्ण

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
      
युजीसी डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेली नेट परीक्षा मराठी विषयातून कोवाडे (ता. आजरा) येथील सुरेश देशमुख हे पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत. सुरेश देशमुख हे सध्या विद्या मंदिर गणेशवाडी (ता. आजरा) या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सुरेश देशमुख हे आजरा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांमधील नेट परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिलेच शिक्षक आहेत. संवेदना फाऊंडेशन आजरा सारख्या सामाजिक संस्थेत विश्वस्त म्हणून कार्यरत असून प्राथमिक शिक्षकांच्या समन्वय समितीचे ते सरचिटणीस म्हणून देखील काम पाहतात. तसेच त्यांनी क्रीडा, संगीत क्षेत्रात देखील उल्लेखनीय कार्य केलेले आहे. असे सुरेश देशमुख हे अष्टपैलू शिक्षक म्हणून आजरा तालुक्यात नावारूपाला आलेले आहेत. त्यात आता नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
=================

Tuesday, February 25, 2025

आजऱ्याजवळील रामतीर्थ येथे बुधवार व गुरुवारी यात्रा

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, चंदगड तालुक्यासह कोकण व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आजरा शहरानजीकच्या रामतीर्थ या धार्मिक स्थळावर बुधवार (दि. 26) व गुरुवार (दि. 27) रोजी यात्रा संपन्न होणार आहे. हिरण्यकेशी नदीच्या काठावरील रामतीर्थ येथे महाशिवरात्री दिवशी होणाऱ्या यात्रेला मोठे धार्मिक महत्त्व आहे.

प्रतिवर्षी हिरण्यकेशी नदीकाठावर असलेल्या रामतीर्थवरील महादेव मंदिरात महाशिवरात्री यात्रा असते. महाशिवरात्रीच्या दिवशी विधीवत पूजा होते, तर दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. यात्रेसाठी आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, चंदगड तालुक्यासह कोकण व कर्नाटकातून भाविक येतात. याचदिवशी आजऱ्यातील रवळनाथ मंदिरातून पालखी रामतीर्थवर जाते. त्याठिकाणी दर्शन झाल्यानंतर हिरण्यकेशी नदीच्या रामतीर्थच्या धबधब्याच्या डोहात नारळ फोडण्याचा विधी होतो. यंदा बुधवार (दि. 26) रोजी महाशिवरात्रीला आजऱ्याजवळील रामतीर्थ यात्रेला प्रारंभ होणार आहे. गुरुवार (दि. 27) रोजी मुख्य यात्रा आहे. या यात्रेसाठी हजारो भक्त दोन दिवसात हजेरी लावतात. महाशिवरात्रीला हिरण्यकेशी नदी काठावर पवित्रस्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. पवित्रस्नानानंतर राममंदिर व प्राचीन महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात.

वनविभागाच्या तपासणी नाक्याजवळ चारचाकी व दुचाकीची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने भाविकांसाठी एसटीची सोय केलेली असून रामतीर्थकडे अर्ध्या तासाला एसटीच्या फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. यात्रास्थळी मेवामिठाई, खेळणी व खाद्य पदार्थांच्या दुकानांनी परिसर फुलून गेला आहे.
==================

भाषिक कौशल्यांच्या विकासाने व्यक्तिमत्त्व उजळते : डॉ. स्वप्निल बुचडे, आजरा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

माणसाची भाषा ही त्याची ओळख असते. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. प्रत्येक माणसाची बोलण्याची, लिहिण्याची शैली स्वतंत्र असते. त्यामुळे भाषिक कौशल्यांच्या विकासाने माणसाचे व्यक्तिमत्त्व उजळते, असे प्रतिपादन डॉ. स्वप्निल बुचडे यांनी केले. आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग, भाषा भगिनी मंच आणि ज्ञान स्रोत मंडळ यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, व्यक्तिमत्व विकास करावयाचा असेल तर स्वतःच्या क्षमता आणि कच्चे दुवे ओळखा.  श्रवण, वाचन, लेखन आणि भाषण ही चार भाषिक कौशल्ये आहेत. व्यक्तिमत्व विकास घडविण्यामध्ये या भाषिक कौशल्याचे योगदान महत्त्वाचे असते. आंतरिक व्यक्तिमत्व आणि बाह्य व्यक्तिमत्व असे व्यक्तिमत्त्वाचे दोन भाग पडतात. बाह्य व्यक्तिमत्व हे आपल्याला फार बदलवता येत नाही. परंतु आंतरिक व्यक्तिमत्व मात्र आपण प्रयत्नाने बदलू शकतो. यामध्ये समाज, सवयी, चरित्र यासारख्या अंतरिक व्यक्तिमत्त्वातील गोष्टी आपण बदलून आपल्या व्यक्तिमत्व विकास घडवू शकतो. चारित्र्य ही व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्वाची बाब आहे.

ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 'अभिजीत मराठी भाषा' या विषयावरील भितीपत्रिकेचे प्रकाशनही यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. अशोक सादळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. डॉ. आप्पासाहेब बुडके यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विनायक चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब कांबळे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, प्रा. रमेश चव्हाण, ग्रंथपाल रवींद्र आजगेकर, डॉ. अविनाश वर्धन, डॉ. सलमा मणेर, प्रा. शेखर शिऊडकर, प्रा. सुवर्णा धामणेकर, प्रा. सुषमा नलवडे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
====================

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची 15 जानेवारी अखेरची ऊस बिले जमा

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सिझन 2024-25 या हंगामात 93 दिवसांमध्ये एकुण एकूण 2 लाख 78 हजार 357.540 मे. टन गाळप करून 3 लाख 31 हजार 250 क्विंटल साखर पोती उत्पादीत केलेली आहे. सरासरी 11.90 टक्के इतका साखर उतारा प्राप्त झालेला असुन कारखान्याकडे दि. 1 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले प्रतिटन 3 हजार 100 रुपये प्रमाणे विनाकपात ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आली आहेत. तरी संबंधित ऊस पुरवठादार शेतकरी यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून बिलाची रक्कम उचल करावी अशी माहिती कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी दिली.

हंगाम 2024-25 मध्ये करखान्याने जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवुन सक्षम तोडणी वाहतुक यंत्रणा उभारली होती. परंतु अती पावसामुळे ऊसाची वाढ न झाल्याने व वातावरणाच्या परिणामामुळे ऊसास अकाली तुरे आलेने सरासरी हेक्टरी उत्पादन कमी होवून साखर उता-यातही त्याचा परिणाम झाला. कारखाना गाळप करणेस सक्षम असुन सुध्दा ऊसा अभावी कारखाना लवकरच बंद करावा लागला. त्यामुळे गाळपाचे ठेवलेले उदिष्ठ पार करू शकलो नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष ना. हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास आलेल्या ऊसाची व तोडणी वाहतुकीची उर्वरीत बिले देखील लवकरच जमा करणार असलेबाबत कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी दिली.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई, जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, मुकुंदराव देसाई, मधुकर देसाई, मारूती घोरपडे, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका रचना होलम, मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि प्र.कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.
==================

Monday, February 24, 2025

दुग्ध व्यवसायाची सर्वकष माहितीसाठी ‘गोकुळ कट्टा’ प्रभावी माध्यम : माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील; गोकुळ दूध संघाच्या गोकुळ कट्टयाचे (स्टुडिओ) उद्‌घाटन संपन्न

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या यशस्वी दूध उत्पादकांची यशोगाथा इतर दूध उत्पादकांना समजावी व दुग्ध व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने संघामार्फत ‘गोकुळ कट्टा’ या माहिती देणाऱ्या स्टुडीओची उभारणी संघाच्या ताराबाई पार्क येथे केली आहे. याचे उद्‌घाटन माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते तसेच गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले कि, गोकुळने नेहमीच किफायतशीर दुग्ध व्यवसाय होण्यासाठी दूध उत्पादकांना विविध घटकांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले आहे. तरूण वर्ग दुग्ध व्यवसायाकडे आकर्षित व्हावा यासाठी त्याला दुग्ध व्यवसायातील सर्वकष माहितीसाठी ‘गोकुळ कट्टा’ प्रभावी माध्यम असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी नमूद केले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ कट्टयाच्या माध्यमातून संघाच्या विविध योजना, उपक्रम, जिल्ह्यातील यशस्वी दूध उत्पादकांच्या व गोकुळश्री विजेते यांच्या यशोगाथा व मुलाखती दूध उत्पादकांना मिळाव्या यासाठी गोकुळने ‘गोकुळ कट्टा’ (स्टुडिओ) तयार केला असून निश्चितच या स्टुडीओचा लाभ गोकुळ च्या दूध उत्पादकांना होईल असे मनोगत व्यक्त केले. या गोकुळ कट्टयाच्या रचनेमध्ये गाय, म्हैस, वैरण, मुक्त गोटा, दूध उत्पादक, दूध संस्था, बल्क कुलर युनिट या प्रतीकृतींचा समावेश करण्यात आला आहे.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासो खाडे, चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
=====================

Saturday, February 22, 2025

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सांगता

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

वसंतराव देसाई आजरा शेतकरी साखर कारखाना गवसे (ता. आजरा) या कारखान्याचा 2024-25 या गळीत हंगामाची सांगता होवून सत्यनारायण पुजा कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष गणपतराव देसाई व त्याच्या सुविद्य पत्नि विजयालक्ष्मी सुभाष देसाई यांचे शुभहस्ते संपन्न झाली. तसेच चेअरमन वसंतराव धुरे व संचालक मंडळाचे शुभहस्ते साखर पोती पुजन संपन्न झाले. या हंगामात कारखान्याने 93 दिवसात 2 लाख 78 हजार 357 मे. टनाचे गाळप करून 3 लाख 31 हजार 250 क्विंटल साखरेचे उत्पादन केले सरासरी उतारा 11.90 इतका मिळाला आहे.

चेअरमन धुरे म्हणाले, हंगाम 2024-25 मध्ये करखान्याने जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवुन सक्षम तोडणी वाहतुक यंत्रणा उभारली होती. परंतु अती पावसामुळे ऊसाची वाढ न झाल्याने व वातावरणाच्या परिणामामुळे ऊसास अकाली तुरे आलेने सरासरी हेक्टरी उत्पादन कमी होवून साखर उता-यातही त्याचा परिणाम झाला. कारखाना गाळप करणेस सक्षम असुन सुध्दा ऊसा अभावी कारखाना लवकरच बंद करावा लागला. त्यामुळे गाळपाचे ठेवलेले उदिष्ठ पार करू शकलो नाही. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष ना. हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास आलेल्या ऊसाची व तोडणी वाहतुकीची उर्वरीत बिले देखील लवकरच जमा करणार आहे. तसेच आजरा साखर कारखाना स्थापने पासुनच आलेल्या अनेक संकटावर मात करीत खंबीरपणे उभा आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचा संपूर्ण ऊस वेळेत गाळप करणे व ऊसाचे बिल वेळेत आदा करून भागातील सभासद शेतक-यांना व कामगारांना दिलासा मिळावा हाच उददेश समोर ठेवून कारखाना उर्जीत अवस्थेत आणणेचे ध्येय कारखान्याचे संचालक मंडळाने डोळ्यासमोर ठेवले आहे. कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील गडहिंग्लज व चंदगड, आंबोली भागातील कारखान्यास ऊस पुरवठा करणा-या ऊस उत्पादकांच्या सहकार्याने सदर हंगाम संचालक मंडळाच्या प्रयत्नाने पार पाडला आहे. आमच्यावर विश्वास ठेवून ऊस उत्पादकांनी आपला ऊस गाळपास पाठविला तसेच तोडणी वाहतुकदारांनी सुध्दा आमच्यावर विश्वास ठेवून कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणेस मदत केली. तसेच मालपुरवठादारांनी कारखान्यास माल पुरवठा करून सहकार्य केले. कारखाना कामगारांनी कारखाना पुर्ण क्षमतेने चालावा यासाठी चांगल्या प्रकारे काम केले. तसेच मान्यवरांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेने कारखान्यास आवश्यकतो निधी उपलब्ध करून दिला. सदर निधीचा काटकसरीने व योग्य वापर करीत कारखाना व्यवस्थापनाने कारखाना सुरू ठेवला आले. आपल्या सर्वांचे असेच सहकार्य कायम लाभले आहे, असेही चेअरमन धुरे म्हणाले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, मुकुंदराव देसाई, मधुकर देसाई, मारूती घोरपडे, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका रचना होलम, मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि प्र. कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.
=======================

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक

मालवण, वृत्तसेवा :

नवसाला पावणारी, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सवाला प्रचंड गर्दी झाली. सुर्य आग ओकत असताना देखील भल्या मोठ्या संख्येने रांगात भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी राजकीय नेते, मंत्री देखील उपस्थित होते. भल्या पहाटे पाहूनच भाविकांची गर्दी झाली होती. कोकण रेल्वेने प्रवाशांची स्पेशल रेल्वे सोडून सोय केली होती. दरवर्षी पेक्षा यंदा जास्त भाविकांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
शनिवारी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, मंत्री आशिष शेलार, खासदार अरविंद सावंत,मंत्री उदय सामंत,आमदार दीपक केसरकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार रवींद्र चव्हाण,आमदार निलेश राणे, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक तसेच मुंबई सह राज्यभरातील भराडी मातेवर श्रध्दा असणारे भक्त आले होते. श्री देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. आता रविवारी जत्रेचा समारोप होणार आहे. आंगणे कुटुंबीयांचे दैवत असले तरी नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व दूर देवीची महती पोहचली आहे. त्यामुळे भक्त आवर्जून दर्शनासाठी येतात. मुंबई, ठाणे, कल्याण महापालिका नगरसेवक आवर्जून दर्शनासाठी येतात. सकाळ पासून दहा रांगात देवीच्या दर्शनाची सोय आंगणे कुटुंबीयांनी केली होती.
=====================

Thursday, February 20, 2025

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवार (दि. 21) पासून सुरुवात

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ बोर्डाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवार (दि. 21) पासून सुरवात होत आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाकडून तयारी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर विभागाअंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे तीन जिल्हे येतात. तीन जिल्हे मिळून एकूण 1 लाख 32 हजार 926 विद्यार्थी परीक्षा देणार असून यासाठी 357 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हयात एकूण 54 हजार 810 विद्यार्थी परीक्षा देणार असून 138 परीक्षा केंद्रावर या विदयार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आलीय. 2018 पासून ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी सारखे गैरप्रकार घडलेत, अशा केंद्रांवरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांची इतर केंद्रावर नियुक्ती करण्यात आलीय. संवेदनशील केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असून कुणीही गैरमार्गाचा अवलंब करून नये, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
============

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाकडून दणका; राजकीय वर्तुळात खळबळ

 मुंबई, वृत्तसंस्था : 

महायुती सरकारमधील कृषीमंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकोटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. १९९५ साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप होती. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्या सदनिका आहेत त्या घोटाळ्यासंदर्भात हा दावा दाखल करण्यात आला होता. नाशिक जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला असली तरी कोकोटे यांनी जामीन मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र कोकाटे यांची आमदारकीही धोक्यात येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.


माणिकराव कोकाटेंना जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यावर आता ते हायकोर्टात अपील करू शकतात. जर या निर्णयाला स्टे मिळाला तर काही अडचण नाही, परंतु स्टे नाही मिळाला तर त्यांच्या सदस्यत्त्वाला धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत अधिक माहिती अशी की, 1995 ते 1997 च्या दरम्यानचे हे प्रकरण आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. यावर आता नाशिक जिल्हा न्यायालयाने निर्णय देत कोकाटेंना झटका दिला आहे.

============================

सर्फनाला पारपोली शेळप वसाहत मॉडेल व्हिलेज बनवू; पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचे प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाला आश्वासन

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पाने विस्थापित झालेल्या पारपोली या गावची शेळप येथे नवीन वसाहत झाली आहे. शंभर टक्के सौरऊर्जेवर चालणारी राज्यातील ही पहिली वसाहत होणार असून यासाठी संपूर्ण सहभाग देण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी दिले. कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली सर्फनाला धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाने ना. आबिटकर यांची भेट घेतली.

महावितरणने ही संपूर्ण वसाहत सोलर व्हिलेज करण्यासाठी नुकतीच वसाहतीत बैठक घेतली होती. या बैठकीत महावितरणने पन्नास टक्के अनुदान देण्याचे मान्य केले होते. उर्वरित पन्नास टक्के रक्कम राज्य सरकारच्या योजनेतून, सीएसआर फंडातून किंवा जिल्हापरिषद नाहीतर डीपीडिसीमधून खासबाब म्हणून धरणग्रस्त वसाहतीला दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील चिंचणी वसाहतीप्रमाणे पारपोली वसाहत निसर्गपुरक पर्यावरणासाठी एक मॉडेल व्हिलेज म्हणून बनविण्यासाठी आपण विशेष लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, अशोक मालव, प्रकाश शेटगे, अर्जुन शेटगे, परशुराम बामणे, यशवंत चव्हाण, मयुरेश देसाई, जावेद पठाण हे उपस्थित होते.
================

Wednesday, February 19, 2025

दिल्लीत पुन्हा 'महिलाराज', रेखा गुप्ता मुख्यमंत्री; 20 रोजी नव्या सरकारचा शपथविधी!

नवी दिल्ली, वृत्तसंस्था :

दिल्लीला अखेर नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले प्रवेश वर्मा हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर, रोहिणी मतदारसंघाचे आमदार विजेंद्र गुप्ता यांना दिल्ली विधानसभा अध्यक्ष असतील.

भाजप हायकमांडने वरिष्ठ नेते ओपी धनखर आणि रविशंकर प्रसाद यांची विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी सर्व आमदारांशी चर्चा केल्यानंतर रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. प्रवेश वर्मा यांनीच रेखा गुप्ता यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला होता. दरम्यान, रेखा गुप्ता 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता रामलीला मैदानावर एका भव्य समारंभात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार आहे.

निकालानंतर 11 दिवसांनी मुख्यमंत्र्यांची घोषणा
दिल्लीत 26 वर्षांनंतर भाजपला मोठा विजय मिळाला आहे. 8 फेब्रुवारीला जाहीर झालेल्या निकालात भाजपला 70 पैकी 48 जागा मिळाल्या. निकालानंतर 11 दिवसांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास
रेखा गुप्ता संघाच्या विचारात वाढलेल्या असून विद्यार्थी संघटनेपासून भाजपात कार्यरत आहेत. 1994-95 ला दौलत राम कॉलेजच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 1995-96 मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या सचिव राहिल्या, तर 1996-97 मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या अध्यक्ष बनल्या. यानंतर 2004-2006 ला त्यांना युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव बनवण्यात आले. 2007 मध्ये त्या उत्तरी पीतमपुरा वार्डमधून भाजपच्या नगरसेवक झाल्या. 2010 मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. सध्या रेखा गुप्ता ह्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे.

2 वेळा विधानसभेला पराभूत
रेखा गुप्ता यांचा 2015 आणि 2020 ला विधानसभा निवडणूकीत पराभव झाला होता. 2015 आणि 2020 मध्ये आपच्या वंदना कुमारी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, यावेळी रेखा गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29 हजार 595 मतांनी पराभव केला. आता पहिल्यांदा आमदारपदी निवडून आल्यानंतर थेट त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे.
====================

व्यंकटराव हायस्कुल आजरा येथे शिवजन्मोत्सव उत्साहात संपन्न

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

जगातील सर्वोत्कृष्ट  प्रशासक, भारतीय नौसेनेचे जनक व महाराष्ट्राच्या अस्मितेचा  मानबिंदू, स्वाभिमान, स्वनिष्ठा, पराक्रम, राष्ट्रभिमानाची बीजे पेरणारा रयतेचा राजा, कुळवाडी, कुलभूषण, बहुजन‌ प्रतिपालक, सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना संघटीत करुन रयतेचे स्वराज निर्माण करणारा लोकशाहीवादी राजा, शेतकऱ्यांचा कैवारी, स्त्रीयांना मातेसमान मानून त्यांचा मानसन्मान करणारे, गोर गरीब रयतेचे छत्र, शौर्य पराक्रमाचे महामेरू, कुशल शासक, रयतेचा आधार, नव्या युगाचा निर्माता, महान योद्धा, जाणता राजा, सह्यादीचा कणखर सुपूत्र युगपुरुष  छत्रपती शिवाजी महाराज यांची  आज ३९५ वी जयंती, या जयंती सोहळ्यानिमित्त व्यंकटराव हायस्कूल व जुनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये आजरा महाल शिक्षण मंडळाचा चे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीष्ट मूर्तीचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज  व व्यंकटराव सीनियर कॉलेज आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे संचालक कृष्णा पटेकर, सचिन शिंपी, पांडुरंग जाधव, सुधीर जाधव, विलास पाटील, तसेच प्राचार्य आर जी कुंभार पर्यवेक्षिका व्ही. जे. शेलार, सिनीयरचे प्र.प्राचार्य पन्हाळकर, शिवाजी पारळे, एम. ए. पाटील आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शिवाजी पारळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण, त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या राजमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी बाल शिवबांनी घेतलेली प्रतिज्ञा आणि ती  पूर्णत्वाला नेण्यासाठी आयुष्यभर घेतलेले अपार कष्ट, अनेक जीवावर बेतलेल्या लढाया, त्यामधील महाराजांचे शौर्य, गनिमी कावा, नियोजन आणि आई जिजाऊ व भवानी देवीचा आशीर्वाद व राज्याभिषेकापर्यंतचा प्रवास यासंदर्भात आपल्या अमोघ वाणीतून विद्यार्थी व शिक्षकांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. व्ही. पाटील यांनी केले. आभार सीनियर कॉलेजचे प्र.प्राचार्य पन्हाळकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर एनसीसी विभागामार्फत एनसीसी विद्यार्थ्यांसमवेत एम. एस. पाटील यांनी प्रभात फेरी काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीचे प्रबोधन केले व शेवटी सर्वांना पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
====================

‘गोकुळ’ मार्फत छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन, गोकुळमार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्य संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ, अधिकारी यांच्‍या उपस्थितीत छञपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, भारताच्या इतिहासातील शौर्य, संघटक आणि प्रचंड देशभक्ती असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन हे एक प्रेरणास्त्रोत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असून ते सत्य आणि न्यायाचे योद्धे होते. त्यांची युद्धनीती, प्रशासकीय कौशल्य आणि प्रगतीशील दृष्टिकोन हे प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारे आहे. या कार्यक्रमाप्रसंगी संग्राम मगदूम यांनी छत्रपती शिवाजी महाराजाची शिवगर्जना सादर केली. स्वागत प्रास्ताविक डॉ.एम.पी.पाटील यांनी केले. यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, डॉ.सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, महाव्यवस्थापक जगदीश पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही.तुंरबेकर, संकलन अधिकारी दत्तात्रय वाघरे, बी.आर.पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, आर.एन.पाटील व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
===================

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा तर्फे कै. उर्मिला श्रीपाद मायदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित सुगम गायन स्पर्धा उत्साहात

विकास न्यूज नेटवर्क, आजरा :

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा तर्फे कै. उर्मिला श्रीपाद मायदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित सुगम गायन स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेची सुरवात कै. उर्मिला मायदेव यांच्या प्रतीमेचे पूजन व दीपप्रज्वलन अनंत मायदेव व भाग्यश्री मायदेव यांच्या हस्ते करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या स्पर्धेत आजरा, गडहिंग्लज, भुदरगड व चंदगड तालुक्यातील ७० स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

इयत्ता पहिली ते पाचवी गटात आदित्य सुनिल नाईक (आजरा) याने प्रथम क्रमांक मिळविला. आर्या पिलाजी गावडे (लाटगाव) हिने व्दितीय तर कृतिका महेश खोत (गडहिंग्लज) हिने तृतीय क्रमांक मिळवीला. इयत्ता सातवी ते बारावी गटात दिती संतोष सुतार (बेगवडे ता. भुदरगड) हिने प्रथम क्रमांक मिळविला. शलाका ओमकार गिरी (आजरा) हिने व्दितीय तर विनया संतोष देसाई (कोळींद्रे) हिने तृतीय क्रमांक मिळवीला.

विजेत्यांना अनंत मायदेव व भाग्यश्री मायदेव, वामन सामंत व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून पांडुरंग पारीट (गारगोटी) व एस. व्ही. चोथे (गडहिंग्लज) यांनी काम पाहिले. संगीत संयोजन दत्तात्रय सावंत, संदेश कुंभार, डॉ. कृष्णा होरांबळे, सुरेंद्र हिरेमठ, निमेश देवार्डे, अजित तोडकर व प्रणय बोलके यांनी केले. यावेळी वाचनालयाचे सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, विजय राजोपाध्ये, महंमदअली मुजावर, डॉ. अंजनी देशपांडे, सुचेता गडडी, गिता पोतदार, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, संजय शेणवी, बाळासाहेब आपटे, सुरेश सुतार, गिता तेजम, शोभा कुंभार, रेवती जांभळे, सानिका मिसाळे, प्रा. संदीप देसाई, निखिल कळेकर, लहू केरकर, महादेव पाटील, महादेव पोवार यांसह संगीतप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. वृषाली वाळके यांनी सुत्रसंचालन केले तर कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी आभार मानले.
===================

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे कै. शुभांगी वायंगणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाट्यछटा स्पर्धा संपन्न; प्राथमिक गटात आराध्या गुरव व माध्यमिक गटात रिया पारपोलकर प्रथम

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे कै. शुभांगी गजानन वायंगणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शालेय नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. सुरवतीला कै शुभांगी वायंगणकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन डॉ. अंजनी देशपांडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेन प्राथमिक गटात कु. आराध्या दयानंद गुरव शंकरलिंग विद्यामंदिर मडिलगे तर माध्यमिक गटात कु. रिया संतोष पारपोलकर- आजरा हायस्कुल यांनी प्रथम कमांक मिळविला.

प्राथमिक गटात व्दितीय क्रमांक कु. त्रिशा अतुल पाटील आजरा हायस्कुल तर तृतीय क्रमांक कु. अव्दिता किशोर खोत व्यंकटराव हायस्कुल यांना मिळाला माध्यमिक गटात व्दितीय क्रमांक कु. ओवी विशाल रेळेकर- रोझरी हायस्कूल व तृतीय क्रमांक कु. अन्वी राहूल नेवरेकर - रोझरी हायस्कुल यांना मिळाला विजेत्या स्पर्धकांना डॉ. अंजनी देशपांडे, वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली आजरा तालुक्यातील विविध शाळातील ३६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग घेतला.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. आय. के. पाटील व श्री मंदार बापट यांनी काम पाहिले. यावेळी ग्रंथालयाचे सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक सुभाष विभुते, विजय राजोपाध्ये, बंडोपंत चव्हाण, गिता पोतदार, सुचेता गडडी, प्रभाकर नेवरेकर, सुनील कांबळे, शंकर चव्हाण, अनिकेत गाडगिळ, गिता तेजम, डॉ. स्वाती गिरी, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, महादेव पाटील, निखिल कळेकर, महादेव पोवार, विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी सुत्रसंचालन केले तर संचालक महंमदअली मुजावर यांनी आभार मानले.
==============

मुंबईत दलालांना दणका देण्याची गरज : कॉ. उदय भट; आजऱ्यात गिरणी कामगारांचा मेळावा

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

गिरणी कामगार पूर्ण वेळ मुंबईत काम करत असताना संपाच्यावेळी त्यांना मुंबईतून बाहेर हाकलले आणि मुंबईवर दलालांचे राज्य निर्माण झाले. त्यांना दिवसाही स्वप्न पडू लागली. हे बदलण्यासाठी गिरणी कामगारांची संघटना लाल निशान पक्षाने एकजूट केली. आणि त्यांना मुंबईत गिरणीच्या जागेतच घरे मिळण्यासाठी संघटीत करण्यात आले. यासाठी पुढची लढाई म्हणून ६ मार्चला आझाद मैदानात संघर्ष लढा उभा करणार असून मुंबई येथील दलालांना दणका देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे कॉ. उदय भट यांनी सांगितले. आजरा येथील किसान भवन येथील गिरणी कामगारांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

स्वागत व प्रास्ताविक नारायण भडांगे यांनी केले. यावेळी भट यांनी महाराष्ट्रभर विखुरलेला गिरणी कामगार त्यांच्याच हक्कासाठी एकत्र करण्याचे काम संघटनेने केले असून या संघटनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांना मुंबईत घर व त्यांची पेन्शन वाढ यासाठी सातत्याने लढाई सुरू असून आत्ताची ही वेळ शासनाला व दलालांना धक्का देण्याची असून सर्व गिरणी कामगारांनी व वारसांनी आझाद मैदानात ताकद दाखविण्याचे आवाहन केले.

यावेळी कॉ. अतुल दिघे यांनी गिरणी कामगार हा बेघर नाही किंवा भुमीहिन नाही. त्याने आपल्या श्रमाने मुंबई सोन्याची केली. त्यानांच बेघर समजून हिकडे घर देऊन व तिकडे घर देऊ असे सांगून फसवणूक केली जात आहे. या फसवणूकीला हे गिरणी कामगार भुलणार नसून गिरणीच्या जागेतच घर मिळविल्याशिवाय ही संघटना शांत बसणार नाही. तसेच गिरणी कामगारांना किमान मासिक ९ हजार पेन्शन मिळाली पाहिजे यासाठीच्या लढाईसाठी गिरणी कामगारांनी सज्ज होण्याचे आवाहन केले.

यावेळी कॉ. धोडिंबा कुंभार, कॉ. शिवाजी सावंत, कॉ. शांताराम पाटील, कॉ. दत्तात्रय अत्याळकर यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याला नारायण राणे, जयश्री कुंभार, अनिता बागवे, हिंदुराव कांबळे, विठ्ठल बामणे, शिवाजी पोवार, मनाप्पा बोलके, बाबू केसरकर, तुकाराम जाधव यांच्यासह महिला व गिरणी कामगार उपस्थित होते. सूत्रसंचलन कॉ. संजय घाटगे यांनी करून आभार मानले.
===============

इन्स्पायर कॅम्प 2025 साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आजरा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

भारत सरकार विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तर्फे मुलभूत विज्ञान अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि नवा कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी इन्स्पायर कॅम्प चे आयोजन करण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता निकष ही इयत्ता दहावीच्या बोर्ड 2024 परीक्षेत टॉप वन पर्सेंट विद्यार्थी असतील या शिबिरात सहभागी होण्याकरिता एसएससी बोर्ड परीक्षेत 93.6 टक्के तर सीबीएससी बोर्ड परीक्षेत 96 टक्के तर आयसीएससी बोर्ड परीक्षेत 97.83 टक्के किमान गुण असणे आवश्यक आहे या विद्यार्थ्यांनी अकरावी सायन्स शाखेत प्रवेश घेतलेला असाव.

संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ व विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसा आला यांच्या संयुक्त विद्यमाने 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2025 या कालावधीत अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डीएसटी डॅश इन्स्पायर कॅम्प संत राहुल कॉलेज कुडाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. या शिबिरात आजरा महाविद्यालयातील राखी राजीव नवार, आहाना फिरोज मुराद, भक्ती पराग परुळेकर यांची निवड झाली होती. या पाच दिवशीय शिबिरात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र व अर्थ सायन्स या विषयावर व्याख्याने संवाद तसेच हँडसम ऍक्टिव्हिटी व प्रयोग प्रश्नमंजुषा चर्चासत्रे घेण्यात आली असे सांगितले.

सदर इन्स्पायर कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी मधील राखी नवार  हिने मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या शिबिरात घेण्यात आलेल्या देशभरातील आघाडीच्या संस्था मधील नामवंत शास्त्रज्ञ शिक्षण तज्ञ संशोधक यांची संवादात्मक सत्रे, तसेच विविध विषयावर चर्चा व प्रश्नमंजुषा यांचे आयोजन करण्यात आले होते. फिरोज मुराद हीने सदर शिबिरात हँडसम ऍक्टिव्हिटी व प्रयोगामध्ये तसेच व्यवहारिक अनुभव व वैज्ञानिक संकल्पनांची सखोल माहिती या शिबिरात वैज्ञानिक क्षेत्रातील तज्ञांशी विद्यार्थी यांचा संवाद घडवून आणण्यात आला विद्यार्थ्यांना अनेक संशोधन क्षेत्रे आणि सर्वोच्च भारतीय वैज्ञानिक संस्थांमध्ये उपलब्ध संशोधन सुविधा बद्दल माहिती देण्यात आली त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना झाला असे मनोगतातून सांगितले. भक्ती परुळकर हिने मनोगत व्यक्त करताना इन्स्पायर कॅम्प मध्ये आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ भटनागर पुरस्कार विजेते राष्ट्रीय तसेच केंद्रीय राज्य विद्यापीठे यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था मधील 15 तज्ञांचे त्यांच्या वैज्ञानिक अनुभवासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले असे मत व्यक्त केले.

आजरा महाविद्यालयातून सदर कॅम्प साठी राखी राजू नवार, आहाना फिरोज मुराद, भक्ती परुळेकर या निवड झालेल्या विद्यार्थिनींनी इन्स्पायर कॅम्प मध्ये घेतलेल्या प्रशिक्षण व अनुभव महाविद्यालयातील विज्ञान शाखेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रयोगाद्वारे सादरीकरण केले सदर कार्यक्रमाचे आयोजन ज्युनिअर विज्ञान विभाग व विज्ञान आणि पर्यावरण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्रद्धा कुलकर्णी यांनी केले. स्वागत प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी केले. आभार प्रा. शुभांगी सावंत यांनी केले.  सूत्रसंचालन सागर फगरे यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. एन. सादळे, प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, प्रा रागिणी राजमाने , प्रा. ज्योती कुंभार तसेच विज्ञान विभागाचे विद्यार्थि  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.
================

आजरा टोल नाक्याबाबत बैठक घेऊन निर्णय करू; पालकमंत्री ना. आबिटकर यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

आजरा, विकास न्यूजसेवा :

संकेश्वर-बांदा महामार्गावर आजरा शहरालगत होत असलेल्या टोल नाक्याला आजरा तालुकावासीयांचा तीव्र विरोध असून याबाबत अनेक आंदोलनेही झाली. जनतेचा विरोध पाहून सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी या आंदोलनात सहभागी झाले होते. आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्यासह माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांच्यासह या दोन तालुक्यातील अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत शेवटपर्यंत या लढ्यात राहण्याचे आश्वासन दिले होते.

निवडणुकीनंतर राज्यात महायुती सत्तेवर आल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांना आरोग्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने आंदोलकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे शिष्टमंडळाने ना. आबिटकर यांची भेट घेतली असता या प्रश्नी आपण लक्ष घालत असून आजरेकराना त्रास होणार नाही असा निर्णय करून घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कॉ. संपत देसाई, परशुराम बामणे, यशवंत चव्हाण, पांडुरंग सावरतकर, जावेद पठाण, मयुरेश देसाई आदी उपस्थित होते.
=================

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...