Friday, May 29, 2026

साडेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांच्या हरकती दाखल, शक्तीपीठाच्या विरोधात आजरा तालुक्यातील शेतकरी एकवटला.....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आजरा तालुक्यातील साडेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आज तहसीलदार आजरा यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी भुदरगड यांना हरकती सादर केल्या. आज सकाळी साडेअकरा वाजता संघर्ष समितीचे कॉम्रेड संपत देसाई व तानाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर पेरणोली, मसोली, एरंडोळ, देवर्डे, वेळवटी, खानापूर इत्यादी बाधित गावातले शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. "एकच जिद्द शक्तीपीठ रद्द" अशा जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी आपल्या हरकती सादर केल्या.
    
वैयक्तिक हरकतीचे अर्जात आपल्या शेतजमिनीसह या रस्त्यामुळे पाण्याचे निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग बदलले जाणार आहेत. पाण्याचे स्त्रोत आटले जाऊन जमिनी कोरडवाहू होणार आहेत. पर्यावरणाची न भरून येणारी विपरीत परिस्थिती तयार होणार आहे. शेतकरी उध्वस्त होणारच पण याबरोबरच इथला निसर्ग आणि पर्यावरण ही उध्वस्त होणार आहे. कवडीमोल दराने शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्या भांडवलदारांच्या घशात घातल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रसंगी रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा निर्धार तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. हरकतीचे अर्ज एकत्र करून गाववार स्वतंत्र याद्या बनवून तहसीलदार यांचे प्रतिनिधी तहसीलदार यांचे प्रतिनिधी म्हणून वरिष्ठ कारकून त्यांच्याकडे हरकतीचे अर्ज देण्यात आले. यावेळी सुधीर देसाई, भीमराव माधव, सर्जेराव देसाई, चंद्रकांत गुरव, किरण गुरव, बाळू जाधव, निवृत्ती कांबळे, दिपाली गुरव, सुभाष देसाई, निवृत्ती फगरे, शंकर पाटील, दिनेश कांबळे, बाळू पाटील, छाया गुरव, शंकर हळवणकर यांच्यासह शक्तीपीठ बाधित गावातील शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
============================

जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त जिल्हाभर विविध उपक्रमांचे आयोजन



कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत तसेच पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या सहकार्याने दिनांक १ ते ५ जून २०२६ या कालावधीत "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू" ही विशेष मोहीम ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहे. "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू" मोहिमेमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांनी केले आहे.
   
यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना हवामान कृती (Climate Action) अशी असून Mission LiFE (Lifestyle for Environment) अंतर्गत पर्यावरणपूरक जीवन शैलीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक मंडळे, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. Reduce. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनातील 4Rs Refuse, Reduce, Reuse आणि Recycle तसेच ग्रे-वॉटर व्यवस्थापनातील 3Rs Reuse आणि Recharge या संकल्पनांचा प्रसार करण्यात येणार आहे. कचऱ्यापासून संपत्ती (Waste to Wealth), परिपत्र अर्थव्यवस्था (Circular Economy), किचन गार्डन, वृक्षारोपण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यासारख्या विषयांवर विशेष भर दिला जाणार आहे.

१ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ संदर्भात ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येणार असून Bulk Waste Generators (BWGs) यांची ओळख, कचऱ्याचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण, जुने कचरा डेपो नोंदणी, घराघरातून कचरा संकलन यासंदर्भात विशेष मोहिम राबविण्यात येतील. या मोहिमेंतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत जनजागृती, ग्रामपंचायत स्तरावरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची पाहणी व मूल्यमापन, "माझे गाव, माझी जबाबदारी" जनसहभाग उपक्रम, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची (BWGs) ओळख, प्रभात फेरी, चित्रकला स्पर्धा, नुक्कड नाटके, स्वच्छता मोहिम, "एक पेड़ माँ के नाम" अंतर्गत  वृक्षारोपण अभियान, विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहेत. ५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष ग्रामसभेमध्ये मोहिमेतील कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व हवामान कृतीबाबत ग्रामस्थांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत सर्व गट विकास अधिकारी व ग्रामपंचायतींना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी दिल्या असून, मोहिमेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती SBM(G)-IMIS पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.
=======================

Thursday, May 28, 2026

जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्था व बागायतदारांना जलप्रशुल्क प्रस्तावावर हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्ह्यातील मोठे प्रकल्प (दुधगंगा, वारणा, राधानगरी व तुळशी), मध्यम प्रकल्प (कडवी, कासारी, कुंभी व धामणी) व लघु प्रकल्पांतर्गत नद्यांवर शासनाने बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांवरून, तसेच सांगली जिल्ह्यातील वारणा नदीतून पाणी घेऊन पिके करणाऱ्या सर्व सहकारी पाणीपुरवठा संस्था व वैयक्तिक बागायतदारांना या जाहीर आवाहनाद्वारे कळविण्यात येते की, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १ जुलै २०२६ ते ३० जून २०२९ या नियंत्रण कालावधीसाठी ठोक जलप्रशुल्क निर्धारणाची कार्यवाही सुरू केली आहे. या संदर्भात लाभार्थी व उपभोक्त्यांची मते जाणून घेण्यासाठी प्राधिकरणाने राज्यस्तरीय दैनिकांमध्ये यापूर्वीच जाहीर सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
    
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ च्या कलम ११ (घ) मधील तरतुदीनुसार, ठोक जलप्रशुल्क निर्धारण करताना लाभार्थ्यांच्या किंवा उपभोक्त्यांच्या मतांची खात्री करून घेणे अनिवार्य आहे. या प्रयोजनार्थ ठोक जलप्रशुल्क निकषांचा सुधारित मसुदा व प्रारूप ठोक जलप्रशुल्काचा प्रस्ताव (मराठी व इंग्रजी भाषांमध्ये) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या https://mwrra.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच, या प्रारूप मसुद्याच्या प्रती या विभागाच्या कार्यक्षेत्रातील शाखा स्तरापर्यंतच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्येही लाभार्थी व उपभोक्त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांना किंवा उपभोक्त्यांना या मसुद्याबाबत/प्रस्तावाबाबत आपल्या सूचना अथवा हरकती नोंदवायच्या असतील, त्यांनी प्राधिकरणाच्या https://mwrra.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरील गुगल फॉर्मद्वारे (Google Form) त्या नोंदवाव्यात किंवा विहित मुदतीत लेखी स्वरूपात संबंधित शाखा कार्यालयातील सूचना पेटीमध्ये जमा कराव्यात, अशी माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) चे उपकार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
=============================

Monday, May 25, 2026

विकासाच्या कल्पनांचे नाते दृढ करुया : मंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रतिपादन, आवंडी धनगरवाडा विकास कामांचे लोकार्पण


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
अशक्य असे काहींच नाही. करण्याची जिद्द मनात असली पाहिजे तर सर्व बाबी शक्य होतात. विकासाच्या कल्पनांचे नाते दृढ करुया असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. आजरा तालुक्यातील आवंडी धनगरवाडा १, २ व ३ येथे झालेले १.२५ कोटींचे मुरुमीकरण रस्ते व ७० लाखांची जलजीवन मिशन योजना यांचा लोकार्पण समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती माजी सभापती विष्णुपंत केसरकर होते.
  
मंत्री आबिटकर म्हणाले, राजकारणात पैसा, घराणेशाही, पक्षाच्या जीवावर राजकारण करणारे आहेत. मी मात्र सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवावर राजकारण केले. त्यामुळेच मिळालेल्या मतांनी व आर्शिवादांने राज्यभर काम करण्याची संधी मिळाली. प्रबळ इच्छाशक्ती असलीतरी कसलेही काम साधता येते. सकारात्मक अधिकारी व तळमळीचा लोकप्रतिनिधी असेल आणि तर त्या भागाचा विकास हमखास होतो. मी धनगरवाड्यात राहणारा समजून काम केले, त्यामुळेच या लोकांची मला पसंती आहे. परिवर्तनाचे काम करण्याची संधी आरोग्य खात्यामुळे मिळाली. आरोग्य क्षेत्रातील शक्य त्या सेवा सुविधा सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी आपला प्रयत्न आहे, असेही मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. वन हक्काचे रखडलेले दावे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी वनविभाग व महसूल विभागाला दिल्या. स्थानिक धनगर बांधवांनी आपली जमीन विकू नये अन्यथा आपणालाच आपल्या गावामध्ये पाहुणे म्हणून रहावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी रणजित सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सरपंच बयाजी मिसाळ, उपसरपंच रंगू कोकरे, जगू कोकरे, उप वनसंरक्षक विलास काळे, वन परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील, राजू पोतणीस, इंद्रजीत देसाई, बाबू येडगे, धनंजय पाटील, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, बशीर काकतीकर, जितेंद्र भोसले, विलास भादवणकर, बंटी सूर्यवंशी, रामू कोकरे, संतोष भाटले, अभिजीत शिंदे, विजय थोरवत, महेश खेडेकर, मंदार बिरजे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

धनगरवाड्यावरील शिकणाऱ्या मुलींना पावसाळी अधिवेशनात नेणार...
तिन्ही धनगरवाड्यातील मिळून ५० मुली शिक्षण घेत आहेत हे कौतुकास्पद आहे. या सर्व मुलींना येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण मुंबईला नेणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
======================

किसान विकास सेवा संस्था ऐनापुर या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध...


गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क...
ऐनापुर (ता. गडहिंग्लज) येथील किसान विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत 29 अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 17 जणांनी माघार घेतल्यानंतर 13 जागांसाठी 12 अर्ज शिल्लक राहिले. भटक्या विमुक्त जाती ही जागा रिक्त राहिली आहे. संस्थेचे संस्थापक सुरेश कुराडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी म्हणून श्रीमती अनिता शिंदे, (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गडहिंग्लज) यांनी काम पाहिले. संस्था निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनील कुराडे, सूर्याजी मोहिते, बाळासो देसाई, सुरेश पवार, पांडुरंग दड्डीकर, तानाजी कुराडे, गणपतराव सूर्यवंशी, अझर मकानदार, भाऊ पाटील यांचे सहकार्य लाभले.
बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे : खातेदार कर्जदार गट : सुरेश कुराडे, शिवाजी जाधव, विलास देसाई, सूर्याजी मोहिते, बाळू चौगुले, अंबाजी दड्डीकर, मुक्तार मकानदार, सविता कळस्कर. महिला प्रतिनिधी : नमिता पवार, मीना कुराडे. अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी : सागर सनदी. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : दिग्विजय कुराडे
=============================

Saturday, May 23, 2026

आजरा येथील शासकीय वसतिगृहात विनामूल्य प्रवेश सुरू


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
आजरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात अनु. जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग व अनाथ प्रवर्गातील इयत्ता 8 वी पासून पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षाकरीता प्रवेश देण्यात येत आहे. इच्छुक विद्यार्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, आजरा येथे किंवा भ्रमणध्वनी 9552215152 द्वारे संपर्क साधावा. तसेच वसतिगृह ऑनलाईन प्रवेशासाठी https://hmas.mahait.org या  संकेतस्थळाला भेट देऊन त्यावर नोंदणी करुन विद्यार्थांनी आपला अर्ज परिपूर्ण भरून त्याची प्रत या कार्यालयास सादर करावी, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे. वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, नाष्टा, दोन वेळेचे जेवण व राहण्याची सोय, ग्रंथालय, निर्वाह भत्ता, मनोरंजन कक्ष, संगणक कक्ष, जिम व क्रीडा साहित्य इत्यादी प्रकारच्या सोयी सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन दिल्या जातात.
=========================

Friday, May 22, 2026

सायलेज तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायाला चालना; गोकुळ मध्ये नेदरलँडच्या तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन, उत्पादन वाढ व खर्चावर बचतीवर भर

 
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
 दुग्ध व्यवसाय आणि पशुधन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘गोकुळ’ दूध संघाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स मधील पी.यु.एम. (प्रोजेक्ट आउट सेंडर मॅनेजर्स) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने सायलेज (मुरघास) या विषयावर विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. नेदरलँड्सचे प्रगतशील शेतकरी हेंड्रिक्स व्हॅन व्हिस्क यांच्या मार्गदर्शनाखाली हे दहा दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
         
गोकुळ दूध संघ व पी.यु.एम. यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन टप्प्याटप्प्याने दिले जात असून, याआदि पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. एर्विन द. विथ यांनी जनावरांची दूध उत्पादकता वाढविणे व गोठा व्यवस्थापन याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले होते. या पार्श्वभूमीवर  नेदरलँड्सचे प्रगतशील शेतकरी हेंड्रिक्स व्हॅन व्हिस्क हे दुसरे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आले होते. त्यांनी विशेषतः सायलेज (मुरघास) या विषयावर सखोल व व्यवसायिक मार्गदर्शन केले. व्हिस्क यांचा स्वतःचा ५०० गायींचा अत्याधुनिक गोठा असून, ते दररोज सुमारे १० हजार लिटर दूध संकलन करतात. ते पूर्णपणे सेंद्रिय शेतीचा अवलंब करत असून पशुधनासाठीचा चारा देखील सेंद्रिय पद्धतीनेच तयार करतात. सायलेज निर्मितीची आधुनिक पद्धत, योग्य साठवण तंत्र, तसेच पशुधनासाठी पौष्टिक व गुणवत्तापूर्ण चारा उपलब्ध करून देण्याच्या विविध बाबींवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. गुणवत्तापूर्ण सायलेजमुळे दुधाचे उत्पादन व गुणवत्ता वाढते, पशुपालकांचा खर्च कमी होऊन नफा वाढतो, असे त्यांनी स्पष्ट केले. सायलेज तयार करताना कच्चा माल व योग्य वैरणीची निवड, आर्द्रता नियंत्रण, योग्य साठवण आणि वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. दौऱ्यादरम्यान त्यांनी गोकुळ दूध संघाशी संलग्न शिंदेवाडी येथील वैरण बँक, विविध दूध संस्था तसेच मुक्त गोठ्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान गोकुळमार्फत सध्या राबविण्यात येत असलेल्या सायलेज प्रकल्पाची माहिती तसेच दूध उत्पादक पातळीवरील अडचणी मांडण्यात आल्या. त्यावर तज्ज्ञांनी उपाययोजना सुचविल्या. प्रत्यक्ष सायलेज निर्मिती स्थळ पाहणी, गोठा भेटी, प्रात्यक्षिके, सादरीकरणे (प्रेझेंटेशन) व गटचर्चा यांच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकारी, सुपरवायझर व दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
         
यावेळी हेंड्रिक्स व्हॅन व्हिस्क यांनी ‘गोकुळ’ दूध संघाच्या शेतकरी-केंद्रित कामकाजाचे विशेष कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, सायलेज प्रकल्पांची अंमलबजावणी व शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविलेले उपक्रम हे अनुकरणीय असल्याचे सांगत, ‘गोकुळ’सारख्या सहकारी संस्थांमुळे दुग्धव्यवसाय अधिक सक्षम होत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विकास कक्ष, ताराबाई पार्क येथे गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक यांच्या हस्ते हेंड्रिक्स व्हॅन व्हिस्क यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक म्हणाले की, गोकुळ व पी.यु.एम. यांच्यातील करारामुळे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन सातत्याने मिळत असून, याचा दुग्धव्यवसायाच्या प्रगतीसाठी निश्चितच मोठा फायदा होणार आहे. यावेळी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक, सदस्य प्रदीप मालगावे, सुनिल धायगुडे, सागर बलकवडे, चंद्रकांत परूळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, डॉ. दयावर्धन कामत, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
========================

Thursday, May 21, 2026

इंधन दरवाढीविरोधात आजरा तालुका कॉग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर आंदोलन


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
देशात सातत्याने वाढत चाललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या महागाईचा तीव्र निषेध नोंदवण्या करिता काँग्रेस कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सतेज (बंटी) पाटील यांच्या नेतृत्वात संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आजरा तालुका काँग्रेसच्या वतीने आजरा येथील पेट्रोल पंपावर तीव्र निदर्शने करण्यात आली. आजरा नगरपंचायतचे गटनेते नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.


यावेळी नगरसेवक शिंपी म्हणाले, वाढत्या इंधन दरामुळे महागाईत प्रचंड वाढ झाली असून, याचा थेट फटका शेतकरी, कामकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या बजेटला बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यावेळी पेट्रोल पंपावर नागरिकांना पत्रक वाटून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. वाढत्या इंधनामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'पेट्रोल-डिझेलचे दर तात्काळ कमी करा', अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामध्ये आजरा नगरपंचायतचे गटनेते नगरसेवक अभिषेक शिंपी, नगरसेवक असिफ पटेल, निसार लाडजी, असिफ सोनेखान, विक्रम पटेकर, सामाजीक कार्यकर्ते इब्राहीम इंचनाळकर, अमित खेडेकर, सुफियान खेडेकर, मुज्जमिल खेडेकर तसेच कॉग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   
============================

कचरा व पाणी प्रश्नावरून मासिक सभेत अधिकारी धारेवर; आजरा नगरपंचायतीच्या दुकानगाळ्यांना ३० टक्के भाडेवाढ


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत कचरा व पाणी प्रश्नावरून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी प्रश्नासंदर्भात ठेकेदार, जीवन प्राधिकरण व नगरसेवकांची बैठक घ्या. ठेकेदार बैठकीला आला नाही तर त्याचे नाव काळ्या  यादीत टाका असा ठराव करण्यात आला.सभेत नगरपंचायतीच्या दुकानगाळ्यांना ३० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी होते.
           
मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी स्वागत केले. सभेपुढील विषयांचे वाचन निहाल नाईकवाडे यांनी केले. मागील सभेचे इतिवृत्त मंजूर होण्यापूर्वी सोलार दोषदुरुस्ती संदर्भात कोणता निर्णय घेतला आहे. रस्ते, गटर्स, सोलार दुरुस्तीबाबत सगळ्यांना समान न्याय द्यावा अशी मागणी करणेत आली. पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारांची स्वच्छता तातडीने करावी. नागरिकांच्या कचरा,पाणी व लाईटबाबत अद्याप अडचणी संपलेल्या नाहीत. बेकायदेशिर नळ कनेक्शनची मोजणी करावी. नगरसेवकांनी सुचविलेली कामे एक महिना होत नसतील तर त्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी कामाचे वेळापत्रक करावे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात निधीचे काय? शहरातील कचरा व पाणी प्रश्न गंभीर आहे. आवंडी वसाहतीशेजारी कचरा टाकला जात आहे तो तातडीने थांबवावा. शासनाकडून क्रीडा संकुलच्या संरक्षक भिंतीसाठी निधी मिळाला असेल तर नगरपंचायतीचा  ६० लाखांचा निधी कशासाठी? पाणी कचरा गटर्स स्वच्छता शुक्रवारच्या आठवडी बाजारात व्यापाऱ्यांकडून केला जाणारा कचऱ्याबाबत कारवाईची गरज आहे असे प्रश्न अभिषेक शिंपी, अनिकेत चराटी, परेश पोतदार, डॉ. इंद्रजीत देसाई, परशुराम बामणे, असिफ पटेल, स्मिता कुंभार, पूनम लिचम, निशात चांद यांनी उपस्थित केले. पटेल कॉलनी येथील पाणी प्रश्नासंदर्भात अनिकेत चराटी यांनी आठ दिवसात नागरिकांना पाणी मिळालेच पाहिजे असे ठासून सांगितले. आजरा शहरातील मालमत्ता कर आकारणी वाढीव दराने करावी या विषयाला नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटीसह सर्व नगरसेवकांनी विरोध केला.नागरिकांना अगोदर सेवा सुविधा उपलब्ध करून द्या नंतर घरफाळा वाढीसंदर्भात विचार करू असे सांगितले. नवीन घंटागाडी, पाण्याचा टँकर व ब्लेडचा ट्रॅक्टर खरेदी करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. बाजारात मोठे वाहनांना सकाळी १० ते संध्याकाळी ७ पर्यंत प्रवेश बंदी किंवा एकेरी वाहतूक करावी असे अशोकअण्णा चराटी यांनी सुचविले.
========================

बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा : पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
राज्यातील गाई-म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा करण्यासाठी व प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, 2023 लागू केला आहे. राज्यामध्ये या कायद्याची अंमलबजावणी 5 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. उत्तम दर्जाच्या वळूंचा वापर करून कृत्रिम रेतनाद्वारे दुधाळ जनावरांची पैदास वाढवणे आणि प्रजननाशी संबंधित गैरप्रकारांना आळा घालणे, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या कायद्यांतर्गत राज्यातील सर्व रेत केंद्र, भ्रूण प्रत्यारोपण केंद्रे, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था आणि सेवा पुरवठादारांना प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक असून, त्यांना केवळ प्रमाणित व उच्च वंशावळीच्या वळूंचेच रेत प्रजननासाठी वापरता येईल. या सर्व प्रक्रियांवर देखरेख ठेवण्यासाठी 'महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाची' स्थापना करण्यात आली आहे. प्राधिकरणाला केंद्रांची तपासणी, झडती व नियमबाह्य साहित्य जप्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

दंड व शिक्षेच्या तरतुदी :
कलम 4 व 5अन्वये नोंदणी प्रमाणपत्रधारक व्यक्तीने विहित मानकांचे पालन न केल्यास, दोष सिद्ध झाल्यावर रु. 50 हजार तसेच नोंदणी प्रमाणपत्राविना गोजातीय प्रजनन क्रिया करणे, अथवा प्रमाणित वळूव्यतिरिक्त इतर वळूंपासून गोठवलेले रेत उत्पादन करणे किंवा अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास, दोष सिद्ध झाल्यावर रु. 1 लाख तर नोंदणी प्रमाणपत्रानुसार मंजूर सेवांबाबत चुकीची / दिशाभूल करणारी जाहिरात किंवा प्रसिद्धी केल्यास, दोष सिद्ध झाल्यावर ६ महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा रु. 2 लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण यांनी दिली आहे.
===========================

Wednesday, May 20, 2026

मान्सूनपूर्व तयारीचा आढावा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून हातकणंगले, शिरोळ आणि कुरुंदवाड परिसराची प्रत्यक्ष पाहणी


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
आगामी मान्सूनचा काळ लक्षात घेता आणि संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मान्सूनपूर्व तयारीची सविस्तर पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी जिल्ह्यातील अत्यंत पूरप्रवण भागातील हातकणंगले, शिरोळ आणि कुरुंदवाड या तालुक्यांना व शहरांना भेटी दिल्या. या दौऱ्याचा मुख्य उद्देश पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या काळात स्थानिक प्रशासन किती सज्ज आहे, याचा प्रत्यक्ष आढावा घेणे आणि यंत्रणेला गती देणे हा होता.
   
या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या संभाव्य निवारा केंद्रांची बारकाईने पाहणी केली. या निवारा केंद्रांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज आणि वैद्यकीय मदत यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाही, याची त्यांनी खात्री करून घेतली. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी लागणारे लाईफ जॅकेट्स, बचाव बोटी आणि इतर आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्याची प्रत्यक्ष तपासणी करत सर्व साहित्य सुस्थितीत ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. या संपूर्ण पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत स्थानिक प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे विविध अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना संभाव्य पुरस्थिती दरम्यान आपापसात समन्वय ठेवून २४ तास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या; तसेच नद्यांच्या पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवून स्थलांतराची वेळ आल्यास नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
========================

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेला ४ कोटी ४६ लाख ढोबळ नफा


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा या पतसंस्थेने सन २०२५-२६ सालात रू. ३४९ कोटी ५० लाख ५३ हजार ६४० इतका एकूण व्यवसाय केला आहे. संस्थेला ४ कोटी ४६ लाख ८८ हजार ७०० इतका ढोबळ नफा झाला असून आवश्यक त्या तरतुदी करून रू. १ कोटी २५ लाख २५ हजार ९९० इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन दयानंद सिध्दाप्पा भुसारी यांनी दिली.
   
सभासदांचा आणि ठेवीदारांचा वाढता विश्वास हीच संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद आहे. सभासदांच्या हिताचे दृष्टीने व संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी संस्था सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबवते. संस्थेच्या संचालक मंडळाच्या नियोजनबध्द कार्यपध्दती आणि सभासदांच्या विश्वासामुळे संस्थेच्या स्थैर्यात आणखी भर पडली आहे तसेच समाजाला आर्थिक दृष्टया भक्कम आधार देण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी संस्था कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
   
संस्थेकडे वसुल भागभांडवल रू. ४ कोटी ५८ लाख इतके असून आर्थिक वर्षात एकूण रू. १९२ कोटी ८८ लाख ठेवी, रू. १५६ कोटी ७२ लाख कर्जवाटप, रू. ५८ कोटी ५९ लाख गुंतवणूक, संस्थेचा राखीव व इतर निधी रू. २१ कोटी पेक्षा अधिक आहे. ऑडिट वर्ग सतत 'अ' असून एकूण ९ शाखा कार्यरत आहेत. सर्व ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेला राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संस्थेच्या सर्व शाखांकडे ऑनलाईन वीज बिल, फोनबिल, डीटीएच रिचार्ज, मनिट्रान्स्फर करणेची सोय, एनईएफटी, आरटीजीएस, क्यू आर कोड, आयएमपीएस, एसएमएस इ. अनेक सुविधा सभासदांकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून सभासदांना जलद व ऑनलाईन सेवा देणेसाठी संस्था लवकरच कोअर बँकिंग सिस्टीम लागू करत आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देणारे संस्थेचे सन्माननिय सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक यांनी संस्थेवर दाखविलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल व कर्मचारी यांनी संस्थेच्या वाढ व विकासासाठी केलेल्या विशेष परिश्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन दयानंद सिध्दाप्पा भुसारी यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी व्हा. चेअरमन सुधीर बाबुराव कुंभार, संचालक नारायण नाना सावंत, रविंद्र दामोदर दामले, रणजित ईश्वर पाटील, शिवाजी जिवबा येसणे, गणपत धोंडीबा जाधव, सुधीर मधुकर चोडणकर, विश्वजित धोंडीबा मुंज, राजेंद्र परशराम चंदनवाले, मुकुंद लक्ष्मण कांबळे, संचालिका सुनिता सुरेश कुंभार, सारिका नाथ देसाई, सरव्यवस्थापक श्री. अर्जुन रामा कुंभार त्याचबरोबर संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
=========================

Tuesday, May 19, 2026

शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही, आजऱ्यात शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा मोर्चाने इशारा


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
शेती, शेतकरी, पर्यावरण आणि संस्कृती उध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला एक इंचही जमीन देणार नाही असा इशारा आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी  मोर्चाने येत तहसीलदार आजरा यांना दिला. चंदगड तालुक्यात महसूल यंत्रणेने सुरू केलेल्या पाहणीच्या पार्श्वभूमीवर आज तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला.
      
सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शेतकरी जमल्यानंतर निमंत्रक कॉ. संपत देसाई, तानाजी देसाई, सुधीर देसाई, चंद्रकांत गुरव, युवराज जाधव,भीमराव माधव, दीपाली गुरव, संजय तरडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरवात झाली. मोर्चा बाजारपेठेतून तहसील कार्यालयावर आला. मोर्चात माजी आमदार के. पी. पाटील, नंदाताई बाभूळकर, मुकुंद देसाई, सुनील शिंत्रे, राजू होलम, संभाजी पाटील हे प्रमुख सहभागी झाले होते. तिथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग कोणासाठी बनवताय याचे उत्तर अजूनही सरकार देऊ शकलेले नाही. एका बाजूला शेतकऱ्यांची शेती कवडीमोल दराने घेऊन त्यांना कंगाल केले जाणार आहे. दुसरीकडे इथला निसर्ग आणि पर्यावरण उध्वस्त होणार आहे तर तिसरीकडे इथली भूमिनिष्ट संस्कृतीवर आक्रमण होणार आहे. म्हणूनच ही लढाई आम्ही विरोधात आहोत. शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले, राज्यभर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ विरोधात आंदोलन सुरू आहे. तालुक्यातील शेतकरी आता संघटित झाला असून एक इंचही जमीन इथला शेतकरी देणार नाही, प्रसंगी रक्त सांडू पण यंत्रणेला पाय ठेवू देणार नाही.
    
नंदाताई बाभूळकर म्हणाल्या, हा देश दोन माणसं दोन माणसांना विकायला निघाले आहेत. माझं सासर नागपूर तर माहेर इथं आहे. त्यामुळे सासर आणि माहेर अशी दोन्हीकडच्या लढ्यात मी असणार आहे. एव्हीएच आणि टोलची लढाई जशी लढवली तशीच ही लढाई आपण लढवू. के. पी. पाटील म्हणाले,  आजरा तालुक्यातील जनतेचे मी अभिनंदन करतो त्यांनी जिल्ह्यात लढ्याला तोंड फोडले आहे. इथे चळवळीचा भक्कम वारसा आहे. आम्ही भुदरगड मधील राष्ट्रवादी अजित दादा गटाची मंडळी या लढ्यात नेटाने उतरणार आहोत. सुनील शिंत्रे, संजय तरडेकर, कॉ. शांताराम पाटील यांनीही मनोगते व्यक्त केली. युवराज जाधव यांनी आभार मानले. यावेळी सुभाष देसाई, सर्जेराव देसाई, धनाजी सावंत, निवृत्ती कांबळे, ए के पावले, शंकर पाटील, धनाजी राणे, आदेश गुरव, उदय पवार, रणजित देसाई, युवराज पोवार, प्रकाश मोरुस्कर, आनंदराव कुंभार, काशिनाथ मोरे, कृष्णा भारतीय, सम्राट मोरे, बाळू जाधव, उदय कोडक यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
=========================

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी 1 जूनपर्यंत अर्जाचे आवाहन


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. सन 2026-27 या आर्थिक वर्षात शासनस्तरावरून प्राप्त झालेल्या उदिदष्ट व तरतूदीच्या अधिन इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर यांच्या नावे परिपूर्ण मागणी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 1 जूनपर्यंत सादर करावेत.
   
अर्जासोबत द्यावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे -
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गट हा पुरूष किंवा महिलांचा असावा. बचत गटांची नोंदणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती कृषी विभाग यांच्याकडे नोंदणी झाल्याबाबतचे बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र. स्वयंसहाय्यता बचत गटातील ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. बचत गटातील सदस्यांचे जातीचे दाखले असणे आवश्यक आहे. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतीलच असावेत. बचत गटातील सदस्यांचे रहिवासी प्रमाणपत्र. (तहसिलदार यांचे) बचत गटातील सदस्यांचे आधार कार्ड असावे. स्वयंसहाय्यता बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे संयुक्त असावे व ते आधार क्रमांकाशी संलग्न असावे. स्वयं सहाय्यता बचत गटाचे ताळेबंद प्रमाणपत्र असावे. बचत गटातील सभासदाचे रेशन कार्ड (एकाच कुटुंबातील एकच सभासद असावा). उपलब्ध तरतूदीच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त असल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल किंमत रूपये ३.५० लाख राहोल. त्यामध्ये ९० टक्के म्हणजेच रूपये ३.१५ लक्ष (तीन लाख पंधरा हजार रूपये फक्त) शासकीय अनुदान व स्वयंसहाय्यता बचत गटाचा हिस्सा १० टक्के म्हणजेच रूपये ३५,०००/- इतका असेल. अर्ज कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार निवडीसाठी केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले.
======================

औषध दुकानदारांच्या बंद दरम्यान नागरिकांसाठी नियंत्रण कक्ष सुरू


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेतर्फे बुधवार, 20 मे रोजी अखिल भारतीय केमिस्ट बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील औषध दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांनी पुकारलेल्या या एकदिवसीय बंदमध्ये जिल्ह्यातील औषध विक्रेते सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बंदच्या कालावधीत रुग्णांच्या अत्यावश्यक व तातडीच्या उपचारासाठी औषधे उपलब्ध व्हावीत तसेच औषधाअभावी कोणत्याही रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन, कार्यालयात एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून नागरिकांनी औषधांबाबत सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
   
सहायक आयुक्त (औषधे)- संपर्क क्रमांक  0231-2641091 व मोबाईल क्रमांक - 9028866959 तसेच बंदच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय पूर्णवेळ सुरू ठेवण्यात येणाऱ्या औषध दुकानांची यादी व संबंधितांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे- ऑफिस- 0231-2650128, 9423570128, प्रल्हाद खवरे (हातकणंगले)- 9881011110, किरण जाधव (पन्हाळा, गगनबावडा, शाहुवाडी) – 9423282526, संदिप मिसाळ (आजरा, चंदगड, गडहिंग्लज)- 9922230677, मोहन ढेरे (राधानगरी, भुदरगड, कागल)- 9545344399, सचिन पाटील (शिरोळ)- 9890151673, संतोष पाटील- (इचलकरंजी)- 8329525559, आदित्य चौगुले (कोल्हापूर शहर व करवीर तालुका)- 9923456559, सुरेश काटकर (कोल्हापूर शहर व करवीर तालुका)- 9545737474, दिपक वाडकर (कोल्हापूर शहर व करवीर तालुका)- 7709344343 या ठिकाणी गरजूंनी संपर्क साधावा.
   
============================

Monday, May 18, 2026

नेसरी येथे गुरुवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, स्वामी प्रतिष्ठान, पोखरण रोड, ठाणे आणि तुकाराम कृष्णाजी कोलेकर आर्टस ॲण्ड कॉमर्स महाविद्यालय, नेसरी, ता. गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी 21 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत तुकाराम कृष्णाजी कोळेकर आर्टस ॲण्ड कॉमर्स महाविद्यालय नेसरी येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
    
या रोजगार मेळाव्यामध्ये 29 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 929 पेक्षा जास्त रिक्तपदे या रोजगार मेळाव्याकरिता कळविण्यात आलेली आहेत. या पदांकरीता किमान 8 वी, 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, बी.ई, बी कॉम, एमबीए, डी फार्म, बी फार्म तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व ‍शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या 3  प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.  जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले.
==============================

Sunday, May 17, 2026

आपत्कालीन परिस्थितीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या पर्जन्यमानामुळे पुरस्थिती निर्माण होते. या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली. राजाराम बंधारा येथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यंत्रणा सज्ज असावी या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी साहित्य आणि प्रात्यक्षिकाची आज पाहणी केली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राजाराम बंधारा येथे देखभाल, दुरुस्ती, प्रात्यक्षिक व प्रशिक्षण या उद्देशाने तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
            
प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणामध्ये सामील झालेल्या आपदा मित्र व आपदा सखींची आस्थापूर्वक चौकशी करून त्यांना आपत्कालीन स्थितीमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच रेस्क्यू बोट, लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, सॉकर कटर, हायड्रोलिक कटर, रेस्क्यू रोप, इमर्जन्सी फ्लोटींग लाईट्स आदींची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी राठोड यांनी यावेळी केली. याप्रसंगी करवीर तहसीलदार स्वप्निल पवार अग्निशमन दलाचे अधिकारी दस्तगीर मुल्ला, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह आपदा मित्र व सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=======================

७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे दिमाखात अनावरण


बेळगाव, विकास न्यूज नेटवर्क....
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनाचा ध्यास घेणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २०२६ च्या निमंत्रण पत्रिकेचे आज मराठा मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात अनावरण करण्यात आले.जेष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे  या संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत. मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, परिषदेचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष महादेव चौगुले, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण तसेच शिवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. साहित्यप्रेमी, कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली होती.
  
यावेळी बोलताना आप्पासाहेब गुरव म्हणाले, “मराठी साहित्य संमेलन ही केवळ साहित्यिक परंपरा नसून सांस्कृतिक ऊर्जा देणारी चळवळ आहे. मराठी भाषा आणि संस्कृती जपणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला मराठा मंदिरचे सदैव पाठबळ राहील,” असे सांगत त्यांनी संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या. परिषदेचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मराठी भाषा, संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जागृत ठेवण्यासाठी तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि नवोदित लेखकांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. सीमाभागात मराठीचा जागर घडविणारे हे संमेलन ठरणार आहे.”

जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी, “बेळगावच्या साहित्यिक परंपरेला नवे बळ देणारे आणि मराठी संस्कृतीचा उत्सव ठरणारे हे संमेलन साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरेल,” असे मत व्यक्त केले. मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात केले. यावेळी मराठा मंदिर संचालक चंद्रकांत गुंडकल व  परिषदेचे उपाध्यक्ष डी. बी. पाटील, एम. वाय. घाडी, मोहन अष्टेकर, संजय मोरे , संजय गौंडाडकर, मोहन पाटील व गणेश दड्डीकर तसेच महिला कार्यकारिणीतील नेत्रा मेणसे, सविता व्यसने, रोशनी हुंद्रे, संजीवनी खंडागळे, स्मिता मेंडके आणि गीता घाडी उपस्थित होत्या. कार्यक्रमास पत्रकार श्रीकांत काकतीकर, उपेंद्र बाजीगर, सतीश जाधव , अनंत कुचेकर , संजय सुर्यवंशी  आणि शिवाजी शिंदे यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित चौगुले यांनी केले.
==========================

Saturday, May 16, 2026

छत्रपतींच्या प्रेरणेने आजरा तालुक्यात रक्तदानाचा महायज्ञ यशस्वी; २११ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग, मुरुडे गाव अव्वल


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आजरा तालुक्यात आयोजित करण्यात आलेला भव्य रक्तदान महायज्ञ उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. शिवशाहू प्रतिष्ठान आणि बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बुरुडे (नेसरी - महागाव रोड कॉर्नर), ता. आजरा येथे पार पडलेल्या या उपक्रमात तब्बल २११ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मानवतेचा संदेश दिला. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात युवक, महिला आणि विविध गावांतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. गावागावांत झालेल्या सामाजिक चुरशीमध्ये मुरुडे गावाने सर्वाधिक रक्तदान करत मानाचा छत्रपतींचा जिरेटोप पटकावला. चाफवडे गावाने द्वितीय तर विंझणे गावाने तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
  
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योजक विठ्ठल घेवडे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी आयोजक आणि कार्यकर्त्यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले. कार्यक्रमावेळी रक्तदात्यांचा सन्मान विश्वस्त जीवन भोसले यांच्यासह अध्यक्ष रविंद्र देसाई, सचिव कृष्णा पाटील, सुहास खामकर, निलेश मानकर, दिनकर कोकीतकर, धनाजी बुगडे, संदिप चव्हाण, सम्राट चव्हाण,सतिश पाटील, राजकुमार भोगन आणि संतोष वर्टेकर यांच्या हस्ते करण्यात आला. “रक्तदान म्हणजे जीवनदान असून समाजातील प्रत्येकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे,” असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
=======================

सोमवारचा शक्तीपीठ विरोधी मोर्चा यशस्वी करणार; मसोली, पेरणोली, देवर्डे येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्धार....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा सोमवारी होणारा मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करण्याचा निर्धार गावोगावी होत असलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकांमधून करण्यात येत आहे. नुकताच आजरा एमआयडीसी येथे झालेल्या टोल मधून आजरा तालुका वगळण्याचा निर्णय झाला असून या निर्णयामुळे आजरा तालुक्यातील लढणाऱ्या जनतेला बळ मिळाले आहे. गेली तीन वर्ष आजरा तालुक्यातील जनता टोलविरोधी आंदोलन करीत आहे  या आंदोलनामुळे टोल मधून तालुक्यातील घरगुती वापराच्या खाजगी वाहनांना सवलत मिळाली आहे. हा एक प्रकारे लढणाऱ्या जनतेचा विजय आहे. म्हणूनच आजरा तालुक्यातील जनता संघर्षावर विश्वास ठेवून सोमवारच्या मोर्चात मोठ्या संख्येने उतरणार आहे असे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई यांनी सांगितले गेले.
  
ते म्हणाले आठवड्यापूर्वी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आजरा तहसील कार्यालयावर १८ तारखेला सोमवारी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. हा केवळ इशारा न होता प्रत्यक्ष मोर्चात मोठ्या संख्येने उतरून शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे हे तालुक्यातील जनता दाखवून देईल. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले राज्यभर या विरोधात मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. आजरा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने लढ्यात उतरून हा तालुका लढणाऱ्यांचा आहे हे दाखवून देईल. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही या निर्धाराने तालुक्यातील शेतकरी आता कामाला लागला आहे. मसोली येथे झालेल्या बैठकीत ए. के. पावले, सरपंच गुरव यांनी स्वागत आणि प्रस्तावना केली. पेरणोली येथील सभेत सुभाष देसाई, सुरेश कालेकर, विठ्ठल मस्कर, आदेश गुरव, कृष्णा सावंत, सर्जेराव देसाई, अमृत सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर देवर्डे येथील सभेत मुकुंद तानवडे, जोतिबा चाळके, निवृत्ती कांबळे, बळीराम तानवडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=======================

Friday, May 15, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु...


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
दसरा चौक कोल्हापूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. 2 मध्ये सन 2026-27 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून या वसतिगृहात इयत्ता 10 वी पास झालेल्या व कोल्हापुर येथील कोणत्याही महाविद्यालयात इयत्ता 11 वी करिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे सुरू आहे.
  
अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनामुल्य प्रवेश दिला जाणार असून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत रहाण्याची सोय, भोजन तसेच संगणक कक्ष (ई लायब्ररी), इंटरनेट सह वाय-फाय सुविधा, खेळ साहित्य, मनोरंजन कक्ष तसेच स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीरे,  आरोग्य तपासणी व दरमहा निर्वाह भत्ता अशा अनेक सोईसुविधा विनामुल्य आहेत. गरजु विद्यार्थ्यांनी वसतिगृहात विनामुल्य प्रवेश घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्ट्या वगळून) संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या अधिक्षकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 8856007439,  9881689733 व 9028333228 या क्रमांकावर संपर्क साधावा.
====================

ऊसतोड कामगारांच्या बाबतीत आर्थिक मदतीचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
ऊसतोड मजुरांना साखर कारखान्यांकडून जास्तीत जास्त सुविधांचा लाभ मिळावा तसेच त्यांच्या बाबतीतील आर्थिक मदतीचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीसमोर सादर करावेत असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अनुदान योजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात घेण्यात आली.                               
    
ते म्हणाले, ऊसतोड कामगार हा आर्थिकदृष्ट्या तितकासा सक्षम नसतो. त्यांना मदत करताना मानवीय दृष्टिकोन बाळगण्यात यावा. जखमी कामगारांच्या बाबतीत संबंधित साखर कारखान्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. तसेच काही ऊसतोड कामगारांच्या आर्थिक मदतींच्या प्रस्तावांवर सिव्हिल सर्जन यांचा अभिप्राय घेण्यात यावा. प्रस्ताव सादर करताना यामध्ये कोणत्याही स्वरूपाची त्रुटी राहू नये याची दक्षता घेण्यात यावी. प्रारंभी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी सानुग्रह अनुदानाच्या अनुषंगाने सादर झालेल्या प्रस्तावांबाबतची माहिती या बैठकीत दिली. या बैठकीसाठी डॉ. रेश्मा पाटील, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर, महेंद्र कांबळे, बी. बी. पाटील यांच्यासह समाजकल्याण विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
===========================

पी. एम. सुर्यघर योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवणार : मंत्री हसन मुश्रीफ


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ निश्चयातून साकारलेली पी. एम. सुर्यघर योजना संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवून पर्यावरण संरक्षण तसेच महागाईच्या कालखंडामध्ये ग्राहकांना शुन्य वीज बिल आणून दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात मंत्री मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील पाणंद रस्ते, जयसिंगराव तलाव पाणीपुरवठा, महावितरण आदी प्रश्नांसह इतर विषयांचा आढावा त्यांनी घेतला.
  
ते म्हणाले, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने अल्प व्याजदरात घरगुती सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी इच्छुक नागरिकांना कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.तसेच कागल तालुक्यातील 86 गावात किमान एक किलोमीटर पर्यंतचे पाणंद रस्ते संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर तयार करावेत यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून कागल नगर परिषदेच्या मालकीचा असलेला जयसिंगराव तलावामध्ये पाणी पातळी कमी राहते .हा तलाव जलसंपदा विभागाने कायमस्वरूपी पूर्ण क्षमतेने भरून देण्याबाबत आपण लवकरच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालयामध्ये बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले

कागलच्या पर्यटनक्षेत्रामध्ये भर टाकणारे आणि मिनी गोवा म्हणून ओळखले जाणाऱ्या या परिसरातील कारंजे, धबधबे , लाईट शो पाहण्यासाठी जिल्हाधिकारी राठोड व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ. जॅस्मिन यांनी कागलचा लवकरात लवकर दौरा करावा असे निमंत्रणही त्यांनी या बैठकीत दिले. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, तहसीलदार अमरदीप वाकडे, नगरपालिका मुख्याधिकारी अजित पाटणकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता एम एस मिसाळ, प्रवीण काळभोर, मनोज फराकटे, युवराज पाटील यांच्यासह संबंधित उपस्थित होते.
============================

भादवणच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : राजे समरजितसिंह घाटगे, ई-लर्निंग संच लोकार्पण, अभ्यासिका उद्घाटन व गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
भादवण गावाने माझ्या राजकीय जीवनात वेळोवेळी साथ दिली आहे. या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
भादवण (ता. आजरा) येथे नवचेतना समूहाच्या वतीने आयोजित राजे फाउंडेशनच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या ई-लर्निंग संचचे लोकार्पण, अभ्यासिका उद्घाटन आणि गुणवंतांचा पुरस्कार वितरण या संयुक्त सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
  
यावेळी बोलताना घाटगे म्हणाले की, “येणारा काळ तंत्रज्ञानाचा असून ग्रामीण भागातही ई-लर्निंग आणि अभ्यासिका अत्यंत गरजेच्या आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा. महिला वर्गाने बचत गटांच्या माध्यमातून पुढे येऊन स्वतःचे उत्पादन बाजारपेठेत आणावे. त्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल.महिलांनी आरोग्य तपासणीबाबत संकोच न बाळगता वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. “राजे फाउंडेशनच्या माध्यमातून गावोगावी आरोग्य शिबिरे आयोजित केली जात असून त्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आदर्श शिक्षक सुभाष सुतार, उत्कृष्ट शेतकरी सुनिल जोशीलकर, उत्कृष्ट व्यावसायिक दयानंद पोवार तसेच मूकबधिर महिला कासूबाई पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस भरती व इतर क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंतांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमात आजरा नगराध्यक्ष आशोक (आण्णा) चराटी, सरपंच माधुरी गाडे, पंचायत राजचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत सुतार, संभाजी सरदेसाई, जनार्दन निऊंगरे, आनंदराव कुलकर्णी समिर पारधे यांसह  मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य रणजित गाडे यांनी केले. यावेळी राजेश जोशीलकर, सुनील कुराडे, विकास बागडी, संजय केसरकर, संदीप गुरव, अनिल पाटील, मारुती देसाई गुरुजी, टि ए  पाटील सर, आनंदराव जोशीलकर, सागर खुळे, सुनील मुळीक, जितेंद्र गाडे, संदीप सुतार, भीमराव केसरकर, बाळासाहेब कुंभार, जनार्दन उंडगे व विजय गाडे यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन दिवेकर सर यांनी तर आभार प्रदर्शन सतीश खुळे यांनी केले.

गाडे कुटूंबियांच्या पाठीशी ठामपणे राहणार : राजे समरजितसिंह घाटगे...
या उपक्रमासह कार्यक्रमासाठी सरपंच माधुरी गाडे आणि प्राचार्य रणजित गाडे यांनी विशेष प्रयत्न केले. या उभयंतांचे सामाजिक, राजकिय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कार्याची पोच त्यांना सरपंच पदाच्या रुपाने मिळाली असल्याचे गौरवोद्गार काढत त्यांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे प्रतापादन राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटानिशी दाद दिली.
=======================

इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात ३ रुपयांची वाढ....


नवी दिल्ली, न्यूज नेटवर्क...
सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. गेल्या काही काळापासून स्थिर असलेल्या इंधन दरांमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३ रुपयांची दरवाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे देशात इंधन दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलने १०६ रुपयांचा टप्पा ओलांडला असून, डिझेल महागल्याने आता मालवाहतूक आणि पर्यायाने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
   
देशातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे नवे दर (प्रति लिटर) :
पेट्रोलच्या दरात झालेली वाढ वाहनधारकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. मुंबईत पेट्रोलने पुन्हा १०६ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
मुंबई : १०६.६८ रुपये (३.१४ रुपयांची वाढ)
दिल्ली : ९७.७७ रुपये (३.०० रुपयांची वाढ)
कोलकाता : १०८.७४ रुपये (३.२९ रुपयांची वाढ)
चेन्नई : १०३.६७ रुपये (२.८३ रुपयांची वाढ)

डिझेलही महागले; मालवाहतुकीवर परिणाम होणार?
डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे केवळ खासगी वाहनचालकच नव्हे, तर मालवाहतूक क्षेत्रावरही याचा मोठा परिणाम होणार आहे. डिझेल महागल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
देशातील प्रमुख शहरातील डिझेलचे नवे दर (प्रति लिटर)
मुंबई : ९३.१४ रुपये (३.११ रुपयांची वाढ)
दिल्ली : ९०.६७ रुपये (३.०० रुपयांची वाढ)
कोलकाता : ९५.१३ रुपये (३.११ रुपयांची वाढ)
चेन्नई :९५.२५ रुपये (२.८६ रुपयांची वाढ)

महागाईचा सर्वसामान्यांना फटका...
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार यांचा परिणाम भारतीय इंधन दरांवर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या दरांमध्ये अचानक ३ रुपयांची वाढ झाल्याने सामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी प्रवासासाठी आता नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागतील.
=======================

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...