Thursday, July 25, 2024

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना शुक्रवार व शनिवारी सुट्टी जाहीर

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना शुक्रवार व शनिवारी सुट्टी जाहीर 
कोल्हापूर, वृत्तसेवा :

गेल्या काही दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक नद्या पात्रा बाहेरून वाहत आहेत. यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. तसेच जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना  दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवार (दि. 26 जुलै) व शनिवार (दि. 27 जुलै) रोजी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असणार आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मात्र शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे काम आदेश देण्यात आले आहेत.

 या आदेशानुसार जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेमधील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक २६ व २७ जुलै २०२४, अशी २ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
=============

आजरा अर्बन बँकेच्या ३५ व्या फुलेवाडी (कोल्हापूर) शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न

आजरा अर्बन बँकेच्या ३५ व्या फुलेवाडी (कोल्हापूर) शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न
आजरा, वृत्तसेवा :

मल्टी स्टेट दर्जा प्राप्त केलेली देशातील २१ वी नॉन शेड्यूल्ड नागरी सहकारी बँक व शेड्‌यूल्ड दर्जाकडे वाटचाल असलेल्या दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या ३५ व्या फुलेवाडी (कोल्हापूर) शाखेचे स्वमालकीच्या जागेत गुरुवार (दि.२५ जुलै) रोजी सकाळी ११ वा. ११ मि. अॅड. लुईस शहा (प्रथितयश विधीज्ञ व सहकार तज्ञ कोल्हापूर) यांचे शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.

याप्रसंगी अॅड. लुईस शहा यांनी ३५ व्या फुलेवाडी शाखेचे उदघाटन झालेचे जाहीर केले. यावेळी ॲड. शहा म्हणाले, अशोकअण्णा चराटी व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सक्षम पद्धतीने बँकेची वाटचाल चालली आहे. बैंकिंग रेग्युलेशन अॅक्ट मधील बदलाप्रमाणे संचालक मंडळाचा ८ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाले नंतर संचालक पद कमी करावे लागणार आहेत त्यामुळे सहकारी बँकांनी आता पासूनच काही जुने व नवीन संचालक मंडळाची रचना करूनच बँकेचे संचालक मंडळ स्थापन करून सहकाराची प्रगती करण्याचे जाहीर केले आहे. तसेच बँकेची उतरोत्तर प्रगती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णा भाऊ संस्था समूह प्रमूख व बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी यांनी बँकेच्या
स्थापने पासूनची माहिती दिली. तसेच कल्याण शाखेचे उदघाटन १५ ऑगस्ट पर्यंत करणार असलेचे जाहीर केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी बँकेत आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून सेव्हिंग खाती उघडण्याबाबतची व बँकेच्या आधुनिकीकरणबाबतची माहिती तसेच बँकेतील विविध सेवा सुविधांचीही माहिती दिली. 

उदघाटन प्रसंगी उपाध्यक्ष सुनिल मगदुम, संचालक सुरेश डांग, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फड़के, प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, अस्मिता सबनिस, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे तसेच परिसरातील प्रतिष्ठित मंडळी व मान्यवर उपस्थित होते.

बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर यांनी बँकेचा पूर्ण आढावा घेवून सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांचे यथोचित सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर यांनी केले तर आभार व समारोप बँकेचे संचालक विलास नाईक यांनी मानले.
================

Wednesday, July 24, 2024

"चित्री" ओव्हरफ्लो; आजरा तालुक्यात पावसाचा जोर

"चित्री" ओव्हरफ्लो; आजरा तालुक्यात पावसाचा जोर 
आजरा, वृत्तसेवा 

 आजरा तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिला असून आजरा व गडहिंग्लज तालुक्याला वरदान असलेला चित्री मध्यम प्रकल्प बुधवारी पहाटे सहा वाजता शंभर टक्के भरला. या प्रकल्पाच्या सांडव्यातून 124 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विद्युत निर्मितीसाठी 180 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता 1 हजार 880 दलघमी (1.88 TMC) आहे. एक जून पासून चित्री प्रकल्पाच्या परिसरात 2043 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी 5 ऑगस्ट रोजी हा प्रकल्प शंभर टक्के भरला होता. यंदा दहा दिवस लवकर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे समाधानाचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील आंबेओहोळ व सर्फनाला हे प्रकल्प यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. उचंगी प्रकल्पही दोन-तीन दिवसात पूर्ण क्षमतेने भरण्याच्या वाटेवर आहे. 
==============

Tuesday, July 23, 2024

आजरा अर्बन बँकेच्या स्वमालकीच्या जागेत फुलेवाडी (कोल्हापूर) येथे ३५ वी शाखेचा गुरुवारी शुभारंभ

आजरा अर्बन बँकेच्या स्वमालकीच्या जागेत फुलेवाडी (कोल्हापूर) येथे ३५ वी शाखेचा गुरुवारी शुभारंभ 
आजरा, वृत्तसेवा :

आर्थिक सक्षमतेचे आणि व्यवसाय वाढीचे निकष पूर्ण करीत आजरा येथील आजरा अर्बन बँकेची (मल्टीस्टेट) वाटचाल सुरू आहे. या वाटचालीमध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये बँकेने १५०० कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. आधुनिक बैंकिंग साठी जे पर्याय व्यावसायिक बँकेकडे उपलब्ध आहे असे सर्व पर्याय या बँकेकडे उपलब्ध आहेत. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सर्व सवलतीच्या योजना बँकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. या आर्थिक वर्षात बँकेला ३ नवीन शाखा उघडण्याचा परवाना बँकेस प्राप्त झाला असून त्याप्रमाणे कर्नाटक राज्यात बेळगुंदी येथे शाखा उघडण्यात आली आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील व्यवसाय, उद्योग आणि नागरिकांचे जीवनमान सुधारणे हे तत्व संस्थापक स्व. काशिनाथ चराटी (अण्णा) आणि स्व. माधवराव देशपांडे (भाऊ) यांनी विचारात घेतले होते. याच विचारांचा पाठपुरावा करत विद्यमान संचालक मंडळ कार्यरत आहे. बँकेच्या ३५ व्या फुलेवाडी (कोल्हापूर) शाखेचे स्वमालकीच्या जागेत गुरुवार (दि. २५ जुलै) रोजी सकाळी ११ वा. ११ मिनिटांनी अॅड. लुईस शहा (प्रथितयश विधीज्ञ व सहकार तज्ञ कोल्हापूर) यांचे शुभहस्ते व डॉ. महेश कदम (विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग) यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजन केले आहे. उदघाटन कार्यक्रमास बँकेचे सर्व ग्राहक, सभासद आणि हितचिंतक यांनी उपस्थित राहावे असे आग्रहाचे निमंत्रण आण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोकअण्णा चराटी, अध्यक्ष रमेश कुरुणकर, उपाध्यक्ष सुनील मगदुम, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, किशोर भुसारी, बसवराज महाळक, मारुती मोरे, आनंदा फडके, प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, अस्मिता सबनिस, सुनिल मगदूम, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले आहे.
=====================

व्यंकटराव हायस्कूलमध्ये 'गुरुपौर्णिमा उत्सव' उत्साहात साजरा; वर्गशिक्षक प्रशांत गुरव यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी दिली अनोखी गुरुवंदना

व्यंकटराव हायस्कूलमध्ये 'गुरुपौर्णिमा उत्सव' उत्साहात साजरा; वर्गशिक्षक प्रशांत गुरव यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी दिली अनोखी गुरुवंदना 
आजरा, वृत्तसेवा :

 आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. गुरूप्रति आदर व्यक्त करण्याचा दिवस. आजरा शहरातील व्यंकटराव हायस्कूल या प्रशालेतील इयत्ता 'नववी अ' च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या सुंदर नियोजनातून तसेच वर्गशिक्षक प्रशांत गुरव यांच्या संकल्पनेतून "गुरुपौर्णिमा उत्सव" हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी स्व-कल्पनेतून 96 पुष्पगुच्छ तयार केले होते. परिसरात उपलब्ध होणाऱ्या पाना-फुलांपासून तसेच टाकाऊ वस्तु पासून पुष्पगुच्छ तयार केले होते. सदर पुष्पगुच्छ यांचे परीक्षण करून प्रथम पाच विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यानुभव विषयांतर्गत 92 ग्रीटिंग कार्ड्स [शुभेच्छा संदेश पत्रे] विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीतून तयार केली होती. सर्वांचे लक्षवेधक अशी ही ग्रीटिंग्स व पुष्पगुच्छ देऊन सर्व गुरुवर्यांप्रति विद्यार्थ्यांनी आदर भावना व्यक्त केली.

वर्गशिक्षक प्रशांत गुरव यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महर्षी व्यास यांच्या जीवनापासून सुरू असणारी ही गुरु- शिष्य परंपरा विविध उदाहरणे व दाखले देऊन उलगडून दाखविली. 'गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा'... या कुमारी शलाका गिरीच्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. कल्पक सुतार या विद्यार्थ्याने व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या प्रतिमेचे हुबेहूब स्केच केले होते. विद्यार्थी संकुलाचे गुरु या नात्याने मनोवेधक असे हे स्केच होते. सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांनी आपले गुरु-शिष्याचे नाते व ही परंपरा टिकवण्यासाठीचा केलेला हा प्रयत्न उल्लेखनीय होय. पुष्पगुच्छ तयार करण्याच्या स्पर्धेत सृष्टी नाईक, नियती मटकर, कुणाल माने, तन्मय पाटील, बेबीआयेशा तगारे यांनी क्रमांक पटकाविले. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी अंशुमन भोसले, ईशान मोटे, कार्तिक हुबळे, कल्पक सुतार, यशराज कुंभार, सृष्टी नाईक, रिया देशमुख, शलाका गिरी, ऋषा देसाई, माधवी आजगेकर यांनी परिश्रम घेतले. श्रीकृष्णा दावणे व महेश पाटील यांचे तसेच सांस्कृतिक विभागाचे सहकार्य लाभले. जयवंतराव शिंपी यांनी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविले. कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळाचे संचालक माजी प्राचार्य सुनील देसाई, उद्योजक सचिनभैया शिंपी उपस्थित होते. प्राचार्य आर. जी. कुंभार व पर्यवेक्षिका व्ही. जे. शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.
=============

Sunday, July 21, 2024

'आंबेओहोळ' 100 टक्के भरला; 15 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु

'आंबेओहोळ' 100 टक्के भरला; 15 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु 
आजरा, वृत्तसेवा :

 आजरा तालुक्यातील उत्तूर परिसराला वरदान ठरणारा आंबेओहोळ मध्यम प्रकल्प रविवार (दि. 21 जुलै) रोजी दुपारी चार वाजता शंभर टक्के भरला आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. या प्रकल्पातून सध्या 15 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा प्रकल्प 1.24 टीएमसीचा आहे. शनिवारी सायंकाळी तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्या पाठोपाठ आंबेओहोळ मध्यम प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला आहे.  
  
==================

Saturday, July 20, 2024

सर्फनाला प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू; आजरा तालुक्यातील जनतेचे 24 वर्षाचे स्वप्न पूर्ण

सर्फनाला प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू; आजरा तालुक्यातील जनतेचे 24 वर्षाचे स्वप्न पूर्ण 
आजरा, वृत्तसेवा :

 आजरा तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणाऱ्या  सर्फनाला मध्यम प्रकल्पात यावर्षी पहिल्यांदाच पाणीसाठा करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पहिल्यांदाच पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे आजरा तालुक्यातील जनतेचे 24 वर्षाची स्वप्न पूर्ण झाले आहे. 24 वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी गेल्या काही वर्षात जोरदार प्रयत्न केले. आमदार आबिटकर यांच्यामुळेच सर्फनाला प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात नव्याने हरित क्रांती होणार आहे. यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. विविध अडचणींचा सामना करत यंदा घरभरणीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे यंदा धरणात पाणी साठवणूक करण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. प्रकल्पाच्या एकूण क्षमतेच्या 66% पाणीसाठा करण्यात आला आहे. 694 मीटर पर्यंत पाणीसाठा करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता प्रकल्पाच्या सांडव्यावरून प्रथमच पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. 21 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
आजरा तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणारा सर्फनाला प्रकल्प आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वास गेला आहे. हा प्रकल्प सुमारे २४ वर्ष रेंगाळला होता. घळभरणीचे काम पूर्ण झाल्याने यावर्षी या धरणात पाणीसाठा होणार आहे. सन २००० साली या प्रकल्पाला शासकीय मंजुरी मिळाली. सुरुवातीला सोपा असणारा हा प्रकल्प नंतर किचकट होत गेला. नेहमी प्रमाणे पुनर्वसनाचे प्रश्न सुटत नसल्याने संघटना व प्रकल्पग्रस्त पातळीवर विरोध होत गेला. अनेकवेळा काम थांबवले गेले. पुनर्वसन झाल्याशिवाय काम नाही हा निर्धार प्रकल्पग्रस्तांचा असल्याने व त्याची पूर्तता खात्याकडून झाली नसल्याने अनेक वर्षे काम रेंगाळले. अखेर आमदार आबिटकर यांच्या पाठपुराव्याने पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागले त्यामुळे पाणीसाठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
    
 *दृष्टिक्षेपात सर्फनाला प्रकल्प* 
* ०.६७ टीएमसी पाणीसाठा 
* २२१ कोटी रुपये प्रकल्पावर झालेला खर्च 
* प्रकल्पांतर्गत आजरा तालुक्यातील २० गावातील २६४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार 
*धरणाची लांबी १४४० मीटर असून उंची ३३.३२७ मी.
*पाणलोट क्षेत्र ११.८८ चौ.किमी.
*बुडीत क्षेत्र २४५.७२ हेक्टर
*सांडव्याची लांबी ८७ मी.
*विसर्ग क्षमता ३३९.६७ घमी/ सेकंद आहे.
*बुडीत क्षेत्रासाठी २८९.२० हेक्टर जमीन संपादन, यामध्ये खासगी २६६.४८ हे.,सरकारी १६.२२ हे व वनखात्याची ६.५० हे.याचा समावेश आहे
*या प्रकल्पांतर्गत शेळप, दाभिल, देवर्डे, साळगांव व सोहाळे हे ५ बंधारे
*लाभक्षेत्रातील गावांमध्ये पारपोली, शेळप, दाभिल, विनायकवाडी, देवकांडगाव, कोरीवडे, हरपवडे, पेरणोली, आल्याचीवाडी, गवसे, दर्डेवाडी, मेढेवाडी, देवर्डे, वेळवट्टी, कुरकुंदे, साळगांव, सोहाळे, बाची, पारेवाडी व पेठेवाडी या गावांचा समावेश
*बुडीत झालेल्या पारपोली व गावठाण या गावांचे पुनर्वसन देवर्डे व शेळप येथे पुनर्वसन वसाहतीमध्ये केले आहे. याठिकाणी सर्व नागरी सुविधा देण्यात आल्या.
===================

Thursday, July 4, 2024

साळगाव बंधाऱ्यावर पाणी; आजरा तालुक्यात पावसाची संततधार

साळगाव बंधाऱ्यावर पाणी; आजरा तालुक्यात पावसाची संततधार 
आजरा, वृत्तसेवा :

 गेल्या आठ दिवसापासून आजरा तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे. यामुळे ओढे नाले तुडुंब भरून  वाहत आहेत. खरीप हंगामाच्या शेती कामांना वेग आला आहे. पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे तालुक्यातील हिरण्यकेशी नदी दुथडी भरून वाहत आहे. तसेच नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. हिरण्यकेशी नदीवरील साळगाव (ता. आजरा) बंधारा बुधवारी रात्री पाण्याखाली गेला आहे. या हंगामात पहिल्यांदाच हा बंधारा पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरून पेरणोली, देवकांडगाव, गारगोटी कडे जाणारी वाहतूक सोहाळे मार्गे पर्यायी रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. 
========= 

Tuesday, July 2, 2024

आमदार प्रकाश आबीटकर यांचा वाढदिवस आजरा येथे विविध उपक्रमांनी साजरा

आमदार प्रकाश आबीटकर यांचा वाढदिवस आजरा येथे विविध उपक्रमांनी साजरा
आजरा, वृत्तसेवा :

 राधानगरी-भुदरगड-आजराचे कार्यसम्राट पाणीदार आमदार प्रकाश आबीटकर यांचा वाढदिवस आजरा येथील शिवसैनिक व आमदार प्रेमींनी विविध उपक्रम राबवत  उत्साहात साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांकडून आजरा ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले तसेच रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. आमदार आबिटकर यांनी मतदारसंघात केलेल्या प्रचंड विकास कामांबद्दल तसेच आजरा तालुक्याच्या पश्चिम विभागाची जीवनदायी ठरणाऱ्या सर्फनाल्याची घळभरणी पूर्ण करून पाणीसाठा सुरू केल्याबद्दल आभार मानण्यात आले. असाच विकासाचा महामेरू दिवसेंदिवस रचत जाऊन मतदारसंघाचा कायापालट करावा त्यासाठी परमेश्वर त्यांना बळ देवो अशा शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यात आल्या. या वेळी शहर प्रमुख विजय थोरवत, आजरा तालुका कृषी समिती अध्यक्ष इंद्रजीत देसाई, हरपवडे माजी सरपंच गोविंद गुरव, संतोष भाटले, साळगाव सरपंच धनंजय पाटील, आजरा तालुका माजी सैनिक अध्यक्ष दत्तात्रय मोहिते, लाटगाव उपसरपंच रणजित सरदेसाई, विजय कोंडुसकर, अमजद माणगावकर, मुदतसर मुल्ला, मंदार बिरजे, रोहित सावंत, अमर केंबळे व रुग्णालयातील स्टाफ उपस्थित होता.
==============

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...