Tuesday, June 30, 2026

सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नव्हे, तर समाजासाठी नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात : कॉ. डॉ. भारत पाटणकर; ‘गोकुळ’मध्ये ४६ सेवानिवृत्त कर्मचारी व १९ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ), कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी संघटना, आयटक आणि कॉ. अवि पानसरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळमधील ४६ सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कर्मचारी वर्गातील दहावी-बारावी परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या १९ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयातील कुरिअर हॉलमध्ये उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रमिक मुक्ती दलाचे नेते व ज्येष्ठ विचारवंत कॉ. डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गोकुळच्या प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परूळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
         
प्रमुख पाहुणे कॉ. डॉ. भारत पाटणकर यांनी मार्गदर्शन करताना सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "गोकुळसारख्या सहकारी संस्थेत सेवा करण्याची संधी मिळणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे भाग्य आहे. कोल्हापूर हा महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा पाया असलेला जिल्हा असून येथील सहकारी संस्थांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे सहकाराची ही परंपरा जपणे आणि अधिक सक्षम करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे." ते पुढे म्हणाले, "सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नव्हे, तर समाजासाठी नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात आहे. सेवाकाळात मिळालेला अनुभव समाज, शेती आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी उपयोगात आणला पाहिजे. गोकुळने दरवर्षी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केल्यास अनुभवी कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन नव्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि संस्थेशी त्यांचे नाते अधिक दृढ होईल." "प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या सेवाकाळातील अनुभव लेखी स्वरूपात जतन करावेत. त्यातून भावी पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळेल. महाराष्ट्रातील ग्रामीण विकास, शेतीची प्रगती आणि आर्थिक उन्नतीचा पाया सहकारात आहे. त्यामुळे सहकाराची मूल्ये जपत समाजहितासाठी सातत्याने कार्य करणे हीच काळाची गरज आहे," असेही त्यांनी सांगितले.
         
यावेळी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य डॉ. चंद्रकांत परूळेकर यांनी दूध उत्पादक हाच गोकुळचा खरा मालक असल्याचे सांगत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायात उतरून दूध उत्पादक म्हणून गोकुळच्या दूध संकलन वाढीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. तसेच ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कष्टाच्या बळावर उभारलेल्या कार्याचा आदर्श आजच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी गोकुळचे ४६ सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कर्मचारी वर्गातील १९ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा कर्मचारी संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ, कृषी उत्पादने आणि गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ भाकपचे कामगार नेते कॉ. दिलीप पवार, आयटकचे अध्यक्ष कॉ. एस. बी. पाटील, गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, डॉ.चंद्रकांत परूळेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, गोकुळचे व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, डॉ. व्ही. डी. पाटील, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ. मल्हार पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, जनरल सेक्रेटरी कॉ. सदाशिव निकम, संभाजी देसाई, संदीप लाटकर,  लक्ष्मण पाटील, संभाजी शेलार, कृष्णात चौगले, लक्ष्मण आढाव, दत्ता बच्चे, योगेश चव्हाण, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने सेवानिवृत्त कर्मचारी, यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
=============================

Monday, June 29, 2026

वडाची झाडे लावून सोहाळे गावातील महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
ग्रामपंचायत मौजे सोहाळे, बाची, सोहळेवाडी (ता. आजरा) येथे वटपौर्णिमेचे औचित्य साधून महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वडाची झाडे लावून अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमेची पूजा केली तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे जतन करण्याचा संकल्प करत वडाची रोपे लावली. "एक सण – एक वृक्ष" हा संदेश देत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले.
   
या उपक्रमात ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. भारती डेळेकर, सदस्या लिला देसाई, रमा कांबळे, निर्मला दोरुगडे, निशा देसाई, अनंत विद्यामंदिर शिक्षिका सौ. निकम , सौ. आजगेकर व सौ. प्रियांका पाटील (वनरक्षक) यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर वृक्षारोपण कार्यक्रमास महिला बचत गटांच्या सदस्य तसेच सोहाळे बाची गावच्या ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत, धार्मिक परंपरेसोबत पर्यावरण संरक्षणाची जोड देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.
 
========================

Sunday, June 28, 2026

आजरा तालुक्यात पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ; 91 टक्के उद्दिष्टपूर्ती...



आजरा, विकास न्यूज नेटवर्क.....
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आजरा तालुक्यातील शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिरिष देसाई, पंचायत समिती उपसभापती यशोदा पोवार, पंचायत समिती सदस्य समीर पारधे, विकास चोथे तसेच आजऱ्याचे नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांनी बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचे उद्घाटन केले. तसेच प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओची मात्रा देऊन देशाला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
     
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी, मलिग्रे, भादवण व उत्तूर तसेच ग्रामीण रुग्णालय, आजरा यांच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यासाठी तालुक्यात 108 पोलिओ बूथ उभारण्यात आले होते. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 265 कर्मचारी व 24 सुपरवायझर कार्यरत होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभरात 5,033 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले असून 91 टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यात आली आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे लसीकरण पुढील चार दिवस घरभेटीद्वारे पूर्ण करून शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. या मोहिमेस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक तसेच लोकप्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
==========================

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सेवा रुग्णालय येथे शुभारंभ...


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सेवा रुग्णालय, कसबा बावडा, येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने , जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सरिता थोरात,डॉ रेश्मा पाटील सेवा रुग्णालयाच्या अधिक्षक श्रीमती डॉ.पाटील , निवृत्त डॉ प्रवीण नाईक , इंडियन बँकेचे मुख्य व्यवस्थापक अजयसिंग तसेच शाखा व्यवस्थापक सुजित शिंदे आदी उपस्थित होते.
   
लसीकरण मोहिमेनंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते इंडियन बँकेच्या सीएसआर फंडातून जिल्हातील सुमारे 291 दिव्यांग लाभार्थ्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी डायलिसिस विभागाला भेट देऊन तेथील विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पेटस्कॅन, सिटीस्कॅन, एमआरआय, आयपीएचएल लॅबच्या बाबतीतील आढावा घेतला. यानंतर बोलताना पालकमंत्र्यांनी, सेवा रुग्णालय येथे सध्या सुरु असलेल्या उर्वशीत कामकाजाची गती वाढवून हे काम येत्या 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावे असे निर्देश दिले. यासाठी निधीची कमतरता जाणवणार नसल्याचेही श्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले. या लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात येतात. दिनांक 1जानेवारी 2026 च्या लोकसंख्येनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 86 हजार 917 बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी जिल्ह्याभरात सुमारे 2 हजार 89 लसीकरण केंद्रे स्थापना करण्यात आली आहेत. लसीकरणापासून कोणतेही बालक वंचित राहू नये यासाठी आय.पी .पी.आय ( घरभेट ) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 9 लाख 64 हजार 680 घरांना भेटी देण्यात येणार आहेत .साठी तब्बल 2 हजार 572 घरभेट पथके, 523 पर्यवेक्षक, 277 ट्रान्झिट टीम, 581 मोबाईल टीम तसेच 11 नाईट टीम कार्यरत राहणार आहेत. 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला नजीकच्या पल्स पोलिओ लसीकरण केंद्रावर नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब जरूर द्यावेत आणि पोलिओमुक्त भारत कायम राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व पालकांना करण्यात आले आहे.
==========================

Saturday, June 27, 2026

पावसाची दडी अन् चोरट्यांचा डल्ला; साळगाव मधील शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
जून महिना संपत आला तरी आभाळाकडे डोळे लावून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या साळगाव (ता. आजरा) येथील शेतकऱ्यांना आणखीन एक झटका बसला आहे. गावातील सुमारे 25 हून अधिक शेतकऱ्यांच्या हिरण्यकेशी नदीकाठावरील कृषी पंपाच्या केबल शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्या आहेत. यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे सुमारे तीन लाखाहून अधिक रकमेचे नुकसान झाले आहे.
    
हिरण्यकेशी नदी काठावर असलेल्या साळगाव गावातील अनेक शेतकऱ्यांचे नदीवर कृषी पंप आहेत. हिरण्यकेशी नदीवरील देवर्डे बंधारा ते वेळवटी जॅकवेल (रेडापाडा नावाचे शेत) या परिसरातील सुमारे 25 हून अधिक शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची केबल अज्ञात चोरट्यांनी कापून नेली आहे. यामुळे या शेतकऱ्यांचे तीन लाखाहून अधिक रकमेचे नुकसान झाले आहे. यामध्ये कृष्णा निवृत्ती पाटील, बंडू तुकाराम वेंगुळकर, पांडुरंग मारुती पाटील, सुरेश जोतिबा कुंभार, धोंडीबा मारुती पाटील, प्रकाश पांडुरंग कुंभार, मनोहर नारायण पाटील, बाबासो शंकर पाटील, अनिल रामा पाटील, उत्तम विष्णू गावडे, धाकलू भाऊ गजरकर, स्वप्निल विष्णू पाटील, दत्तात्रय गोपाळ पाटील, भगवान महादेव पाटील, आनंदा कृष्णा गजरकर, विष्णू लक्ष्मण गावडे, सुरज म्हमुलाल मुजावर, रामचंद्र भाऊ गावडे, बाबाजी संभू पाटील, पंडित राजाराम पाटील, शिवाजी गणेश पाटील, अरुण विष्णू गावडे धोंडीबा रामा गावडे यांच्यासह आणखी काही शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल कापून नेल्या आहेत. ऐन खरीप हंगामात जून महिना संपत आला तरी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. त्यातच कृषी पंपांच्या केबलची चोरी झाल्यामुळे साळगाव मधील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
=====================

Friday, June 26, 2026

लोकराजा राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराने नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी) यांचा गौरव....


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दसरा चौक, कोल्हापूर येथील मुस्लिम बोर्डिंग सभागृहात गंगाधर वृत्तपत्राच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व समाजहिताचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिला जाणारा "लोकराजा राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार" आजरा नगरपंचायत नगरसेवक परशुराम वैजू बामणे (भाऊजी) यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास पद्मश्री उदय देशपांडे, प्रा. किसनराव कुऱ्हाडे, दादासाहेब लाड, सीमाकवी रवींद्र पाटील, आक्काताई नलवडे, श्रीराम पचिंद्रे, राजेंद्र कांबळे व कमलाकर वर्टेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
    
यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक समता, शिक्षणप्रसार, बहुजन कल्याण आणि लोकहितकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे आजच्या समाजजीवनातील महत्त्व अधोरेखित केले. शाहू महाराजांनी दिलेला सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासाचा संदेश प्रत्येकाने आचरणात आणण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या मनोगतातून केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांनी परशुराम बामणे (भाऊजी) यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी शिक्षक नेते सुनील शिंदे, गोपाळ गडकरी, पांडुरंग सावरतकर, दिनकर जाधव उपस्थित होते.
=========================

डाव्यांच्या राजकारणाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आजऱ्यातील कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबीर घ्यावे; डाव्या पक्ष-संघटनांचा पत्रकार परिषदेत घणाघात...


आजरा विकास न्यूज नेटवर्क....
नैतिकता आणि नीतिमत्ता ही डाव्यांच्या राजकारणाची मूल्ये आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जन्म डाव्या विचारसरणीच्या कुटुंबात झाला आहे. त्यामुळे त्यांना डावी विचारसरणी व डाव्यांचे राजकारण याची पुरेपूर माहिती आहे. डाव्या पक्ष व संघटनांनी आजही आपली मूल्ये अबाधित ठेवली आहेत. मात्र मंत्री आबिटकर यांचे आजऱ्यातील कार्यकर्ते डाव्या पक्ष व संघटनांना बदनाम करण्याचे काम करत आहे. त्यामुळे पालकमंत्री आबिटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबीर घेऊन त्यांना डाव्याच्या राजकारणाबाबत समजून सांगावे. तसेच शिवसेना शिंदे गटाने टोलबाबत चळवळीच्या कार्यकर्त्यांवर पोकळ आरोप करू नये, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा आजरा येथील पत्रकार परिषदेत डाव्या पक्ष-संघटना, जनचळवळीच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी कॉ. संपत देसाई. शांताराम पाटील, संजय तरडेकर, दशरथ घुरे, भीमराव माधव, प्रकाश कालेकर, युवराज जाधव,  काशिनाथ मोरे, नामदेव फगरे, मारुती पाटील, बाळू जाधव, शंकर पाटील, व्ही. डी. जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
  
यावेळी कार्यकर्त्यांनी सुरुवातीला टोलबाबत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले. ते पुढे म्हणाले, डाव्यांचे राजकारण समजून टीका करावी. टोलविरोधात आंदोलनाला आमच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. आत्तापर्यंतच्या सगळ्या भूमिका, निवेदने आम्ही मांडत आलो आहोत. त्यामुळे प्रशासनाने टोलमुक्ती बाबत आमच्याशी चर्चा का केली असे म्हणणे चुकीचे आहे. मंत्री आबिटकर हे आम्हाला टोलविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करा म्हणतात पण त्यांचे कार्यकर्ते आमचा काय संबंध असा प्रश्न विचारतात. आमची राजकीय भूमिका गेली 30 वर्ष कायम आहे. सर्व कार्यकर्ते आजही चळवळीत आहेत. आम्ही कोणताही प्रश्न अर्धवट सोडला नाही. अनेक प्रश्नांसाठी संघर्ष उभा करून पूर्णत्वास नेले आहेत. आम्ही भूमिका बदलत नाही भूमिका कोण बदलत आहे हे साऱ्यांना माहित आहे. आजरा टोलमुक्तीच्या लढ्यात आजरा साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान राहिले आहे. टोल नाका स्थलांतरित झाला तरी आजरा तालुक्याला टोल मुक्ती हवी आहे. पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊनच टोलमुक्तीचा निर्णय व्हावा ही आमची भूमिका होती व कायम आहे. आम्ही कधीही सत्तेचे नव्हे कष्टकरी हिताचे राजकारण केले आहे. तुमच्याकडे इडी, सीबीआय, सत्ता आहे. त्यामुळे आमच्याकडून आर्थिक गैरव्यवहार झालेत असे वाटत असेल, तर आमची चौकशी लावा. काहीही सिद्ध झाल्यास सगळ्यातून बाजूला होण्याची आमची तयारी आहे. आमच्या चारित्र्यावर, नीतिमत्तेवर शिवसेना शिंदे गटाने बोलू नये. टोलच्या आंदोलनात शिवसेना शिंदे गट केवळ एक वेळ वगळता कधीही सहभागी नव्हता, त्यामुळे तुम्हाला टोलबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तसेच तुम्ही आंदोलनात कधी होता ते बाहेर पडण्याची भाषा करताय? डाव्या पक्ष-संघटना यांच्या चळवळीवर बोलू नये. ज्यांचे कुणाचे व्यक्तिगत आर्थिक हितसंबंध आहेत, त्यांची नावे घेऊन बोलावे. कोणतेही पोकळ आरोप करू नये अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
===================

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन; पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पुष्पहार अर्पण


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस येथे विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. समाजसुधारक, लोककल्याणकारी राजा आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, शाहू जन्मस्थळ जतन विकास समितीचे इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
   
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केलेले कार्य, सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचा दूरदर्शी निर्णय, सामाजिक न्यायासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे तसेच जातीभेद निर्मूलनासाठी घेतलेले धाडसी निर्णय यांचे यावेळी स्मरण करण्यात आले. त्यांच्या विचारांवर आणि आदर्शांवर चालण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमास विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, शिक्षक तसेच शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शाहू जन्मस्थळ जतन विकास समितीच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना शाहू जन्मस्थळ संग्रहालयासाठी जमीन हस्तांतरण तसेच कोल्हापूर इतिहास संग्रहालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.
=========================

‘गोकुळ’ मार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन...


 कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे, डॉ.चंद्रकांत परूळेकर तसेच कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
         
यावेळी मनोगत व्यक्त करताना गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य डॉ.चंद्रकांत परूळेकर म्हणाले, “राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि जनकल्याणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे महान कार्य केले. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक ठरतात. समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाचा त्यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या याच लोककल्याणकारी विचारांतून प्रेरणा घेत गोकुळ दूध संघ ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. दूध उत्पादकांचे हित, गुणवत्ता आणि विश्वास या मूल्यांच्या आधारे गोकुळची वाटचाल सुरू असून दूध उत्पादकांच्या आर्थिक उन्नतीसाठी गोकुळ दूध संघ सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. शाहू महाराजांनी दिलेल्या सर्वसमावेशक विकासाच्या विचारांचा वारसा जपत गोकुळ संघ भविष्यातही शेतकरी व दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहील.” याप्रसंगी गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परूळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. दयावर्धन कामत, दत्तात्रय वागरे, डॉ.प्रकाश दळवी, बाजीराव राणे, रमेश पाटील, कैलास मोळक, शिवाजी पाटील, डॉ. भरत साठम, डॉ. रवि नाईक, डॉ.शिवलिंग बोबडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
=============================

परिवर्तनाचे शिल्पकार : राजर्षी शाहू महाराज (जयंती विशेष)....

परिवर्तनाचे शिल्पकार : राजर्षी शाहू महाराज
    
अवघ्या ४८ वर्षांच्या आयुष्यात समता, सामाजिक न्याय आणि शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाचा नवा आदर्श घालून देणाऱ्या, समाजाला प्रगतीची दिशा दाखविणाऱ्या लोकराजाला मानाचा मुजरा... त्यांच्या १५२ व्या जयंती निमित्त...

संकलन व लेखन – सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

२६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात यशवंतराव म्हणून जन्मलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे केवळ एका संस्थानाचे अधिपती नव्हते, तर सामाजिक न्याय, शिक्षण, समता आणि मानवतेचे युगप्रवर्तक विचारवंत होते. १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेल्यानंतर आणि २ एप्रिल १८९४ रोजी राज्यकारभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सत्ता ही जनकल्याणाचे साधन असते, हे आपल्या कार्यातून सिद्ध केले. म्हणूनच त्यांना ‘लोकराजा’ आणि ‘लोककल्याणकारी राजा’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र शासन त्यांच्या जन्मदिनाचे ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून पालन करते, ही त्यांच्या कार्याची सर्वोच्च पावती आहे.
     
शाहू महाराजांवर महात्मा ज्योतिराव फुले आणि सत्यशोधक विचारांचा गाढा प्रभाव होता. समाजातील विषमता, जातिभेद, अज्ञान आणि दारिद्रय यांचे मूळ शिक्षणाच्या अभावात आहे, हे त्यांनी ओळखले. त्यामुळे त्यांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन मानले. ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ हा त्यांचा विचार आजही तितकाच समर्पक आहे. १९१७ मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानात सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण लागू केले. प्रत्येक गावात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण, गरीब आणि वंचित मुलांनाही शिक्षणाची समान संधी मिळावी म्हणून विविध समाजघटकांसाठी वसतिगृहे उभारली. म्हणूनच त्यांना भारतातील वसतिगृह चळवळीचे आद्य जनक मानले जाते.

आजच्या काळात शिक्षणाची व्याप्ती वाढली असली, तरी शिक्षणातील गुणवत्ता, मूल्ये आणि समान संधी अधिक सुधारण्याची गरज आहे. शाहू महाराजांनी दिलेला संदेश स्पष्ट होता—शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नव्हे, तर विचारक्षम, जबाबदार आणि सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी असते. आजच्या तरुणांनी त्यांच्या या विचाराचा स्वीकार करून ज्ञानासोबत सामाजिक संवेदनाही जोपासणे आवश्यक आहे.
     
शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची संकल्पना केवळ मांडली नाही, तर ती प्रत्यक्ष कृतीत उतरवली. १९०२ मध्ये त्यांनी मागासवर्गीयांसाठी शासकीय सेवेत आरक्षण लागू केले. भारतातील आरक्षणाच्या धोरणाचा हा पहिला ऐतिहासिक प्रयोग होता. सार्वजनिक विहिरी, शाळा, दवाखाने आणि सरकारी कार्यालये सर्वांसाठी खुली केली. अस्पृश्यता, वेठबिगारी, महार वतने, जातीय भेदभाव आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी कायदे करून कठोर भूमिका घेतली. आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह, स्त्रियांचे शिक्षण आणि महिलांच्या सन्मानासाठी त्यांनी प्रगतिशील निर्णय घेतले. त्यांच्यासाठी प्रत्येक माणूस हा प्रथम माणूस होता; जात, धर्म किंवा पंथ हे दुय्यम होते.

राजर्षी शाहू महाराजांनी केवळ सामाजिक सुधारणा केल्या नाहीत, तर आर्थिक आणि कृषी विकासालाही समान महत्त्व दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजारपेठा उभारल्या, राधानगरी धरणासारखे दूरदृष्टीचे प्रकल्प राबवले, सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली आणि उद्योगधंद्यांना चालना दिली. तांत्रिक शिक्षण, लष्करी शिक्षण आणि कौशल्याधारित प्रशिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांनी स्वावलंबी समाजाची पायाभरणी केली. विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन आजच्या ‘शाश्वत विकास’ या संकल्पनेशी पूर्णपणे सुसंगत आहे.

शाहू महाराजांनी कला, क्रीडा आणि संस्कृतीलाही तितकेच महत्त्व दिले. संगीत, नाटक, चित्रकला आणि कुस्तीला त्यांनी राजाश्रय दिला. बालगंधर्व, केशवराव भोसले, बाबूराव पेंटर यांसारख्या अनेक प्रतिभांना त्यांनी प्रोत्साहन दिले. समाजाचा विकास केवळ अर्थकारणाने होत नाही; संस्कृती, कला आणि मानवी मूल्ये यांच्यामुळेच राष्ट्र समृद्ध होते, हा त्यांचा व्यापक दृष्टिकोन होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला त्यांनी दिलेले पाठबळ, मूकनायक या वृत्तपत्राला केलेले साहाय्य आणि दलित समाजाच्या नेतृत्वाबाबत व्यक्त केलेला विश्वास यामुळे भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात शाहू महाराजांचे स्थान अधिक उंचावते. त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवून शासन चालवले. सत्ता ही विशेषाधिकार नसून जबाबदारी आहे, हे त्यांनी आपल्या प्रत्येक निर्णयातून दाखवून दिले.

६ मे १९२२ रोजी अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले; परंतु त्यांच्या विचारांचे आयुष्य आजही अखंड सुरू आहे. आधुनिक भारतात समता, सामाजिक न्याय, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, आरक्षण, सर्वसमावेशक विकास आणि मानवी हक्क यांविषयी जे विचार आपण स्वीकारतो, त्यांची बीजे राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वीच रोवली होती.

आजच्या तरुण पिढीसमोर तंत्रज्ञान, स्पर्धा आणि जागतिक संधींचे नवे क्षितिज खुले झाले आहे. अशा वेळी शाहू महाराजांचा आदर्श आपल्याला सांगतो की, खरे शिक्षण तेच, जे स्वतःला उन्नत करताना समाजालाही उभारी देते; खरा विकास तोच, जो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो; आणि खरे नेतृत्व तेच, जे सत्तेपेक्षा सेवेला मोठे मानते. म्हणूनच राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे केवळ इतिहासातील महान राजा नाहीत, तर भविष्याचा मार्ग दाखवणारे लोकनेते आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे, समतेचा समाज घडवणे आणि शिक्षणातून मानवतेची उभारणी करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल.
=====================

Thursday, June 25, 2026

सीपीआर नूतनीकरण वास्तूचे जुलैच्या पहिल्या आठवडयात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन : मंत्री हसन मुश्रीफ...


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय या नुतणीकरण वास्तूचे लोकार्पण पावसाळी अधिवेशन समाप्तीनंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख मिळाल्यानंतर कदाचित जुलैच्या पहिल्या आठवडयात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. शेंडा पार्क येथील छोटेखानी सभागृहात मंत्री हसन मुश्रीफ यांनी तेथे सुरू असलेल्या विविध विभागातील सोई सुविधांचा आढावा घेतला.  याप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे,माजी अधिष्ठाता डॉ.अजित लोकरे, सीपीआरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.भूषण मिरजे, डॉ.गिरीश कांबळे,वैद्यकीय महाविद्यालय अधिक्षक डॉ.शिशिर मिरगुंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
   
यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी शेंडा पार्क येथे सुरू असलेले 125 निवासी स्त्री/पुरुष डॉक्टरांचे निवासी वसतीगृह, प्रत्येकी 150 मुला/मुलींचे वसतीगृह, बॅडमिंटन व टेबल टेनिस कोर्ट, विश्रामगृह नूतनीकरण त्याचबरोबर MBBS चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जुन्या वसतिगृहाचे नूतनीकरण तसेच 150 नर्सिंग क्षमता असलेल्या हॉस्टेल व प्रशिक्षण केंद्राचा आढावा घेऊन उर्वरीत कामे येत्या वर्षाअखेर पर्यंत पूर्ण करावीत. त्याचबरोबर सध्या या ठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये पाणी, रस्ता, वीज त्याचबरोबर एसटीपीची (सिव्हेज ट्रिटमेंट प्लॅन्ट) कामे प्राधान्य करण्यात यावीत असे निर्देश दिले.शेंडा पार्क येथील कामकाजासह श्री मुश्रीफ यांनी सीपीआर येथील अपूर्ण कामांचाही आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बुरुड, डॉ. अनिता सैबनवार, प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप, मनपा जल अभियंता हर्षदीप घाटगे, कार्य अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, कार्यालयीन अधिक्षक समीर मोमीन यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी - कंत्राटदार उपस्थित होते.
=========================

चंदगड तालुक्यात 'मजरे कार्वे' येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू; कार्यक्षेत्रातील गावांची अधिसूचना प्रसिद्ध


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
राज्य शासनाच्या निर्णयानुसार चंदगड तालुक्यात मजरे कार्वे येथे नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यात येत असून, त्याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नव्या कार्यालयाचे मुख्यालय मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे राहणार असून, कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तुर्केवाडी, माणगाव, कोवाड, चंदगड, नागनवाडी आणि हेरे या सहा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांनी दिली आहे. या मंडळांअंतर्गत चंदगड तालुक्यातील शेकडो महसूल गावे नव्या अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या प्रशासकीय कार्यक्षेत्रात येणार आहेत. त्यामुळे महसूलविषयक सेवा, दैनंदिन प्रशासकीय कामकाज, दाखले, नोंदी तसेच विविध शासकीय सेवा नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

मंडळ अधिकारी भाग तुर्केवाडी अधिनस्त ग्राम महसूल अधिकारी गावे : मौजे कारवे, सुपे, मजरे कार्वे, शिनोळी खु, शिनोळी बु, देवरवाडी, तुडिये, हाजगोळी, कोलीक, खा. म्हाळुंगे, मळवीवाडी, सुंडी, महिपाळगड, करेकुंडी, कौलगे, बुकिहाळ, तुर्केवाडी, माडवळे, वैताकवाडी, मुरकुटेवाडी, तडशिनहाळ, ढेकोळी, सरोळी, ढेकोळीवाडी, सुरुते

मंडळ अधिकारी भाग माणगाव अधिनस्त ग्राम महसूल अधिकारी गावे : माणगांव, लाकूरवाडी, मलगड, माणगांववाडी, हुंबरवाडी शिवणगे, लकीकटे, मलतवाडी, म्हाळेवाडी बसर्गे, धुमडेवाडी, तावरेवाडी, गौळवाडी, निटूर, घुल्लेवाडी, ढोलगरवाडी, कडलगे खु, मांडेदुर्ग नागरदळे, किणी, कडलगे बु.

मंडळ अधिकारी भाग कोवाड अधिनस्त ग्राम महसूल अधिकारी गावे : कालकुंद्री, किटवाड, कुदनुर, तळगुळी कागणी, होसूर, हुंदळेवाडी चिंचणे, कामेवाडी, दुंडगे, कोवाड, जकनहटी, तेऊरवाडी राजगोळी खु, राजगोळी बु, दिंडलकोप, यर्तनहट्टी, चन्नेहट्टी.

मंडळ अधिकारी भाग चंदगड अधिनस्त ग्राम महसूल अधिकारी गावे : चंदगड, आसगांव, हंबिरे, चुरणीचावाडा, कोळींद्रे मौजे शिरगाव, मजरे, शिरगांव, ई सावर्डे, काजीर्णे, हिंडगांव, फाटकवाडी, शिरोली, उत्साळी, अलबादेवी, पोवाची वाडी, सत्तेवाडी, कोकरे उमगांव, जांबरे, न्हावेली, नागवे, आडूरे, कानुर खुर्द, भोगाली, पिळणी, पुन्द्रा, सडेगुडवळे, कानुर बु, धामापूर कुरणी, बिजूर बुझवडे, ई म्हाळुंगे, इब्राहिमपूर, गवसे, कानडी इ.
  
मंडळ अधिकारी भाग नागनवाडी अधिनस्त ग्राम महसूल अधिकारी गावे : नागनवाडी, कोरज कुर्तनवाडी, गंधर्वगड, कोनेवाडी, अडकुर, बोंजुर्डी, मोरेवाडी, मलगेवाडी, विंझणे, आमरोळी, पोरेवाडी, मुगळी, गणूचीवाडी, सोनारवाडी, जोगेवाडी, तांबुळवाडी, बागीलगे, डुकरवाडी, नरेवाडी, जटेवाडी, सातवणे, आसगोळी, केंचेवाडी, केरवडे, वाळकोळी, दाटे, बेळेभाट, वरगांव, गुडेवाडी.

मंडळ अधिकरी भाग हेरे अधिनस्त ग्राम महसूल अधिकारी गावे : खा. कोळीद्रे, नांदवडे, खा सावर्डे, शिपूर, सुळये, पाटणे, रायंदेवाडी, जेलुगडे, मोटणवाडी, शेवाळे, मिरवेल, वाघोत्रे, खा गुडवळे, इसापूर, खामदळे, हेरे, पार्ले, कोदाळी, कळसगादे, गुळंब, हलकर्णी, हल्लारवाडी, करंजगाव, जंगमहट्टी, आंबेवाडी, कलिवडे, किटवडे इ.

नवीन कार्यालयामुळे चंदगड तालुक्यातील नागरिकांची महसूल कार्यालयांवरील धावपळ कमी होऊन प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
===========================

Tuesday, June 23, 2026

सामाजिक न्याय दिन साजरा करण्यासाठीकोल्हापूरवासीय सज्ज; नागरिकांनी शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी समता दिंडीत सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी....


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
कोल्हापुर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने 26 जून हा दिवस "सामाजिक न्याय दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन "सामाजिक न्याय दिन" म्हणून साजरा करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग व जिल्हा प्रशासन यांचे वतीने शुक्रवार 26  जून  रोजी सकाळी 8.30 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करून त्यांना अभिवादन करण्यासाठी समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. समता दिंडीची सुरुवात पालकमंत्री, प्रकाश आबिटकर, सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू छत्रपती महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भारूड व सहायक आयुक्त सचिन साळे तसेच  विविध प्रशासकीय विभाग प्रमुख यांचे उपस्थितीमध्ये होणार आहे.
              
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन  करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय विभागांनी, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वंचित घटकातील नागरिक उदा. तृतीयपंथी नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला तसेच विविध महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, एन.एस.एस, एन. सी. सी. विद्यार्थी विद्यार्थिनी, विविध तालमी, तरुण मंडळे, बचत गट व जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी स्वेच्छेने पारंपारिक वेशभूषेत, ढोल-ताशा, लेझीमपथक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनपटावर आधारित चित्ररथ इत्यादी सह समता दिंडीची शोभा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे,  असे आवाहन जिल्ह्याधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे. 26 जून रोजी सकाळी 8 वाजता राजर्षि छत्रपती शाहू महाराज जन्म स्थळास भेट देवून मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करणेत येणार आहे. तदनंतर समता दिंडीस सुरुवात होईल. त्याचा मार्ग ऐतिहासिक दसरा चौक येथे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयास हार अर्पण करुन- छत्रपती राजाराम महाराज पुतळा (व्हिनस कॉर्नर)- माईसाहेब महाराजांचा पुतळा- ऐतिहासिक बिंदू चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक- छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय गंगाराम कांबळे स्मारक ते  ऐतिहासिक दसरा चौक मैदानात समता दिंडीची सांगता होईल.
=========================

Monday, June 22, 2026

कोल्हापूरात योग दिन उत्साहात संपन्न...


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
जिल्हा प्रशासन, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय, माय भारत व सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयुष मंत्रालयाचा कॉमन योगा प्रोटोकॉल,जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी केलेली योगाची प्रात्यक्षिके तसेच पहिल्या आंतरराष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त विजेता रोहित चव्हाण,१७ वर्षा खालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या रोहिणी देवबा व हर्षवर्धन पाटील, इनर्व्हिल क्लब आयोजित योगास्पर्धेत प्रथम क्रमांकासह योगा क्विन पुरस्कार प्राप्त गंधाली खोपकर आदी खेळाडूंचा तर रविभुषण कुमठेकर व संदीप पाटील या योग मार्गदर्शकांचा शाल,रोप तसेच प्रमाणपत्र तसेच देवून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
   
संपूर्ण जगभर 21जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो.आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनात योग ही काळाची गरज बनली आहे. योगामुळे केवळ शारीरिक स्वास्थ्य नव्हे तर मानसिक सकारात्मक विचार व निरोगी जीवनशैली विकसित होण्यास मदत होते. याप्रसंगी जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती अभियानाची सुरवात व शपथ घेण्यात आली. ही शपथ प्रा डॉ.श्वेता पुरुळेकर यांनी उपस्थितांना दिली. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते योग मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या योग दिनासाठी क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, तालुका क्रीडा अधिकारी एल. जी. पवार, सुधाकर जमादार, मनिषा पाटील, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, रोहिणी मोकाशी, स्नेहल जगताप-पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक सिमा पाटील, माय भारतचे निलेश कांबळे, हॉकी प्रशिक्षक सागर जाधव आदी उपास्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक शिवाजी पाटील यांनी केले.
=============================

Saturday, June 20, 2026

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला 3 हजार कोटींची मोठी चालना; कोल्हापूर आणि पुण्यात दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा, केंद्राच्या अनेक निर्णयांतून साखर कारखानदारीला नवसंजीवनी....


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
पश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाला नवे बळ देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी 3 हजार कोटी रुपयांच्या दोन मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1 हजार 500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प, तर पुण्यातील बंद पडलेले नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. इचलकरंजी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्सटाईल पार्कमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, नगर विकास राज्य मंत्री तथा कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धैर्यशील माने आणि धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री राहुल आवाडे, शिवाजी पाटील, अशोक माने, रवींद्र चव्हाण आणि राजेंद्र पाटील यड्रावकर, महापौर उदय धातुंडे, माजी खासदार कल्लापण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि आवाडे परिवार आदि उपस्थित होते.
   
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर केंद्र सरकारने साखर उद्योगाला स्थैर्य देण्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. साखर कारखान्यांवरील सुमारे 46 हजार कोटी रुपयांचा प्राप्तीकर माफ करण्यात आला असून, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळामार्फत (NCDC) 10 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविणे, मल्टीफीड इथेनॉल प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आणि इथेनॉलवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करणे यांसारख्या निर्णयांमुळे साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळाली आहे. बंद पडलेल्या साखर कारखान्यांना पुन्हा कार्यान्वित करण्याबरोबरच उद्योगाला साखरेपलीकडे इथेनॉल, सीबीजी आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांकडे वळविण्याचे धोरण राबविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. काही सहकारी साखर कारखाने स्वतंत्रपणे सायट्रिक ॲसिड, इथेनॉल किंवा सीबीजी निर्मिती प्रकल्प उभारू शकत नाहीत. त्यामुळे सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या उपउत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1 हजार 500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा अमित शहा यांनी केली. या प्रकल्पात विविध कारखान्यांची बाय-प्रॉडक्ट्स एकत्र करून त्यापासून सायट्रिक ॲसिड, इथेनॉल, सीबीजी आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार केली जातील. या प्रकल्पातून मिळणारा सर्व नफा पुन्हा सहभागी साखर कारखान्यांना वितरित केला जाणार असल्याने शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होणार आहे. या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी एका बैठकीतच तत्काळ मंजुरी दिली असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. पुढील तीन महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी पुण्यातील बंद पडलेले ‘नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह’ पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून 1 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा केली. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशातील आणि जगभरातील साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचे काम येथे केले जाणार आहे. तसेच डेअरी प्लांट, इथेनॉल प्लांट, सायट्रिक ॲसिड प्लांट आणि शेण अथवा मळीपासून सीबीजी निर्मिती करणाऱ्या संयंत्रांसाठी लागणारी यंत्रणा तयार करण्याची क्षमता या केंद्रात विकसित केली जाणार आहे. या उपक्रमातून मिळणारा आर्थिक लाभही सहकारी क्षेत्राला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, इचलकरंजी शहरासाठी 2051 सालापर्यंत पिण्याचे पाणी शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड येथून उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक निधी राज्य शासन देईल. तसेच पॉवरलूम उद्योगासाठी सोलर पार्क उभारून स्वस्त व स्वच्छ वीज उपलब्ध करून देण्यात येईल. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी इचलकरंजीच्या सहकार आणि वस्त्रोद्योग विकासातील ऐतिहासिक योगदानाचाही उल्लेख केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी हे सहकारातून समृद्धी निर्माण करणारे आदर्श मॉडेल असल्याचे सांगितले. महाराष्ट्राची सहकार चळवळ शेतकरी आणि सभासदांच्या सामूहिक शक्तीवर उभी असल्याचे नमूद करत त्यांनी सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध सुधारणांची माहिती दिली. शहरी सहकारी बँकांसाठी नवी धोरणे, आधार-सक्षम पेमेंट प्रणाली, गोल्ड लोन आणि कर्जमर्यादा वाढ, वन-टाइम सेटलमेंट योजना आणि ‘अम्ब्रेला ऑर्गनायझेशन’ची संकल्पना यामुळे सहकार क्षेत्र अधिक बळकट झाल्याचे ते म्हणाले. यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्ताराची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमात आमदार राहुल आवाडे यांनी प्रास्ताविक केले, तर राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी आभार मानले. मोठ्या संख्येने नागरिक आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
===========================

1 हजार 500 कोटी रुपयांच्या निधीतून अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचे काम सुरू : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; कोल्हापूरमध्ये कृतज्ञता सोहळा व जाहीर सभा...


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर शासनाच्या तब्बल 1 हजार 500 कोटी रुपयांच्या निधीतून खर्च करून हा परिसर विकास कॉरीडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे गौरोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले. कोल्हापूरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत (दादा) पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, नगर विकास राज्यमंत्री तथा कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री डॉ. विनय कोरे, डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, डॉ.अशोकराव माने, शिवाजी पाटील, निरंजन डावखरे, जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत, महापौर रुपाराणी निकम, माजी आमदार प्रकाश आवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
   
गृहमंत्री शहा म्हणाले, 7 व्या शतकातील असलेल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सुमारे 41 छोट्या-मोठ्या मंदिराचे संरक्षण करून येथील परिसर पुढील 6 महिन्याच्या आत विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणी अन्नछत्र सुरू करण्याबाबत आपण सकारात्मक असल्याचे सांगितले.  आपल्या  वारशाचे, संस्कृतीचे जतन, संवर्धन करणे आणि त्याला चालना देणारे हे शासन असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारर्कीदीत आर्थिक, संरक्षण, सुरक्षा या सर्वच क्षेत्रात झालेल्या प्रगतीची मांडणी करताना देशातील घुसखोरांना अत्यंत बारकाईने शोधून काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ग्रामीण व शहरी भागातील विकास गतीने सुरू असल्याचेही मंत्री शहा म्हणाले.
   
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची अध्यात्मिक व सांस्कृतिक शक्ती पुनर्जीवित होत आहे. या परिसराचा विकास करण्याचा आग्रह केंद्रीय गृहमंत्र्यांनी धरला होता. राज्यातील 5 जोतिर्लिगांसह कोल्हापूर जिल्ह्यातील  जोतिबाचाही विकास सुरु आहे.  भाविकांसाठी या आराखड्यातून पुढील शंभर वर्षात सेवा करता येईल असे व्यापक काम  राज्य शासनाने हाती घेतले आहे. कोल्हापूर शहर हे केवळ शक्तिपीठ अथवा अध्यात्माची पंढरी नाही तर ती सहकाराची आद्य पंढरी असल्याचे सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कणखर नेतृत्वात देशाची वेगळी ओळख निर्माण झाली असून त्यांनी सहकार क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याचे गौरोवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, येथील मंदिर परिसरातील आधुनिकीकरण व सुशोभीकरणाच्या कामाला आज प्रारंभ झाला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर एक वेगळ्या उंचीवर जाईल. महाराष्ट्राने संपूर्ण देशाला अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख दिली आहे.अमित शहा हे अतिशय कणखर गृहमंत्री असून देशातील नक्षलवाद संपवण्याचे काम केंद्रीय गृहमंत्र्यालयाद्वारे पूर्ण झाले. त्याचबरोबर सहकार क्षेत्रात अनेक लोकाभिमुख बदल श्री शहा यांनी घडविले आहेत. पालकमंत्री प्रकाश अबिटकर म्हणाले, तिर्थक्षेत्र विकास आराखडा हा कोल्हापूरवासियांसाठी अत्यंत अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातर्गंत या ठिकाणी भाविकांना सुविधा निर्माण होतील. राज्यातील इतर सुविधांना ही केंद्र शासनाने गती देवून महाराष्ट्राचा विकास करावा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा संयोजकाच्या वतीने महालक्ष्मीची मूर्ती व तलवार देऊन सन्मान करण्यात आला. गृहमंत्री शहा यांच्या भाषणानंतर पालकमंत्री आबिटकर व महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते मंदिर विकास आराखडा गृहमंत्र्यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार धनंजय महाडिक तर आभार प्रदर्शन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
===============================

१ हजार ४४५.९७ कोटींच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ.....

१ हजार ४४५.९७ कोटींच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ.....

मंदिर जतन, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ
     
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १ हजार ४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांच्या कोनशीलेचे अनावरण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, नगर विकास राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रुपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल उपस्थित होते.
     
गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर मंदिर परिसरातील रामाचा पार येथे श्रींच्या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन प्रदक्षिणा मार्ग, परिवार देवता मंदिर संवर्धनासह मुख्य मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकास कामांच्या कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या मंदिर आराखडा प्रदर्शनाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर हे भारतातील प्राचीन, जागृत आणि प्रमुख शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. सुमारे हजार वर्षांहून अधिक इतिहास लाभलेल्या या मंदिराचा उल्लेख विविध पुराणे आणि ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आढळतो. हेमाडपंथी स्थापत्यशैली, समृद्ध शिल्पकला आणि धार्मिक परंपरांचा अद्वितीय संगम असलेले हे मंदिर देश-विदेशातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मंजूर केलेला महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा हा कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीला अधिक बळकटी देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरत आहे. मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सोयी-सुविधा आणि पर्यटन विकास या सर्व बाबींचा समन्वय साधत हा आराखडा राबविण्यात येत आहे. विकास आणि वारसा संवर्धन यांचा समतोल राखत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे मंदिर परिसराचे वैभव अधिक वृद्धिंगत होणार असून भाविकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
   
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याला ६ मे २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण १ हजार ४४५.९७ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. नियोजन विभागाच्या २८ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात १४३.९० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यामध्ये पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मूळ मंदिराचे जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे. सध्या मूळ मंदिराच्या संवर्धनासाठी ३२.९६ कोटी रुपये तसेच मंदिरातील विद्युतीकरण, सीसीटीव्ही आणि लाईटिंगविषयक कामांसाठी २३.०५ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. मंदिराचे पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या ४१ लहान-मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण २८,०५८ चौरस मीटर जमिनीचे मूल्यांकन करण्यात आले असून त्यापैकी १९,४८९ चौरस मीटर खाजगी क्षेत्राच्या भूसंपादनाची प्रक्रिया अपर मुख्य सचिव (नगर विकास) यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे. तीन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या बृहद विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर व देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकाने, अँफिथिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टिपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या प्रमाणावर वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. केंद्र आणि राज्य शासन धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी कटिबद्ध असून हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. कार्यक्रमास राज्य शासनातील मंत्री, खासदार, आमदार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
=======================

Friday, June 19, 2026

शिवसेनेचा वर्धापन दिन आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने उत्साहात साजरा....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन शिवसेना आजरा तालुक्याच्या वतीने अतिशय उत्साहात साजरा करणेत आला. संघर्षातून उभा असणाऱ्या या संघटनेला आज 6 दशक पूर्ण झाली. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी सातत्याने लढण्याची आणि रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करण्याची शिकवण शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पक्षाला पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आजच्या या शुभ दिनी शिवसेना आजराचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सामाजिक भान जपत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे रुग्णांना फळांचे वाटप केले. तसेच नव्याने होत असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयच्या इमारतीच्या कामाला भेट देऊन सविस्तर आढावा घेतला. येणाऱ्या काळात पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून पक्ष संघटना मजबूत करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी आजरा संपर्क प्रमुख जितेंद्र भोसले, शिवसेना शहर प्रमुख विजय थोरवत, पाणंद समितीचे सदस्य इंद्रजित देसाई, उप तालुका प्रमुख काका देसाई, युवासेना तालुका प्रमुख मंदार बिरजे, रणजित सरदेसाई, संतोष भाटले, धनंजय पाटील, महेश खेडेकर, सुनील दिवेकर, अमजद माणगावकर तसेच ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. अमोल पाटील व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
  
=========================

Thursday, June 18, 2026

श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विविध कामकाजाचा शुभारंभ शनिवारी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार; नवीन प्रदक्षिणा मार्ग व परिवार देवता मंदिर संवर्धन कामांचा समावेश...



कोल्हापूर, न्यूज नेटवर्क.....
पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग व परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा शुभारंभ शनिवार, २० जून रोजी सकाळी होणार आहे. हा शुभारंभ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. महाराष्ट्र शासनाच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व करवीर निवासिनी श्री अंबाबाई विकास आराखडा अंतर्गत हा विकास प्रकल्प राबवला जात आहे. नवीन प्रदक्षिणा मार्गामुळे भाविकांना मंदिर प्रदक्षिणा करताना अधिक सुविधा, सुसज्जता आणि सुरक्षितता उपलब्ध होणार आहे. तसेच परिवार देवता मंदिरांचे संवर्धन व सुशोभीकरण केले जाणार आहे.
   
यावेळी, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री कोल्हापूर माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह खासदार शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर महानगरपालिका महापौर रुपाराणी निकम,  सर्वश्री आमदार सतेज पाटील, अरुण लाड, जयंत आसगावकर, विनय कोरे (सावकर), राजेंद्र पाटील (यड्रावकर), चंद्रदीप नरके, अमल महाडिक, डॉ. अशोकराव माने, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, विभागीय आयुक्त, पुणे शीतल तेली-उगले उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांची कोल्हापूर येथे राजकीय सभा तसेच इचलकरंजी येथे सहकारी बँकेचा कार्यक्रम व राजकीय सभा होणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्याकडून पूर्वतयारीबाबत आढावा....
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या दौऱ्यात संबंधित अधिकाऱ्यांनी नेमूण दिलेली जबाबदारी अचूक पार पाडावी, याबाबतीत कोणतीही हयगय नको तसेच प्रत्येक ठिकाणी समन्वयाने कामकाज करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड उपस्थित होते.
=======================

Wednesday, June 17, 2026

आजरा नगरपंचायतीतील अधिकृत व अनधिकृत नळजोडण्यांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची मागणी....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क.....
सामाजिक सेवा प्रतिष्ठान, आजरा प्रणीत अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचायतीच्या हद्दीतील अधिकृत व अनधिकृत नळजोडण्यांचे सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल सादर करावा तसेच अनधिकृत नळजोडण्या नियमानुसार नियमित करण्याबाबतचे निवेदन आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे व  मुख्य ठेकेदार आर. डी. देसाई यांना देण्यात आले. यावेळी  नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी), स्मिता कुंभार (परळकर) तसेच अन्याय निवारण समितीचे पांडुरंग सावरतकर, जोतीबा आजगेकर, दिनकर जाधव, मिनीन डिसोझा, जावेद पठाण, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख कदम, उत्तम कांबळे, सुपरवायझर व इतर सदस्य उपस्थित होते.
  
निवेदनात शहरातील सर्व अधिकृत, अनधिकृत व घरगुती नळजोडण्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून त्याची स्वतंत्र नोंद तयार करावी, अनधिकृत नळजोडण्या नियमांनुसार नियमित करून नगरपंचायतीच्या महसुलात वाढ करावी तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदनाची दखल घेत मुख्याधिकारी सुर्वे यांनी पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदारांना या संदर्भातील आवश्यक कार्यवाही आठ दिवसांच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्वेक्षण करून आवश्यक अहवाल सादर करण्याबाबतही संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन दिले. या निर्णयामुळे आजरा शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक पारदर्शक होऊन अनधिकृत नळजोडण्यांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
========================

रामतीर्थ पर्यटन स्थळी स्वच्छता मोहीम; वनविभाग, सरपंच संघटना, मराठा महासंघ, आजी-माजी सैनिक संघटना यांचा संयुक्त उपक्रम...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
वनविभाग आजरा, आजरा तालुका सरपंच संघटना, मराठा महासंघ आजरा, आजी - माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रामतीर्थ पर्यटन स्थळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेअंतर्गत रामतीर्थ फाटा ते रामतीर्थ पर्यटन स्थळादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या झाडांच्या फांद्या व झुडपे साफ करण्यात आली. तसेच परिसरातील प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या व इतर टाकाऊ कचरा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित करण्यात मदत झाली.
    
या मोहिमेत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच आजरा तालुक्यातील सरपंच, सरपंच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच आजी - माजी सैनिक संघटना आजराचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पर्यटन स्थळांचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखणे, पर्यावरण संवर्धन करणे व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने सदर मोहीम राबविण्यात आली. उपस्थितांनी पर्यटन स्थळ परिसर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ राखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सर्व संबंधितांच्या सक्रिय सहभागामुळे ही स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पडली.
==========================

Tuesday, June 16, 2026

"टोल मे है कुछ तो झोल...!, पत्रकार परिषदेत आजरा तालुका शिवसेना शिंदे गटाचा हल्लाबोल....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
संकेश्वर-बांदा महामार्गावरील आजरा शहरा नजीकच्या टोलच्या प्रश्नाबाबत आमचे नेते पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे सर्वसामान्यांच्या सोबत कायम आहेत. त्यामुळेच त्यांचे टोल नाका स्थलांतरित व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र आजरा शहरानजीक टोल नाका सुरू राहवून त्या माध्यमातून आपली दुकानदारी सुरू राहावी यासाठी काही मंडळी प्रयत्नशील आहेत. मात्र अशा प्रवृत्तीला आमचा विरोध राहणार आहे, असे आजरा येथील पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, तालुकाप्रमुख संजय पाटील, आजरा शहर प्रमुख विजय थोरवत, संतोष भाटले, इंद्रजीत देसाई, धनंजय पाटील, नितीन यादव उपस्थित होते.
   
 
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, टोल हद्दपार व्हावा, याकरिता सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समिती स्थापन केली गेली. टोलविरोधी आंदोलनात पालकमंत्री आबिटकर यांचा नेहमीच सहभाग राहिला आहे. सुरुवातीला टोल बाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय टोल सुरू करू देणार नसल्याची कृती समितीची भूमिका होती. टोल नाका हद्दपारची भूमिका असताना आजरा तालुक्याला टोल मधून वगळून टोल सुरू करण्यास कृती समितीतील काही स्वयंघोषित नेत्यांनी परवानगी दिली. टोलविरोधी कृती समितीतील काही नेत्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिका तालुक्यातील जनतेला संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. मात्र पालकमंत्री आबिटकर व शिवसेना शिंदे गट यांनी टोल सुरू करू देणार नाही व टोल हद्दपार करू ही भूमिका कायम ठेवली आहे. टोलविरोधी कृती समितीतील काही मंडळींची भूमिका नेमकेपणाने स्पष्ट होत नाही. कृती समिती ही सर्व पक्षी असताना काही मोजकीच मंडळी भूमिका मांडताना दिसतात. त्यामुळे कृती समिती व शिवसेना शिंदे गट यांचा काहीही संबंध नाही. शिवसेना शिंदे गट टोलबाबत सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत असलेली भूमिका घेऊन त्यांना न्याय देणार आहे. कृती समितीतील अनेक मंडळींनी अनेक आंदोलने केली. मात्र प्रत्येक आंदोलन अर्धवट सोडत शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम या मंडळींनी केले आहे. अन्याय निवारण समितीने आजरा शहरापुरते काम करावे. अन्याय करणाऱ्या लोकांना समर्थन देण्याचे काम करू नये. नाहीतर अन्याय समितीच्या बाबतीत राजकीय महाअन्याय करण्यात येईल. कृतीत समितीतील मंडळींचे प्रश्नही त्यांचीच असतात आणि उत्तरही त्यांचीच असतात. टोलबाबत ही काही मंडळी आपली दुकानदारी सुरू राहावी यासाठी काम करत आहेत. तसेच परंपरेप्रमाणे मांडवली करण्याचे काम ही मंडळी करत आहेत. या सर्व प्रवृत्तीचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच आगामी काळात जनतेच्या हिताच्या निर्णयासोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.
============================

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...