Wednesday, March 25, 2026

कोल्हापूर जिल्ह्यात अफवांमुळे पेट्रोल पंपांवर मागणी व पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने प्रशासनाकडून निर्बंध; नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घेण्याचे आवाहन


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क...
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर (पुरवठा शाखा) यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार, कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तथापि, समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असून मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, ज्यामुळे मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आणि इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून काही निर्बंध लागू केले आहेत. या आदेशानुसार आता दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत आणि तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 2000 रुपयांपर्यंतच इंधन भरता येईल. कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना इंधन पुरवठ्यात प्राधान्य दिले जाईल. तसेच, प्रत्येक पेट्रोल पंपाने आपल्याकडील शिल्लक साठा, प्राप्त झालेला साठा आणि मागणी केलेल्या साठ्याची माहिती दर्शनी भागातील फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील. सर्व पेट्रोल पंपधारकांनी या आदेशाचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. हा आदेश 25 मार्च 2026 पासून तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून तो 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहील.
××××××××××××××××××××××××××××××

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...