Tuesday, July 14, 2026

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...


गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क...
कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गडहिंग्लज येथील सौ. वि. दि. शिंदे हायस्कूल मधील मराठी विषयात 97 गुण मिळवलेली गिरीजा हाळवणकर तसेच 96 गुण मिळणाऱ्या प्रणाली शेवाळे, विभा शिंदे व श्रावणी पाटील व मार्गदर्शक शिक्षिका नेहा ज्ञानदेव पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मराठी विषयात उत्कृष्ट गुण मिळवणारी गडहिंग्लज तालुक्यातील वि. दि. शिंदे हायस्कूल एकमेव शाळा असल्यामुळे मान्यवरांनी कौतुक केले.
    
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. गोपाळ गावडे तर शिक्षक नेते दादासाहेब लाड अध्यक्षस्थानी होते. वेतन अधिक्षक उदय सरनाईक, उद्योजक गजानन भारमल, कोजिमचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष पी. डी. पाटील, बी. एस. कांबळे, विजय सरगर, मनोहर पाटील, नेताजी डोंगळे,सोनल गाडेकर, सुनीता पाटील तसेच पालक आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. के. डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
=============================

भादवण हायस्कूल प्रशालेत गुणवंत-यशवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
एस. एस. सी. फेब्रु-मार्च 2026 मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा भादवण हायस्कूल भादवण (ता. आजरा) मध्ये संपन्न झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित आजरा महाल शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, पालक, दाते, हितचिंतक, गावातील सन्माननीय व्यक्ती यांचे स्वागत मुख्याध्यापक आर. जी. कुंभार यांनी केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष के. जी. पटेकर होते. शाळेच्या भौतिक सुविधा बरोबरच गुणात्मक विकासाकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे तसेच पुढील शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक करिअरच्या वाटा शोधाव्या लागतील असेही ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे भरभरून असे कौतुक केले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच माधुरी गाडे यांनी विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, एन. एम. एम. एस. परीक्षा, ओलंपियाड परीक्षा, विज्ञान प्रदर्शन यामध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांबद्दल गौरवोद्गार काढले. कोणतीही खाजगी शिकवणी न लावता विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षकांच्या मार्गदर्शनातून मिळवलेल्या यशाचे कौतुक सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी टी. बी. मुळीक यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
    
इयत्ता दहावीतील यशवंत विद्यार्थी लक्ष्मी रमेश चौगुले (प्रथम क्रमांक), प्राची विजय केसरकर (द्वितीय क्रमांक), शुभम पांडुरंग तोरगले (तृतीय क्रमांक), सेजल दत्तात्रय पाटील (चतुर्थ क्रमांक), मनाली महादेव पाटील(पाचवा क्रमांक) विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे पदाधिकारी, दाते व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करणेत आला. आयुष पाटील, रिया आजगेकर, कार्तिक सुतार (5वी), एकता खुळे, सार्थक कांबळे, राज शिंत्रे (6वी), वेदांत उंडगे, आरोही पाटील, श्रेयश पाटील (7वी), मानसी कामत अश्विता सिमणे, श्रवण सुतार  (8वी), प्रतिक्षा डोंगरे, सानिका वडराळे, आर्या कुंभार (9वी) अनुक्रमे (प्रथम, द्वितीय, तृतीय)या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त सानिका वडराळे, प्रतीक्षा डोंगरे, आर्या कुंभार, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील यशवंत विद्यार्थी तन्मय देवरकर, आदेश पाटील, अनुज पाटील, दिगंबर पाटील व आयटीओ ओलंपियाड परीक्षेत सुवर्णपदक विजेती संस्कृती कुराडे व स्वयम चौगुले तसेच कै.मनाली उत्तम रेडेकर यांचे स्मरणार्थ अंकिता उद्योग समूहाच्या सर्वेसर्वा लता उत्तम रेडेकर यांनी ठेवलेल्या रोख रकमेच्या व्याजातून गरीब- होतकरू संजीवनी गवळी, वैदेही परीट, रिया जोशीलकर, विद्या कांबळे, पायल सुतार, अमृता गारडे, श्रावणी शिवणे, भूमिका मुळीक, प्राची शिंत्रे, सोहम डोंगरे, सुयश गवळी, प्रणाली ढेंगे, शमिका मुळीक या विद्यार्थिनींना बक्षीसरुपी आर्थिक सहाय्य करण्यात आले.
   
मार्गदर्शक शिक्षक आर. जी. कुंभार, एस. एस. नाईक, बी. पी. कांबळे, पी. एस. गुरव, एम. एम. जाधव, आर. पी. होरटे, व्ही. एस. कोळी, पी. एम. वडर, लिपिक एस. के. पोवार, मारुती गोडसे, संदिप पाटील, सचिन कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे उपाध्यक्ष के. जी. पटेकर, खजिनदार सुनील पाटील, संचालक सचिन शिंपी, पांडुरंग जाधव, सुधीर जाधव, विलास पाटील हे मान्यवर उपस्थित होते. सरपंच माधुरी गाडे, पोलीस पाटील गीता कुंभार, बक्षीस दाते सिंधुताई दिवेकर, पुंडलिक पाटील, सेवानिवृत्त टीपीओ टी. बी. मुळीक, पालक संदीप सुतार उपस्थित होते. लक्ष्मी चौगुले या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. बक्षीस वाचन व दात्यांचा नामोल्लेख व्ही. एस. कोळी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एस. गुरव यांनी केले. आभार व्ही. एच. गवारी यांनी मानले.
===========================

Monday, July 13, 2026

सोहळेत "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; सोहाळे व सोहाळेवाडी येथे १ हजार ५०० रोपांचे वृक्षारोपण...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
कृषी विभाग व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या अभिनव उपक्रमांतर्गत आज मौजे सोहाळे (ता. आजरा) येथे शेतकरी  रणजित देसाई यांच्या शेतात भात रोपलावणी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शेतीची कामे प्रत्यक्ष करून कृषी क्षेत्राशी बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
   
यावेळी सोहाळे गावच्या लोकनियुक्त सरपंच भारती डेळेकर, सामाजिक वनीकरण गडहिंग्लजच्या वनक्षेत्रपाल श्रीमती कल्याणी गोडसे, पंचायत समिती आजराचे विस्तार अधिकारी बी. टी. कुंभार, ग्रामसेवक अजित रणदिवे, वनपाल संजय निळकंठ, वनरक्षक दिपक कदम, विद्या मंदिर सोहाळेचे मायकल फर्नांडिस, सौ. निकम मॅडम, सौ. आजगेकर मॅडम तसेच शालेय विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून रोपलावणीच्या कामात सहभाग घेतला. उपस्थितांनी शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून घेत शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे अधोरेखित केले.
   
यानंतर हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत मौजे सोहाळेवाडी येथे सामाजिक वनीकरण विभाग, गडहिंग्लज व ग्रामपंचायत सोहाळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध प्रजातींची १ हजार ५०० रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. या वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामस्थ, विद्या मंदिर सोहाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत रोपांची लागवड केली. वृक्षलागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून, लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करून ते वृक्षात रूपांतरित करण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" आणि "हरित महाराष्ट्र अभियान" या दोन्ही उपक्रमांमुळे कृषी, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग यांचा उत्कृष्ट संगम घडून आला. शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विविध शासकीय विभागांच्या संयुक्त सहभागातून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचा प्रभावी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
=================================

आजरा तालुक्यात होणार हत्ती संगोपन केंद्र; पर्यटनालाही मिळणार मोठी चालना, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते घाटकरवाडी येथे बोटिंग प्रकल्पाचे उद्घाटन, जंगली हत्तींमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी.....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क.....
आजरा तालुक्यातील जंगली हत्तींचा वावर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान हा अनेक वर्षांपासूनचा चिंतेचा विषय आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आजरा तालुक्यात लवकरच 'हत्ती संगोपन केंद्र' (हत्ती कॅम्प) उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. ते आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे जलसंधारण विभागाच्या तलावात नव्याने सुरू करण्यात आलेल्या बोटिंग प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. घाटकरवाडी आणि परिसरातील गावांमध्ये जंगली हत्तींकडून शेतीचे सातत्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या पार्श्वभूमीवर, स्थानिक गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर प्रश्नाबाबत निवेदन दिले. जोपर्यंत हत्ती संगोपन केंद्र पूर्णपणे कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तात्काळ व्हावेत आणि त्यांना नुकसान भरपाईची मदत वेळेत मिळावी, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.
   
यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले की, हत्तींच्या शेतातील मुक्त आणि अनिर्बंध संचारामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच हे 'हत्ती संगोपन केंद्र' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व गावकरी आणि शेतकऱ्यांनी आता याला संमती दर्शवली आहे. यामुळे हत्तींचा शेतातील वावर थांबेल आणि शेतीचे नुकसान टळेल. यावेळी पालकमंत्र्यांनी बोटींग प्रकल्पाचे उद्घाटन करताना घाटकरवाडीच्या निसर्गसौंदर्याचे आणि पर्यटन क्षमतेचे विशेष कौतुक केले. त्यांनी स्वतः बोटींग करीत पर्यटनाचा आस्वाद घेतला. यावेळी ते म्हणाले, "घाटकरवाडी आणि किटवडे हा परिसर 'महाराष्ट्राचे चेरापूंजी' म्हणून ओळखला जातो, कारण राज्यात सर्वाधिक पाऊस याच भागात पडतो. इथल्या मातीला आणि निसर्गाला एक वेगळाच सुगंध आणि सौंदर्य आहे." कोल्हापूर आणि मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणारे हजारो पर्यटक या नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी घाटकरवाडीत थांबू शकतील. याच अनुषंगाने पर्यटनाला चालना देण्यासाठी जलसंधारण विभागाच्या तलावात हा बोटिंग प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
    
एका बाजूला नयनरम्य तलावातील बोटिंग आणि दुसऱ्या बाजूला हत्ती संगोपन केंद्र, या दुहेरी आकर्षणामुळे भविष्यात घाटकरवाडी हे पर्यटनाचे एक मोठे 'स्पॉट' (केंद्र) म्हणून नावारूपाला येईल. हत्ती कॅम्प पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे भेट देतील, ज्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि परिसराचा आर्थिक विकास होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आणि पर्यटनाच्या या नव्या ओळखीसाठी पुढाकार घेणारे जलसंधारण विभागाचे अधिकारी, गुंतवणूकदार आणि ग्रामस्थ यांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
===========================

राधानगरीत सीईओ डॉ.जॅसमिन यांचा शेताच्या बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद; जिल्हा परिषद सदस्य अमृता डोंगळे यांची उपस्थिती....


राधानगरी, विकास न्यूज नेटवर्क.....
राधानगरी तालुक्यात 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असून, यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी थेट शेताच्या बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांतर्गत डॉ. जॅसमिन यांनी केवळ पाहणी न करता स्वतः शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतीच्या कामात सहभाग घेतला. त्यांनी स्वतः पॉवर टिलर चालवून शेताची चिखलणी केली आणि त्यानंतर उपस्थित शेतकरी व अधिकाऱ्यांसोबत भात रोपलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमृता डोंगळे याही उपस्थितीत होत्या.
   
या दौऱ्यामध्ये आधुनिक, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींवर विशेष भर देण्यात आला. भात पिकातील कीड नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे पक्षी थांबे आणि चिकट सापळे शेतात लावण्याच्या कामातही डॉ. जॅसमिन यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. तसेच, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या प्रसंगी वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी डॉ. जॅसमिन यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी अत्यंत जिव्हाळ्याने संवाद साधत त्यांच्या अडचणी, शेतीपुढील आव्हाने आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासोबतच सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अधिकाधिक अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अमृता डोंगळे, पंचायत समिती सदस्य संग्राम कलिकते, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, मंडळ कृषी अधिकारी अनिल भोपळे यांच्यासह जिल्हा परिषद, कृषी विभाग व ‘आत्मा’ संस्थेचे अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
==============================

‘गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी; गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ...


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांकडून दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, त्याचा सकारात्मक परिणाम दूध विक्रीवर होत आहे. सध्या गोकुळकडून पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली तसेच कोकण विभागात दररोज सुमारे १६ ते १६.५० लाख लिटर दूध विक्री होत आहे. गेल्या सुमारे ४० दिवसांत दैनिक दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ झाली असून, ग्राहकांचा वाढता विश्वास हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे दिसून येत आहे. गुणवत्ता म्हणजेच गोकुळ, अशी ओळख ग्राहकांच्या मनात निर्माण झाली आहे. दूध संकलनापासून प्रक्रिया, पॅकिंग आणि ग्राहकांपर्यंत वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता व शुद्धतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. त्यामुळे गोकुळचे दूध तसेच तूप, लोणी, पनीर, दही, ताक, श्रीखंड, चीज, बासुंदी, गुलाबजाम, आईस्क्रीम आदी दुग्धजन्य पदार्थांना बाजारपेठेत सातत्याने चांगली मागणी आहे.
     
गोकुळचे मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक हणमंत पाटील म्हणाले, "गुणवत्ता हीच गोकुळची सर्वात मोठी ताकद आहे. ग्राहकांना शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार दूध व दुग्धजन्य उत्पादने योग्य दरात उपलब्ध करून देण्यावर आमचा कायम भर असतो. दूध उत्पादकांनी विश्वासाने पुरविलेल्या दर्जेदार दुधावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करून त्याची गुणवत्ता व शुद्धता कायम ठेवत सातत्यपूर्ण सेवेद्वारे ते  ग्राहकांपर्यंत पोहोचविले जाते. त्यामुळे ग्राहकांचा गोकुळवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. याच विश्वासामुळे गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी सातत्याने वाढत असून, भविष्यातही गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादने देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." दूध उत्पादकांचा विश्वास, कर्मचारी, वितरक, केंद्र चालक, वाहतूकदार व हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य आणि ग्राहकांची पसंती यामुळे गोकुळच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. गुणवत्ता हीच खरी ओळख जपत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत गोकुळची उत्पादने पोहोचविण्याचे काम पुढेही अधिक वेगाने सुरू राहणार आहे.
=============================

पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर थेट शेताच्या बांधावर; 'एक दिवस बळीराजासाठी' उपक्रमांतर्गत केली भात लावणी, जिल्ह्यात ३०० गावांमध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासन शेतकऱ्यांच्या दारी....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क......
बळीराजाच्या अडीअडचणी आणि शेतीचे प्रश्न थेट बांधावर जाऊन समजून घेण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज एक आगळावेगळा पुढाकार घेतला. 'एक दिवस बळीराजासाठी' या विशेष उपक्रमांतर्गत आजरा तालुक्यातील मसोली येथे चिखलात उतरून पालकमंत्र्यांनी स्वतः रोटावेटर चालवत चिखलणी केली, तसेच पारंपरिक पद्धतीने भात रोपलावणी व बांधबंदिस्तीच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेतला. पालकमंत्र्यांच्या या उपक्रमामुळे आज विविध लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जिल्ह्यातील तब्बल ३०० गावांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते.
    
जिल्ह्यात सध्या पावसाळी हंगामातील भातशेतीची कामे अंतिम टप्प्यात असून, लावणीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मसोली येथील शेतकरी सुरेश होडगे यांच्या शेताला भेट दिली. केवळ औपचारिक भेट न देता, पालकमंत्र्यांनी थेट भातखाचरात उतरून चिखलणीच्या कामात रोटावेटर चालवला. त्यानंतर हातात भाताची रोपे घेत महिला भगिनी व शेतकऱ्यांच्या सोबतीने पारंपरिक पद्धतीने रोपलावण केली. शेताचे बांध मजबूत करण्याच्या कामातही त्यांनी हातभार लावला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन थेट आपल्यासोबत चिखलात काम करत असल्याचे पाहून स्थानिक शेतकऱ्यांमध्येही कमालीचा उत्साह दिसून आला. रासायनिक खतांचा वापर टाळून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने यावेळी शेतात प्रत्यक्ष 'जीवामृत' तयार करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. जीवामृतासाठी लागणारे आवश्यक घटक, त्याचे योग्य प्रमाण आणि पिकांसाठी होणारे फायदे याविषयी कृषी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पालकमंत्र्यांनी स्वतः या प्रक्रियेत सहभागी होत जीवामृत निर्मितीची सविस्तर माहिती घेतली व नैसर्गिक शेतीची व्याप्ती वाढवण्याचे आवाहन केले. शेतीची कामे आटोपल्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी गाव परिसरातील पद्धतीने, शेतकऱ्यांसोबत शेताच्या बांधावर बसूनच झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला. या जेवणादरम्यान रंगलेल्या अनौपचारिक गप्पांमधून त्यांनी शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्या जाणून घेतल्या.
     
यावेळी शासकीय योजनांची तळागाळातील अंमलबजावणी, आधुनिक व पारंपरिक शेती अवजारांची उपलब्धता, दर्जेदार बियाणे आणि खतांचा वेळेत पुरवठा, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील आव्हाने यावर चर्चा झाली.
      
पालकमंत्री आबिटकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम उत्पादन वाढीसाठी आणि शेतकरी-प्रशासन यांमधील दरी मिटवण्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे. आज एकाच दिवशी जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते. या मोहिमेत आजरा येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रांताधिकारी हरीश सुळ, तहसीलदार समीर माने, सरपंच चंद्रकांत गुरव यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी, महिला शेतकरी, ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमात मागेल त्याला काजू कलमे अंतर्गत १ लाख काजू कलमे वाटप व लागवाड केली जाणार आहे. याअंतर्गत काजू कलमांचे वाटप व बि- बियाणे वाटप प्रातिनिधिक पद्धतीने करण्यात आले. तसेच आज ठिकठिकाणी सेंद्रिय निविष्टा उत्पादन बाबत मार्गदर्शन, EL-Nino बाबत करावयाच्या उपाय योजना बाबत मार्गदर्शन, कृषी पुरस्कार प्राप्त व पिक स्पर्धा विजेते शेतकरी यांचे तंत्रज्ञान संवाद, पीएमएफएमइ योजने अंतर्गत वैयक्तिक व गटास देण्यात येणाऱ्या प्रक्रिया युनिट स्थापनेसाठी माहिती तसेच विविध शेतीसाठी लागणारी अवजारे मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
——
"शेतकऱ्यांचे प्रश्न प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजून घेतल्यास योजनांची आखणी अधिक चांगल्या प्रकारे करता येते. याच उद्देशाने आम्ही गेल्या वर्षापासून हा उपक्रम राबवत आहोत. केवळ कागदावर योजना न राहता प्रशासन थेट बांधावर पोहोचल्यास बळीराजाला मोठा दिलासा मिळतो."
प्रकाश आबिटकर, पालकमंत्री, कोल्हापूर
• ==========================

Saturday, July 11, 2026

ऐनापुर बंधारा ठेकेदाराचा निष्काळीपणा वाहनचालकाच्या जीवावर बेतला; काळ आला होता पण वेळ आली नाही...


गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क....
ऐनापुर (ता. गडहिंग्लज) येथील हिरण्यकेशी नदीवरील बंधाऱ्यावर संरक्षणासाठी लोखंडी रोलिंग दोन महिन्यापूर्वी उभा केले होते. मात्र ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पहिल्याच पावसात हे रोलिंग वाहून गेले. यामुळे या बंधाऱ्यावरील  वाहतूक धोकादायक बनली आहे. याचा प्रत्यय शनिवारी आला. या बंधाऱ्यावरून एक अवजड मालवाहतूक ट्रक सरोळी-निंगुडगेच्या दिशेने जात असताना बंधाऱ्यावरून घसरला. मात्र ट्रक चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती, यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ट्रकचे नुकसान झाले आहे. यामुळे ऐनापुर बंधाऱ्यावरील संरक्षणासाठी लोखंडी रोलिंग महत्त्वाचे आहे.
   
दरम्यान विकास न्यूजने प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळे तसेच शनिवारी घडलेल्या अपघातामुळे पाटबंधारे विभाग खडबडून जागे झाले आहे. ऐनापुर बंधाऱ्यावर सिमेंटचे डिंबे उभे करण्यास सुरू केले आहे. यामुळे नागरिकांच्या काही प्रमाणात समाधान झाले असले तरी ऐनापूर बंधाऱ्याला कायमस्वरूपी संरक्षण लोखंडी रोलिंग उभी करण्याची मागणी होत आहे.
===========================

Friday, July 10, 2026

भ्रष्टाचार की निष्काळजीपणा?, ऐनापुर बंधाऱ्याचे रोलिंग अवघ्या दोन महिन्यांतच गेले वाहून....


गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क.....
हिरण्यकेशी नदीवरील ऐनापुर (ता. गडहिंग्लज) बंधाऱ्यावर प्रवाशांच्या सोयी करता दोन महिन्यापूर्वी उभारण्यात आलेले लोखंडी रोलिंग पहिल्याच पावसात वाहून गेले आहे. यामुळे या कामात भ्रष्टाचार झाला आहे की ठेकेदाराने निष्काळजीपणा केला आहे, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
  
हिरण्यकेशी नदीवर ऐनापुर येथे कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा आहेत. या बंधाऱ्याची उंची कमी आहे. तरीही या बंधाऱ्यावरून लोकांची धोकादायक पद्धतीने वाहतूक असते. आजरा तालुक्यातील कोवाडे, निंगुडगे, सरोळी या गावातील नागरिकांना गडहिंग्लजकडे जाण्यासाठी या बंधाऱ्याचा उपयोग होत होता. बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळे धोकादायकरित्या नागरिकांना यावरून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे या बंधाऱ्यावर संरक्षण करता रोलिंग उभारण्याची मागणी नागरिकांची होती. त्यास अनुसरून दोन महिन्यापूर्वी या बंधाऱ्यावर रोलिंग उभा केले होते. मात्र ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे पाणी बंधाऱ्यावर आल्यानंतर उभा केलेले लोखंडी रोलिंग वाहून गेले आहे. यामुळे या रोलिंगच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कामात नेमका भ्रष्टाचार झाला आहे की ठेकेदाराचा निष्काळजीपणा झाला आहे याची चर्चा ऐनापुर परिसरात सुरू आहे.
==============================

Thursday, July 9, 2026

आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्या करिता आजर्‍यातून वारकरी दिंडी रवाना...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा आळंदी ते पंढरपूर असा दरवर्षी पालखी सोहळा संपन्न होतो. पायी होणाऱ्या या दिंडी सोहळ्यामध्ये आजरा तालुका व परिसरातील वारकरी दिंडी सहभागी होते. याकरिता वारकरी बांधव नुकतेच आळंदी कडे रवाना झाले आहेत. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या रथामागे 23 नंबर वर आजरेकर दिंडीला स्थान आहे. आजरेकर दिंडीचे मालक संदीप कोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात.
    
आळंदी-पंढरपूर पायी पालखी सोहळ्याला अनेक वर्षांची मोठी परंपरा आहे. या परंपरेत आजरा तालुका व परिसरातील वारकरी सहभागी होत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात मुख्य रथाच्या मागे 23 नंबर वर दिंडी आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी या दिंडीत असतात. यंदाही आजरा शहरासह साळगाव, पेरणोली, कोरीवडे, देवकांडगाव, वेळवटी, उचंगी, आजरा गांधीनगर, भादवन यासह गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील विविध गावातील वारकरी या दिंडीत सहभागी होतात. सलग अठरा दिवस पायी चालत वारकरी दिंडीचा प्रवास आळंदी ते पंढरपूर पूर्ण करतात. पंढरपूरात आषाढी एकादशीचा सोहळा करूनच हे वारकरी गावी परततात. यंदाही या वारीत सहभागी होण्यासाठी आता मागील दिंडी क्रमांक 23 चे वारकरी नुकतेच आजऱ्याहून आळंदी कडे रवाना झाले आहेत. यावर्षी संदीप दादा कोंडकर, तानाजी पाटील (कोरिवडे), नामदेव सुतार (भादवन), चंद्रकांत शिंदे (आजरा गांधीनगर), डॉ. शंकर पारपोलकर (आजरा), बाळकृष्ण पाटील (साळगाव), धनाजी शिंदे (उचंगी), विनायक पताडे (हुनगीनाळ), दौलती तानवडे (देवर्डे), भीमराव जाधव (इंगळी), अंकुश पाटील (साळगाव) यांच्यासह वारकरी बांधव सहभागी झाले आहेत.
===============================

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...