Monday, September 30, 2024

स्वाती गुरव यांना 'राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार 2024' प्रदान

स्वाती गुरव यांना 'राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार 2024' प्रदान
गडहिंग्लज, वृत्तसेवा :
 
'कै.माणिकराव पाटील एज्युकेशनल फाउंडेशन,कोल्हापूर' यांच्यावतीने राज्यातील 27 जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गडहिंग्लज तालुक्यातून जीवन शिक्षण मंदिर मुत्नाळ शाळेच्या शिक्षिका स्वाती सुरेश गुरव यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे संपन्न झाला.
 
 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षा, सहशालेय स्पर्धापरीक्षा तज्ञ मार्गदर्शक, जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये यश, समूहनृत्य, समूहगीत सांस्कृतिक स्पर्धेत यश, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा विशेष उपक्रम 'ज्ञानी मी होणार' स्पर्धेत सलग तीन वर्षे यश, उपक्रमशीलता, आधुनिक तंत्रस्नेही अध्यापन, पर्यावरण स्नेही उपक्रम आयोजन, 5 लाख 43 हजार रुपयांचा स्व-प्रयत्नातून शैक्षणिक उठाव, शिक्षक प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक, शासकीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी सहभाग, आपत्ती व्यवस्थापन व केलेली मदतकार्य, मराठी भाषा विशेष सुधार उपक्रम अशा अनेक अष्टपैलू कार्याची नोंद घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 
 
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. बी. एम. हिरडेकर (माजी परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ, कुलसचिव संजय घोडावत विद्यापीठ) यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसाद पाटील, उपकुलसचिव डॉ.उत्तम सकट, उपशिक्षणाधिकारी एस. के. यादव, शिक्षण उपनिरीक्षक आर. व्ही. चौगुले, गटशिक्षणअधिकारी डॉ.विश्वास सुतार, समरजीत पाटील  उपस्थित होते. राज्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे संयोजन तुषार पाटील, धनश्री पाटील, डॉ.अजित सूर्यवंशी, श्रीमती सुनिता पाटील यांनी केले. मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, गटशिक्षणअधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख या सर्वांचे मार्गदर्शन, विद्यार्थी, पालक व शिक्षक वृंदाचे सहकार्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत मुत्नाळ यांचे प्रोत्साहन लाभले.
=====================

Wednesday, September 25, 2024

आजरा अर्बन बँकेला "सर्वोत्कृष्ट बँक" पुरस्कार

आजरा अर्बन बँकेला "सर्वोत्कृष्ट बँक" पुरस्कार
आजरा, वृत्तसेवा :

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन यांचे मार्फत जिल्हास्तरीय बँकींग परिषदेच्या कार्यक्रम सोहळ्यामध्ये आजरा अर्बन बँकेला "सर्वोत्कृष्ट बँक" पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ५०१ कोटी रुपये पेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांच्या गटात सर्वोत्तम नागरी सहकारी बँकेस दिला जाणारा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बँकेस सलग तिसऱ्या वर्षी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष निपुणराव कोरे व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या उपाध्यक्षा वैशालीताई आवाडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. अनिल देशपांडे, किशोर भुसारी, आनंदा फडके, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर उपस्थित होते.
आजरा तालुक्यामध्ये ६४ वर्षापूर्वी बँकेचा कार्यविस्तार सुरू झाला. शेतीपुरक उद्योग, छोटे व्यावसायिक व उद्योग यांना अर्थ पुरवठा हा केंद्र बिंदू मानून बँकेने आतापर्यन्त जवळपास १५०० कोटी रुपयेच्या वर व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. स्वभांडवलावर मल्टी स्टेट दर्जा प्राप्त करणारी जिल्ह्यातील आजरा बँक ही एकमेव बँक असून शेड्‌यूल बँकेकडे वाटचाल सुरू आहे. बँकेत आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून सेव्हिंग खाती उघडण्याबाबतची व केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP व राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मोबाईल बँकिंग, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsap Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत. बँक महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्हयात व कर्नाटक राज्यातील बेळगावी व उत्तर कन्नड जिल्हयात एकूण ३५ शाखांच्या माध्यमातून सेवा देत आहे. भविष्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गरजू व्यावसायिक व उद्योजकांना व त्यांच्या गरजाना अर्थ पुरवठा करून देशाच्या प्रगतिमध्ये योगदान देण्याचा मानस असून वरील सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधनेचे आवाहन बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर यांनी केले.
================

Tuesday, September 24, 2024

शिवाजी विद्यापीठाच्या 44 व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आजरा महाविद्यालयामध्ये आयोजन

शिवाजी विद्यापीठाच्या 44 व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आजरा महाविद्यालयामध्ये आयोजन
आजरा, वृत्तसेवा :

आजरा महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठाचा 44 वा मध्यवर्ती युवा महोत्सव दिनांक 29, 30 सप्टेंबर, 2024 व 1 ऑक्टोबर, 2024 रोजी आयोजित केला आहे. शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जवळपास 200 महाविद्यालयांमधील सुमारे 2500 ते 3000 विद्यार्थी या युवा महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. 35 वेगवेगळ्या कला प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पधेचा उद्घाटन सोहळा 24 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 10:00 होणार असून उद्घाटक म्हणून राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कला शिक्षक सागर बगाडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे प्रमुख पाहुणे तर जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  असणार आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन करण्याची संधी प्रथमच महाविद्यालयाला मिळत आहे. यापूर्वी जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन महाविद्यालयाने केले आहे. या महोत्सवाचा पारितोषिक वितरण आणि सांगता समारंभ दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते शरद भुताडिया याच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. टी. एम. चौगुले, शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. आर. डी. ढमकले, अॅड. स्वागत परुळेकर, व शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सव समितीचे सर्व सदस्य तसेच जनता एज्युकेशन सोसायटी आजाराचे सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे, युवा महोत्सव समन्वयक डॉ. आनंद बल्लाळ व कार्यालय अधीक्षक योगेश पाटील यांनी दिली.
=======================   

Monday, September 23, 2024

या तारखेपासून "लाडक्या बहिणींना" मिळणार तिसरा हप्ता

या तारखेपासून "लाडक्या बहिणींना" मिळणार तिसरा हप्ता 
मुंबई, वृत्तसेवा : 

महाराष्ट्र राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात अनेक महत्वाच्या योजनांचा घोषणा केल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महत्वाच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्य सरकारने दोन हफ्ते मिळून 3000 हजार रुपये रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केली आहे. अशातच आता तिसऱ्या हप्त्याचे वितरण कधी होणार? असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला होता. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय तिसरा कार्यक्रम हा 29 सप्टेंबर रोजी रायगडमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जदार महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे. अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे अनेक महिलांना योजनेचा फायदा घेता आला नाही. परंतु आता त्या महिलांना सुद्धा तिसऱ्या टप्प्यात आर्थिक लाभ मिळणार आहे. एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. या साठी राज्य सरकारने पुण्यात मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर दूसरा कार्यक्रम हा नागपूरमध्ये पार पडला. अशातच आता तिसरा कार्यक्रम हा रायगडमध्ये होणार असून येत्या 29 सप्टेंबरपासून तिसऱ्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. लाडकी बहिण योजनेची अर्ज प्रक्रिया अजूनही सुरू असून ती 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
================

Saturday, September 14, 2024

आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात आरोग्यसेवा निर्माण केल्याचे समाधान : आमदार प्रकाश आबिटकर; 25 कोटी 39 लाखांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा

आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात आरोग्यसेवा निर्माण केल्याचे समाधान : आमदार प्रकाश आबिटकर; 25 कोटी 39 लाखांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण  सोहळा
आजरा, वृत्तसेवा :

 आजरा तालुक्यातील पश्चिम भागातील आरोग्यसेवेचे स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण होते. ते पूर्ण करण्याचे भाग्य लाभले यांचे समाधान असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. गवसे (ता.आजरा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार आबिटकर बोलत होते. यावेळी आमदार आबिटकर यांच्या हस्ते गवसे प्राथमिक आरोग्य केंद्र नूतन इमारतीचा लोकार्पण तसेच गवसे परिसरातील 25 कोटी 39 लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
    
स्वागत व प्रास्ताविक गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी केले. पश्चिम भागातील लोकांना आरोग्य सेवा तातडीने मिळावी यासाठी आम.आबिटकर यांच्या प्रयत्नातून गवसे येथे प्राथमिक  आरोग्य केंद्र उभारले आहे. परिसरातील सुमारे १८ गावातील लोकांना याचा लाभ मिळणार असून या आरोग्य केंद्रात १६ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. आमदार आबिटकर म्हणाले,१९७८ पासून या भागातील लोकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी होती मात्र अनेक कारणांमुळे ते रखडले होते. आपण २०२२ साली प्रशासकीय मंजुरी घेत दोन वर्षांच्या आत काम पूर्ण केले. ठरवले तर कोणतीही गोष्ट शक्य होते याचे गवसे प्राथमिक आरोग्य केंद्र हे उदाहरण आहे. तालुक्यातील पश्चिम भागासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरणारे आहे. निर्णायक टप्पा पूर्ण केल्याचे समाधान मिळाले. सुसज्य असे उभारलेले हे आरोग्य केंद्र १४ हजार लोकांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. आरोग्य सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यापुढे चांगली सेवा द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जयवंतराव शिंपी, रणजित पाटील व डॉ.संजय रनवीर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, प्रा.अर्जुन आबिटकर, आजऱ्याच्या माजी नगराध्यक्षा जोस्त्ना चराटी, मुकुंद देसाई, उदय पवार, रचना होलम, अभिषेक शिंपी, रणजित सरदेसाई, दशरथ अमृते, परशुराम बामणे, इंद्रजित देसाई, सुधीर कुंभार, गोविंद पाटील, संतोष भाटले, तहसिलदार समिर माने, तालुका आरोग्य अधिकारी यशवंत सोनवणे, बांधकाम उपअभियंता सूर्यकांत नाईक यांच्यासह परिसरातील सरपंच, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
============

Friday, September 13, 2024

राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या वाड्यावस्त्यावर आरोग्य सेवा पोचविण्याचा ध्यास घेतलेले नेतृत्व : आमदार प्रकाश आबिटकर

राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या वाड्यावस्त्यावर आरोग्य सेवा पोचविण्याचा ध्यास घेतलेले नेतृत्व : आमदार प्रकाश आबिटकर 
आजरा, वृत्तसेवा :

 राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघ वाड्या वस्त्यावर विखुरलेला आहे. गेले अनेक वर्ष मतदार संघातील अनेक ठिकाणे आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते, वीज अशा मूलभूत सुविधांपासून वंचित होती. जी ठिकाणी मूलभूत सुविधांपासून वंचित होती, अशा ठिकाणी त्या सुविधा निर्माण करून तेथील लोकांची जगणे सुसह्य करण्याचे काम राधानगरी-भुदरगड-आजराचे कार्यसम्राट व पाणीदार आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. सध्याच्या काही काळात लोकांना आरोग्य सेवा चांगल्या प्रमाणात कशी मिळेल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे काम आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. शासकीय आरोग्य सुविधा मिळाव्यात, याकरता आरोग्य केंद्र उभारणीची मागणी अनेक ठिकाणी होती. या मागणीचा विचार करता, परिसराचा भौगोलिक विस्तार लक्षात घेऊन आमदार आबिटकर यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीची कामे केली. अशीच मागणी आजरा तालुक्यातील दुर्गम असणाऱ्या पश्चिम भागातील नागरिकांची होती. या नागरिकांना शासकीय आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी 10-20 किलोमीटरचा फेरा मारावा लागत होता. तसेच नागरिकांची आरोग्य सुविधा अभावी हेळसांड होत होती. नागरिकांची या फेऱ्यातून सुटका करण्याचे तसेच चांगली आरोग्य सुविधा मिळावी याकरिता आमदार आबिटकर कायम प्रयत्नशील होते. त्यातूनच सर्व अडचणीवर मात करत पश्चिम भागाच्या मध्यवर्ती असणाऱ्या गवसे (ता. आजरा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यापासून ते या आरोग्य केंद्राला सुसज्ज इमारत देण्याचे काम आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यात अग्रेसर असणाऱ्या आमदार आबिटकर यांनी आपणच " दमदार आमदार " असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. गवसे येथे उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा लोकार्पण तसेच गवसे परिसरातील 25 कोटी 39 लाखांच्या विविध विकास उद्घाटन व लोकार्पण  सोहळा शनिवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे. 
 शनिवारी उद्घाटन व लोकार्पण होत असलेल्या विविध 25 कोटी 39 लाखाच्या विकास कामांमध्ये किटवडे धनगरवाडा रस्ता 1 कोटी 42 लाख, शेळप-आंबाडे-लिंगवाडी रस्ता 5 कोटी 53 लाख, दाभिल फाटा ते गवसे रस्ता 10 कोटी, गवसे प्राथमिक आरोग्य केंद्र 6 कोटी 64 लाख, देवर्डे ते पारेवाडी रस्ता 1 कोटी 30 लाख, देवर्डे फाटा ते वेळवटी 50 लाख यांचा समावेश आहे. या सर्व विकासकामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा शनिवारी दिवसभर होणार आहे. या सर्व विकास कामांची मागणी गेले अनेक वर्षापासून या परिसरातील नागरिकांच्या कडून सातत्याने होत होती. त्याला मूर्त स्वरूप देण्याचे काम आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातील दुर्गम असणाऱ्या पश्चिम भागात आरोग्य व दळणवळण या क्षेत्रात नागरिकांची होणारी हेळसांड थांबणार आहे. 25 कोटी 39 लाखांच्या विकासकामामुळे परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन गवसे परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. 
================ 

Monday, September 9, 2024

येत्या विधानसभा निवडणुकीत समरजितराजेंना विजयी करून स्वाभिमानाची लढाई जिंकू : जयवंतराव शिंपी, आजरा येथे शिंपी गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राजेंना आमदार करण्याचा निर्धार...

येत्या विधानसभा निवडणुकीत समरजितराजेंना विजयी करून स्वाभिमानाची लढाई जिंकू : जयवंतराव शिंपी, आजरा येथे शिंपी गटाच्या  कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राजेंना आमदार करण्याचा निर्धार...
आजरा, वृत्तसेवा :
         
गेली वीस-पंचवीस वर्षे आजरा तालुक्यातील सर्वसामान्य माणसं जोडण्याचं काम आपण करत आहे. राजे समरजितसिंह घाटगे देखील कोणतेही संविधानिक पद नसताना शाश्वत विकासकामांचा अजेंडा गावोगावी राबवत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षा ओळखण्याची चिकित्सक वृत्ती चांगली आहे. त्यामुळे या तालुक्यातील स्वाभिमानी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत राजे समरजितसिंह घाटगे यांच्या विजयासाठी माझ्यासह आमचे सर्वच कार्यकर्ते ही आमच्या सर्वांच्या स्वाभीमानाची आणि हक्काची लढाई नक्की जिंकतील असा विश्वास आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आजरा येथे जयवंतराव शिंपी यांच्या नेतृत्वाखाली  आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते..
 
यावेळी राजे समरजिसिंह घाटगे यांचा सत्कार जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते करण्यात आला. शिंपी पुढे म्हणाले, समरजितसिंह घाटगे  एक उच्चविद्याविभूषित नेतृत्व आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव त्यांना चांगली आहे. त्यामुळे कोणी कितीही आमिषे दाखवली तरी जनतेने त्यांच्या आमिषांना बळी न पडता समरजितसिंह घाटगे यांना निवडून देऊया असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, शाहू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या शिकवणीप्रमाणे, मतांमध्ये नको तर माणसांमध्ये गुंतवणूक करा. माणूसपण जोडण्याचं आणि जपण्याचं त्यांनी आम्हाला पाजलेलं बाळकडू आम्ही तंतोतंत कृतीतून पाळत आहोत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. हा परिसर विकासाच्या बाबतीत उपेक्षित राहिला असला तरी येत्या काळात या  परिसराच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण नक्की प्रयत्नशील राहू. त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आपला लोकसेवक म्हणून आपल्या सर्वांचीच सेवा करण्याची एक संधी द्या असे आवाहन केले. यावेळी जनार्दन निऊंगरे, ॲड.धनंजय देसाई यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सभापती भिकाजी गुरव, के. जी.पटेकर, एस. पी. कांबळे, विलास पाटील, सदाशिव डेळेकर, गणपतराव नाईक, डी. एम. पाटील, बाबाजी नाईक, सुनील शिंदे यांच्यासह कागल विधानसभा मतदार संघातील या परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रा.सुनील देसाई यांनी मानले.

चौकट....

आजरा तालुका राजेंची हमखास पाठराखण करेल....

प्रास्ताविक करताना युवा नेते अभिषेक शिंपी म्हणाले, राजे समरजितसिंह घाटगे यांनी पुरोगामीत्वाचे वलय लाभलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात केलेला प्रवेश हा जनतेच्या मनातील प्रवेश आहे. या प्रवेशाने राजे समरजितसिंह घाटगे यांनी प्रत्यक्ष कृतीतून शाहू महाराजांच्या विचारांना बळकटी देण्याचे काम केलं आहे. मात्र या जिल्ह्यात पुरोगामीत्वाचे सोंग घेऊन कारभार करणाऱ्या कांही मंडळींनी जिल्ह्याचे अतोनात नुकसान केले आहे, असे नेतृत्व आता बदलण्याची गरज आहे. आशा संधीसाधू नेतृत्वाची येथील जनतेने नोंद घेतली असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीत या तालुक्यातील जनता राजे समरजितसिंह घाटगे यांना निवडून देण्यासाठी त्यांची हमखास पाठराखण करतील असे सांगताच उपस्थित असलेल्या सर्वांनीच टाळ्या वाजवून त्यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला.
====================

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...