Saturday, February 28, 2026

आजरा ग्रामीण रुग्णालयाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिला जाणारा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार यावर्षी ग्रामीण रुग्णालय आजराला प्राप्त झाला. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


आरोग्य रत्न पुरस्काराकरिता रुग्णालयाचे एकूण गुणात्मक आणि धोरणात्मक कामकाज पाहण्यात आले. यामध्ये डी एच आय एस -2 व एच एम आय एस या संकेतस्थळावरील एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 च्या रिपोर्टिंग वरती सर्व ग्रामीण रुग्णालयांना गुण देण्यात आले. तसेच बाह्य रुग्ण विभाग, अंतर रुग्ण विभाग, बी ओ आर, स्वाभाविक प्रसुती, सिझेरियन प्रसूती, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेले शस्त्रक्रिया शिबिर, इतर शस्त्रक्रिया, स्वच्छता, एनसीडी क्लिनिक, एमजेपी जेवाय कामकाज यावरही गुण देण्यात आले. ग्रामीण रुग्णालय या श्रेणीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय आजरा या संस्थेने सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला अशी माहिती आजरा ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी दिली. अतिशय दुर्गम भागात काम करून व अनेक नैसर्गिक अडचणींवर मात करत ग्रामीण रुग्णालय आजरा यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
**************************

Friday, February 27, 2026

सुपोषित ग्रामपंचायत अभियानात साळगाव ग्रामपंचायतीला केंद्र शासनाचे 1 लाखाचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर; कोल्हापूर जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींचा समावेश....


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सुपोषित ग्रामपंचायत अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याने उत्तेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींची उत्कृष्ट कार्याबद्दल निवड झाली असून राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशस्वी ग्रामपंचायतींना केंद्र शासनामार्फत प्रत्येकी 1 लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस आणि विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के यांनी दिली. 
निवडीचे निकष आणि प्रक्रियाः- या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींमधील अंगणवाडी केंद्रांतील बालकांच्या कुपोषण निर्मूलनावर भर देण्यात आला होता ज्या ग्रामपंचायतींमध्ये मध्यम तीव्र कमी वजनाची (MUW) आणि अति तीव्र कमी वजनाची (SUW) बालके राष्ट्रीय सरासरीपेक्षा (MUW - १४.३९% आणि SUW ३.४३%) कमी आहेत, अशा ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण १०२५ ग्रामपंचायतींपैकी २९६ ग्रामपंचायती मानांकनासाठी पात्र ठरल्या होत्या, त्यातून अंतिम १८ ग्रामपंचायतींची निवड झाली आहे.

पुरस्कारास पात्र ठरलेल्या १८ ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे -
आजरा - कासारकांडगाव, साळगांव, कोवाडे 
 भुदरगड - मुदाळ, व्हनगुत्ती
 गडहिंग्लज - हडलगे, उंबरवाडी 
गगनबावडा - कोदे, अणदुर, साखरी म्हांळुगे 
कागल - पिंपळगांव खुर्द 
 करवीर - हलसवडे, पाडळी बुद्रुक 
 पन्हाळा - पोहाळे तर्फ आळते, कसबा बोरगांव, काळजवडे 
राधानगरी - घोटवडे, नरतवडे

सार्वजनिक आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस. व जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली याकामी शिरोळच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी मनिषा पालेकर आणि जिल्हा कक्षाचे विस्तार अधिकारी (सां) सौरव कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे.
*************************

Wednesday, February 25, 2026

दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती साधणे हेच ‘गोकुळ’चे मुख्य उद्दिष्ट : गोकुळ दूध संघ चेअरमन नविद मुश्रीफ, दूध खरेदी दर वाढीच्या निर्णयाबद्दल दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा सत्कार


 कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ केल्याबद्दल गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळ यांचा गोकुळ दूध संघाशी संलग्न प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील यांच्या हस्ते सत्कार गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व संस्था प्रतिनिधी उपस्थितीत होते. गोकुळने म्हैस दूध खरेदी दरात प्रति लिटर एक रुपया आणि गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, दूध संस्था कर्मचारी संघटनेने या निर्णयाचे स्वागत करत चेअरमन व संचालक मंडळाचा गौरव केला.
         
यावेळी बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, उत्पादक हाच गोकुळचा खरा पाया आहे. दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती साधणे हेच संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. करण्यात आलेली दरवाढ निश्चितच उत्पादकांच्या आर्थिक विकासाला चालना देणारी ठरेल. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पुढे ते म्हणाले की, गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्था आणि त्या संस्थांमध्ये कार्यरत कर्मचारी वर्ग यांचा संघाच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे. संघाच्या विविध योजना, अनुदाने आणि उपक्रमांची माहिती प्रत्येक दूध उत्पादकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कर्मचारी वर्गाने प्रभावीपणे पार पाडावी. दूध संकलन वाढीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले. सध्या वाढत्या उन्हाळ्याचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर होत असल्याचे नमूद करत चेअरमन मुश्रीफ यांनी संस्थेचे कर्मचारी व सचिवांनी उत्पादकांना योग्य मार्गदर्शन करावे, असे सांगितले. उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी, आहार व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि आरोग्य विषयक सूचना याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. त्यामुळे दूध उत्पादनात घट होणार नाही आणि उत्पादकांचे नुकसान टाळता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, बाळासो खाडे, युवराज पाटील, संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, शामराव पाटील, विश्वास पाटील, सुरेश जाधव, तानाजी गुरव, सरदार देसाई, संजय पानारी, मंगेश बेडकळ, रामचंद्र चौगले, शिवाजी शिंदे, सुनिल विभूते, संघटनेचे व दूध संस्था प्रतिनिधी कर्मचारी  उपस्थित होते.
***********************************

Saturday, February 21, 2026

रेशन धान्य पावती प्रमाणे का दिले नाही म्हणून विचारणा करणाऱ्या ग्रामस्थास रेशन धान्य दुकानदाराकडून मारहाण; आजरा तालुक्यातील पोळगाव येथील प्रकार....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
पोळगाव (ता. आजरा) येथील रेशन धान्य दुकानदार गुणाजी लक्ष्मण साबळे यांना पांडुरंग लक्ष्मण कोरगावकर या ग्रामस्थांनी रेशन धान्य पावती प्रमाणे का दिले नाही म्हणून विचारणा केली असता साबळे यांनी कोरगावकर यांना शिवीगाळ करत मारहाण केले आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास कोरगावकर यांनी आजरा तहसील कार्यालय समोर 27 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मीरा पांडुरंग कोरगावकर यांच्या नावे असलेल्या शिधापत्रिकेवरील रेशन धान्य घेण्यासाठी कोरगावकर हे पोळगाव येथील रवळनाथ स्वस्त धान्य दुकान येथे गेले होते. यावेळी रेशन धान्य दुकानदार गुणाजी साबळे यांनी कोरगावकर यांना बारा किलो तांदळाची पावती दिली. मात्र प्रत्यक्षात तांदूळ देताना दहा किलो दिले. याबाबत कोरगावकर यांनी साबळे यांना विचारले असता, साबळे यांनी शिवीगाळ करत कोरगावकर यांच्या कानशिलात लगावली. तसेच अरेरावीची भाषा वापरत याबाबत कोणाकडेही तक्रार करा आपण घाबरत नसल्याचे सांगितले. यामुळे कोरगावकर यांनी या प्रकरणाची चौकशी होऊन न्याय मिळावा असे निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर, प्रांताधिकारी आजरा भुदरगड, तहसीलदार आजरा यांना दिले आहे. तसेच याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास 27 फेब्रुवारी पासून आजरा तहसील कार्यालय आवारात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
****************************

Friday, February 20, 2026

‘गोकुळ’ परिवारातील सदस्यांची जि.प. निवड अभिमानास्पद : गोकुळ दुध संघ चेअरमन नविद मुश्रीफ; गोकुळ मार्फत मान्यवरांचा सत्कार...


कोल्‍हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्यावतीने कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य पदी निवड झाल्याबदल संघाचे संचालक अमरसिंह पाटील, अभिजित तायशेटे तसेच सुयशा अंबरिषसिंह घाटगे (व्हनाळी), अमृता अरुण डोंगळे (घोटवडे), शिवाजी मुरलीधर जाधव (हुपरी), अनिरुद्ध केदारी रेडेकर (पेद्रेवाडी) यांचा गोकुळच्या वतीने संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला. यावेळी संघाचे संचालक व अधिकारी उपस्थित होते.
         
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्‍हणाले, गोकुळ ही संस्था नसून एक सशक्त कुटुंब आहे. आपल्या परिवारातील सदस्य विविध क्षेत्रांत यश संपादन करत आहेत, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हे यश केवळ व्यक्तीचे नसून संपूर्ण गोकुळ परिवाराच्या संस्कारांचे आणि सहकार्याचे फलित आहे. ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना ग्रामीण भागातील विकास,  शिक्षण,  आरोग्य आणि पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष द्यावे. सहकारातून मिळालेली पारदर्शकता, जबाबदारी आणि जनसामान्यांप्रती संवेदनशीलता हीच मूल्ये सार्वजनिक कार्यातही जपली गेली पाहिजेत. यावेळी सत्कारास उत्तर देताना अमृता डोंगळे यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले, “गोकुळ परिवाराने दिलेला सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. संघाने जपलेली सहकाराची परंपरा आणि समाजाशी असलेली नाळ आम्हाला पुढील कार्यकाळात मार्गदर्शक ठरेल. सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करू.”
         
यावेळी सर्व सत्कारमूर्तींना पुढील वाचालीसाठी गोकुळ परिवारामार्फत शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच गोकुळ मधील कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्त निमित्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे,  संचालक  बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
***************************************

‘गोकुळ’ कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपयेव गाय दूध खरेदी दरात २ रूपये वाढ : गोकुळ दूध संघ चेअरमन नविद मुश्रीफ; दूध उत्पादकांना महिन्याला साडे सात कोटी रुपये अधिक मिळणार....


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.... 
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम व्हावा, म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून दि. २१ फेब्रुवारी २०२६  रोजी पासून म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रुपये ५२.५० वरून रूपये ५३.५० करण्यात आला आहे. तर गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर दर ३४.०० रूपये वरून ३६.०० रूपये करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे गोकुळच्या म्हैस व गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे सात ते साडे सात कोटी रुपयाचा जादाचा दर मिळणार आहे. तसेच गोकुळच्या म्हैस दुधाच्या विक्री दरामध्ये २ रुपयाची वाढ करण्यात आली असून गाय दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतेही दर वाढ केलेली नाही, अशी माहिती गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली. 
         
गोकुळ संलग्न ७ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून जवळ-जवळ १७ लाख लिटर प्रतिदिन संकलन केले जाते. गोकुळचे दूध उत्पादक हेच केंद्रबिंदू असून त्यांच्या श्रमाला न्याय मिळावा यासाठी गोकुळ नेहमीच कार्यरत राहिला आहे. दूध उत्पादक, संस्था, सचिव, कर्मचारी प्रत्येक घटक हा गोकुळ परिवाराचा अविभाज्य भाग आहे. दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे सांगितले. दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजीच्‍या संचालक मंडळाच्‍या बैठकीमध्ये सद्य बाजार स्थितीचा विचार करून निर्णय घेण्‍यात आला आहे. तसेच लवकरच संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना सुधारित दरपत्रक पाठवणेत येणार आहेत.
**************************************

Thursday, February 19, 2026

महाविज्ञान प्रदर्शनात भादवण हायस्कूलचे दैदीप्यमान झेप....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
शिवतेज तरुण मंडळ, शेळपवाडी (ता. आजरा) आयोजित विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयातील महाविज्ञान प्रदर्शनात भादवण हायस्कूल, भादवण या विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या कल्पकता,परिश्रम आणि मार्गदर्शक शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यालयाने मोठे यश संपादन केले. इयत्ता आठवी ते बारावी या मोठ्या गटामध्ये तन्मय किशन देवरकर इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने तयार केलेल्या "स्मार्ट स्ट्रीट लाईट; सोलर एनर्जी सेवर" या उपकरणास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. हे उपकरण सौरऊर्जेवर आधारित स्वयंचलित असून दिवसाच्या वेळी सौर पॅनलद्वारे ऊर्जा साठवते आणि रात्री आपोआप प्रकाश देते. ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण भागातील वीज समस्येवर उपाय म्हणून हे उपकरण उपयुक्त ठरू शकते.
इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या आदेश दत्तात्रय पाटील या विद्यार्थ्याने सादर केलेले "स्वयंचलित अग्निशमन यंत्र" हे उपकरण आग लागल्यास सेन्सरच्या साहाय्याने तात्काळ पाणी किंवा अग्निरोधक द्रव फवारून आग आटोक्यात आणणारे आहे. दिगंबर दत्तात्रय पाटील यांचे सहकार्य मिळाले. हे उपकरण विशेषतः शाळा,कार्यालये व घरांसाठी उपयुक्त ठरू शकते. आपत्कालीन परिस्थितीत मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्य करणारी ही प्रणाली अत्यंत प्रभावी असल्याचे परीक्षकांनी नमूद केले. या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण व अभिनव संकल्पनांमुळे परीक्षकांची मने जिंकली. प्रमाणपत्र, ट्रॉफी व रोख तीन हजार रुपये बक्षीस देऊन विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना गौरविण्यात आले. विज्ञान विषयशिक्षक प्रशांत गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक राजेंद्र कुंभार यांचे प्रोत्साहन मिळाले. शिक्षकवृंदाचे सहकार्य मिळाले.
****************************************

किल्ले पन्हाळगडावर 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष; 'मेगा पदयात्रा' आणि रक्तदान शिबिराने शिवजयंती साजरी...


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ नामांकनामुळे जागतिक नकाशावर झळकलेल्या किल्ले पन्हाळगडावर शिवजयंतीचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'मेगा पदयात्रा' (My Bharat - Mera Yuva Bharat) आणि रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर पारंपरिक पाळणा सोहळा पार पडला. यावेळी नगराध्यक्षा जयश्री पवार, उपनगराध्यक्ष सतीश भोसले, उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, मुख्याधिकारी चेतन माळी व अन्य मान्यवर उपस्थित होते.


युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सकाळी भव्य पदयात्रेचे आयोजन केले होते. पन्हाळा नगरपालिकेजवळील शिवमंदिरापासून सुरू झालेली ही यात्रा मयूर बागेपर्यंत काढण्यात आली. यात शासकीय कर्मचारी, युवक आणि विविध शाळांतील सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. कुमार विद्यामंदिरचे झांज पथक, संजीवन पब्लिक स्कूलचे घोडे पथक आणि आर. आर. अकॅडमी बोरपाडळे यांच्या लेझीम पथकाने यात्रेची शोभा वाढवली. नरके पब्लिक स्कूल, वारणा कॉलेज, देवाळे हायस्कूल आणि गर्ल्स हायस्कूल नेबापूरच्या एनसीसी (NCC) पथकांनी शिस्तबद्ध संचलन केले. मयूर बागेत विद्यार्थ्यांनी सादर केलेली मर्दानी खेळांची प्रात्याक्षिके उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. शिवजयंतीचे औचित्य साधून आरोग्य विभाग आणि तहसील कार्यालयामार्फत १८ व १९ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची पाहणी करण्यासाठी आलेले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केवळ पाहणी न करता स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान केले. त्यांच्या या कृतीने उपस्थितांसमोर एक आदर्श निर्माण झाला असून, "रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान" असल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला. संपूर्ण पन्हाळगड परिसर "जय भवानी-जय शिवाजी" आणि "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या घोषणांनी दुमदुमून गेला होता. पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले.
***********************************
बातमी व जाहिरात करिता संपर्क....
9049969625

‘गोकुळ’ मार्फत छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन...


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या  ताराबाई पार्क कार्यालय येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.
         
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, भारताच्या इतिहासातील शौर्य आणि  संघटन कौशल्याचे प्रतिक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराजाची स्थापना करून त्यांनी न्याय, सत्य आणि सर्व धर्मसमभावाचा आदर्श घालून दिला. त्यांची युद्धनीती, दूरदृष्टी आणि सक्षम प्रशासन पद्धती आज हि प्रेरणादायी आहे. सामान्य जनतेच्या कल्याणासाठी असलेली त्यांची बांधिलकी आम्हाला प्रेरणा देणारे असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके यांनी मनोगत व्यक्त केली तर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महिला विकास अधिकारी मृण्मयी सातवेकर यांनी केले. तर आभार जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांनी केले. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे,  संचालक  अजित नरके, अंबरिषसिंह घाटगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, संभाजी पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ संचालक अभिषेक डोंगळे, गोकुळचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंके, संकलन व्‍यवस्‍थापक दत्तात्रय वागरे, डॉ.दयावर्धन कामत, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.विजय मगरे, अशोक पुणेकर, विनोद वानखेडे, गीता मोरे, संभाजी जाधव व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

जिल्हास्तरीय युवा पुरस्काराचे आयोजन; १० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन....


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने सन २०१८-१९ ते २०२५-२६ या कालावधीतील जिल्हास्तरीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. युवा पुरस्काराचे स्वरुप जिल्हा युवा पुरस्कार- जिल्हा स्तरावर एक युवक तसेच एक युवती एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. प्रति युवक व युवतींसाठी हा पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रु.१०,०००/ तर  प्रति संस्थेसाठी गौरवपत्र,  सन्मान चिन्ह रोख रक्कम रु. ५०,०००/- अशा स्वरूपाचा असणार आहे.


युवक, युवतींसाठी पात्रतेचे निकष -  अर्जदार युवक/युवतीचे वय पुरस्कार वर्षातील १ एप्रिल रोजी १३ वर्षे पूर्ण व ३१ मार्च रोजी ३५ वर्षे पर्यंत असावे. अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग ५ वर्ष वास्तव्य केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो तारखेसह माहिती सादर करणे आवश्यक राहील.
संस्थांसाठी पात्रता निकष-  संस्थानी केलेल्या कार्याचे उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ. तारखेसह माहिती अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील, अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० नुसार पंजीबध्द असावी.  अर्जदार व संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार व संस्थेच्या सदस्यांचा पोलिस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला (संबंधित परिक्षेत्रातील पोलिस स्टेशन) देणे आवश्यक राहील.

पुरस्कारासाठी मुल्यांकन - युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य पुरस्कार वर्षाच्या दि.१ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीतील वर्षनिहाय गत तीन वर्षाची केलेली कार्य कामगिरी विचारात घेण्यात येईल. जिल्ह्यातील पात्र युवक, युवतींनी, संस्थेने आपला प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी स्टेडीयम, कोल्हापूर येथे सादर करावा. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर तसेच संकेतस्थळावर sports, maharashtra.gov.in. उपलब्ध आहे. इच्छुकांनी  दि. १० मार्च  पर्यंत अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची कात्रणे, फोटो इ. च्या सत्यप्रती, तीन पासपोर्ट फोटो, चारित्र्याचा दाखला, पुरस्कार मिळाल्यानंतर दोन वर्ष कार्यरत राहण्याबाबत हमीपत्र जोडून बंद लिफाफ्यात कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

कोल्हापूर जिल्ह्यात CSR अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया अभियान....


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली CSR उपक्रमांतर्गत Rotary Club या स्वयंसेवी संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या विशेष शस्त्रक्रिया अभियानासाठी रोटरी क्लबच्या विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांवर आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये प्रामुख्याने स्त्रीरोग, नेत्ररोग, बालरोग, कान-नाक-घसा, मूत्ररोग, ऑर्थोपेडीक तसेच इतर सर्वसाधारण शस्त्रक्रियांचा समावेश आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि हातकणंगले या सहा तालुक्यांतील तपासणीत पात्र ठरलेल्या रुग्णांवर 9 ते 14 मार्च या कालावधीत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. शस्त्रक्रियेसाठी इच्छुक रुग्णांनी संबंधित तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तपासणी करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. दिलीप माने यांनी केले आहे.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
9049969625

Tuesday, February 17, 2026

विकासाची पालखी नवीन शिलेदारांच्या खांद्यावर...!; आजरा तालुकावासियांची अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पेलणार का?


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
माथी कैक वर्षे मागासलेपणाचे बिरूद घेऊन वावरणाऱ्या आजरा तालुक्यातील जनतेच्या आशा-आकांक्षा पुन्हा केंद्रस्थानी आलेल्या आहेत, ज्या प्रत्येक निवडणुकीनंतर आपसूकच हवेत विरल्या गेल्या. त्या प्रथेप्रमाणे पुन्हा जिवंत झाल्या इतकंच. आता या नव्या शिलेदारांच्या खांद्यावर सर्वच बाबतीत रखडलेल्या विकासाची पालखी इमानेइतबारे वाहण्याची जबाबदारी असणार आहे. अर्थातच जुन्या-नव्या शिलेदारांच्या समन्वयातून हा जबाबदारीचा पूल बांधला जाणार का? हे पाहण्यासाठी आजरा तालुकावासीय नक्कीच आतुर झाले आहेत.


आजरा तालुक्याच्या राजकीय घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शरद पवार गट, शिवसेना शिंदे व ठाकरे गट, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस या पक्षातील नेते व कार्यकर्त्यांच्या परिघात पिंगा घालीत असतात. येथे पक्षीय नावाचा स्वेच्छेप्रमाणे ताईत गळ्यात परिधान केला जातो. यामुळे ज्या त्या पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरून देखील आजरा तालुक्यात सोयीप्रमाणे पाहण्याचा अलिखित प्रघात तयार झाला आहे. साहजिकच तालुक्यातील दीर्घकाळ रखडलेल्या विकासाला चालना मिळालेली नाही. साडेतीन वर्षाच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीनंतर लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींच्या हातात सभागृहाची सूत्रे सोपविली जात आहेत. तालुक्याच्या भल्यासाठी या प्रतिनिधींना राजकीय जोडे सभागृहाबाहेर ठेवावे लागतील. त्यामुळे तालुक्यातील विकासकामांना अपेक्षित गती मिळेल का? आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील का? याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

आजरा तालुका हा दुर्गम, डोंगराळ, ग्रामीण खेड्यापाड्यांचा. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, सार्वजनिक तसेच मूलभूत सोयीसुविधा आणि विकासाच्या अनेक पातळ्यांवर संघर्ष करणारा, ही या तालुक्याची खरी ओळख. येथे रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रांत भरीव कामाची संधी आहे. मागच्या काही वर्षात धरणांचे पाणी आणि शिक्षणाच्या बाबतीत काही प्रमाणात विकास झाला असला, तरी तो अपुरा असल्याची किंबहुना अव्याहतपणे पुढे सरकला नसल्याची बोचरी सल नागरिकांमध्ये घर करून राहिली आहे.

पदाधिकाऱ्यांनी कट्टर गटांच्या राजकारणाची झुल बाजूला करून तालुक्याच्या विकासाच्या पालखीला खांदा देण्याची अपेक्षा लोकांना आहे. विशेषतः शेतकरी, युवा वर्ग, महिला आणि विद्यार्थीवर्ग मोठ्या आशेने पाहत आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय, सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी, दळणवळणासाठी दर्जेदार रस्ते, तसेच शिक्षण आणि आरोग्यसेवा गावपातळीवर सहजतेने उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्या सामान्य नागरिकांकडून वारंवार मांडल्या जात आहेत. तालुक्याचा सामाजिक चेहरामोहरा बदलतील, असे वैद्यकीय अधिकारी आणि शिक्षक या घटकांची तालुक्याला अनेक वर्षे प्रतीक्षा राहिली आहे. दरम्यान, येथील युवकांमध्ये बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. अनेक तरुण शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करत आहेत, रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध व्हावी, लघुउद्योग, कृषिपूरक उद्योगांना चालना मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत. तालुक्यातील जनता गटातटाच्या राजकारणात गुंतलेली आहे. राजकारण आणि समाजकारण वेगळं मानून शासन, प्रशासनावरील लोकदबावातून आजरा तालुक्यावरील मागासलेपण पुसण्याची संधी आहे. राजकीय गटप्रमुख आणि नवीन पदाधिकाऱ्यांनी मनावर घेतल्यास अपेक्षित विकासाची संकल्पना रुजण्यास मदत होईल.

प्रमुख अपेक्षा....
आजरा तालुक्यातील आरोग्य आणि शैक्षणिक धोरण आणि दर्जा उंचावणे, तालुक्यातील सर्व रस्त्यांची मजबूत दुरुस्ती व नवीन रस्त्यांचे जाळे, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा व सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना विमा आणि अनुदान वेळेवर, युवकांसाठी रोजगारनिर्मिती व कौशल्य विकास केंद्रे, ग्रामीण आरोग्यसेवेत सुधारणा व तज्ज डॉक्टरांची नियुक्ती, शिक्षण क्षेत्रात डिजिटल सुविधा व शाळांना आवश्यक सोयी, प्रशासनात पारदर्शकता व लोकांशी थेट संवाद अशा आजरा तालुकावासियांच्या माफक अपेक्षा आहेत.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Sunday, February 15, 2026

बहिरेवाडीतील ह.भ.प. आप्पा मोरे यांच्या सहजीवनाचा अमृतमहोत्सवी सोहळा; ग्रंथतुला, समई प्रदान व हरिपाठाचे वाटप


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
बहिरेवाडी (ता. आजरा) येथील ह.भ.प. श्री. आप्पा लक्ष्मण मोरे व सौ. हौशाबाई आप्पा मोरे यांच्या सहजीवनाचा अमृतमहोत्सवी सोहळा संपन्न झाला. यनिमित्ताने ग्रंथतुला, समई प्रदान व हरिपाठाचे वाटप करणेत आले. ग्रंथतुलातील पुस्तकांची प्राथमिक विद्यामंदिर, भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी व श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा यांना समारंभपूर्वक सुपूर्द करणेत आली. श्री रुक्मिणी विठ्ठल मंदिरसाठी पंढरपूरचे ह.भ.प. श्री. एकनाथ नामदास महाराज यांचेकडे मोरे कुटूंबियांच्यावतीने दोन समई प्रदान करण्यात आली. मोरे कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत आई-वडिलांच्या सहजीवनाचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे असे गौरवोद्गार पंढरपूरचे ह.भ.प. श्री एकनाथ नामदास महाराज यांनी काढले.
        
मोरे दाम्पत्यांचा सहजीवनाचा अमृत महोत्सव व ह.भ.प. आप्पा मोरे यांचा ९१ वा वाढदिवस असा संयुक्त सोहळा श्री. रुक्मिणी विठ्ठल मंदिर बहिरवाडी येथे घेण्यात आला. मोरे कुटुंबीयांच्या वतीने पाद्यपूजन, ९१आरतीची ओवाळणी, मंदिरासाठी दोन समई भेट, सार्थ हरिपाठाचे वाटप व महाप्रसाद देणेत आला. ह.भ.प. श्री एकनाथ नामदास महाराज यांच्या हस्ते ह.भ.प. आप्पा मोरे व सौ हौशाबाई मोरे यांचा आहेर, साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. वयाची ९१ वर्षे व सहजीवनाचा अमृत महोत्सव सोहळा हा दुर्मिळ योग असून या निमित्ताने मोरे कुटुंबीयांनी केलेले सामाजिक योगदान वारकरी संप्रदायाला प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार ह.भ.प. श्री. एकनाथ नामदास महाराज यांनी काढले. यावेळी श्री रुक्मिणी विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने झालेल्या सप्ताहाचे व्यासपीठ चालक ह.भ.प. श्री. नानासो यादव, सदाशिव पिटके, बंडोपंत चौगुले, राजाराम चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, जयवंत शिंत्रे, गजानन मिरजकर, कल्लाप्पा मिरजकर, सावळाप्पा मिसाळ, अर्जुन कुंभार, सुरेश पाटील, विजय काकडे, सदाशिव शिंत्रे यासह वारकरी व मोरे कुटूंबिय उपस्थित होते.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क....
9049969625

Saturday, February 14, 2026

अज्ञात वाहनाच्या धडकेत सोहाळेच्या युवकाचा मृत्यू...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशांत (गोट्या) नामदेव दोरूगडे (वय 38) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना माणगाव (जि. रायगड) जवळ शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली घडली.


याबाबत माहिती अशी, प्रशांत हा महाड येथे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. शुक्रवारी रात्री तो ट्रक घेऊन मुंबईहुन महाडकडे जात होता. या प्रवासादरम्यान माणगाव नजीक ट्रक रस्त्याशेजारी लावून रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने प्रशांत यांना ठोकरले. यात प्रशांत हा गंभीर जखमी होऊन मयत झाला. प्रशांत हा आईवडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याच्या आईचे सुमारे दहा वर्षांपूर्वी तर वडिलांचे तीस वर्षांपूर्वी निधन झाले होते. प्रशांतच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Thursday, February 12, 2026

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा आयोजित सुगम गायन स्पर्धेत प्राथमिक गटात रश्मी गवस तर माध्यमिक गटात कौस्तुभ सुतार प्रथम...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा तर्फे कै. उर्मिला श्रीपाद मायदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित सुगम गायन स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेची सुरवात कै. उर्मिला मायदेव यांच्या प्रतीमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून अनंत मायदेव यांच्या हस्ते करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष. वामन सामंत यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.


प्राथमिक गटातून रश्मी उदय गवस (गडहिंग्लज) हिने प्रथम क्रमांक मिळविला. आर्या पिलाजी गावडे (लाटगाव, ता. आजरा) हिने व्दितीय तर सार्थक भिमराव मनगुते (गडहिंग्लज) याने तृतीय क्रमांक मिळवीला. माध्यमिक गटातून कौस्तुभ संतोष सुतार (वेगवडे ता. भुदरगड) याने प्रथम क्रमांक मिळविला. हर्षदा महादेव पाटील (विटे, ता. आजरा) हिने व्दितीय तर रिया रत्नाकर धुरे (उत्तूर) हिने तृतीय क्रमांक मिळवीला. विजेत्यांना प्रमुख पाहुणे अनंत मायदेव व मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रणव पाटील (गडहिंग्लज) व एस. व्ही. चोथे (आजरा) यांनी काम पाहिले. संगीत संयोजन निमेश देवार्डे, सदेश कुंभार, ज्ञानदेव पाटील, प्रणय बोलके व चंद्रकांत ठाकूर यांनी केले. या स्पर्धेत आजरा, गडहिंग्लज, भुदरगड व चंदगड तालुक्यातील ६० स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.


यावेळी नगरसेविका स्मीता कुंभार वाचनालयाचे सहकार्यबाह रविंद्र हुक्केरी, संचालक विजय राजोपाध्ये, महंमदअली मुजावर, बंडोपंत चव्हाण, विनायक आमणगी, डॉ. अंजनी देशपांडे, गिता पोतदार, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, स्टीफन डिसोझा, संजय शेणवी, डॉ. कृष्णा होरांबळे, चंद्रशेखर बटकडली, भालचंद्र सावंत, अमित ढवळ, प्रा. संदीप देसाई, निखिल कळेकर, महादेव पाटील, महादेव पोवार यांसह संगीतप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्षा सौ. विद्या हरेर यांनी सुत्रसंचालन केले तर कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी आभार मानले.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

आजऱ्यात सलग दुसऱ्या वर्षी रंगणार आजरा केसरी सेकंद बैलगाडा शर्यत....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
महाशिवरात्री निमित्त आजरा येथे सलग दुसऱ्या वर्षी आजरा केसरी सेकंद बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शनिवार दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी होत आहेत. बोलकेवाडी गायरान चित्रानगर शेजारी येथे होणाऱ्या या स्पर्धेबाबत बैलगाडा शर्यत शौकिनांना मोठी उत्सुकता लागून राहिलेली आहे. या स्पर्धा ओपन गट व दुसा, आदत गट अशा दोन गटात होणार आहे.


ओपन गटासाठी 31 हजार, 25 हजार, 20 हजार, 15 हजार, 12 हजार, 10 हजार, 8 हजार, 6 हजार, 4 हजार, 3 हजार, 2 हजार अशी एकूण 11 क्रमांकाची रोख रकमेची पारितोषिके व मानाची ढाल अशी बक्षिसे आहेत. या गटासाठी 1 हजार 500 रुपये प्रवेश फी आहे. दुस्सा, आदत गटासाठी 15 हजार, 12 हजार, 10 हजार, 8 हजार, 7 हजार, 6 हजार, 5 हजार, 4 हजार, 3 हजार, 2 हजार 500, 2 हजार अशी एकूण 11 क्रमांकाची रोख रकमेची पारितोषिके व मानाची ढाल अशी बक्षिसे आहेत. या गटासाठी 1 हजार रुपये प्रवेश फी आहे. अधिक माहितीसाठी सुमित पारपोलकर (9607809973) यांच्यासह इम्रान मुराद, सागर कांबळे, अनिरुद्ध सुतार, रोहित पारपोलकर, ऋषिकेश खाडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Monday, February 9, 2026

उत्तूर मधून राष्ट्रवादीचे शिरीष देसाई तर पेरणोलीतून राष्ट्रवादीचे सुधीर देसाई विजयी; आजरा पंचायत समितीत, जाणून घ्या आजरा तालुक्यातील गट व गण निहाय उमेदवारांचे मतदान....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. यामध्ये उत्तूर गटातून राष्ट्रवादीचे शिरीष देसाई तर पेरणोली गटातून राष्ट्रवादीचे सुधीर देसाई विजयी झाले. उत्तुर गणातून राष्ट्रवादीचे विकास चोथे, भादवण गणातून राष्ट्रवादीच्या जयश्री गाडे, पेरणोली गणातून राष्ट्रवादी-शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत यशोदा पोवार, वाटंगी गणातून भाजपचे समीर पारदे विजयी झाले. आजरा पंचायत समितीवर राष्ट्रवादी पक्ष सत्ता स्थापन करणार आहे. भादवण गणातून विजयी झालेल्या जयश्री गाडे या सभापती पदावर विराजमान होणार आहेत.


उमेदवारनिहाय मिळालेले मतदान पुढील प्रमाणे...


पंचायत समिती उत्तूर मतदारसंघ :
अभिजीत अमृत आरेकर (उत्तूर), काँग्रेस : 455
संभाजी राजाराम कुराडे (उत्तूर), शिवसेना शिंदे गट : 4669
विकास वसंत चोथे (बहिरेवाडी), राष्ट्रवादी अजित पवार गट : 7281 (विजयी)
सागर शशिकांत वाघरे (होन्याळी), शिवसेना ठाकरे गट : 285
महेश काशिनाथ करंबळी (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष : 4809
नोटा : 165


पंचायत समिती भादवण मतदार संघ :
जयश्री गजानन गाडे (भादवण), राष्ट्रवादी अजित पवार गट : 6153 (विजयी)
भारती कृष्णा डेळेकर (सोहाळे), शिवसेना शिंदे गट : 4904
साधना संजय केसरकर (भादवण), ताराराणी आघाडी पक्ष : 3788
नोटा : 128


पंचायत समिती पेरणोली मतदारसंघ :
स्मिता उत्तम देसाई (पेरणोली), भारतीय जनता पार्टी : 3737
श्वेता रणजीतकुमार सरदेसाई (लाटगाव), शिवसेना शिंदे गट : 4126
अस्मिता दत्तात्रय कांबळे (कोरीवडे), वंचित बहुजन आघाडी : 446
जिजाबाई महादेव कांबळे (कासार कांडगाव), अपक्ष : 81
यशोदा युवराज पोवार (देऊळवाडी), अपक्ष : 6542 (विजयी)
नोटा : 166


पंचायत समिती वाटंगी मतदारसंघ :
समीर दशरथ पारदे (मलिग्रे), भारतीय जनता पार्टी : 6226 (विजयी)
सतीश गणपती फडके (सुळे), शिवसेना शिंदे गट : 2572
राजाराम गुणाजी होलम (पोळगाव), राष्ट्रवादी अजित पवार गट : 5263
किरण विश्वनाथ कोरे (बुरुडे), अपक्ष : 30
नरसू बाबू शिंदे (पोश्रातवाडी), अपक्ष : 235
नोटा : 82


जिल्हा परिषद उत्तूर मतदारसंघ :
विठ्ठल महादेव उत्तूरकर (उत्तूर), शिवसेना शिंदे गट : 9443
शिरीष हिंदुराव देसाई (उत्तूर), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : 12801 (विजयी)
उमेश मुकुंदराव आपटे (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष : 10202
नोटा : 191


जिल्हा परिषद पेरणोली मतदारसंघ :
विष्णू मोतबा केसरकर (किणे), शिवसेना शिंदे गट : 6368
सुधीर राजाराम देसाई (वेळवट्टी), राष्ट्रवादी अजित पवार गट : 12042 (विजयी)
जयवंत मसणू सुतार (किणे), भारतीय जनता पार्टी : 10613
सुधीर रामदास सुपल (लाटगाव), राष्ट्रीय समाज पक्ष : 294
सुरेश कृष्णा शिंगटे (वाटंगी), अपक्ष : 117
नोटा : 76
(अधिकृत आकडेवारी अद्याप प्रसिद्ध व्हायची आहे. आकडेवारीत बदल होऊ शकतो)
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Saturday, February 7, 2026

आजरा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी 63.90 टक्के मतदान; सोमवारी मतमोजणी....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
आजरा तालुक्यातील दोन जिल्हा परिषद मतदार संघ व चार पंचायत समिती मतदार संघासाठी शनिवारी 63.90 टक्के मतदान झाले. एकूण 96 हजार 611 पैकी 61 हजार 731 इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेच्या 8 तर पंचायत समितीच्या 18 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आजरा येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे.


आजरा तालुक्यात पेरणोली व उत्तुर हे जिल्हा परिषदेचे दोन मतदारसंघ आहेत. उत्तुर, भादवण, पेरणोली व वाटंगी हे चार पंचायत समितीचे मतदार संघ आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गेले पंधरा दिवस तालुक्याचे ग्रामीण राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट यांनी सर्वच ठिकाणी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. राज्यातील सत्ताधारी महायुती मध्येच तालुक्यात चुरशीची लढत झाली. शनिवारी सकाळच्या सत्रात कमी मतदान झाले. दुपारच्या सत्रात तालुक्यात मतदानाचा वेग वाढला. दुपारी दीड वाजेपर्यंत तालुक्यात 43.34 टक्के मतदान झाले.
मतदार संघ निहाय झालेले मतदान...
उत्तूर पंचायत समिती मतदार संघ : 17 हजार 476 (63.52 टक्के)
भादवण पंचायत समिती मतदार संघ : 14 हजार 882 (62.94 टक्के)
उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघ : 32 हजार 358 (63.25 टक्के)
पेरणोली पंचायत समिती मतदार संघ : 15 हजार 37 (64.23 टक्के)
वाटंगी पंचायत समिती मतदार संघ : 14 हजार 336 (65.04 टक्के)
पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघ : 29 हजार 373 (64.62 टक्के)
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Friday, February 6, 2026

लाडकी बहीण योजना E-KYC सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत...


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत Aadhaar Authentication द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून ऑनलाईन E-KYC मध्ये सुधारणा करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने या बाबीचा सकारात्मक विचार करून, ज्या लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत E-KYC पूर्ण केली आहे आणि पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीची नोंद केली आहे, अशांसाठी ऑनलाईन E-KYC मध्ये सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 मार्चपर्यंत उपलब्ध करून दिली आहे. यासंदर्भात योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आवश्यक सुधारणा करण्यात आली असून, यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. एस. वाईंगडे यांनी दिली आहे.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Thursday, February 5, 2026

पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातील गावनिहाय विकास आराखडा तयार; विकास आराखड्यानुसार गावांना प्राधान्याने निधी देणार : जिल्हा परिषद मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयवंत सुतार....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचा भौगोलिक व्याप मोठा आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवर हा मतदार संघ विखुरलेला आहे. अनेक ठिकाणी महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक गावातील महत्त्वाचे प्रश्न असणाऱ्या गोष्टी घेऊन गावनिहाय विकास आराखडा तयार केला आहे. या विकास आराखड्याला प्राधान्य देऊन सर्व प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक करण्यासाठी आगामी काळात कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत मसणु सुतार यांनी केले. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी विकास न्यूजशी संवाद साधला....


जयवंत सुतार पुढे म्हणाले, पेरणोली जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा माझा ध्यास राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग या विविध विभागांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाचा एक वार्षिक कृती आराखडा तयार करून अतिशय नियोजनबद्धरित्या विकास करण्याचे आपले नियोजन आहे. केवळ पायाभूत विकास हा माझा अजेंडा नाही, त्याबरोबरच मतदारसंघातील जनतेसाठी व्यक्तिगत लाभाच्या योजना राबवणे, आमचे नेते खासदार धनंजय महाडिकसाहेब, आमदार शिवाजीराव पाटीलसाहेब, अशोकअण्णा चराटी यांच्या माध्यमातून कामगार कल्याण विभाग, संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ योजना, अपंग-परित्यक्ता पुनर्वसन योजना, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजना, पोलिस भरती तसेच लष्कर भरतीसाठी तरुणांना योग्य प्रशिक्षण, महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, युवतींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आराखडा अशा व्यक्तिगत योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.


सुतार यांनी सांगितलं की कोणतेही संवैधानिक पद नसताना पेरणोली जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांसाठी डांबरी रस्ते, शाळा दुरुस्ती, दलित वस्तीतील रस्ते, शेती-पाणंद रस्त्यांसाठी तब्बल 40 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. हे काम म्हणजे नुसता विकास नाही-तो विश्वासाचा पूल आहे. माझे वडील स्व. मसणू सुतार यांच्या सेवाव्रताचा वारसा मी पुढे नेत, सर्वसामान्यांच्या सेवेसाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. या निवडणुकीत मला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा व प्रतिसाद मिळत आहे. या मतदारसंघात शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, युवकांसाठी रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि शेती सुधारणा-या क्षेत्रांत ठोस, दीर्घकालीन आणि परिणामकारक काम करण्याचा माझा संकल्प आहे. हा मतदारसंघ फक्त विकसित नाही, तर स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवायचा आहे. ही निवडणूक कोणत्याही सत्तेसाठी नाही, स्वार्थासाठी नाही- ही निवडणूक आहे आपल्या भागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी. माझ्याकडे पद नसेल, पण माझ्याकडे सेवा करण्याची परंपरा आहे. माझ्याकडे शब्द कमी असतील, पण काम करण्याची तयारी आहे. आपल्या विश्वासातून मला मिळालेला आशीर्वादच माझी खरी ताकद आहे. हा विकासाचा प्रवास पुढे नेण्यासाठी, माझं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी, आपल्या मतदानरूपी आशीर्वादाची मला नितांत गरज आहे. आणि मला विश्वास आहे की 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानामध्ये बॅलेट पेपरवर 3 अनुक्रमांक वर माझे नाव व कमळ चिन्ह आहे. कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातील तमाम मतदार बंधू-भगिनी मला भरघोस मतांनी विजयी करतील आणि आपल्या सेवेची संधी देतील.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

विकासात्मक दृष्टिकोन असणाऱ्या भारतीय जनता पार्टीला विजयी करा : जयवंत सुतार; उचंगी पैकी हुडे येथे भाजपचा प्रचार दौरा


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
गेल्या दहा वर्षात केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार कार्यरत आहे. या माध्यमातून भाजपने सर्वसामान्यांसाठी वैयक्तिक हिताच्या तसेच सार्वजनिक हिताच्या अनेक योजना राबवले आहेत. याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होऊन त्यांचे जीवन सुखकर झाले आहे. हा विकासाचा दृष्टिकोन फक्त भारतीय जनता पार्टी कडेच आहे. असा विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी करावे असे आवाहन भाजपाचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार यांनी केले. ते उचंगी पैकी हुडे येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. यावेळी ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीला भरघोस मतदान करत विजयी करण्याचा निर्धार केला.


जयवंत सुतार पुढे म्हणाले, विविध संस्थातील पदे मिरवण्यासाठी आहेत असे मानणाऱ्यांना बाजूला करा. जनतेसाठी काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करा. वाड्या वस्त्यावर निधी पोहोचवण्यात आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. आतापर्यंत जिल्हा परिषद मतदार संघात 40 कोटी हून अधिक रकमेचा निधी दिला आहे. त्यानंतरच मते मागायला आलो आहे. यावेळी वाटंगी पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार समीर पारदे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संयोगिता बापट, ज्योत्स्ना चराटी, युवराज देसाई, सागर देसाई, वसंत चौगुले, पांडुरंग देसाई, विष्णू देसाई, मनोहर देसाई,  नंदकुमार कुपटे, राजेंद्र धडाम, तुकाराम धडाम, अरविंद देसाई, सत्तू धडाम, यशवंत चौगुले यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.


देवर्डे येथील जी. एम. पाटील यांच्या गटाचा भारतीय जनता पार्टीचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार व पेरणोली पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार स्मिता देसाई यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यावेळी जी. एम. पाटील गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...