Wednesday, February 19, 2025

मुंबईत दलालांना दणका देण्याची गरज : कॉ. उदय भट; आजऱ्यात गिरणी कामगारांचा मेळावा

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

गिरणी कामगार पूर्ण वेळ मुंबईत काम करत असताना संपाच्यावेळी त्यांना मुंबईतून बाहेर हाकलले आणि मुंबईवर दलालांचे राज्य निर्माण झाले. त्यांना दिवसाही स्वप्न पडू लागली. हे बदलण्यासाठी गिरणी कामगारांची संघटना लाल निशान पक्षाने एकजूट केली. आणि त्यांना मुंबईत गिरणीच्या जागेतच घरे मिळण्यासाठी संघटीत करण्यात आले. यासाठी पुढची लढाई म्हणून ६ मार्चला आझाद मैदानात संघर्ष लढा उभा करणार असून मुंबई येथील दलालांना दणका देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे कॉ. उदय भट यांनी सांगितले. आजरा येथील किसान भवन येथील गिरणी कामगारांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

स्वागत व प्रास्ताविक नारायण भडांगे यांनी केले. यावेळी भट यांनी महाराष्ट्रभर विखुरलेला गिरणी कामगार त्यांच्याच हक्कासाठी एकत्र करण्याचे काम संघटनेने केले असून या संघटनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांना मुंबईत घर व त्यांची पेन्शन वाढ यासाठी सातत्याने लढाई सुरू असून आत्ताची ही वेळ शासनाला व दलालांना धक्का देण्याची असून सर्व गिरणी कामगारांनी व वारसांनी आझाद मैदानात ताकद दाखविण्याचे आवाहन केले.

यावेळी कॉ. अतुल दिघे यांनी गिरणी कामगार हा बेघर नाही किंवा भुमीहिन नाही. त्याने आपल्या श्रमाने मुंबई सोन्याची केली. त्यानांच बेघर समजून हिकडे घर देऊन व तिकडे घर देऊ असे सांगून फसवणूक केली जात आहे. या फसवणूकीला हे गिरणी कामगार भुलणार नसून गिरणीच्या जागेतच घर मिळविल्याशिवाय ही संघटना शांत बसणार नाही. तसेच गिरणी कामगारांना किमान मासिक ९ हजार पेन्शन मिळाली पाहिजे यासाठीच्या लढाईसाठी गिरणी कामगारांनी सज्ज होण्याचे आवाहन केले.

यावेळी कॉ. धोडिंबा कुंभार, कॉ. शिवाजी सावंत, कॉ. शांताराम पाटील, कॉ. दत्तात्रय अत्याळकर यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याला नारायण राणे, जयश्री कुंभार, अनिता बागवे, हिंदुराव कांबळे, विठ्ठल बामणे, शिवाजी पोवार, मनाप्पा बोलके, बाबू केसरकर, तुकाराम जाधव यांच्यासह महिला व गिरणी कामगार उपस्थित होते. सूत्रसंचलन कॉ. संजय घाटगे यांनी करून आभार मानले.
===============

No comments:

Post a Comment

कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज कि...