Saturday, June 20, 2026

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला 3 हजार कोटींची मोठी चालना; कोल्हापूर आणि पुण्यात दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा, केंद्राच्या अनेक निर्णयांतून साखर कारखानदारीला नवसंजीवनी....


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
पश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाला नवे बळ देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी 3 हजार कोटी रुपयांच्या दोन मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1 हजार 500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प, तर पुण्यातील बंद पडलेले नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. इचलकरंजी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्सटाईल पार्कमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, नगर विकास राज्य मंत्री तथा कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धैर्यशील माने आणि धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री राहुल आवाडे, शिवाजी पाटील, अशोक माने, रवींद्र चव्हाण आणि राजेंद्र पाटील यड्रावकर, महापौर उदय धातुंडे, माजी खासदार कल्लापण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि आवाडे परिवार आदि उपस्थित होते.
   
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर केंद्र सरकारने साखर उद्योगाला स्थैर्य देण्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. साखर कारखान्यांवरील सुमारे 46 हजार कोटी रुपयांचा प्राप्तीकर माफ करण्यात आला असून, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळामार्फत (NCDC) 10 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविणे, मल्टीफीड इथेनॉल प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आणि इथेनॉलवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करणे यांसारख्या निर्णयांमुळे साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळाली आहे. बंद पडलेल्या साखर कारखान्यांना पुन्हा कार्यान्वित करण्याबरोबरच उद्योगाला साखरेपलीकडे इथेनॉल, सीबीजी आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांकडे वळविण्याचे धोरण राबविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. काही सहकारी साखर कारखाने स्वतंत्रपणे सायट्रिक ॲसिड, इथेनॉल किंवा सीबीजी निर्मिती प्रकल्प उभारू शकत नाहीत. त्यामुळे सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या उपउत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1 हजार 500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा अमित शहा यांनी केली. या प्रकल्पात विविध कारखान्यांची बाय-प्रॉडक्ट्स एकत्र करून त्यापासून सायट्रिक ॲसिड, इथेनॉल, सीबीजी आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार केली जातील. या प्रकल्पातून मिळणारा सर्व नफा पुन्हा सहभागी साखर कारखान्यांना वितरित केला जाणार असल्याने शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होणार आहे. या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी एका बैठकीतच तत्काळ मंजुरी दिली असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. पुढील तीन महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी पुण्यातील बंद पडलेले ‘नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह’ पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून 1 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा केली. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशातील आणि जगभरातील साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचे काम येथे केले जाणार आहे. तसेच डेअरी प्लांट, इथेनॉल प्लांट, सायट्रिक ॲसिड प्लांट आणि शेण अथवा मळीपासून सीबीजी निर्मिती करणाऱ्या संयंत्रांसाठी लागणारी यंत्रणा तयार करण्याची क्षमता या केंद्रात विकसित केली जाणार आहे. या उपक्रमातून मिळणारा आर्थिक लाभही सहकारी क्षेत्राला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, इचलकरंजी शहरासाठी 2051 सालापर्यंत पिण्याचे पाणी शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड येथून उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक निधी राज्य शासन देईल. तसेच पॉवरलूम उद्योगासाठी सोलर पार्क उभारून स्वस्त व स्वच्छ वीज उपलब्ध करून देण्यात येईल. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी इचलकरंजीच्या सहकार आणि वस्त्रोद्योग विकासातील ऐतिहासिक योगदानाचाही उल्लेख केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी हे सहकारातून समृद्धी निर्माण करणारे आदर्श मॉडेल असल्याचे सांगितले. महाराष्ट्राची सहकार चळवळ शेतकरी आणि सभासदांच्या सामूहिक शक्तीवर उभी असल्याचे नमूद करत त्यांनी सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध सुधारणांची माहिती दिली. शहरी सहकारी बँकांसाठी नवी धोरणे, आधार-सक्षम पेमेंट प्रणाली, गोल्ड लोन आणि कर्जमर्यादा वाढ, वन-टाइम सेटलमेंट योजना आणि ‘अम्ब्रेला ऑर्गनायझेशन’ची संकल्पना यामुळे सहकार क्षेत्र अधिक बळकट झाल्याचे ते म्हणाले. यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्ताराची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमात आमदार राहुल आवाडे यांनी प्रास्ताविक केले, तर राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी आभार मानले. मोठ्या संख्येने नागरिक आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
===========================

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...