आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
संकेश्वर-बांदा महामार्गावरील आजरा शहरा नजीकच्या टोलच्या प्रश्नाबाबत आमचे नेते पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे सर्वसामान्यांच्या सोबत कायम आहेत. त्यामुळेच त्यांचे टोल नाका स्थलांतरित व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र आजरा शहरानजीक टोल नाका सुरू राहवून त्या माध्यमातून आपली दुकानदारी सुरू राहावी यासाठी काही मंडळी प्रयत्नशील आहेत. मात्र अशा प्रवृत्तीला आमचा विरोध राहणार आहे, असे आजरा येथील पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, तालुकाप्रमुख संजय पाटील, आजरा शहर प्रमुख विजय थोरवत, संतोष भाटले, इंद्रजीत देसाई, धनंजय पाटील, नितीन यादव उपस्थित होते.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, टोल हद्दपार व्हावा, याकरिता सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समिती स्थापन केली गेली. टोलविरोधी आंदोलनात पालकमंत्री आबिटकर यांचा नेहमीच सहभाग राहिला आहे. सुरुवातीला टोल बाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय टोल सुरू करू देणार नसल्याची कृती समितीची भूमिका होती. टोल नाका हद्दपारची भूमिका असताना आजरा तालुक्याला टोल मधून वगळून टोल सुरू करण्यास कृती समितीतील काही स्वयंघोषित नेत्यांनी परवानगी दिली. टोलविरोधी कृती समितीतील काही नेत्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिका तालुक्यातील जनतेला संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. मात्र पालकमंत्री आबिटकर व शिवसेना शिंदे गट यांनी टोल सुरू करू देणार नाही व टोल हद्दपार करू ही भूमिका कायम ठेवली आहे. टोलविरोधी कृती समितीतील काही मंडळींची भूमिका नेमकेपणाने स्पष्ट होत नाही. कृती समिती ही सर्व पक्षी असताना काही मोजकीच मंडळी भूमिका मांडताना दिसतात. त्यामुळे कृती समिती व शिवसेना शिंदे गट यांचा काहीही संबंध नाही. शिवसेना शिंदे गट टोलबाबत सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत असलेली भूमिका घेऊन त्यांना न्याय देणार आहे. कृती समितीतील अनेक मंडळींनी अनेक आंदोलने केली. मात्र प्रत्येक आंदोलन अर्धवट सोडत शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम या मंडळींनी केले आहे. अन्याय निवारण समितीने आजरा शहरापुरते काम करावे. अन्याय करणाऱ्या लोकांना समर्थन देण्याचे काम करू नये. नाहीतर अन्याय समितीच्या बाबतीत राजकीय महाअन्याय करण्यात येईल. कृतीत समितीतील मंडळींचे प्रश्नही त्यांचीच असतात आणि उत्तरही त्यांचीच असतात. टोलबाबत ही काही मंडळी आपली दुकानदारी सुरू राहावी यासाठी काम करत आहेत. तसेच परंपरेप्रमाणे मांडवली करण्याचे काम ही मंडळी करत आहेत. या सर्व प्रवृत्तीचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच आगामी काळात जनतेच्या हिताच्या निर्णयासोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.
============================
============================
No comments:
Post a Comment