Tuesday, September 30, 2025

आजरा महाविद्यालयमध्ये महान क्रांतिकारक शहीद भगत सिंग यांना जयंतीदिनी आदरांजली

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
महान स्वातंत्र्यसेनानी, शहीद-ए-आझम भगत सिंग यांच्या जयंतीनिमित्त आजरा महाविद्यालय आजरा मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने त्यांच्या प्रेरणादायी जीवन आणि कार्यावर आधारित विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख प्रा. डॉ. नवनाथ शिंदे  यांनी भगत सिंग यांच्या अतुलनीय देशभक्ती आणि क्रांतिकारी विचारांना उजाळा दिला. त्यांनी आपल्या भाषणात भगत सिंग यांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांवर प्रकाश टाकला. १९१९ मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाने भगत सिंग यांच्या बालमनावर खूप खोलवर परिणाम केला आणि त्यांना ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. अवघ्या २३ वर्षाच्या आयुष्यामध्ये भगतसिंग यांनी खूप मोठे कार्य केले आहे. त्यांनी नौजवान भारत सभा या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. १९२८ साली लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पोलीस अधिकारी जे.पी. सांडर्स यांची हत्या केली तसेच दडपशाही कायद्यांना विरोध करण्यासाठी बटुकेश्वर दत्त यांच्यासह केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकले.  ते केवळ क्रांतिकारक नव्हते, तर एक प्रखर विचारवंत आणि लेखकही होते. 'मी नास्तिक का आहे?' हा त्यांचा लेख त्यांच्या वैचारिक खोलीचे दर्शन घडवतो. २३ मार्च १९३१ रोजी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांना राजगुरु आणि सुखदेव यांच्यासह फाशी देण्यात आली. त्यांचे बलिदान भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी एक मोठी प्रेरणा ठरले. भगत सिंग यांनी पाहिलेल्या समानता व सामाजिक न्यायावर आधारित भारताच्या निर्मितीसाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. नवनाथ शिंदे, प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील व एनएसएस प्रकल्प अधिकारी डॉ. अविनाश वर्धन यांनी भगत सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाचे आयोजन दि.२२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत आयोजित राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाच्या निमित्ताने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अविनाश वर्धन यांनी केले तर सूत्र संचालन व आभार प्रा. रत्नदीप पवार यांनी केले.  या कार्यक्रमाला प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, प्रा. अनिल निर्मळे, प्रा. विठ्ठल हाक्के, प्रा. अनुराधा मगदूम तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
==============

व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर आजरा येथे पोषण आहार सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा येथील व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिरमध्ये पोषण आहार सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा महाल शिक्षण मंडळाच्या संचालिका अलकाताई जयवंतराव शिंपी होत्या.सकस व संतुलित आहारामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य कशा पद्धतीने सुधारते याची सविस्तर माहिती त्यांनी आपल्या मनोगततून दिली. या कार्यक्रमात 140 पालक महिलांनी  उत्फूर्त भाग घेतला होता. वेगवेगळ्या पदार्थांचे मेजवानी अक्षरशः मुलांना भेटली.

या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक सौ. आर. एच. गजरकर यांनी केले. सौ. एन. आर. हरेर, डी. बी. डेळेकर, माजी नगरसेविका सुमैया खेडेकर, डॉ.पारपोलकर यांनी आपल्या भाषणात आहारात पालेभाज्यांचे महत्व पटवून सांगितले. या कार्यक्रमाला आजरा महाल शिक्षण मंडळाच्या संचालिका प्रियंकाताई अभिषेक शिंपी, व्यंकटराव हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या पर्यवेक्षिका सौ. व्हि. जे. शेलार, सौ. ए. एस. गुरव, व्यंकटराव प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. आर. व्ही. देसाई उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. एल. पी.कुंभार यांनी केले. आभार सौ. एन. आर. हासबे यांनी मानले.
=================

1 नोव्हेंबरपासून राज्यातील उसाचा गळीत हंगाम सुरु होणार, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. यंदाचा उसाचा गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकातील कारखान्यांबरोबर सीमेलगतच्या कारखान्यांना हंगाम सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील ऊस कर्नाटकात जाऊ नये म्हणून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या हंगामात एकूण 1 हजार 250 लाख टन ऊस उपलब्ध असेल असा अंदाज देण्यात आला आहे. मुख्यमंत्री निधीसाठी दरवर्षी घेण्यात येणारे प्रतिटन 5 रुपयांवरुन 15 रुपये करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. 
===================

आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील माध्यमिक शाळांना स्मार्ट टीव्ही वाटप; खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क :
आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील 150 हून अधिक माध्यमिक शाळांना स्मार्ट टीव्ही देण्यात आला. खासदार छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या स्मार्ट टीव्हीचे वाटप करण्यात आले. अनिकेत मंगल कार्यालय, महागाव, गडहिंग्लज या ठिकाणी हा कार्यक्रम झाला.
       
अध्यक्षस्थानावरून बोलताना, खासदार शाहू महाराज म्हणाले, आज काळ झपाट्याने बदलत आहे. या बदलत्या काळात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. शिक्षकांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करावे. त्याचा वापर शिक्षणात करून आपल्या विद्यार्थ्यांना स्मार्ट बनवावे. आमदार जयंत आसगावकर यांच्या माध्यमातून शाळांसाठी  साहित्य देण्याचा जो उपक्रम राबविला जातो, तो खरोखरच  कौतुकास्पद आहे. त्यांच्या अनेक कार्यक्रमात मी स्वतः सहभागी झालो आहे. शिक्षकांप्रती त्यांची असणारी तळमळ वाखण्याजोगे आहे. आमदार सतेज पाटील म्हणाले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून ते जागेवर सोडवणे, यात आसगावकर सरांचा हातखंडा आहे. ही आसगावकर सरांची वृत्ती मला आवडली. गेल्या पाच वर्षात आसगावकर सरांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावून शिक्षक आमदार कसा असावा, हे दाखवून दिले आहे. आसगावकर सरांच्या माध्यमातून शिक्षकांना एक चांगले नेतृत्व मिळणे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. अशा माणसाचे कौतुक होणे हे स्वाभाविकच आहे. माझ्या सूचनेनुसारच त्यांनी आपला फंड रस्ते, गटारी यासाठी न वापरता तो केवळ शाळांसाठीच वापरला. शाळांना दिला जाणारा स्मार्ट टीव्ही हा फक्त शिक्षकांनाच नाही तर विद्यार्थ्यांनाही स्मार्ट बनवणार आहे.
      
प्रास्ताविकात आमदार जयंत आसगावकर म्हणाले, माझ्या फंडातून दिले जाणारे प्रत्येक साहित्य हा ब्रॅण्डेड असतो. हे साहित्य वाटप करताना अगदी पारदर्शकपणे तोही कार्यक्रम घेऊनच केला जातो. माझ्या कारकिर्दीत तीन वेळा टप्पावाढ झाली, जुन्या पेन्शनसाठी राज्यात पहिला मोर्चा कोल्हापुरातून निघाला. त्यानंतर राज्यभर असे मोर्चे निघाले. याचा परिणाम म्हणजे त्यासाठी शासनाला समिती नेमली. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असून लवकरच आपल्या बाजूने निकाल लागेल. गेल्या पाच वर्षात आमचे नेते, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम सुरू आहे. शिक्षकांचे प्रश्न ऐकून घेणे ते सोडवणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. त्यात मी कोठेही कमी पडणार नाही. माझे आयुष्य मी शिक्षकांसाठी समर्पित केले आहे, तुमची साथ सदैव माझ्या पाठीशी राहू दे, अशी अपेक्षा आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला सुनील शिंत्रे, अंजनाताई रेडेकर, संभाजीराव देसाई, ऍड बाळासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, विद्याधर गुरबे, बसवराज आजरी, दिग्विजय कुऱ्हाडे, एम. जे. पाटील, सोमगोंडा आरबोळे, राजू खमलेट्टी, नौशाद बुड्डेखान यांच्यासह तीनही तालुक्यातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
====================

आजरा शहरात नमो उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
राज्य शासनाच्या विशेष योजनेअंतर्गत आजरा नगरपंचायत क्षेत्रात “नमो उद्यान” उभारण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पामुळे शहरातील रहिवाशांना आधुनिक व आकर्षक उद्यानाचा लाभ मिळणार असून हरित परिसर आणि दर्जेदार विरंगुळ्याच्या सोयी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे सांगितले आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना उत्कृष्ट दर्जाचे उद्यान विकसित करण्यासाठी विशेष अनुदान देण्यात येत आहे. त्याअंतर्गत आजरा नगरपंचायत क्षेत्रात नमो उद्यान विकसित करण्यात यावे, यासाठी आपला पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार या नमो उद्यानाला मंजुरी मिळाली आहे. या नमो उद्यानात मुलांसाठी खेळणी, वयोवृद्धांसाठी चालण्याचे मार्ग, तसेच आकर्षक बागा व फवारे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे आजरा शहरातील नागरिकांना दर्जेदार उद्यान, हरित परिसर आणि विश्रांतीसाठी तसेच फिरण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत. आजरा शहरातील नागरिकांसाठी हरित वातावरण, आरोग्यदायी जीवनशैली व मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प नक्कीच महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
=====================

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट ! दूध संस्थाच्या खात्यावर दर फरकापोटी १३६ कोटी ०३ लाख रक्कम जमा होणार : गोकुळ दूध संघ चेअरमन नविद मुश्रीफ

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) कडे दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधाचा अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून तो सणासुदीच्याकाळात देण्याची परंपरा आहे. गोकुळ तर्फे सातत्याने दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात असून “दूध उत्पादक शेतकरी हेच  गोकुळच्या कार्याचे केंद्रबिंदू” या भूमिकेवर ठाम राहून संचालक मंडळ जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध आहे. याच परंपरेतून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गायीच्या अंतिम दूध दर फरकापोटी तब्बल १३६ कोटी ०३ लाख रुपयाची उच्चांकी रक्कम दि. ०१ ऑक्टोबर २०२५ इ.रोजी थेट प्राथमिक दूध संस्थाच्या बँक खात्यावर जमा केली जाणार असून हीच गोकुळ कडून लाखो दूध उत्पादकांना मिळालेली स्नेहपूर्ण दिपावली भेट ठरणार असल्याचे माहिती गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली.
          
आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये दि.०१/०४/२०२४ ते ३१/०३/२०२५ या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दूधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर २ रुपये ४५ पैसे व गाय दूधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर १ रुपये ४५ पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. दूध संस्थासाठी प्रतिलिटर सरासरी १ रुपये २५ पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्स पोटी  गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकांना हीरक महोत्सवी जादा दर फरक म्हैस दुधास प्रतिलिटर २० पैसे व गाय दुधास प्रतिलिटर २० पैसे देण्यात आला आहे व तो वरील दर फरकामध्ये समाविष्ठ आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या श्रमावर आणि विश्वासावर गोकुळ फुललेला आहे. गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो. त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दूधाकरीता ६६ कोटी ३७ लाख ७० हजार रुपये तर गाय दूधाकरीता ४५ कोटी १४ लाख ८ हजार रूपये इतका दूध दर फरक व दर फरकावर ६ टक्के प्रमाणे होणारे व्याज ५ कोटी ५२ लाख ८९ हजार व डिंबेचर व्याज ७.८० टक्के प्रमाणे १० कोटी ६७ लाख ३५ हजार रूपये व शेअर्स भांडवलावरती ११ टक्के प्रमाणे डिव्हिडंड ८ कोटी ३८ लाख ६९ हजार रूपये असे एकूण १३६ कोटी ०३ लाख रूपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थाच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे. दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून दिवाळीची गोड भेट आहे. अशी भावना चेअरमन नविद मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
         
या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील गोकुळ संलग्न ८ हजार १२ दूध संस्थांच्या सुमारे ५ लाख दूध उत्पादक सभासदांना होणार आहे. दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या एकूण १३६ कोटी ०३ लाख रुपये अंतिम दूध दर फरका व्यतिरिक्त गोकुळने या आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ ४२ कोटी रुपये पशुवैद्यकीय उपचार, कृत्रिम रेतन, वैरण विकास, मायक्रोट्रेनिंग, दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान, मिल्को टेस्टर खरेदी, कॉम्प्युटर खरेदी, शैक्षणिक सहल, दूध उत्पादकांना किसान विमा पॅलिसी, भविष्य कल्याण निधी, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान व वासरू संगोपनवरती अनुदान व सेवा-सुविधा वरती खर्च केले आहेत. याबरोबर गोकुळ संलग्न दूध उत्पादकांच्या जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी व दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे उच्च गुणवत्तेचे महालक्ष्मी पशुखाद्य कोहिनूर डायमंड, मिनरल मिक्स्चर (फर्टीमिन प्लस) मोफत व सवलतीच्या दरात, टी.एम.आर.चा पुरवठा, अनुदानावर काफ स्टार्टर, मिल्क रिप्लेसर उत्पादकांच्या दारापर्यंत पोहोच करीत आहे. गोकुळने प्रतिदिनी दूध संकलनाचा १८ लाख ५९ हजार लिटरचा टप्पा ओलाडला असून दूध विक्रीचे मागील सर्व उच्चांक मोडीत काढून एका दिवसात सणानिमित्या २३ लाख ६३ हजार लिटरची दूध विक्री केली आहे. तसेच सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये दूध पुरवठा करणाऱ्या म्हैस दूध उत्पादकास ६० रुपये ४८ पैसे तर गाय दूध उत्पादकास ३६ रुपये ८४ पैसे इतका उच्चांकी दूध दर अंतिम दरफरकासह मिळाला आहे. संघाची प्रगती साधण्यासाठी प्रत्येक गावामध्ये म्हैस दूध उत्पादनांत वाढ होणे आवश्यक आहे. यासाठी म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रमांतर्गत परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी अनुदान योजना सुरू असून या योजनेत जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभागी होऊन जातिवंत म्हैशी खरेदी करून संघाचे म्हैस दूध संकलन वाढवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले.  गोकुळची सन २०२४-२५ मध्ये ३ हजार ९६६ कोटी रुपये वार्षिक उलाढाल झाली असून यामध्ये दूध उत्पादक, विक्रेते, ग्राहक व कर्मचाऱ्यांचा प्रामुख्याने सहभाग असून राज्याचे सर्व नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली, सभासद दूध संस्था तसेच दूध उत्पादकांच्या सहकार्यामुळे गोकुळची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यापुढेही गोकुळची वाटचाल तितक्याच दिमाखात व यशस्वीपणे पुढे चालू ठेवू.  गोकुळच्या दूध संकलनाचा २० लाखाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी तसेच म्हैस दूध संकलन वाढीसाठी भविष्यात दूध संस्था व उत्पादकांचे सहकार्य मोलाचे आहे. संचालक मंडळ व व्यवस्थापनाचे योग्य नियोजनामुळे दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाला जास्तीत जास्त दर व योग्य मोबदला देण्यासाठी संचालक मंडळ व संघ व्यवस्थापन कटिबद्ध असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
          
गोकुळच्या संलग्न दूध संस्थांनी दिपावलीपूर्वी फरकाची रक्कम दूध उत्पादक सभासदाना आदा करून सभासदाचा दीपावलीचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन चेअरमन मुश्रीफ यांनी केले असून दूध उत्पादक, दूध संस्था,  ग्राहक,  वितरक,  कर्मचारी, वाहतूक ठेकेदार व सर्व हितचिंतक यांना विजयादशमी दसरा व दिपावलीच्या गोकुळ परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे,  संचालक बाबासाहेब चौगले,  शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बाळासो खाडे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी उपस्थित होते.
================

Monday, September 29, 2025

यशाला ‘शॉर्टकट’ नाही : आयपीएस बिरदेव डोणे, कोल्हापुरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात युवकांना प्रेरणादायी मंत्र

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
आयुष्यात यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, असा प्रेरणादायी मंत्र स्पर्धा परीक्षेतून आयपीएस झालेले अधिकारी बिरदेव डोणे यांनी युवकांना दिला. जिल्हा प्रशासन आणि सायबर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर कॉलेजच्या आनंदभवन सभागृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा शुभारंभ झाला. प्रतिष्ठित शाही दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्राचार्या डॉ. बी. एन. मेनन, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिरदेव डोणे यांनी सांगितले की, परीक्षेच्या कालावधीत केलेल्या अभ्यासापेक्षा वर्षभर सातत्याने केलेला अभ्यास परिणामकारक ठरतो. अपयशाला घाबरू नका, आत्महत्या सारखे चुकीचे निर्णय टाळा आणि कुटुंबाकडून प्रेरणा घ्या, असे त्यांनी आवाहन केले. त्यांनी छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या आईला आपले आदर्श मानले. आपल्या घरातील पहिली शिकलेली पिढी असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी महत्त्वाची नसून मिळालेल्या संधीचे सोने करणे गरजेचे आहे, असे सांगितले. अभ्यासाचे नियोजन करताना गुणवत्तेवर लक्ष द्या, कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवा, प्रश्नपत्रिका पूर्ण लिहिणे ही पहिली पायरी आहे, सामाजिक माध्यमांवरील जाहिराती तपासून योग्य मार्गदर्शक निवडा, इंग्रजीची भीती बाळगू नका कारण प्रशासनात स्थानिक भाषेतच काम करावे लागते, असे त्यांनी मार्गदर्शन केले. आपले छंद आणि अनुभव आत्मविश्वासाने सांगण्याचा सल्ला देत मॉक इंटरव्ह्यूमध्ये नैसर्गिक उत्तरे देण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. यूपीएससीच्या पुढील प्रयत्नांसाठीही आपण तयारी करत असल्याचे सांगत प्रामाणिक प्रयत्न आणि दृढ विश्वास यश मिळवून देतो, असे त्यांनी नमूद केले. सीबीएससी, एनसीआरटी पुस्तके, टॉपर्सचे व्हिडीओ आणि यूपीएससीच्या भाषेचा अभ्यास यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. यशस्वी होण्यासाठी मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास हाच खरा शॉर्टकट असल्याचेही ते म्हणाले. डॉ.कुलकर्णी यांनी शेवटी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
==================

आजरा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेला 1 कोटी 7 लाख 75 हजार नफा; सभासदांना 10 टक्के लाभांश

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेला अहवाल सालात 1 कोटी 7 लाख 75 हजारचा निवळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन दयानंद सिद्धाप्पा भुसारी यांनी दिली. तसेच सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला. संस्थेच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

जनरल मॅनेजर अर्जुन रामा कुंभार यांनी सभा नोटीस वाचन ताळेबंद व आर्थिक पत्रकांचे वाचन केले. संचालक सुधीर मधुकर चोडणकर यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. चेअरमन श्री दयानंद सिद्धाप्पा भुसारी म्हणाले, संस्थेकडे वसूल भाग भांडवल 4 कोटी 60 लाख असून, 170 कोटी 39 लाखापेक्षा अधिक ठेवी आहेत, 155 कोटी 44 लाख कर्ज वाटप केले आहे, 325 कोटी 84 लाखांचा व्यवसाय केला असून, बँक गुंतवणूक 40 कोटी 74 लाख आहे. संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. सभासद, ठेविदार, खातेदार व हितचिंतक यांचा वाढता विश्वास ही संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद असून सभासदांचा विश्वास व संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी वर्गाच्या कष्टाच्या जोरावर संस्थेची स्वतःची वेगळी ओळख बनवत स्वामी विवेकानंद पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार तसेच अहवाल सालात ७० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ सभासदांचे अभिष्टचिंतन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या व्यवहार वाढी व प्रगतीसाठी भैरू शेलार, हेमंत कदम, विजय बांदेकर, इनास फर्नाडिस या सभासदांनी सूचना मांडल्या. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चेअरमन दयानंद सिद्धाप्पा भुसारी, व्हा. चेअरमन सुधीर बाबुराव कुंभार, संस्थेचे जनरल मॅनेजर अर्जुन रामा कुंभार यांनी दिली. सभा खेळीमेळीत व चांगल्या वातावरणात संपन्न झाली. संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केले. विजय बांदेकर यांनी संस्थेच्या चांगल्या पध्दतीच्या कामकाजाबद्दल संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव मांडला. सभेला ज्येष्ठ संचालक नारायण नाना सावंत, रविंद्र दामोदर दामले, रणजीत ईश्वर पाटील, शिवाजी जीवबा येसणे, गणपत धोंडीबा जाधव, विश्वजीत धोंडीबा मुंज, राजेंद्र परेशराम चंदनवाले, मुकुंद लक्ष्मण कांबळे, संचालिका सुनिता सुरेश कुंभार, सारिका नाथ देसाई, शाखा सल्लागार आनंदा तुकाराम मस्कर, शंकर हाळवणकर, निवृत्ती डोंगरे, तुकाराम पाटील, चंद्रकांत डोंगरे, धनाजी कुंभार, आनंदा चौगुले, श्रीपती यादव, सुकाणू समिती सदस्य मलिककुमार गणपतराव बुरुड, अरुण नारायण देसाई, उत्तम शंकर कुंभार, माजी संचालक सुरेश कुंभार, सुभाष नलवडे, संजय घंटे यांच्यासह कर्मचारी व सभासद उपस्थित होते. व्हा. चेअरमन सुधीर बाबुराव कुंभार यांनी आभार मानले.
==================

आरोग्य अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटींतून आहार, स्वच्छता आणि सेवांमध्ये सुधारणा घडवावी : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य सेवांना गती द्या; मंत्र्यांचा गुणवत्तेवर भर, कारवाईचा इशारा, कोल्हापूर मंडळस्तरीय बैठकीत निर्देश

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागातील प्रत्येक अधिकाऱ्याने क्षेत्रीय भेटी देऊन गुणवत्तापूर्ण आहार, स्वच्छता आणि सेवांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. कोल्हापुरातील जय पॅलेस हॉल, गारगोटी रोड, कळंबा येथे आयोजित विभागीय कार्यशाळा आणि आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीत कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील सुमारे पाचशे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर राज्यभरातील १० हजारांहून अधिक वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी थेट प्रक्षेपणाद्वारे सहभागी झाले. मंत्री आबिटकर यांनी शासकीय आरोग्य सुविधांचा पुरेपूर वापर व्हावा आणि सर्वसामान्यांना वेळेत दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी कठोर नियंत्रणाची गरज व्यक्त केली. गुणवत्तापूर्ण औषधे, आहार, स्वच्छता आणि सेवा यावर कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. चुकीचे काम आढळल्यास तातडीने दुरुस्ती करा, अन्यथा संबंधितांवर कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

रुग्णवाहिका सेवांबाबत येणाऱ्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करण्याचे निर्देश देताना त्यांनी १०२ रुग्णवाहिकांना १०८ प्रमाणेच जबाबदाऱ्या देण्याचे संकेत दिले. या बैठकीत प्रथमच राज्यातील मंडळ स्तरावरील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांची एकत्रित चर्चा झाली. यापुढे प्रत्येक मंडळात अशा आढावा बैठका घेतल्या जातील, असे मंत्र्यांनी जाहीर केले. शासकीय रुग्णालयांमधील प्रसूतींची संख्या वाढावी आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा अधिकाधिक लाभ नागरिकांना मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार शक्य नसल्यासच खासगी रुग्णालयांचा पर्याय निवडावा, पण याचा अर्थ असा नाही की सर्व रुग्ण खासगी रुग्णालयांकडे वळावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेअंतर्गत समाविष्ट आजारांची संख्या वाढवण्यात आली असून, शासकीय रुग्णालयांनी चांगल्या सेवा देऊन रुग्णांचा विश्वास संपादन करावा, असेही ते म्हणाले. उपसंचालक आरोग्य डॉ. दिलीप माने यांनी क्षेत्रीय भेटींदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आढळलेल्या त्रुटींचे छायाचित्रांसह सादरीकरण केले. तसेच विभागात चांगले काम केलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मानही यावेळी मंत्र्यांनी केला. बैठकीला डॉ. नितीन अंबार्डेकर, श्रीधर पंडीत, डॉ. प्रशांत हिंगणकर, डॉ. उज्वला कळंबे, डॉ. योगेश होटकर, डॉ. दयानंद जगताप, डॉ. सुहास खेडकर, डॉ. शरद दराडे, स्वाती पाटील, डॉ. निपुण विनायक, डॉ. क्रांती कटक, पंकज नंदनवार आणि गौरव जोशी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेने आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा आणि जबाबदारी निश्चितीकरणाला चालना देण्याचा निर्धार व्यक्त केला, ज्यामुळे सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
=================

Friday, September 26, 2025

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी विजया दशमी निमित्त आजरा शहरातून पथसंचलन

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
विजयादशमी हा धर्म, शौर्य, सगुण व न्याय यांच्या विजयाचे प्रतिक असलेला सनातन वैदिक हिंदु धर्मातील एक पवित्र व प्रेरणादायी पर्वकाळ आहे. याच परमपवित्र दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रआराधनेच्या कार्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि आता या कार्याला १०० वर्षे पुर्ण होत आहेत. हा सर्वांसाठीच खरोखरच अभिमानाचा व गौरवाचा क्षण आहे. या शताब्दी वर्षात प्रवेश करतानाचा हा क्षण संपूर्ण हिंदु समाजाच्या उत्थानाचे, जागृतीचे, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्राच्या बळकटीकरणाचे तसेच विश्वबंधुत्वाच्या संदेशाचे माध्यम ठरत आहे. या वर्षी साजरा होणाऱ्या विजयादशमी उत्सवा निमित्त आजरा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहघोष पथसंचलन व विजयादशमी उत्सव आजरा शहरात रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ४.०० वा. भाजीमंडई आजरा येथून सुरुवात होत असून पथसंचलनानंतर सायं. ५.३० वा. महाजन गल्ली येथील चैतन्य सभागृहात विजयादशमी उत्सव व शस्त्र पुजन या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. याकरिता प्रमुख वक्ते म्हणून रा. स्व. संघाचे कोल्हापूर विभाग कार्यकारणी सदस्य केदारजी जोशी हे असणार आहेत. याकरिता आजरा शहरातील तसेच पंचक्रोशीतील सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका कार्यवाह विश्वनाथ हसबे यांनी केले आहे.
==================

...अन्यथा आजरा साखर कारखाना चौकशीची साखर सहसंचालकांच्याकडे मागणी करणार, शिवसेना शिंदे गटाची पत्रकार परिषदेत माहिती

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
वसंतराव देसाई आजरा शेतकरी साखर कारखान्याने सन 2024-25 सालचा प्रसिद्ध केलेला वार्षिक अहवालातील आर्थिक ताळेबंद पूर्णतः बोगस आहे. यातून कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांची फसवणूक झाली आहे. आजरा साखर कारखान्याने सन 2024-25 च्या ताळेबंदाबाबत शुद्धिपत्रक काढावे, अन्यथा आजरा साखर कारखान्याची चौकशी करण्याची मागणी साखर सहसंचालकांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे आजरा तालुका प्रमुख संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माहिती देताना संजय पाटील व इंद्रजीत देसाई म्हणाले, आजरा साखर कारखान्याच्या संचालक मंडळांने मांडलेला वार्षिक ताळेबंद अहवाल खोटा असून लेखापरीक्षकांना हाताशी धरून सभासदांची फसवणूक केली आहे. ताळेबंदामध्ये सण 2017-18 व 18-19 मधील 12 कोटीच्या वर असलेली शेतकऱ्यांची देणे न दाखवता ती परस्पर भाग भांडवल व रिझर्व फंडाला वर्ग करण्यात आली आहेत. प्रीवोल्युशन मध्ये 152 कोटीची वाढ व कायम मालमत्तेमध्ये 86 कोटीची वाढ झालेली आहे यामध्ये वाढविण्यासारखे काय आहे? मालमत्तेच्या नावाखाली पाडण्यात आले आहेत. आर्थिक वर्षात कारखान्याने दाखवलेला 1 कोटी 42 लाख नफा हा खोटा असून सदर आर्थिक वर्षात चार कोटी पर्यंत तोटा दिसून येतो. तत्कालीन संचालक मंडळाच्या कालावधीत कारखान्यातील झालेली चोरी बाबत प्रशासन व संचालक यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. उलट सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्यात आले आहे. एनसीडीसीकडून कर्ज मिळवण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर व मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य झाले आहे. मात्र मंत्री आबिटकर व पाटील यांचे फोटो अहवालावरती छापलेले नाहीत. अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत. आजरा साखर कारखान्यात एकंदरीत अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे वस्तुस्थिती मांडणारे शुद्धिपत्रक प्रसिद्ध करावे, अन्यथा साखर कारखान्याच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच आमच्या विचारांची पायमल्ली होत असल्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घातला असल्याचेही पाटील व देसाई यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, शहर प्रमुख विजय थोरवत, कार्यालय प्रमुख संतोष भाटले, साळगाव सरपंच धनंजय पाटील उपस्थित होते.
==================




Thursday, September 25, 2025

"स्वच्छता ही सेवा" उपक्रमा अंतर्गत सोहाळे येथे महाश्रमदान उत्साहात

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
स्वच्छता ही सेवा उपक्रम अंतर्गत ग्रामपंचायत सोहाळे (ता. आजरा) येथे महाश्रमदानचे आयोजन करणेत आले. “स्वच्छता ही सेवा 2025” अंतर्गत सोहाळे ग्रामपंचायतीचा “एक दिवस – एक तास – एक साथ” उपक्रम उत्साहात पार पडला. आजऱ्याचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांची प्रमुख उपस्थिती  होती.

गाव स्वच्छ, निरोगी व पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीतर्फे “स्वच्छता ही सेवा 2025” या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत “एक दिवस – एक तास – एक साथ” ही विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत ग्रामपंचायत सदस्य, शाळकरी विद्यार्थी, महिला बचतगट, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या मोहिमेअंतर्गत सकाळपासून गावातील प्रमुख रस्ते, शाळा व अंगणवाडी परिसर, देवस्थान, स्मशान शेड, बसथांबा आदी ठिकाणी एकत्रितपणे स्वच्छता करण्यात आली. गावातील प्रत्येक नागरिकाने घरासमोरील व सार्वजनिक ठिकाणचा कचरा गोळा करून स्वच्छतेस हातभार लावला. विद्यार्थ्यांनी “स्वच्छ गाव – सुंदर गाव”, “स्वच्छता हीच सेवा” अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकले.

या वेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी सांगितले की, “गावाच्या प्रगतीसाठी स्वच्छता ही पहिली पायरी आहे. एक दिवस, एक तास गावासाठी दिला तर आपले गाव केवळ स्वच्छच नव्हे तर आरोग्यदायी व आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल. सर्वांनी मिळूनच हा उपक्रम यशस्वी होऊ शकतो.” सरपंच सौ.भारती डेळेकर यांनी  प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने या पुढेही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम न राहता दैनंदिन सवय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी  व्यक्त केले.

या उपक्रमामुळे गावातील सामाजिक एकोपा बळकट झाला असून, नागरिकांनी “आपले गाव – आपली जबाबदारी” या भावनेने स्वच्छतेचे व्रत हाती घेण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी बांधकाम विभागाचे उपअभियंता नाईक, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव साहेब, विस्तार अधिकारी कुंभार, विलास पाटील साहेब, पंचायत समिती कडील सर्व अधिकारी, कर्मचारी,  ग्रामपंचायत अधिकारी, रणदिवे, बी.आर. सी सर्जेराव घाटगे,  कुंडलिक शिर्सेकर त्याचबरोबर आजरा महाविद्यालय व व्यंकटराव  ज्यु. कॉलेज कडील NSS व NCC विदयार्थी, विद्यामंदिर सोहाळे शाळेचे शिक्षक व विद्यार्थी, उपसरपंच वसंत कोंडुसकर व ग्रामपंचायत सर्व सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, पोलीसपाटील, गावातील सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, युवा मंडळे, महिला बचत गट आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
=============

सभासदांनी 15 हजारची शेअर्स रक्कम पूर्ण करावी; आजरा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत अध्यक्ष मुकुंद देसाई यांचे आवाहन

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांची शेअर्स रक्कम पंधरा हजार रुपये केलेली आहे. त्यास वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळून कार्यवाही सुरू आहे. भविष्यात सभासदांना कोणतेही लाभ देताना अपुऱ्या शेअर्स रक्कमेमुळे अडचणी निर्माण होत आहेत. अपुरी शेअर्स रक्कम पूर्ण केल्या सभासद साखर व इतर लाभ देणे सोयीचे होईल. तसेच कारखान्याच्या भाग भांडवलामध्ये वाढ होऊन कारखान्याच्या आर्थिक स्थितीत हातभार लागला जाईल. त्यामुळे आजरा साखर कारखान्याची अपुरी शेअर्स रक्कम असणाऱ्या सभासदांनी उर्वरित रक्कम भरून पंधरा हजार रुपयेचा शेअर्स पूर्ण करावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी केले. ते गवसे (ता. आजरा) येथे वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 35 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी स्वागत केले. संचालक शिवाजी नांदवडेकर यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. साखर कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या 21 शेतकऱ्यांचा संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष मुकुंद देसाई पुढे म्हणाले, आजरा साखर कारखाना स्थापनेपासूनच अनेक अडचणीवर मात करत वाटचाल करीत आहे. सध्याच्या कारखान्याच्या मशनरी खूप जुनी आहेत, त्यामुळे त्या पूर्ण क्षमतेने चालवताना तक्रार येतात. तसेच अन्य कारखान्यांची गाळप क्षमता आणि उसाची उपलब्धता यामुळे कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करणे ही काळाची गरज झाली आहे. सध्या तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे एकरी सरासरी ऊस उत्पादन घटत चालले आहे. तसेच साखर उताऱ्यात देखील घट होत आहे. आजरा साखर कारखाना उभारणीपासून आजतागायत केवळ साखर उत्पादनावर अवलंबून आहे. वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करता केवळ साखर उत्पादन करून कारखान्याची आर्थिक घडी बसणार नाही, त्याकरिता इथेलॉन, डिस्टिलरी सारखे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. मात्र कारखाना कार्यक्षेत्र असलेली गवसे व दर्डेवाडी ही गावे शासनाच्या इकोसिन्सिटीव्ह झोनमध्ये येत असल्याने उपपदार्थ निर्मितीस परवानगी मिळणे अडचणी येत आहेत. कारखान्याचे संचालक मंडळ कारखान्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी आवश्यक ते वेगळे पर्याय काढून त्यावर एकमुखी निर्णय घेत आहे. सभासदांनी ज्या विश्वासाने कारखान्याची धुरा संचालक मंडळाच्या हाती दिली आहे त्या विश्वासाने कारखान्याचा कारभार सुरू आहे.

कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांनी नोटीस वाचन केले. यावेळी गोकुळ संचालिका अंजना रेडेकर यांनी 2 हजार 700 लोकांनी पाच हजार रुपये भरलेले आहेत. त्यांचा पूर्ण शेअर्स करून घेतला जात नाही. त्यामुळे त्यांना सभासदत्व नाही आणि कारखान्याचा कोणताही लाभ नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांचे पाच हजार रुपये परत करा अशी मागणी केली. माजी अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी मशिनरीवर अनावश्यक खर्च झाले आहेत त्यातून कारखान्याला कोणताही फायदा झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तानाजी देसाई म्हणाले, शेतकऱ्यांची देणे ताळेबंदात दिसत नाहीत त्यामुळे ताळेबंद चुकीचा आहे. कारखान्याने काटा व इतर उपकरणासाठी एआय तंत्रज्ञान वापरावे अशी मागणी देखील केली. कॉ. संपत देसाई म्हणाले, गेल्या 13 वर्षात कारखाना कर्जातून का बाहेर पडला नाही याचे संचालकाने आत्मचिंतन करावे. सुनील शिंदे यांनी सरसकट सर्व सभासदांना 50 किलो साखर देण्याची मागणी केली. कॉ. शांताराम पाटील यांनी वाढीव शेअर्स रक्कम शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात करण्यात येऊ नये अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत युवराज पोवार, गुरु गोवेकर, उदय कोडक, गणपती सांगले, पांडुरंग सावरकर, तुळसाप्पा पोवार यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, संचालक विष्णू केसरकर, उदय पवार, दीपक देसाई, रणजीत देसाई, संभाजी पाटील, वसंत धुरे, काशिनाथ तेली, अशोक तर्डेकर, हरी कांबळे, रचना होलम, मनीषा देसाई, नामदेव नार्वेकर, रशीद पठाण, दिगंबर देसाई यांच्यासह महादेव पाटील धामणेकर, शिरीष देसाई, मारुती देसाई, डी. ए. पाटील, राजू होलम यांच्यासह सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संचालक मारुती घोरपडे यांनी आभार मानले.
===============

Wednesday, September 24, 2025

कोल्हापूर प्राईड रील्स, युट्यूब शॉर्ट्स व व्हिडीओ स्पर्धेसाठी 6 ऑक्टोबर पर्यंत सहभाग नोंदविन्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवला यावर्षी राज्य महोत्सवचा दर्जा मिळाला आहे. या निमित्ताने भारत सरकार, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाही दसरा महोत्सव 2025 अंतर्गत कोल्हापूर प्राईड रील्स, युट्यूब शॉर्ट्स स्पर्धा व कोल्हापूर प्राईड युट्यूब व्हिडीओ स्पर्धांचे आयेाजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रवेश निशुल्क असून दिनांक 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत सहभागी होता येणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडकिल्ले, दुर्गवैभव, प्राचीन  मंदिरे व वास्तू , वारसा स्थळे, निसर्ग संपदा, पर्यटन स्थळे, धबधबे, जैव विविधता, पारंपरिक कला कौशल्य, हस्तकला, खाद्य संस्कृती, पारंपरिक यात्रा, जत्रा  यावर आधारित रिल्स व यु ट्यूब व्हीडिओ सादर करायचे आहेत.

यु ट्यूब व्हिडीओ नियम व अटी पुढीलप्रमाणे :
पात्रता- ही स्पर्धा 15 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींकरिता खुली आहे. सहभागी व्यक्तीकडे सक्रिय YouTube चॅनेल असणे आवश्यक आहे.
विषय व विषयवस्तू : व्हिडीओ दिलेल्या विषयाशी सुसंगत असावा.
विषय : कोल्हापूर जिल्ह्यातील गडकिल्ले, दुर्गवैभव, प्राचीन मंदिरे व वास्तू, पारंपारिक यात्रा/जत्रा, वारसा स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे, अद्भुत पर्यटन स्थळे, धबधब्यांची समृद्धी, खाद्यसंस्कृती, हस्तकला व पारंपारिक कलाकौशल्य.
व्हिडीओ हा मूळ संकल्पनेला अनुसरुन, सर्जनशील आणि प्रेक्षकांना गुंतवणारा असावा. सहभागी स्पर्धकाने व्हिडीओ स्वतःच्या चॅनेल वर प्रक्षेपित करणे अनिवार्य आहे.
सादरीकरण मार्गदर्शक तत्त्वे :
व्हिडीओची लांबी (YouTube) : किमान २ मिनिटे.
फॉरमॅट : Landscape (16:9) किंवा Portrait (9:16) स्वीकार्य आहे.
व्हिडीओ YouTube वर सार्वजनिक (public) स्वरुपात अपलोड करावा.
व्हिडीओच्या शीर्षकात #Shahi Dasara Mahotsav2025 असणे आवश्यक आहे.
डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडीओचा संक्षिप्त आढावा व  स्पर्धेच्या शीर्षकाचा उल्लेख या गोष्टी असाव्यात. 
YouTube Shorts या स्पर्धेसाठी स्वीकारले जाणार नाहीत.
सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक व्हिडीओ पाठवू शकतो.
स्पर्धकांनी सादर केलेल्या व्हिडीओचे शीर्षक yt.firstname.lastname या स्वरूपात असणे अत्यावश्यक आहे.
अंतिम सादरीकरणाची मुदत दि. 6 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आहे.
    
दोन्ही स्पर्धांसाठी पारितोषिके :
प्रथम क्रमांक -रोख रु. 7 हजार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक  - रोख रु. 5 हजार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक - रोख रु. 3 हजार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र याशिवाय प्रत्येकी तीन उत्तेजनार्थ रोख रु. 1 हजार व प्रमाणपत्र  याप्रमाणे आहे. एक स्पर्धक दोन्ही स्पर्धात भाग घेऊ शकतो व दोन्हीकडे कितीही एन्ट्री देऊ शकतो. रिल्स व व्हीडिओ आधी केलेलेही चालतील व आताही करता येणार आहे. स्पर्धेत सहभागाचे सर्व नियम व इतर माहिती @dasara_mahotsav_kolhapur यावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी करण मिरजकर  7709599494, विरेंद्रसिंह शिंदे  9923101994 व निखिल उंडाळे  9595790550 यांच्याशी संपर्क साधावा.
===============

भादवण विकास सेवा संस्थेला 4 लाख 12हजाराचा नफा, सभासदांना 5 टक्के लाभांश देणार : चेअरमन संभाजी कांबळे


आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
भादवण (ता. आजरा) येथील भादवण विकास सेवा संस्थेला 2024/25 आर्थिक वर्षात 4 लाख 12 हजाराचा नफा झाला असून सभासदांना 5 टक्के लाभांश देणार असल्याचे वार्षिक सभेत चेअरमण संभाजी कांबळे यांनी जाहीर  केले. केदारनाथ मंदिर येथे सभा संपन्न झाली.

स्वागत व प्रास्ताविक संचालक व माजी चेअरमण पी. के. केसरकर यांनी केले. प्रास्ताविकामध्ये गेल्या 3 वर्षा पूर्वी संस्थेमध्ये 762 सभासद होते. त्या नंतर 200 शेतकऱ्याना सभासदत्व दिले असल्याचे सांगितले. श्रद्धांजलीचा ठराव  संचालक माजी चेअरमण मारुती देसाई यांनी मांडला. आजरा भुदरगडचे लोकप्रिय आमदार प्रकाश आबीटकर यांची महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट व पालक मंत्री कोल्हापूर पदी निवड झाली त्याच बरोबर कागल विधानसभचे आमदार हसन मुश्रीफ यांची वैद्यकिय शिक्षण खात्याच्या मंत्री पदी निवड झाले बद्दल अभिनंदन करणेत आले. संस्था सचिव सुभाष पाटील यांनी अहवाल वाचन केले. यावेळी सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. यावेळी उपस्थित सभासदांनी दिलेल्या प्रश्नांना सचिव सुभाष पाटील यांनी उत्तरे दिली. या हंगामात पीक कर्ज व म. मुदत कर्ज वाटप 2 कोटी 20  लाख इतके वाटप झाले मागील 3 वर्षाच्या तुलनेत 1 कोटी 40 लाख कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले असून स्वभांडवलातून 40 लाख इतके वाटप झाले आहे.  संस्थेला चालू वर्षी ऑडीट वर्ग अ  मिळाला आहे. आपत्तीग्रस्त सभासदांना आर्थिक मदत केली आहे. सभासद कर्जाची 99 टक्के वसुली झाली आहे. यावेळी आजरा साखर कारखाना संचालक राजेश जोशीलकर, अनंत पाटील, विष्णू मुळीक, पी. जी. मुळीक यांनी चर्चेत भाग घेतला. सभेला व्हा. चेअरमन दत्तात्रय पाटील, संचालक दशरथ डोंगरे, रत्नापा कुंभार, गजानन गाडे, रुक्मिणी पाटील, रत्नाबाई केसरकर, एम. टी. मुळीक, दत्तात्रय पाटील यांच्यासह बाळू गाडे, बाळासाहेब कदम,  तुकाराम पाटील, दिनकर गोडसे सुधीर जाधव, गणपती कोलते, शंकर कांबळे, नारायण नेसरीकर, बाबुराव पाटील, शामराव देसाई, तुकाराम केसरकर, आनंदा पाटील, गणपती देवरकर, संभाजी पाटील, निवृती पाटील, श्रीपती देवरकर, अर्जुन दोरूगडे, धोंडीबा जांभळे  यांच्यासह सभासद उपस्थित होते. आभार संचालक अशोक गुरव यांनी मानले.
===================

Tuesday, September 23, 2025

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

मुंबई, न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात आता प्रशासन निवडणुकीच्या दृष्टीने प्राथमिक तयारीला लागलेले आहे. त्यासाठीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे.

निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या हरकीत व सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येतात.
===============

पारंपरिक वेशभूषा दिन उत्साहात साजरा; कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातून सांस्कृतिक संदेश आणि पर्यटनाला चालना

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
यंदा कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा राज्यातील प्रमुख महोत्सव म्हणून साजरा होत आहे. या निमित्ताने जिल्हा आणि शासन स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून कोल्हापूरची समृद्ध संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवले जात आहे. मंगळवारी, महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, पारंपरिक वेशभूषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून कोल्हापुरी संस्कृतीचा संदेश प्रभावीपणे दिला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जलसिंचन विभाग, कृषी, सहकार, क्रीडा, विभागीय आणि तालुका कार्यालयांमधील सर्वांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

पारंपरिक वेशभूषा ही संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ती समाजाचा इतिहास, मूल्ये, परंपरा आणि वैशिष्ट्ये यांचे प्रतिबिंब आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात प्रत्येक प्रांताची वेशभूषा त्या त्या संस्कृतीचे जिवंत चित्र रेखाटते. कोल्हापूरच्या पारंपरिक वेशभूषेतून साधेपणा, शालीनता आणि सांस्कृतिक अभिमान दिसून येतो. ही वेशभूषा सामाजिक एकता, उत्सव, धार्मिक श्रद्धा आणि स्थानिक कलांचे मिश्रण आहे. पारंपरिक वेशभूषा परिधान करणे म्हणजे आपल्या मुळांचा सन्मान करणे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला सांस्कृतिक वारसा पुढे नेणे. ही वेशभूषा शब्दांविना संस्कृतीची कहाणी सांगणारी मौन संदेशवाहक आहे.

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. येथील धार्मिक स्थळे, मंदिरे, तलाव आणि हस्तकला यामुळे कोल्हापूर जगभरात ओळखले जाते. यापैकी कोल्हापुरी चप्पल ही पारंपरिक हस्तकला अनेक शतकापासून प्रसिद्ध आहे. अलीकडेच मिळालेल्या जीआय टॅगमुळे या चप्पलचे संरक्षण आणि प्रचार वाढला आहे. ही चप्पल केवळ आरामदायक आणि टिकाऊ नसून, स्थानिक शिल्पकारांच्या कलेचे प्रतीक आहे. पर्यटक कोल्हापूरला भेट देताना ही चप्पल खरेदी करून स्मृती म्हणून घेऊन जातात, ज्यामुळे ती पर्यटनवाढीसाठी महत्त्वाचे माध्यम ठरली आहे. लिडकॉम मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापुरी चप्पल स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. यातून चप्पल बाबत माहिती देण्यात आली.

शाही दसरा महोत्सवात कोल्हापुरी चप्पलला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पारंपरिक वेशभूषा दिनानिमित्त चप्पल घालण्यास प्राधान्य देण्यात आले. तसेच, दसरा चौक येथील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये विविध माध्यमांद्वारे चप्पलचा प्रचार केला जात आहे. पर्यटनवाढीसाठी जनजागृती मोहीम राबवली जात असून, यामुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. स्थानिक शिल्पकार, प्रशासन आणि खासगी संस्था यांच्या सहकार्याने कोल्हापुरी चप्पलचा सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित केले जात आहे.
=================

अरुण डोंगळे यांचा राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
गोकुळ दूध संघांचे माजी अध्यक्ष व विद्यमान जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात डोंगळे यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादीचे सचिव आमदार शिवाजी गर्जे, आमदार ईद्रास नायकवाडी, आमदार संजय खोडके, आनंद परांजपे, माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते मंडळी उपस्थित होते. या प्रवेशाने राधानगरी व करवीर तालुक्यात राष्ट्रवादी आणखी मजबूत होण्यास बळ मिळणार आहे. यावेळी गोकुळ संचालक रणजितसिंह पाटील, किसन चौगुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, भोगावती साखर कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजाराम भाटले, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिंगबर मेडसिंगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे, सम्राट डोंगळे, संदीप डोंगळे, युवा शक्ति अध्यक्ष सुहास डोंगळे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अरुण डोंगळे यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
================

कोल्हापूरचा दसरा महोत्सव सर्वसमावेशक जनोत्सव बनवूया : खासदार शाहू महाराज छत्रपती; राज्याच्या प्रमुख महोत्सवातील शाही दसरा महोत्सवाचा थाटात शुभारंभ

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूरमधील दसरा महोत्सवाचा राज्य शासनाने नुकताच राज्याच्या प्रमुख महोत्सवात समावेश केला आहे. आपल्यासाठी ही अभिमानाची बाब असून दसरा महोत्सव अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक जनोत्सव बनवण्याच्या दृष्टीने विचार करूया असे प्रतिपादन खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले. त्यांच्या हस्ते दसरा चौक येथे शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरजकुमार, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, तहसीलदार स्वप्नील रावडे, तेजस्विनी पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाहू महाराज म्हणाले, याच पद्धतीने राज्यात सर्वत्र दसरा महोत्सव साजरा व्हावा. आताच्या काळात दसरा महोत्सवाचे रूप बदललेले असले तरी स्वरूप तेच आहे. कोल्हापूरमध्ये पर्यटक वाढीसाठी विमान, रेल्वे, तसेच इतर दळणवळणाच्या माध्यमातून वाढ होत आहे. अशा स्थितीत हा आपला दसरा महोत्सव अधिक जनताभिमुख करूया. खासदार धनंजय महाडिक यांनी देशातील महत्त्वाच्या दोन दसरा महोत्सवांचा उल्लेख करून म्हैसूर नंतर कोल्हापूर येथील दसरा महोत्सवाचे महत्व तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल आभार मानले. यामुळे आता शाही दसरा महोत्सवात अधिकाधिक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचाही समावेश करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. यावेळी त्यांनी शाही दसरा महोत्सवादरम्यान आयोजित विविध कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. ते म्हणाले, या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनातून आपण सर्व मिळून एक नवा इतिहास निर्माण करूया. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. राज्यगीत गायल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रशासनाकडून करण्यात आले. या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल मालक संघटनेचा महोत्सवात विशेष योगदान दिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत आयरेकर यांनी केले.

नाट्यमय प्रसंग-नृत्यातून ‘गाथा शिवशभुंची’ कार्यक्रम संपन्न
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गाथा शिवशभुंची हा कार्यक्रम शुभारंभ प्रसंगी संपन्न झाला. काही चित्रपट, मालिका त्यातील प्रचलित गाणी, नाट्यमय प्रसंग, त्यातील नृत्ये असा मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थितांनी दाद दिली. या कार्यक्रमामध्ये स्थानिक 100 कलाकारांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका विनायक चौगुले या कलाकारांने उत्तम प्रकारे साकारली. गोंधळ, दिंडी, मर्दानी खेळ सोबतच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग देखील पाहायला मिळाले. वासुदेव आला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, अंबाबाई गोंधळाला ये, आई तुळजाभवानी गोंधळाला ये अशा अनेक गीतातून तसेच लढाईंच्या प्रसंगातून उपस्थित भारावले. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन कोल्हापूर येथील स्वप्नील यादव यांनी केले आहे.
=================

Monday, September 22, 2025

जनता सहकारी गृहतारण संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; 11 टक्के लाभांश जाहीर

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजऱ्यातील जनता सहकारी गृहतारण संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात ५५ लाख ५८ हजार ५९४ इतका निव्वळ नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लांभाश देण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष मारूती मोरे यांनी संस्थेच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधरण सभेत जाहिर केले. संस्था रौप्यमहोत्सवात पदार्पण करत असून संस्थेने कमी कालावधी मध्ये १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला. यंदा संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने संस्थेकडून सर्व सभासदांना प्रत्येकी रूपये पाचशेचे बोनस शेअर्स देणेचा निर्णय घेतला आहे तसेच सभासदांना प्रवासात उपयुक्त अशी ट्रॅव्हलर बॅग भेटवस्तू व कर्मचाऱ्यांना एक जादा वेतनवाढ दिली जाणार आहे. शिवाय रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीन वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, कार्यक्रम राबविले जाणार आहेत व नवीन शाखा विस्तार करणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

संस्थेने सर्व संस्था प्रवर्तकांचे, तसेच ७५ वर्ष पूर्ण झालेले सभासद, तसेच बढती मिळालेल्या व जि. प. सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार प्राप्त व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. तसेच ४ थी, ५ वी शिष्यवृत्ती, १० वी व १२ वी, पदवीधर, वेगवेगळया क्षेत्रातील नाविण्यपूर्ण प्राविण्य मिळविलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संस्था अध्यक्ष मारुती मोरे यांनी करुन संस्थेच्या आजपर्यंतच्य सांपत्तिक स्थितीचा आढावा सभासदासमोर सादर केला. श्रध्दांजली ठरावाचे वाचन संचालिका प्रो. (डॉ.) संजीवनी पाटील यांनी केले. संस्थेच्या प्रवर्तकांचे सत्कार चेअरमन मारूती मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. विषय पत्रिका, मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक, शासकीय लेखापरीक्षण व संचालक मंडळ कर्ज यादीचे वाचन संस्थेचे मॅनेजर मधुकर खवरे यांनी केले. सभेमधील चर्चेमध्ये बंडोपंत चव्हाण, इनास फर्नाडीस, महादेव मोरूस्कर, विष्णू जाधव, सावंत, विजय बांदेकर व कृष्णा येसणे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर संस्थेने १०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण केलेबददल संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करणेत आला. संस्थेकडे आजअखेर १०७ कोटी ९० लाख हजारांच्या ठेवी असून ६६ कोटी ३५ लाख इतके कर्ज वाटप केले आहे. संस्थेला आयएसओ मानांकन ९००१ : २०१५ प्राप्त झालेले आहे. आपली संस्था स्व-भांडवलावर सुरु असून कोणत्याही बँकेकडून कर्ज न घेता व्यवहार सुरु आहे हि अभिमानाची गोष्ट आहे. सभासदांनी या पुढील काळातही सहाकार्य करावे असे आवाहन उपाध्यक्ष प्रो. (डॉ.) अशोक बाचूळकर यांनी केले.

सभेचे सूत्रसंचालन प्रो. (डॉ.) अशोक बाचूळकर यांनी केले व आभार प्रा. आनंद चव्हाण यांनी मानले. यावेळी आजरा शाखेचे संचालक प्राचार्य, डॉ. अशोक सादळे, दिनकर पोटे, प्रा. आनंद चव्हाण, कृष्णा डेळेकर, श्री. युवराज शेटके, प्रा. (डॉ.) तानाजी कावळे, प्रा. सौ. नेहा पेडणेकर, प्रो. (डॉ.) सौ. संजीवनी पाटील, प्रा. सौ. क्रांती शिवणे उपस्थित होते. संस्थेचे मॅनेजर मधुकर खबरे व प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार व सर्व शाखांचे चेअरमन, व्हा. चेअरमन संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
====================

प्रशांत सुभाष गुरव यांना "राज्यस्तरीय माणिक शिक्षण सेवा गौरव पुरस्कार 2025" प्रदान

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
कै.श्री.माणिकराव पाटील एज्युकेशनल फाउंडेशन,कोल्हापूर आयोजित राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळा २०२५ शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भादवण हायस्कूल,भादवणचे (ता. आजरा) सहाय्यक शिक्षक प्रशांत सुभाष गुरव यांना वीस वर्षांच्या सेवेतील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रीडा अशा अष्टपैलू कार्याची नोंद घेऊन राज्यस्तरीय माणिक शिक्षण सेवा गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. 

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागाचे सहसचिव डी. एस. पोवार उपस्थित होते. यावेळी मान्यवर म्हणून माध्यमिक उपशिक्षणाधिकारी आर. जी. चौगले, शिक्षक नेते समन्वय समिती मोहन भोसले, गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार, गोकुळ दूध संघ व्यवस्थापक आर. जी. पाटील, जि. प. सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील, प्राथमिक शिक्षक बँक चेअरमन शिवाजी रोडे पाटील, पदवीधर शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष सुकुमार पाटील,  कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन,जुनी पेन्शन संघटना जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे, शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष सदानंद शिंदे, प्राथमिक शिक्षक बँक संचालक अमर वरुटे व पद्मजा मेढे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील साहित्य, कला,क्रीडा,कृषी,शिक्षण,आरोग्य, गिर्यारोहण,अवयवदान,सामाजिक संस्था अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४५ गुणवंत मान्यवरांना "आदर्श पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले.

मनोगतामध्ये डॉ.रणधीर शिंदे यांनी समाजाला प्रोत्साहनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले तर डी. एस. पवार यांनी समाजातील गुणवंत व्यक्तींना प्रोत्साहन देऊन प्रेरणा देणाऱ्या फाउंडेशनचे कौतुक केले. पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या वतीने प्रशांत गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. समाजातील विविध घटकातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर या पुरस्काराच्या रूपाने कौतुकाची थाप दिल्याने पुढील काळात यापेक्षाही चांगले कार्य करण्याची जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे मार्गदर्शक तुषार पाटील, अध्यक्षा सुनीता पाटील, उपाध्यक्ष डॉ. अजित सूर्यवंशी, सचिव धनश्री पाटील यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यामुळे समाजातील गुणवंत व्यक्तींना योग्य तो गौरव मिळून त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळेल,असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमासाठी भादवन हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र कुंभार, मदन देसाई, भारती कांबळे, पुंडलिक वडर, रामदास होरटे, व्ही. एस. कोळी, अस्मिता पाटील, शोभा कुंभार, विठ्ठल चौगुले,  एस. एस. नाईक, मेघा चव्हाण, संदीप पाटील, शितल गुरव, अनिकेत भोसले, सुरेश गुरव उपस्थित होते. आजरा महाल शिक्षण मंडळ, आजराचे अध्यक्ष जयवंतरावजी शिंपी, उपाध्यक्ष एस. पी. कांबळे, सचिव अभिषेकदादा शिंपी, खजिनदार सुनील पाटील, उद्योजक सचिनभैय्या शिंपी, सर्व संचालक, मुख्याध्यापक आर. जी. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक वृंदाचे सहकार्य मिळाले.
====================

Sunday, September 21, 2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा सोहाळे येथे उत्साहात प्रारंभ

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
राज्य शासनाच्या वतीने दि. 17 सप्टेंबर 2025 ते दि. 31 डिसेंबर 2025 या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरु करण्यार आले आहे. त्या अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत सोहाळे बाची (ता. आजरा) च्या वतीने मान्यवरांच्या उपास्थितीत या अभियानाचा मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्ह‌णून नूतन गट‌विकास अधिकारी सुभाष सावंत उपस्थित होते. "गावच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली असून लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. सोहाळे गावच्या लोकनियुक्त सरपंच भारती डेळेकर यांनी उपास्थितांना मार्गदर्शन करताना, "आपल्या गावाचा सर्वांगीण व शाश्वत विकास होण्यासाठी या अभियानात, गावातील सर्वांनी मोठ्या प्रमाणात सह‌भागी व्हावे असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी प्रशासनाच्या वतीने सहा. गट‌विकास अधिकारी दिनेश शेटे,  विस्तार अधिकारी कुंभार, ग्रामपंचायत सोहाळे ग्रामविकास अधिकारी अजित रणदिवे, ग्रा.पं. चे सर्व सदस्य व कर्मचारी,  मंडळ अधिकारी सुंदर जाधव, महसूल अधिकारी रेखा कांबळे, कृषी अधिकारी मनीषा पाटील, आरोग्य विभागाचे अधिकारी कांबळे, विद्या मंदिर सोहाळे व अंगणवाडीचे सर्व शिक्षक वृंद बचत गटाचे समन्वयक, आणि  पोलीस पाटील सोहाळे व बाची यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपास्थित होते.
===================

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...