Tuesday, September 23, 2025

पारंपरिक वेशभूषा दिन उत्साहात साजरा; कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातून सांस्कृतिक संदेश आणि पर्यटनाला चालना

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
यंदा कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा राज्यातील प्रमुख महोत्सव म्हणून साजरा होत आहे. या निमित्ताने जिल्हा आणि शासन स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून कोल्हापूरची समृद्ध संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवले जात आहे. मंगळवारी, महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, पारंपरिक वेशभूषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून कोल्हापुरी संस्कृतीचा संदेश प्रभावीपणे दिला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जलसिंचन विभाग, कृषी, सहकार, क्रीडा, विभागीय आणि तालुका कार्यालयांमधील सर्वांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

पारंपरिक वेशभूषा ही संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ती समाजाचा इतिहास, मूल्ये, परंपरा आणि वैशिष्ट्ये यांचे प्रतिबिंब आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात प्रत्येक प्रांताची वेशभूषा त्या त्या संस्कृतीचे जिवंत चित्र रेखाटते. कोल्हापूरच्या पारंपरिक वेशभूषेतून साधेपणा, शालीनता आणि सांस्कृतिक अभिमान दिसून येतो. ही वेशभूषा सामाजिक एकता, उत्सव, धार्मिक श्रद्धा आणि स्थानिक कलांचे मिश्रण आहे. पारंपरिक वेशभूषा परिधान करणे म्हणजे आपल्या मुळांचा सन्मान करणे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला सांस्कृतिक वारसा पुढे नेणे. ही वेशभूषा शब्दांविना संस्कृतीची कहाणी सांगणारी मौन संदेशवाहक आहे.

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. येथील धार्मिक स्थळे, मंदिरे, तलाव आणि हस्तकला यामुळे कोल्हापूर जगभरात ओळखले जाते. यापैकी कोल्हापुरी चप्पल ही पारंपरिक हस्तकला अनेक शतकापासून प्रसिद्ध आहे. अलीकडेच मिळालेल्या जीआय टॅगमुळे या चप्पलचे संरक्षण आणि प्रचार वाढला आहे. ही चप्पल केवळ आरामदायक आणि टिकाऊ नसून, स्थानिक शिल्पकारांच्या कलेचे प्रतीक आहे. पर्यटक कोल्हापूरला भेट देताना ही चप्पल खरेदी करून स्मृती म्हणून घेऊन जातात, ज्यामुळे ती पर्यटनवाढीसाठी महत्त्वाचे माध्यम ठरली आहे. लिडकॉम मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापुरी चप्पल स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. यातून चप्पल बाबत माहिती देण्यात आली.

शाही दसरा महोत्सवात कोल्हापुरी चप्पलला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पारंपरिक वेशभूषा दिनानिमित्त चप्पल घालण्यास प्राधान्य देण्यात आले. तसेच, दसरा चौक येथील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये विविध माध्यमांद्वारे चप्पलचा प्रचार केला जात आहे. पर्यटनवाढीसाठी जनजागृती मोहीम राबवली जात असून, यामुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. स्थानिक शिल्पकार, प्रशासन आणि खासगी संस्था यांच्या सहकार्याने कोल्हापुरी चप्पलचा सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित केले जात आहे.
=================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...