Tuesday, September 30, 2025

आजरा महाविद्यालयमध्ये महान क्रांतिकारक शहीद भगत सिंग यांना जयंतीदिनी आदरांजली

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
महान स्वातंत्र्यसेनानी, शहीद-ए-आझम भगत सिंग यांच्या जयंतीनिमित्त आजरा महाविद्यालय आजरा मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने त्यांच्या प्रेरणादायी जीवन आणि कार्यावर आधारित विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख प्रा. डॉ. नवनाथ शिंदे  यांनी भगत सिंग यांच्या अतुलनीय देशभक्ती आणि क्रांतिकारी विचारांना उजाळा दिला. त्यांनी आपल्या भाषणात भगत सिंग यांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांवर प्रकाश टाकला. १९१९ मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाने भगत सिंग यांच्या बालमनावर खूप खोलवर परिणाम केला आणि त्यांना ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. अवघ्या २३ वर्षाच्या आयुष्यामध्ये भगतसिंग यांनी खूप मोठे कार्य केले आहे. त्यांनी नौजवान भारत सभा या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. १९२८ साली लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पोलीस अधिकारी जे.पी. सांडर्स यांची हत्या केली तसेच दडपशाही कायद्यांना विरोध करण्यासाठी बटुकेश्वर दत्त यांच्यासह केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकले.  ते केवळ क्रांतिकारक नव्हते, तर एक प्रखर विचारवंत आणि लेखकही होते. 'मी नास्तिक का आहे?' हा त्यांचा लेख त्यांच्या वैचारिक खोलीचे दर्शन घडवतो. २३ मार्च १९३१ रोजी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांना राजगुरु आणि सुखदेव यांच्यासह फाशी देण्यात आली. त्यांचे बलिदान भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी एक मोठी प्रेरणा ठरले. भगत सिंग यांनी पाहिलेल्या समानता व सामाजिक न्यायावर आधारित भारताच्या निर्मितीसाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. नवनाथ शिंदे, प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील व एनएसएस प्रकल्प अधिकारी डॉ. अविनाश वर्धन यांनी भगत सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाचे आयोजन दि.२२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत आयोजित राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाच्या निमित्ताने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अविनाश वर्धन यांनी केले तर सूत्र संचालन व आभार प्रा. रत्नदीप पवार यांनी केले.  या कार्यक्रमाला प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, प्रा. अनिल निर्मळे, प्रा. विठ्ठल हाक्के, प्रा. अनुराधा मगदूम तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
==============

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...