Tuesday, September 23, 2025

कोल्हापूरचा दसरा महोत्सव सर्वसमावेशक जनोत्सव बनवूया : खासदार शाहू महाराज छत्रपती; राज्याच्या प्रमुख महोत्सवातील शाही दसरा महोत्सवाचा थाटात शुभारंभ

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूरमधील दसरा महोत्सवाचा राज्य शासनाने नुकताच राज्याच्या प्रमुख महोत्सवात समावेश केला आहे. आपल्यासाठी ही अभिमानाची बाब असून दसरा महोत्सव अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक जनोत्सव बनवण्याच्या दृष्टीने विचार करूया असे प्रतिपादन खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले. त्यांच्या हस्ते दसरा चौक येथे शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरजकुमार, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, तहसीलदार स्वप्नील रावडे, तेजस्विनी पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाहू महाराज म्हणाले, याच पद्धतीने राज्यात सर्वत्र दसरा महोत्सव साजरा व्हावा. आताच्या काळात दसरा महोत्सवाचे रूप बदललेले असले तरी स्वरूप तेच आहे. कोल्हापूरमध्ये पर्यटक वाढीसाठी विमान, रेल्वे, तसेच इतर दळणवळणाच्या माध्यमातून वाढ होत आहे. अशा स्थितीत हा आपला दसरा महोत्सव अधिक जनताभिमुख करूया. खासदार धनंजय महाडिक यांनी देशातील महत्त्वाच्या दोन दसरा महोत्सवांचा उल्लेख करून म्हैसूर नंतर कोल्हापूर येथील दसरा महोत्सवाचे महत्व तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल आभार मानले. यामुळे आता शाही दसरा महोत्सवात अधिकाधिक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचाही समावेश करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. यावेळी त्यांनी शाही दसरा महोत्सवादरम्यान आयोजित विविध कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. ते म्हणाले, या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनातून आपण सर्व मिळून एक नवा इतिहास निर्माण करूया. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. राज्यगीत गायल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रशासनाकडून करण्यात आले. या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल मालक संघटनेचा महोत्सवात विशेष योगदान दिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत आयरेकर यांनी केले.

नाट्यमय प्रसंग-नृत्यातून ‘गाथा शिवशभुंची’ कार्यक्रम संपन्न
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गाथा शिवशभुंची हा कार्यक्रम शुभारंभ प्रसंगी संपन्न झाला. काही चित्रपट, मालिका त्यातील प्रचलित गाणी, नाट्यमय प्रसंग, त्यातील नृत्ये असा मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थितांनी दाद दिली. या कार्यक्रमामध्ये स्थानिक 100 कलाकारांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका विनायक चौगुले या कलाकारांने उत्तम प्रकारे साकारली. गोंधळ, दिंडी, मर्दानी खेळ सोबतच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग देखील पाहायला मिळाले. वासुदेव आला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, अंबाबाई गोंधळाला ये, आई तुळजाभवानी गोंधळाला ये अशा अनेक गीतातून तसेच लढाईंच्या प्रसंगातून उपस्थित भारावले. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन कोल्हापूर येथील स्वप्नील यादव यांनी केले आहे.
=================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...