Tuesday, July 23, 2024

व्यंकटराव हायस्कूलमध्ये 'गुरुपौर्णिमा उत्सव' उत्साहात साजरा; वर्गशिक्षक प्रशांत गुरव यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी दिली अनोखी गुरुवंदना

व्यंकटराव हायस्कूलमध्ये 'गुरुपौर्णिमा उत्सव' उत्साहात साजरा; वर्गशिक्षक प्रशांत गुरव यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी दिली अनोखी गुरुवंदना 
आजरा, वृत्तसेवा :

 आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. गुरूप्रति आदर व्यक्त करण्याचा दिवस. आजरा शहरातील व्यंकटराव हायस्कूल या प्रशालेतील इयत्ता 'नववी अ' च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या सुंदर नियोजनातून तसेच वर्गशिक्षक प्रशांत गुरव यांच्या संकल्पनेतून "गुरुपौर्णिमा उत्सव" हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी स्व-कल्पनेतून 96 पुष्पगुच्छ तयार केले होते. परिसरात उपलब्ध होणाऱ्या पाना-फुलांपासून तसेच टाकाऊ वस्तु पासून पुष्पगुच्छ तयार केले होते. सदर पुष्पगुच्छ यांचे परीक्षण करून प्रथम पाच विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यानुभव विषयांतर्गत 92 ग्रीटिंग कार्ड्स [शुभेच्छा संदेश पत्रे] विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीतून तयार केली होती. सर्वांचे लक्षवेधक अशी ही ग्रीटिंग्स व पुष्पगुच्छ देऊन सर्व गुरुवर्यांप्रति विद्यार्थ्यांनी आदर भावना व्यक्त केली.

वर्गशिक्षक प्रशांत गुरव यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महर्षी व्यास यांच्या जीवनापासून सुरू असणारी ही गुरु- शिष्य परंपरा विविध उदाहरणे व दाखले देऊन उलगडून दाखविली. 'गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा'... या कुमारी शलाका गिरीच्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. कल्पक सुतार या विद्यार्थ्याने व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या प्रतिमेचे हुबेहूब स्केच केले होते. विद्यार्थी संकुलाचे गुरु या नात्याने मनोवेधक असे हे स्केच होते. सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांनी आपले गुरु-शिष्याचे नाते व ही परंपरा टिकवण्यासाठीचा केलेला हा प्रयत्न उल्लेखनीय होय. पुष्पगुच्छ तयार करण्याच्या स्पर्धेत सृष्टी नाईक, नियती मटकर, कुणाल माने, तन्मय पाटील, बेबीआयेशा तगारे यांनी क्रमांक पटकाविले. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी अंशुमन भोसले, ईशान मोटे, कार्तिक हुबळे, कल्पक सुतार, यशराज कुंभार, सृष्टी नाईक, रिया देशमुख, शलाका गिरी, ऋषा देसाई, माधवी आजगेकर यांनी परिश्रम घेतले. श्रीकृष्णा दावणे व महेश पाटील यांचे तसेच सांस्कृतिक विभागाचे सहकार्य लाभले. जयवंतराव शिंपी यांनी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविले. कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळाचे संचालक माजी प्राचार्य सुनील देसाई, उद्योजक सचिनभैया शिंपी उपस्थित होते. प्राचार्य आर. जी. कुंभार व पर्यवेक्षिका व्ही. जे. शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.
=============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...