विकास न्यूज (विशेष प्रतिनिधी) :
आंध्र प्रदेश असो वा मध्यप्रदेश असो वा कानडी मुलुख असो इथला भाविक जोतीबाची चैत्र यात्रा चुकवत नाही. भौगोलिक दृष्ट्या हे भाग वेगवेगळे राज्य असली तरी तमाम मराठी भाविक मंडळी ही याना त्या कारणाने स्थलांतरित झालेली आहेत. हे स्थलांतर पेशवाई काळात फार झाले आहे. लढाई च्या निमित्ताने काही मराठी मंडळी तेथेच राहिली पण त्यांनी आपल्या कुलदैवताचा विसर पडु दिलेला नाही.
आम्ही इकडे उत्तरेकडे मोठी मुलूखगिरी करण्यास आलो असून मोठी दौलत मिळवली आहे हे खरे आहे, तथापि आमचे कुलदैवत डोंगराचा जोतिबा, छत्रपतींचा भगवा झेंडा व आमची मूळची शिंदखेडची पाटीलकी यांचे विस्मरणाने रहाणारी दौलत आम्ही कस्पटासमान मानतो. हे उद्गार आहेत, ग्वालेरच्या महादजी शिंदे यांचे.
शिंदे घराण्याची ज्योतिबावर खूप मोठी श्रद्धा. शिंदे घराण्याचे कुलदैवत म्हणजे जोतिबा. शिवाजीराव शिंदे यांच्या काळात ग्वाल्हेर व इतर संस्थानांचे एकत्रिकरण होवून मध्यप्रदेशची निर्मिती होणार होती. तेव्हा शिंदे यांनी आपला अधिकारी जोतिबा डोंगरावर पाठवला. एकिकरणासंदर्भात जोतिबाचा प्रसाद घेतला आणि नाथांची एकीकरणासंदर्भात आज्ञा आहे असा कौल घेवूनच परतले. त्यानंतर ग्वाल्हेर संस्थान मध्यप्रदेशात सहभागी होण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
जोतिबाचे आज जे देवालय आहे ते ग्वालेरच्या राणोजीराव शिंदे यांनी १७३० साली बांधले. तिथेच असणारे केदारेश्वराचे मंदीर दौलतराव शिंदे यांनी बांधले. चोपडाईचे मंदिर प्रितीराव चव्हाण यांनी बांधले तर मालोजी निकम पन्हाळकर यांनी रामेश्वराचे मंदीर बांधले. जोतिबाचे मंदीर पुर्वी छोटे होते. राणोजीराजे शिंदे यांच्या पुढाकारातून आजचे मंदीर बांधण्यात आले. जोतिबा डोंगरावर कसा आला. या गडाला जोतिबाचा डोंगर, वाडी रत्नागिरी हे नाव कस पडलं याबाबतीत देखील आख्यायिका सांगितल्या जातात.
🌀जोतिबाची आख्यायिका🌀
रत्नासुर नावाचा राक्षस होता. त्याने देवांना युद्धाचे आव्हान दिले. जोतिबाने ते आव्हान स्वीकारले आणि युद्धाला सुरवात झाली. हे युद्ध आषाढी अमावस्येला सुरू झाले आणि श्रावण शुद्ध षष्ठीस रत्नासुर जमिनीवर कोसळला. रत्नासुर जमिनीवर पडला तेव्हा सर्व जनतेने चांगभल अशा आरोळ्या ठोकल्या. अखेर रत्नासुरावरूनच या ठिकाणाला वाडी रत्नागिरी अस नाव देण्यात आलं. गंमत म्हणजे रत्नासुराचा वध झाल्यानंतर त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर राक्षसाचा वध करण्यास जोतिबाने सुरवात केली. जो राक्षस ज्या ठिकाणी मेला त्या ठिकाणाला त्या त्या राक्षसावरुन नाव देण्यात आले. दानासूर दानोळीत, कोथळासूर कोथळीत, केसी केसापूरात, कुंभासूर कुंभोजमध्ये, महिषासुर मसाई पठारावर, संदळ- मंजळ हे राक्षस सादळे-मादळेत, कंदासूर कांदेमध्ये, मंगलासुर मांगले गावात मरून पडले. त्या राक्षसांच्या नावावरूनच या गावांची नावे देण्यात आली. जोतिबाने रत्नासुराचा टोप जिथे पाडला त्या गावाला टोप. रत्नासुराचा मंडप जिथे पडला ते मनपाडळे अशी आख्यायिका देखील सांगितली जाते.
जोतिबाची यात्रा
चैत्री पोर्णिमेला जोतिबाची यात्रा भरते. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेशसह देशभरातून मराठी बांधव या जत्रेत सहभागी होतात. सासनकाठ्यांचा मान असणारे भाविक सासनकाठ्या नाचवत जल्लोष करतात. जोतिबाच्या नावाने चांगभल म्हणत सारा डोंगर गुलालात उधळून निघतो. सासनकाठ्या विजयीपताका म्हणून मिरवण्यात येतात. पालखी यमाई मंदीरात भेट घेवून पुन्हा येईपर्यन्त ३५ ते ४० फूट उंच असणारी सासनकाठी एकटा माणूस नाचवत राहतो. सासनकाठी म्हणजे ३५-४० फुटांचा लांबलचक वेळू. त्याच्या शेंड्याला एक वस्त्र व तूरा बांधलेला असतो व त्यावर एक फळी असते. सासनकाठीच्या बुडक्यापासून चार फुटावर एक आडवी लाकडी फळी माश्याच्या आकाराची बसवली जाते ज्याच्यावर श्री नाथांची मुर्ती किंवा पादुका बसवतात व त्याच्या सहाय्याने सासनकाठी खांद्यावर घेवून नाचवता येते. सासनकाठीला चारी बाजूने दोऱ्या बाधलेल्या असतात. त्याला तोरणी असे म्हणले जाते.सासनकाठीला मानाचे नारळाचे तोरण चढवले जाते. काही गावात लहान मुलांना सासनकाठीच्या पायावर घातले जाते. महाराष्ट्रासह इतर राज्यातून मानाच्या ९६ तर इतर २५० च्या वर सासनकाठ्या चैत्रयात्रेला सहभागी होतात. सोबत दवण्याचा सुगंध गुलाल-खोबऱ्याची उधळणं असते. चांगभल गजराबद्दल अभ्यासक सांगतात की हा शब्द पंजाबी चंगा भला यापासून आलेला आहे. चांगल होवो म्हणजेच चांगभलं.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....