Tuesday, May 19, 2026

शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही, आजऱ्यात शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा मोर्चाने इशारा


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
शेती, शेतकरी, पर्यावरण आणि संस्कृती उध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला एक इंचही जमीन देणार नाही असा इशारा आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी  मोर्चाने येत तहसीलदार आजरा यांना दिला. चंदगड तालुक्यात महसूल यंत्रणेने सुरू केलेल्या पाहणीच्या पार्श्वभूमीवर आज तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला.
      
सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शेतकरी जमल्यानंतर निमंत्रक कॉ. संपत देसाई, तानाजी देसाई, सुधीर देसाई, चंद्रकांत गुरव, युवराज जाधव,भीमराव माधव, दीपाली गुरव, संजय तरडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरवात झाली. मोर्चा बाजारपेठेतून तहसील कार्यालयावर आला. मोर्चात माजी आमदार के. पी. पाटील, नंदाताई बाभूळकर, मुकुंद देसाई, सुनील शिंत्रे, राजू होलम, संभाजी पाटील हे प्रमुख सहभागी झाले होते. तिथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग कोणासाठी बनवताय याचे उत्तर अजूनही सरकार देऊ शकलेले नाही. एका बाजूला शेतकऱ्यांची शेती कवडीमोल दराने घेऊन त्यांना कंगाल केले जाणार आहे. दुसरीकडे इथला निसर्ग आणि पर्यावरण उध्वस्त होणार आहे तर तिसरीकडे इथली भूमिनिष्ट संस्कृतीवर आक्रमण होणार आहे. म्हणूनच ही लढाई आम्ही विरोधात आहोत. शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले, राज्यभर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ विरोधात आंदोलन सुरू आहे. तालुक्यातील शेतकरी आता संघटित झाला असून एक इंचही जमीन इथला शेतकरी देणार नाही, प्रसंगी रक्त सांडू पण यंत्रणेला पाय ठेवू देणार नाही.
    
नंदाताई बाभूळकर म्हणाल्या, हा देश दोन माणसं दोन माणसांना विकायला निघाले आहेत. माझं सासर नागपूर तर माहेर इथं आहे. त्यामुळे सासर आणि माहेर अशी दोन्हीकडच्या लढ्यात मी असणार आहे. एव्हीएच आणि टोलची लढाई जशी लढवली तशीच ही लढाई आपण लढवू. के. पी. पाटील म्हणाले,  आजरा तालुक्यातील जनतेचे मी अभिनंदन करतो त्यांनी जिल्ह्यात लढ्याला तोंड फोडले आहे. इथे चळवळीचा भक्कम वारसा आहे. आम्ही भुदरगड मधील राष्ट्रवादी अजित दादा गटाची मंडळी या लढ्यात नेटाने उतरणार आहोत. सुनील शिंत्रे, संजय तरडेकर, कॉ. शांताराम पाटील यांनीही मनोगते व्यक्त केली. युवराज जाधव यांनी आभार मानले. यावेळी सुभाष देसाई, सर्जेराव देसाई, धनाजी सावंत, निवृत्ती कांबळे, ए के पावले, शंकर पाटील, धनाजी राणे, आदेश गुरव, उदय पवार, रणजित देसाई, युवराज पोवार, प्रकाश मोरुस्कर, आनंदराव कुंभार, काशिनाथ मोरे, कृष्णा भारतीय, सम्राट मोरे, बाळू जाधव, उदय कोडक यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
=========================

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...