Tuesday, February 17, 2026

विकासाची पालखी नवीन शिलेदारांच्या खांद्यावर...!; आजरा तालुकावासियांची अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पेलणार का?


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
माथी कैक वर्षे मागासलेपणाचे बिरूद घेऊन वावरणाऱ्या आजरा तालुक्यातील जनतेच्या आशा-आकांक्षा पुन्हा केंद्रस्थानी आलेल्या आहेत, ज्या प्रत्येक निवडणुकीनंतर आपसूकच हवेत विरल्या गेल्या. त्या प्रथेप्रमाणे पुन्हा जिवंत झाल्या इतकंच. आता या नव्या शिलेदारांच्या खांद्यावर सर्वच बाबतीत रखडलेल्या विकासाची पालखी इमानेइतबारे वाहण्याची जबाबदारी असणार आहे. अर्थातच जुन्या-नव्या शिलेदारांच्या समन्वयातून हा जबाबदारीचा पूल बांधला जाणार का? हे पाहण्यासाठी आजरा तालुकावासीय नक्कीच आतुर झाले आहेत.


आजरा तालुक्याच्या राजकीय घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शरद पवार गट, शिवसेना शिंदे व ठाकरे गट, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस या पक्षातील नेते व कार्यकर्त्यांच्या परिघात पिंगा घालीत असतात. येथे पक्षीय नावाचा स्वेच्छेप्रमाणे ताईत गळ्यात परिधान केला जातो. यामुळे ज्या त्या पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरून देखील आजरा तालुक्यात सोयीप्रमाणे पाहण्याचा अलिखित प्रघात तयार झाला आहे. साहजिकच तालुक्यातील दीर्घकाळ रखडलेल्या विकासाला चालना मिळालेली नाही. साडेतीन वर्षाच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीनंतर लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींच्या हातात सभागृहाची सूत्रे सोपविली जात आहेत. तालुक्याच्या भल्यासाठी या प्रतिनिधींना राजकीय जोडे सभागृहाबाहेर ठेवावे लागतील. त्यामुळे तालुक्यातील विकासकामांना अपेक्षित गती मिळेल का? आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील का? याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

आजरा तालुका हा दुर्गम, डोंगराळ, ग्रामीण खेड्यापाड्यांचा. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, सार्वजनिक तसेच मूलभूत सोयीसुविधा आणि विकासाच्या अनेक पातळ्यांवर संघर्ष करणारा, ही या तालुक्याची खरी ओळख. येथे रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रांत भरीव कामाची संधी आहे. मागच्या काही वर्षात धरणांचे पाणी आणि शिक्षणाच्या बाबतीत काही प्रमाणात विकास झाला असला, तरी तो अपुरा असल्याची किंबहुना अव्याहतपणे पुढे सरकला नसल्याची बोचरी सल नागरिकांमध्ये घर करून राहिली आहे.

पदाधिकाऱ्यांनी कट्टर गटांच्या राजकारणाची झुल बाजूला करून तालुक्याच्या विकासाच्या पालखीला खांदा देण्याची अपेक्षा लोकांना आहे. विशेषतः शेतकरी, युवा वर्ग, महिला आणि विद्यार्थीवर्ग मोठ्या आशेने पाहत आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय, सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी, दळणवळणासाठी दर्जेदार रस्ते, तसेच शिक्षण आणि आरोग्यसेवा गावपातळीवर सहजतेने उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्या सामान्य नागरिकांकडून वारंवार मांडल्या जात आहेत. तालुक्याचा सामाजिक चेहरामोहरा बदलतील, असे वैद्यकीय अधिकारी आणि शिक्षक या घटकांची तालुक्याला अनेक वर्षे प्रतीक्षा राहिली आहे. दरम्यान, येथील युवकांमध्ये बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. अनेक तरुण शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करत आहेत, रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध व्हावी, लघुउद्योग, कृषिपूरक उद्योगांना चालना मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत. तालुक्यातील जनता गटातटाच्या राजकारणात गुंतलेली आहे. राजकारण आणि समाजकारण वेगळं मानून शासन, प्रशासनावरील लोकदबावातून आजरा तालुक्यावरील मागासलेपण पुसण्याची संधी आहे. राजकीय गटप्रमुख आणि नवीन पदाधिकाऱ्यांनी मनावर घेतल्यास अपेक्षित विकासाची संकल्पना रुजण्यास मदत होईल.

प्रमुख अपेक्षा....
आजरा तालुक्यातील आरोग्य आणि शैक्षणिक धोरण आणि दर्जा उंचावणे, तालुक्यातील सर्व रस्त्यांची मजबूत दुरुस्ती व नवीन रस्त्यांचे जाळे, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा व सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना विमा आणि अनुदान वेळेवर, युवकांसाठी रोजगारनिर्मिती व कौशल्य विकास केंद्रे, ग्रामीण आरोग्यसेवेत सुधारणा व तज्ज डॉक्टरांची नियुक्ती, शिक्षण क्षेत्रात डिजिटल सुविधा व शाळांना आवश्यक सोयी, प्रशासनात पारदर्शकता व लोकांशी थेट संवाद अशा आजरा तालुकावासियांच्या माफक अपेक्षा आहेत.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...