Saturday, January 10, 2026

साळगाव बंधाऱ्याचा पिलर खचला, अपघाताची शक्यता; चारचाकी व अवजड वाहनांना वाहतूक बंदी करण्याची मागणी....

आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधाऱ्याचा आजऱ्याकडील बाजूचा एक पिलर खचला आहे. यामुळे पिलर आणि बंधाऱ्याचा वरील भाग एकमेकापासून सुटला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासाठी या बंधाऱ्यावरून होणारी चार चाकी व अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी साळगाव ग्रामस्थांनी केली आहे. आगामी मे 2026 मध्ये साळगाव गावची लक्ष्मी देवी यात्रा होत आहे. त्यापूर्वी बंधार्‍याची दुरुस्ती करण्याची मागणी देखील केली आहे.

हिरण्यकेशी नदीवर सिंचनासाठी साळगाव येथे 1967 मध्ये बंधारा उभा करण्यात आला. या बंधार्‍याला साठ वर्षाहून अधिक काळ झाला आहे. त्यामुळे या बंधार्‍याच्या पिलरचे दगड निखळून पडण्याची प्रकार कायम घडत असतात. त्यातच पेरणोली देवकांडगाव मार्गे गारगोटीला होणारी वाहतूक देखील याच बंधाऱ्यावरून होते. सध्या अवजड वाहनांची वाहतूक देखील वाढली आहे. त्यामुळे बंधाऱ्यास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर लागलीच हा बंधारा पाण्याखाली जातो. याकरिता वाहतुकीसाठी बंधाऱ्याला समांतर पूल उभा करण्याची मागणी पेरणोली परिसरातील नागरिकांकडून सातत्याने होत आहे. यापूर्वी त्यासाठी निधीही मंजूर झाला होता, मात्र तांत्रिक अडचणीमुळे तो निधी परत गेला.

काही वर्षांपूर्वी या बंधाऱ्याचा निकामी झालेला पिलर दुरुस्त करण्यात आला होता. आता पुन्हा आणखी एक पिलर निकामी झाला आहे. यातून अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे. आजरा-गारगोटी नवीन मार्गाचे काम सुरू आहे. रस्ते कामाची अवजड वाहतूक तसेच ऊस वाहतूक या बंधाऱ्यावरून सुरू आहे. बंधारेचे आयुष्य जास्त झाल्यामुळे बांधकाम कमकुवत होत आहे. त्यामुळे आता योग्य ती डागडूजी करून बंधारा सेवेत कायम ठेवणे गरजेचे आहे. याकरिता प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी साळगाव ग्रामस्थातून होत आहे.

साळगाव बंधाऱ्याच्या दुरावस्थेबाबत पाटबंधारे विभागाचे अभियंता अजिंक्य आबिटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, साळगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 65 लाखाच्या निधीची तरतूद आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. लवकरच याला मंजुरी मिळून दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात येईल. तोपर्यंत या बंधाऱ्यावरील चारचाकी व अवजड वाहतूक बंद करण्याबाबत आजरा तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेण्यात आली आहे.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••


No comments:

Post a Comment

२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...