Wednesday, July 15, 2026

२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना प्रभाग क्र. १५ व ११ मधील विविध नागरी सुविधांशी संबंधित प्रलंबित कामांवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करणारे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्नांबाबत यापूर्वी अनेक वेळा लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही समाधानकारक कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
   
निवेदनामध्ये भाई-भाई टॉकीज ते शिवकॉलनी तसेच चाफे गल्ली ते सरकारी दवाखाना या मार्गांवरील खड्डे तातडीने बुजविणे, मंजिरी परिसरातील बंद असलेले स्ट्रीट लाईट पुन्हा सुरू करणे, चराटी कॉलनी–आपटे कॉलनी येथील मुख्य पाणीपुरवठा लाईन बदलणे, नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, विविध भागांत नवीन स्ट्रीट लाईट व सोलर लाईट बसविणे, रुक्मिणी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर करणे, चर्च गल्लीतील विहिरीजवळील पेव्हींग ब्लॉक बसविणे, रामदेव गल्लीतील रामाची विहीर स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करणे, विरंगुळा केंद्रासाठी मंजूर करण्यात आलेले दोन गाळे तात्काळ उपलब्ध करून देणे, जोशी गल्लीतील मंजूर रस्त्याच्या कामाचा कार्यादेश देऊन प्रत्यक्ष काम सुरू करणे तसेच गटारींची साफसफाई झाल्यानंतर त्यातील गाळ व कचरा २४ तासांच्या आत उचलण्याची व्यवस्था करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. समितीने नगरपंचायत प्रशासनाला निवेदन प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली असून, अन्यथा मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी आजरा नगरपंचायत कार्यालयासमोर शांततापूर्ण "भजन व ढोल-ताशा वाद्य , भारतीय बैठक" आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनास सर्वस्वी नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती मा. उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, आजरा तसेच मा. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, आजरा यांनाही आवश्यक कार्यवाहीसाठी देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर नगरसेवक तथा समितीचे अध्यक्ष श्री. परशुराम बामणे, नगरसेविका डॉ. सौ. स्मिता कुभांर, श्री. गौरव देशपांडे, श्री. पांडुरंग सावरतकर, श्री. जावेद पठाण, श्री. बंडोपंत चव्हाण, श्री. संजय जोशी, श्री. जोतिबा आजगेकर, श्री. मिनीन डिसोझा, श्री. रामचंद्र पंडीत, श्री. सईद पेंटर, श्री. संतोष बांदिवडेकर आणि श्री. अभिजित परीट यांच्या सह्या आहेत. समितीच्या वतीने नागरिकांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
===============================

No comments:

Post a Comment

२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...