Friday, June 13, 2025

बिग ब्रेकिंग; आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन तर पंचायत समितीचे चार सदस्य, कोल्हापूर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 68

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेला सुरुवात झाली असतानाच आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेला सुरुवात होणार आहे. याबाबत शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी 68 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. यात विशेष गोष्ट म्हणजे गत वेळी जिल्हा परिषदेचे तीन व पंचायत समितीचे सहा सदस्य असणाऱ्या आजरा तालुक्यासाठी आता जिल्हा परिषदेचे केवळ दोन तर पंचायत समितीचे चार सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तीन मतदारसंघात तालुका विभागलेला असतानाच आता जिल्हा परिषद सदस्य संख्या दोन केल्यामुळे तालुक्याच्या राजकीय मर्यादा स्पष्ट होत आहेत.

गेल्या दोन ते तीन वर्षापासून राज्यातील अनेक जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक आहे. या निवडणुका विविध कारणाने लांबणीवर पडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याच्या आदेश दिल्यानंतर आता प्रभाग रचनेपासून या निवडणुकीला प्रारंभ होत आहे. गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शहरात नगरपंचायत व नगरपरिषदा निर्माण झाल्यानंतर गतवेळी 67 सदस्य संख्या असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या नेमकी किती होणार याकडे लक्ष लागले होते. आगामी निवडणुकीसाठी यामध्ये एकने वाढ होत ती 68 झाली आहे. यामध्ये करवीर व कागल तालुक्यात प्रत्येकी एक जिल्हा परिषद सदस्य संख्या वाढली आहे. मात्र आजरा तालुक्यातील एक जिल्हा परिषद सदस्य संख्या कमी झाली आहे. सदस्य संख्येचा निर्णय 2011 च्या जनगणनेतील लोकसंख्या विचारात घेऊन करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद तालुकावार सदस्य संख्या व पंचायत समिती सदस्य संख्या : शाहूवाडी चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती सदस्य, पन्हाळा सहा जिल्हा परिषद व बारा पंचायत समिती सदस्य, हातकणंगले अकरा जिल्हा परिषद व बावीस पंचायत समिती सदस्य, शिरोळ सात जिल्हा परिषद सदस्य व चौदा पंचायत समिती सदस्य, करवीर बारा जिल्हा परिषद व चोवीस पंचायत समिती सदस्य, गगनबावडा दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती सदस्य, राधानगरी पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती सदस्य, कागल सहा जिल्हा परिषद व बारा पंचायत समिती सदस्य, भुदरगड चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती सदस्य, आजरा दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती सदस्य, गडहिंग्लज पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती तर चंदगड चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती सदस्य अशी एकूण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या साठी 68 सदस्य संख्या असून जिल्ह्यातील पंचायत समिती साठी 136 सदस्य संख्या राहणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकाकरिता प्रभाग रचना कार्यक्रम :
14 जुलै 2025 पर्यंत जिल्हाधिकारी यांनी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध करणे.
21 जुलै 2025 पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करणे.
28 जुलै 2025 पर्यंत प्राप्त हरकतींच्या आधारे अभिप्रायासह जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव सादर करणे.
11 ऑगस्ट 2025 पर्यंत विभागीय आयुक्त यांनी प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय देणे.
18 ऑगस्ट 2025 पर्यंत जिल्हाधिकारी यांनी अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करणे.
====================

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...