Wednesday, June 11, 2025

‘गोकुळ’च्या दुग्ध व्यवसायातील यशामुळे सहकार चळवळ सक्षम : मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस; गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी घेतली मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई, न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) या राज्यातील अग्रगण्य सहकारी दुग्ध संस्थेच्या चेअरमनपदी नविद हसन मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर त्यांनी व गोकुळचे संचालक मंडळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री नाम.देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथील ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. गोकुळच्यावतीने मा. मुख्यमंत्री महोदयांचा कोल्हापूरची श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा, पुष्पगुच्छ व गोकुळची दुग्ध उत्पादने देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर, आमदार विनयरावजी कोरे, आमदार चंद्रदीप नरके,  जनसुराज्य युवाशक्ती प्रदेश अध्यक्ष समित कदम, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील तसेच गोकुळचे संचालक व मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा करताना सांगितले की, “गोकुळच्या दुग्ध व्यवसायातील यशामुळे राज्यातील सहकार चळवळ अधिक सक्षम झाली आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यात गोकुळचा मोठा वाटा असून सहकार क्षेत्रातील इतर संस्थांनी देखील गोकुळचा आदर्श घ्यावा. गोकुळने उत्पादन, गुणवत्ता आणि शेतकरी हित यांचा उत्कृष्ट समन्वय साधला आहे.”

गोकुळच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांकडे विविध मागण्या सादर करण्यात आल्या. त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, पनवेल, वाशी या परिसरात नवीन विस्तारित दुग्ध शाळेसाठी १५ एकरपर्यंत औद्योगिक भूखंड उपलब्ध करून देण्याची तसेच पुणे येथे नव्या पॅकिंग स्टेशनसाठी औद्योगिक भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय राज्य शासनाच्या धोरणानुसार फक्त गाय दूध उत्पादकांना अनुदान दिले जाते; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील म्हैस दूध उत्पादकांची संख्या लक्षणीय असल्याने त्यांनाही प्रतिलिटर अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळाने २०२५ पासून राज्यात लागू केलेल्या सौर उर्जा संदर्भातील मल्टीएअर टेरिफ पॉलिसीमुळे वाढलेला आर्थिक भार लक्षात घेता, या धोरणाच्या अटी व शर्तींमध्ये शिथिलता आणावी अथवा फेरविचार करावा, अशी विनंतीही गोकुळच्या वतीने करण्यात आली. या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गोकुळसारख्या सहकारी संस्थांच्या उद्योग विस्तारासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. वरील मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात येईल,”असे आश्वासन त्यांनी दिले. या भेटीदरम्यान गोकुळच्या भविष्यातील औद्योगिक, ऊर्जा बचत व गुणवत्ता आधारित योजनांवर ही चर्चा झाली. गोकुळचे स्वयंपूर्ण ऊर्जानिर्भरता या बाबतीत राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले. याप्रसंगी संघाचे संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, वाशी शाखा डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते.
==========

No comments:

Post a Comment

कोल्हापुरी चपलांच्या जागतिक प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार; पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई, न्यूज नेटवर्क : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत ...