येत्या विधानसभा निवडणुकीत समरजितराजेंना विजयी करून स्वाभिमानाची लढाई जिंकू : जयवंतराव शिंपी, आजरा येथे शिंपी गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राजेंना आमदार करण्याचा निर्धार...
आजरा, वृत्तसेवा :
गेली वीस-पंचवीस वर्षे आजरा तालुक्यातील सर्वसामान्य माणसं जोडण्याचं काम आपण करत आहे. राजे समरजितसिंह घाटगे देखील कोणतेही संविधानिक पद नसताना शाश्वत विकासकामांचा अजेंडा गावोगावी राबवत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षा ओळखण्याची चिकित्सक वृत्ती चांगली आहे. त्यामुळे या तालुक्यातील स्वाभिमानी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत राजे समरजितसिंह घाटगे यांच्या विजयासाठी माझ्यासह आमचे सर्वच कार्यकर्ते ही आमच्या सर्वांच्या स्वाभीमानाची आणि हक्काची लढाई नक्की जिंकतील असा विश्वास आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आजरा येथे जयवंतराव शिंपी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते..
यावेळी राजे समरजिसिंह घाटगे यांचा सत्कार जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते करण्यात आला. शिंपी पुढे म्हणाले, समरजितसिंह घाटगे एक उच्चविद्याविभूषित नेतृत्व आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव त्यांना चांगली आहे. त्यामुळे कोणी कितीही आमिषे दाखवली तरी जनतेने त्यांच्या आमिषांना बळी न पडता समरजितसिंह घाटगे यांना निवडून देऊया असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, शाहू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या शिकवणीप्रमाणे, मतांमध्ये नको तर माणसांमध्ये गुंतवणूक करा. माणूसपण जोडण्याचं आणि जपण्याचं त्यांनी आम्हाला पाजलेलं बाळकडू आम्ही तंतोतंत कृतीतून पाळत आहोत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. हा परिसर विकासाच्या बाबतीत उपेक्षित राहिला असला तरी येत्या काळात या परिसराच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण नक्की प्रयत्नशील राहू. त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आपला लोकसेवक म्हणून आपल्या सर्वांचीच सेवा करण्याची एक संधी द्या असे आवाहन केले. यावेळी जनार्दन निऊंगरे, ॲड.धनंजय देसाई यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सभापती भिकाजी गुरव, के. जी.पटेकर, एस. पी. कांबळे, विलास पाटील, सदाशिव डेळेकर, गणपतराव नाईक, डी. एम. पाटील, बाबाजी नाईक, सुनील शिंदे यांच्यासह कागल विधानसभा मतदार संघातील या परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रा.सुनील देसाई यांनी मानले.
चौकट....
आजरा तालुका राजेंची हमखास पाठराखण करेल....
प्रास्ताविक करताना युवा नेते अभिषेक शिंपी म्हणाले, राजे समरजितसिंह घाटगे यांनी पुरोगामीत्वाचे वलय लाभलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात केलेला प्रवेश हा जनतेच्या मनातील प्रवेश आहे. या प्रवेशाने राजे समरजितसिंह घाटगे यांनी प्रत्यक्ष कृतीतून शाहू महाराजांच्या विचारांना बळकटी देण्याचे काम केलं आहे. मात्र या जिल्ह्यात पुरोगामीत्वाचे सोंग घेऊन कारभार करणाऱ्या कांही मंडळींनी जिल्ह्याचे अतोनात नुकसान केले आहे, असे नेतृत्व आता बदलण्याची गरज आहे. आशा संधीसाधू नेतृत्वाची येथील जनतेने नोंद घेतली असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीत या तालुक्यातील जनता राजे समरजितसिंह घाटगे यांना निवडून देण्यासाठी त्यांची हमखास पाठराखण करतील असे सांगताच उपस्थित असलेल्या सर्वांनीच टाळ्या वाजवून त्यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला.
====================
No comments:
Post a Comment