श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरचे कार्य आदर्शवत : आमदार प्रकाश आबिटकर; आजरा येथे वाचनालयाच्या अद्यावत इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ
आजरा, वृत्तसेवा :
आजरा तालुक्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक चळवळीला बळकटी देण्याचे काम श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरने केले आहे. तालुक्याच्या वाचन संस्कृतीला बळ मिळावे म्हणून ग्रामीण भागात वाचनालय उभारणीस श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरने नेहमीच मदत केली आहे. त्याचबरोबर वाचन मंदिर नेहमीच विविध उपक्रम राबवत असते हे कौतुकास्पद आहे. या वाचन मंदिरचे सर्वच कार्य आदर्शवत आहे. हा आदर्श साऱ्यांनीच घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते आजरा येथे श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या अद्यावत इमारत बांधकामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रो. डॉ. अशोक बाचूळकर होते. आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या अद्यावत इमारतीसाठी नगर विकास विभागाच्या विशेष घटक योजनेतून आमदार आबिटकर यांच्या प्रयत्नातून चार कोटी पन्नास लाख रुपये मंजूर झाले. या इमारत बांधकामाचे भूमिपूजन आमदार आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविकात वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. बाचुळकर यांनी वाचनालयाच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच वाचनालयाच्या माध्यमातून आगामी काळात फिरते ग्रंथालय व अद्यावत स्पर्धा परीक्षा विभाग सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले. आमदार आबिटकर पुढे म्हणाले, नवीन वास्तूच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढविण्यास हातभार लागणार आहे. वाचनाचा छंद जोपासला गेला पाहिजे कारण वाचनामुळे समृद्धता येते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात वाचन संस्कृतीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. वाचनालयाची उभी राहणारी नवीन वास्तू आजऱ्याच्या सौंदर्यात भर घालणारी ठरणार आहे. विकास कामांच्या बरोबरच इतर कामाकडेही लक्ष देता आले याचे समाधान असल्याचेही आमदार आबिटकर यांनी सांगितले. अण्णाभाऊ संस्था समूहप्रमुख अशोक चराटी म्हणाले, आजरा तालुका वासियांनी वाचन संस्कृती टिकून ठेवली आहे. याचा तालुक्याच्या जडणघडणीला फायदा झालेला आहे. सुधीर कुंभार म्हणाले, मतदार संघाचा सर्व अंगाने विकास कसा करावा हे आमदार आबिटकर यांनी दाखवून दिले आहे. असा आमदार आम्हाला लाभला हे आमचे भाग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता राजेंद्र सावंत यांनी वाचनालयाच्या नवीन इमारतीची तांत्रिक माहिती दिली. यावेळी जयवंत पन्हाळकर यांनी वाचनालयासाठी एक लाख एक हजार रुपयांची देणगी जाहीर केली. यावेळी माजी नगराध्यक्षा ज्योस्ना चराटी, विलास नाईक, डॉ. अनिल देशपांडे, विजय पाटील, राजू होलम, शिवशंकर उपासे, जी. एम. पाटील, दशरथ अमृते, अनिकेत चराटी, संजय सावंत, परशुराम बामणे, मारुती मोरे, विक्रम देसाई, महादेव टोपले, आदमसाब मुराद, नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे, जितेंद्र भोसले, संतोष भाटले, विजय थोरवत, धनंजय पाटील, सुभाष विभुते, वामन सामंत, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सदाशिव मोरे यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी इंजल यांनी आभार मानले.
=============
No comments:
Post a Comment