Friday, August 9, 2024

म्हैस दूध वाढीसाठी आणखी प्रयत्नांची गरज : गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे; आजरा येथे गोकुळ दूध संघाची संपर्क सभा

म्हैस दूध वाढीसाठी आणखी प्रयत्नांची गरज : गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे; आजरा येथे गोकुळ दूध संघाची संपर्क सभा 
आजरा, वृत्तसेवा :

 कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) म्हैस दूध ही ओळख आहे. गोकुळ दूध संघाला आजरा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात म्हशीच्या दुधाचा पुरवठा होतो. मात्र गेल्या काही वर्षात तालुक्यातून पुरवठा होणाऱ्या म्हशीच्या दुधाचे प्रमाण घटत चालले आहे. यासाठी तालुक्यातून म्हैस दूध वाढीसाठी आणखी प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले. ते आजरा येथे संस्था प्रतिनिधींच्या संपर्क सभेत बोलत होते. 
 स्वागत व प्रास्ताविक करताना  गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर तालुक्यातील एकूण दूध उत्पादनाचा आढावा घेतला. श्रीमती रेडेकर म्हणाल्या, तालुक्यात एकूण 321 दूध संस्था आहेत. तालुक्यातून 42,168 लिटर दुधाचा पुरवठा गोकुळ दूध संघाला होतो. यापैकी 72 टक्के म्हशीचे तर 28 टक्के गायीचे दूध आहे. गोकुळच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी गोकुळच्या यशस्वीतेचा आलेख वाढतच चालला आहे. त्यामुळे सध्या गोकुळची वार्षिक उलाढाल 3670 कोटी पर्यंत गेली आहे. यावेळी श्रीमती रेडेकर यांनी गाय दुधाप्रमाणे म्हैस दुधाला सुद्धा शासनाकडून अनुदान मिळावे व गोकुळ दूध संघाने वाडी-वस्तीवरील दूध संस्थांना पशुखाद्य देण्याबाबत नियोजन करावे अशा मागण्या केल्या. यावेळी अध्यक्ष अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी), संचालिका अंजनाताई रेडेकर यांचा संस्था प्रतिनिधींच्या वतीने सत्कार करण्यात आला. नॅशनल डेअरी असोसिएशनचा बेस्ट वुमन फार्मर अवॉर्ड मिळाल्याबद्दल पेद्रेवाडीच्या सरपंच लता रेडेकर, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श गोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल पेरणोलीचे दत्तात्रय पाईम, महापुरात चांगले काम करणारे सुपरवायझर, दूध वाहतूक ठेकेदार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्पादकांना आर्थिक मदतीचे वाटप देखील करण्यात आले. 
 अध्यक्ष अरुण डोंगळे पुढे म्हणाले, आजरा तालुक्याच्या दूध उत्पादन वाढीमध्ये माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. दूध व्यवसायात ग्रामीण भागातील महिला तळमळीने काम करत असतात. महिलांच्या योगदानामुळेच दूध व्यवसायाला समृद्धी आली आहे. त्यामुळे आता दूध वाढीचे आव्हान पेलताना महिलांनी दूध व्यवसायासाठी प्रशिक्षित होण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, आजरा तालुक्यातील म्हैस दुधाचे प्रमाण चांगले आहे हे कौतुकास्पद आहे. गोकुळ संघाच्या संदर्भात आजरा तालुक्याचे कामकाज चांगले आहे. दूध संघाच्या विविध योजनांचा लाभ दूध उत्पादकांनी चांगल्या प्रकारे घेऊन दुधाचे उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे. यावेळी तुळसाप्पा पोवार, शिवाजी कोंडुसकर, के. व्ही. येसणे, सुभाष देसाई, विजय देसाई, मारुती येझरे यांनी विविध प्रश्न मांडले. अध्यक्ष डोंगळे व दूध संघाचे अधिकारी यांनी संस्था प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी संचालक नाविद मुश्रीफ, बाबासाहेब चौगुले, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, करणसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, एस. आर. पाटील, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, प्रकाश पाटील, किसन चौगुले, नंदकुमार ढेंगे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, आजरा जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंद देसाई, रणजीत देसाई, दीपक देसाई, राजाराम पोतनीस, रवींद्र भाटले, अशोक तर्डेकर, शिवाजी गिलबिले, भीमराव वांद्रे, किरण पाटील, सुधीर पाटील यांच्यासह गोकुळ दूध संघाचे अधिकारी, आजरा तालुक्यातील दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी आभार मानले.
==================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...