Monday, April 29, 2024

2 व 3 मे रोजी साळगावात लक्ष्मीदेवी मंदिर वास्तुशांती समारंभ व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा

2 व 3 मे रोजी साळगावात लक्ष्मीदेवी मंदिर वास्तुशांती समारंभ व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा 
आजरा वृत्तसेवा :

 साळगाव (ता. आजरा) येथे ग्रामस्थांनी उभारलेल्या लक्ष्मी देवी मंदिराच्या नवीन वास्तूचा वास्तुशांती समारंभ व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा गुरुवार (दि. 2 मे) व शुक्रवार (दि. 3 मे) रोजी संपन्न होत असल्याची माहिती लक्ष्मीदेवी मंदिर जीर्णोद्धार समितीने दिली आहे. या सोहळ्यासाठी मुंबई, पुणे व इतर ठिकाणचे चाकरमनी साळगावात दाखल झाले आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने गावात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. 
दोन दिवसीय कार्यक्रम पुढील प्रमाणे : 
गुरुवार (दि. ०२ मे) रोजी सकाळी ९ ते १२ : लिंगाचा टेक येथे असलेल्या श्री लक्ष्मीदेवी मुर्तीचा अभिषेक, विधिवत पुजा व कलशपुजन करणे. दुपारी १२ ते २ : श्री केदारलिंग मंदिर येथे असलेल्या श्री लक्ष्मीदेवी मुर्तीचा अभिषेक व विधिवत पुजा. दुपारी ३ ते ६ : श्री केदारलिंग मंदिर ते श्री लक्ष्मी मंदिर पर्यंत श्री लक्ष्मीदेवी मुर्ती व कलशाची सवाद्य मिरवणूक. सायं. ६.३० ते ८.३० महाप्रसाद. रात्री ९ ते ११ : युवाकिर्तनकार ह.भ.प. ऋषिकेश कोरेगांवकर महाराज (सातारा) यांची किर्तनसेवा.
शुक्रवार (दि. ०३ मे) रोजी सकाळी ८ ते ११ : महिलांचा गारवा, पाण्याच्या घागरी व दुरड्या यांची वारकरी सांप्रदाय दिंडीसह मिरवणूक. सकाळी ११ वा. : मंदिर प्रवेश व श्री लक्ष्मीदेवी मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा. दुपारी १२ ते २ : धार्मिक विधी, होमहवन, श्री सत्यनारायण पुजा व कलशारोहण सोहळा. दुपारी २ ते सायं. ६ : श्री लक्ष्मीदेवीची ओटी भरणे व देणगीदारांचा सत्कार. सायं. ६.३० ते ८.३० : महाप्रसाद. रात्री ९ ते ११ : माऊली सोंगी भजन मंडळ नवले, (ता. भुदरगड) यांचा : सोंगी भजनाचा कार्यक्रम. असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे तसेच वास्तुशांती कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन लक्ष्मीदेवी मंदिर जिर्णोद्धार समिती व साळगाव ग्रामस्थ यांनी केले आहे.
=================

Sunday, April 28, 2024

राजर्षी शाहूंच्या रक्ताचा, विचारांचा मी खरा वारसदार; शाहू महाराज यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे भूमिका

राजर्षी शाहूंच्या रक्ताचा, विचारांचा मी खरा वारसदार; शाहू महाराज यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे भूमिका
कोल्हापूर : वृत्तसेवा 

“राजर्षी शाहू महाराज यांच्या थेट रक्ताचा आणि विचारांचा मी वारसदार आहे. शाहूंचे समतावादी विचार समाजात रूजविण्यासाठी माझे अखंड परिश्रम सुरू आहेत, यामुळे जनतेने मला स्वीकारले तर आहेच, शिवाय वारसदार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. हिंदू कायद्यानुसार दत्तक प्रक्रिया झाल्याने मी कायदेशीर वारसदार आहे” असे पत्रक कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील इंडिया व महाविकास आघाडी, काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

शाहू छत्रपती यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  राजर्षी शाहू महाराजांच्या रक्ताचा वारस म्हणून छत्रपती शहाजी महाराज यांनी मला दत्तक घेतले. त्यामुळे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा आपण कायदेशीर वारसदार  झालो आहे. या प्रक्रियेला तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू व केंद्रीय गृहमंत्री लाल बहाद्दूर शास्त्री  यांनी १९५६ चा हिंदू कायद्यानुसार याला मान्यता देत शिक्कामोर्तब केले. मी राजर्षी शाहूंच्या रक्ताचा, कायद्यानुसार तसेच विचारांचा वारसदार आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या कन्या राधाबाईसाहेब उर्फ आक्कासाहेब महाराज यांचे चिरंजीव विक्रमसिंह पवार अर्थात छत्रपती शहाजी महाराज यांच्या कन्या शालिनीराजे यांचा मी पूत्र आहे, म्हणजे मी राजर्षी शाहू महाराज यांचा खापर पणतू असल्याने थेट रक्ताचा वारसदार आहे. दत्तक विधानानंतर छत्रपती घराण्याचा मी वारसदार आहेच, पण त्याच बरोबर मी शाहू विचारांचा वारसदार आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. गेल्या साठ वर्षात राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा समतावादी विचार राज्य आणि देशातही पोहोचविण्यासाठी माझे अखंड परिश्रम सुरू आहेत. राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारस असल्याने जनतेने मला स्वीकारले आहे. कोल्हापूरच्या लोकांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केले,  त्यांच्या या प्रेमामुळेच मी जनतेशी एकरूप झालो आहे. साठ वर्षात जनतेकडून मिळणारे अखंड प्रेम, लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना झालेली विराट गर्दी आणि प्रचाराला मिळत असलेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता हे सिद्ध होते. पत्रकात पुढे म्हटले आहे की, ज्या राजर्षी शाहू महाराजांनी आयुष्यभर समतेसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी अहोरात्र कार्य केले.  अशा विचारधारेच्या विरोधात राजवर्धन कदमबांडे यांचे काम सुरु आहे, जे स्वत:ला राजर्षी शाहूंच्या विचारांचे वारसदार म्हणवतात, याचे आपल्याला मनस्वी दु:ख होत आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.
==============

Saturday, April 27, 2024

गद्दार खासदारांना उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक मूठमाती देतील : आमदार भास्कर जाधव; आजऱ्यात महाविकास आघाडीची प्रचार सभा

गद्दार खासदारांना उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक मूठमाती देतील : आमदार भास्कर जाधव; आजऱ्यात महाविकास आघाडीची प्रचार सभा 
आजरा वृत्तसेवा :

 भाजप हा सत्तेसाठी हापापलेला पक्ष आहे. विरोधी पक्षातील माणसे फोडून प्राप्त केलेली सत्ता हा भाजपच्या विचारांचा पराभव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदारांनी गद्दारी केली आहे, त्यामुळे गेल्यावेळी त्यांच्या विजयासाठी राबलेला उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकच त्यांना या निवडणुकीत मुठमाती देतील, अशी प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. ते आजरा येथे महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचार सभेत बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
 राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार भास्कर जाधव पुढे म्हणाले, एक पक्ष विरुद्ध अखंड देश अशी सध्याची निवडणूक आहे. यामध्ये देश जिंकला पाहिजे. मणिपूर येथील घटना घडवून कित्येक महिन्यांचा कालावधी लोटला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही मणिपूरला गेलेले नाहीत. देशातील 140 कोटी जनतेला आपला परिवार मानणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या परिवारात मणिपूरमधील भगिनी येत नाहीत का? असा सवाल करत आमदार जाधव पुढे म्हणाले, शेतीशी संबंधित विविध घटकातून वर्षाला लाखो रुपये वसूल करून शेतकऱ्याच्या सन्मानासाठी सहा हजार रुपये दिल्याचा देखावा सुरू आहे. सध्या जातीय दंगली घडवून राजकारण करण्याचा डाव खेळला जात आहे. देशात सगळ्यात जुमला चालू आहे. आमदार बंटी पाटील म्हणाले, आजरा तालुक्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्वाभिमानाच्या लढाईत नेहमी तालुकावासियांच्या सोबत राहणार आहे. विद्यमान खासदारांनी पाच वर्षात आजरा तालुक्यात ढुंकूनही बघितले नाही तसेच तालुक्याच्या कुठल्याही प्रश्नाबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर शेती अवजारांवरील जीएसटी रद्द केला जाईल. या निवडणुकीत पक्ष फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहनही त्यांनी केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, सध्या समाजात निर्माण झालेली विषमता दूर करण्यासाठी समतेचा विचार महत्त्वाचा आहे. आजरा तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहणार आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, डॉ. नंदाताई बाभुळकर, कॉ. संपत देसाई, गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजना रेडेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे, युवा नेते अभिषेक शिंपी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष युवराज पोवार, सर्व श्रमिक संघटनेचे अतुल दिघे, दयानंद भोपळे, भैरवी सावंत, समीर चांद यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुनील शिंत्रे, विनायक उर्फ अप्पी पाटील, जयवंतराव शिंपी, रामराजे कुपेकर, संभाजी पाटील, राजेंद्र सावंत, उदयराज पवार, किरण कांबळे, संकेत सावंत, विक्रम देसाई, रवींद्र भाटले, संजय तरडेकर, राजू होलम, दयानंद कांबळे, डी. के. कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सुधीर येसने यांनी सूत्रसंचालन केले. संतोष मासोळे यांनी आभार मानले.
==============  

Wednesday, April 24, 2024

संभाजीराजेंना खासदारकी देऊन गादीचा मान कसा राखला जातो हे पंतप्रधान मोदींनी दाखवून दिले : नाथ देसाई; अर्जुन आबिटकर यांचा आजरा तालुक्यात प्रचार दौरा

संभाजीराजेंना खासदारकी देऊन गादीचा मान कसा राखला जातो हे पंतप्रधान मोदींनी दाखवून दिले : नाथ देसाई; अर्जुन आबिटकर यांचा आजरा तालुक्यात प्रचार दौरा 
आजरा : वृत्तसेवा 

 युवराज संभाजीराजे यांना भाजपने राष्ट्रपती नियुक्त खासदार करून कोल्हापूरचा व कोल्हापूरच्या गादीचा सन्मान केला आहे. त्यामुळे गादीचा सन्मान कसा केला जातो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून दिले आहे. कोल्हापूरच्या गादी विषयी आम्हाला आदर असल्यामुळे गादीच्या मान राखण्याविषयी कोणी आम्हाला शिकवण्याची गरज नाही, असा घणाघात आजरा तालुका भाजपचे युवा नेते नाथ देसाई यांनी केला. ते साळगाव (ता. आजरा) येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार सभेत बोलत होते. जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
केदारलिंग सेवा संस्था अध्यक्ष आनंदराव कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी अर्जुन आबिटकर म्हणाले, खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासनिधी आणला आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूर मधून संजय मंडलिक यांना मोठया मताधिक्याने विजयी करा. मताधिक्य देण्यामध्ये आजरा तालुका अग्रेसर राहिला पाहिजे. नाथ देसाई पुढे म्हणाले, संभाजीराजे लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असताना  शाहू महाराजांना उमेदवारी देऊन घरामध्ये भांडणे लावण्याचे काम केले. कोल्हापूरच्या गादीचा जर मानच राखायचा होता तर डी वाय पाटील यांना ज्यावेळी राज्यपाल केले त्यावेळी शाहू महाराजांना राज्यपाल का केले नाही असा सवाल उपस्थित केला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार म्हणाले, पंतप्रधान मोदींनी आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत राम मंदिर उभारणी, 370 कलम हटवणे, 80 कोटी जनतेला पाच वर्षे मोफत रेशन वाटप, शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेचा निधी, आयुष्यमान भारत ही आरोग्याची योजना अशा विविध उपक्रमातून सर्वसामान्यांचे जीवनमान सुखकर करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, शिवसेना तालुकाध्यक्ष संजय पाटील, परशुराम बामणे, प्रकाश पाटील, सरपंच धनंजय पाटील, उपसरपंच उषा नावलकर, ग्रामपंचायत सदस्य बबन भंडारी, स्वप्नाली केसरकर, जितेंद्र भोसले, विजय थोरवत, संतोष भाटले, सुनील दिवेकर, दयानंद निउंगरे, अश्विन डोंगरे, राजू कुंभार, राजाराम पाटील, ज्ञानदेव नावलकर, इम्तियाज शेख, महादेव भंडारी, महादेव कुंभार, शिवाजी कुंभार, पांडुरंग पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
============

Monday, April 22, 2024

कोल्हापुरातून 23 तर हातकणंगलेतून 27 उमेदवार रिंगणात; जाणून घ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार

कोल्हापुरातून 23 तर हातकणंगलेतून 27 उमेदवार रिंगणात; जाणून घ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार 
 कोल्हापूर : वृत्तसेवा 

 लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जांची माघार प्रक्रिया सोमवारी पार पडली. माघारी नंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 23 तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 27 अर्ज शिल्लक राहिले आहेत. इतिहासात या दोन्हीही मतदार संघात यावेळी सर्वाधिक उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 2019 मध्ये कोल्हापूर मधून 15 तर हातकणंगले मधून 17 उमेदवार रिंगणात होते.

 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात छाननी नंतर 27 अर्ज शिल्लक राहिले होते. माघारी वेळी यातील चार अर्ज मागे घेण्यात आले, यामुळे या मतदारसंघात 23 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात छाननीनंतर 32 अर्ज शिल्लक राहिले होते. माघारी वेळी यातील पाच अर्ज मागे घेण्यात आले, यामुळे या मतदारसंघात 27 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार : छत्रपती शाहू शहाजी (काँग्रेस, हात), संजय भिकाजी मागाडे (बसपा, हत्ती), संजय सदाशिव मंडलिक (शिवसेना, धनुष्यबाण), कोगले संदीप भैरवनाथ (देश जनहित पार्टी, बॅट), बी. टी. पाटील (माजी सैनिक) (भारतीय जवान किसान पार्टी, भेटवस्तू), माने अरविंद भिवा (भारतीय राष्ट्रीय दल, कॅरम बोर्ड), शशीभूषण जीवनराम देसाई (अखिल भारत हिंदू महासभा, रोड रोलर), डॉ. सुनील नामदेव पाटील (नॅशनल ब्लॅक पॅंथर पार्टी, गॅस सिलेंडर), संतोष गणपती बिसूरे (अपनी प्रजाहित पार्टी, सीसीटीव्ही कॅमेरा), अपक्ष उमेदवार : इरफान अबूतालीब चांद (हिरवी मिरची), कुदरतुला आदम लतीफ (शिवण यंत्र), कृष्णा हनुमंत देसाई (नारळाची बाग), कृष्णाबाई दीपक चौगुले (हिरा), खाडे बाजीराव नानासो (ऊस शेतकरी), नागनाथ पुंडलिक बेनके (शिट्टी), माधुरी राजू जाधव (प्रेशर कुकर), मुस्ताक अजीज मुल्ला (दूरदर्शन), मंगेश जयसिंग पाटील (इस्त्री), अॅड. यश सुहास हेगडे पाटील (कोट), राजेंद्र बाळासो कोळी (किटली), सलीम नूरमहम्मद बागवान (अंगठी), सुभाष वैजू देसाई (लिफाफा), संदीप गुंडोपंत संकपाळ (बॅटरी टॉर्च).   

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार : रवींद्र तुकाराम कांबळे (बसपा, हत्ती), धैर्यशील संभाजीराव माने (शिवसेना, धन्युष्यबाण), सत्यजित बाबासाहेब पाटील (आबा) सरुडकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मशाल), इम्रान इकबाल खतीब (बहुजन मुक्ती पार्टी, खाट), डॉ. ईश्वर महादेव यमगर (भारतीय लोकशक्ती पार्टी, टीलर), दिनकरराव तुळशीदास चव्हाण (पाटील), (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, सिंह), धनाजी जगन्नाथ गुरव (शिवारेकर) (लोकराज्य जनता पार्टी, ऑटो रिक्षा), डि.सी. पाटील दादासाहेब/दादगोंडा चवगोंडा पाटील (वंचित बहुजन आघाडी, प्रेशर कुकर), रघुनाथ रामचंद्र पाटील (भारतीय जवान किसान पार्टी, भेटवस्तु), राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी (स्वाभिमानी पक्ष, शिट्टी), शरद बाबुराव पाटील, (नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी, गॅस सिलेंडर), संतोष केरबा खोत (कामगार किसान पार्टी, नारळाची बाग), अपक्ष उमेदवार : अस्लम ऐनोद्दिन मुल्ला (चिमणी), आनंदराव तुकाराम थोरात (किटली), आनंदराव वसंतराव सरनाईक, (फौजू बापू) (बॅटरी टॉर्च), जावेद सिंकदर मुजावर, (फुगा), लक्ष्मण श्रीपती डवरी (अंगठी), लक्ष्मण शिवाजी तांदळे, (हिरा), प्रा. परशुराम तम्मान्ना माने (सफरचंद), मनोहर प्रदीप सातपुते (स्पॅनर), महंमद मुबारक दरवेशी (एअर कंडिशनर), अरविंद भिवा माने (कॅरम बोर्ड), देवेंद्र नाना मोहिते (ट्रक), राजेंद्र भिमराव माने (दुरदर्शन), रामचंद्र गोविंदराव साळुंखे (कपाट), शिवाजी धोंडीराम संकपाळ (बॅट), सत्यजित पाटील (आबा) (माईक).
================

गाडीला पाच-पाच झेंडे लावून फिरणाऱ्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये : संजय मंडलिक; आजऱ्यात महायुतीची पदयात्रा व प्रचार सभा

गाडीला पाच-पाच झेंडे लावून फिरणाऱ्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये : संजय मंडलिक; आजऱ्यात महायुतीची पदयात्रा व प्रचार सभा 
आजरा : वृत्तसेवा 

 स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या आमदारकीच्या पहिल्या निवडणुकीत गाडीला पाच-पाच झेंडे लावून फिरत होते. आमदार म्हणून निवडून येण्यासाठी सुरुवातीला हिंदुत्ववाद स्वीकारणारे आता पुरोगामीचा मुखवटा घालून फिरत आहेत. अशा लोकांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, असे टीकास्त्र महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले. ते आजरा येथे महायुतीची पदयात्रा व प्रचार सभेत बोलत होते. खासदार धनंजय महाडिक सभेच्या अध्यक्षस्थानी होते. 
 प्रचार सभेपूर्वी आजरा शहरातून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. स्वागत व प्रास्ताविक अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी यांनी केले. महायुतीचे उमेदवार मंडलिक पुढे म्हणाले, विरोधक इतिहासातीलच गप्पा मारत आहेत. उमेदवारांच्या पेक्षा त्यांचे प्रवक्ते जास्त बोलत आहेत. उमेदवार काहीही बोलत नाहीत त्यामुळे लोकसभेत त्यांच्या नावावर 10-12 माणसे आत येणार का? वयाच्या 75 वर्षानंतर राजकारणात यायचा निर्णय कुणाच्या हट्टापायी घेण्यात आला. विरोधी उमेदवार ज्यावेळी दत्तक आले, त्यावेळी मिळालेल्या मालमत्तेत घट झाली असल्यास आपण खरोखरच वारसदार ठरतय का? याचं आत्मचिंतन होण्याची गरज आहे. आजरा शहराला मिळालेला निधी हा आजऱ्यातील मित्राकडे बघून न देता तमाम आजऱ्यातील नागरिकांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी दिला आहे. संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र, असा टोलाही त्यांनी लगावला. खासदार महाडिक म्हणाले, देश कुणाच्या हाती द्यायचा यासाठी लोकसभेची निवडणूक आहे. काँग्रेसच अजूनही गरिबी हटावचीच भाषा सुरू आहे. काँग्रेसच्या काळात देशात घोटाळ्यांची शृंखला तयार झाली होती. मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही डाग नाही. कागलच्या शाहू ग्रुपचे प्रमुख समरसिंग घाडगे म्हणाले, निवडणूक दोन उमेदवारांची नसून राष्ट्रहिताची निवडणूक आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येकी 10 वर्षाच्या काळातील कार्यकाळाची तुलना होण्याची गरज आहे. आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, नरेंद्र मोदीच्या वाऱ्याचा झंजावत आजरा तालुक्यात वाहत आहे. विरोधकांकडे लोकसभेला उमेदवार नव्हता त्यामुळे तडजोडीचा उमेदवार म्हणून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आजरा तालुक्यातून मंडलिक यांना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी साऱ्यांनी झटून काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजप चंदगड विधानसभा मतदारसंघ प्रमुख शिवाजी पाटील, संग्राम कुपेकर, डॉ. अनिल देशपांडे, विलास नाईक, अनिरुद्ध केसरकर, जितू टोपले, विजय पाटील, दशरथ अमृते, मलिक बुरुड, संजय पाटील, ज्योस्त्ना चराटी, सुधीर कुंभार, अरुण देसाई यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आनंद बल्लाळ यांनी सूत्रसंचालन केले, शंकर टोपले यांनी आभार मानले.
================

Sunday, April 21, 2024

आजरा अर्बन बँकेच्या ३३ व्या बेळगुंदी, ता.जि. बेळगावी शाखेचा मंगळवारी उद्घाटन समारंभ

आजरा अर्बन बँकेच्या ३३ व्या बेळगुंदी, ता.जि. बेळगावी शाखेचा मंगळवारी उद्घाटन समारंभ
आजरा : वृत्तसेवा 

आर्थिक सक्षमतेचे आणि व्यवसाय वाढीचे निकष पूर्ण करीत आजरा अर्बन बँकेची वाटचाल सुरू आहे. या वाटचालीमध्ये नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेने १५०० कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. केवळ व्यवसाय हा निकष न पाहता समाजाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे संस्था आणि शाखा विस्तार हे तत्व संस्थापक स्व. काशिनाथ चराटी (अण्णा) आणि स्व. माधवराव देशपांडे (भाऊ) यानी विचारात घेतले होते. याच विचारांचा पाठपुरावा करत विद्यमान संचालक मंडळाने कर्नाटक राज्यामध्ये बेळगुंदी ता. जि. बेळगावी येथे शाखा विस्ताराचा प्रस्ताव ठेवला आणि मंगळवार दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी सर्व अद्ययावत सेवासह या शाखेचे उद्घाटन होत आहे. आजरा बँकेची ही ३३ वी शाखा आहे. या भागात छोटे उद्योग आणि व्यवसाय उभे रहावेत आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळावी हा दृष्टीकोन बँकेच्या व्यवस्थापनाने ठेवला आहे. उद्घाटनाच्या दिवशी पूजा आणि तीर्थप्रसादाचे आयोजन केले आहे त्याला बँकेचे सर्व ग्राहक, सभासद आणि हितचिंतक यांनी उपस्थित राहावे असे आग्रहाचे निमंत्रण आण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी, अध्यक्ष रमेश कुरुणकर, उपाध्यक्ष सुनील मगदुम, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, अस्मिता सबनिस, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केला आहे.
===============

Saturday, April 20, 2024

संभाजीराजे छत्रपती यांचा तीन दिवसाचा आजरा तालुका दौरा

संभाजीराजे छत्रपती यांचा तीन दिवसाचा आजरा तालुका दौरा 
 आजरा : वृत्तसेवा 

इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ  माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे तीन दिवस आजरा तालुका दौऱ्यावर आहेत. रविवार दि. 21 ते मंगळवार दि. 23 पर्यंत संभाजीराजे छत्रपती आजरा तालुक्यातील ग्रामीण भाग व वाड्या वस्त्यावर संपर्क दौरा करणार आहेत. या तीन दिवसीय दौऱ्याचे नेटके नियोजन आजरा तालुक्यातील महाविकास आघाडी कडून करण्यात आले आहे. संभाजीराजे छत्रपती यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे : रविवार दिनांक 21 एप्रिल 2024 : लाकूडवाडी (सकाळी 8.30), सुळे (9.00), गजरगाव (9.30), सरंबळवाडी (10.00), कानोली (10.30), मलीग्रे-कागीणवाडी (11.00), कोळींद्रे-पोश्रातवाडी (11.30), शिरसंगी (दुपारी 12.30), वाटंगी-मोरेवाडी (1.30), चाफवडे (2.00), चितळे-भावेवाडी-जेऊर (4.00), कासार कांडगाव (5.00), पोळगाव (5.30), एरंडोल-सातेवाडी (सायंकाळी 6.00), लाटगाव (6.30), खानापूर-रायवाडा (7.00), देऊळवाडी (7.30), विटे (रात्री 8.00) आवंडी धनगरवाडा (8.30). सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 :  सरोळी (सकाळी 8.30), निगुडगे (9.00), कोवाडे (9.30), पेद्रेवाडी-हाजगोळी बुद्रुक-हाजगोळी खुर्द (10.00), हत्तीवडे (11.00), होनेवाडी (11.30), मेंढोली (दुपारी 12.00), बोलकेवाडी (12.30),  चित्रानगर (1.00) बुरुडे-भटवाडी (1.30), मुरुडे (2.00), सुलगाव-चांदेवाडी (2.30), सोहाळे (4.00), साळगाव (4.30), पेरणोली (5.00), हरपवडे-कोरीवडे (5.30), देवकांडगाव-विनायकवाडी (सायंकाळी 6.00), दाभील (6.30), शेळप-शेळपवाडी (7.00), खेडगे- पारपोली गावठाण (7.30), मुंगूसवाडी (रात्री 8.30), खेडे (9.00). मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 : भादवणवाडी (सकाळी 8.30), भादवन (9.00), मडिलगे (9.30), वडकशिवाले  (10.00), महागोंड (10.30), वझरे (11.00), होण्याळी (11.30), करपेवाडी (दुपारी 12.00), चव्हाणवाडी (12.30), चिमणे (1.00), बेलेवाडी (1.30), झुलपेवाडी (2.00), धामणे (3.30), पेंढारवाडी (4.00), आरदाळ (4.30), हालेवाडी (5.00), मुमेवाडी (5.30), बहिरेवाडी (सायंकाळी 6.00), उत्तूर (6.30). याप्रमाणे नियोजन करण्यात आले असून इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्ते व नेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन इंडिया आघाडीचे निमंत्रक यांनी केले आहे.
==============

Thursday, April 18, 2024

आजरा तालुक्यात घनसाळ, बांबू, काजू संशोधन केंद्र निर्माण करणार : शाहू महाराज छत्रपती; आजरा तालुक्याच्या विविध गावात संपर्क दौरा

आजरा तालुक्यात घनसाळ, बांबू, काजू संशोधन केंद्र निर्माण करणार : शाहू महाराज छत्रपती; आजरा तालुक्याच्या विविध गावात संपर्क दौरा 
आजरा : वृत्तसेवा 

आजरा तालुका घनसाळ तांदूळ, काजू व बांबू पिकासाठी प्रसिद्ध आहे. या पिकांच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी प्रयत्नशील अजून त्यासाठी आजरा तालुक्यात घनसाळ तांदूळ, बांबू व काजू पिकांचे संशोधन केंद्र निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदार संघांचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी केले. ते पेरणोली (ता. आजरा) येथे संपर्क सभेप्रसंगी बोलत होते. शाहू महाराज गुरुवारी दिवसभर आजरा तालुक्याच्या संपर्क दौऱ्यावर होते. या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

शाहू महाराज पुढे म्हणाले, राज्यात सध्या अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्याची अधोगती झालेली आहे. यामुळे सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आजरा तालुक्यातील पर्यटनाला चालना देऊन रोजगार निर्मिती कशी होईल याकडेही लक्ष दिले जाईल. सर्वच पिकांना हमीभाव मिळाला पाहिजेत, याकरिता प्रयत्न करून काजू बोंडू प्रक्रिया उद्योग उभा करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले, जनतेची फसवणूक करून भाजप सरकार सत्तेत आले आहे. गेल्या दहा वर्षात कोणतेही आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले, खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केला आहे. शाहू महाराजांच्या रूपाने कोल्हापूरचा बुलंद आवाज लोकसभेत पाठवूया. प्रास्ताविकात कॉ. संपत देसाई म्हणाले, या निवडणुकीच्या माध्यमातून देशाचे भवितव्य घडणार आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. संविधान बदलण्याचे काम अलीकडच्या दहा वर्षात सुरू झाले आहे. लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचे हात चिन्ह घराघरापर्यंत पोहचूया. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, गोकुळ संचालिका अंजना रेडेकर, उदयराज पवार, शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उमेश आपटे, राजेंद्र सावंत, अभिषेक शिंपी, रवींद्र भाटले, संकेत सावंत, सरपंच प्रियांका जाधव, भारती डेळेकर, विक्रम देसाई, सचिन घोरपडे, युवराज पोवार, हरिबा कांबळे, अशोक तर्डेकर, हर्षल सुर्वे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. पांडुरंग दोरुगडे यांनी सूत्रसंचालन केले. उत्तम देसाई यांनी आभार मानले. 
==============

मोदींच्या गॅरंटीचा जाहीरनामा घरोघरी पोहोचवा : राजे समरजितसिंह घाटगे; भादवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा

मोदींच्या गॅरंटीचा जाहीरनामा घरोघरी पोहोचवा : राजे समरजितसिंह घाटगे; भादवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा
आजरा : वृत्तसेवा 

शेतकरी, महिला, युवा वर्ग व गरीब नागरिकांच्या सशक्तीकरणासह देशाला महासत्ता बनवणारा भाजपचा जाहीरनामा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीचा हा जाहीरनामा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. भादवण (ता.आजरा)येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भादवण पंचायत समिती मतदार संघातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास भादवण, भादवणवाडी, खोराटवाडी, मासेवाडी, मडिलगे, हालेवाडी, वझरे, अर्दाळ, महागोंड, होन्याळी, चिमणे या गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी  भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवड पत्राचे वाटप घाटगे यांच्या हस्ते केले.

घाटगे  पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप  सरकारने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले अयोध्येत  श्रीराम मंदिर उभारणे, काश्मीरमधील 370 कलम हटवणे यासारखे महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावले. विकसित भारताची संकल्पना घेऊन नरेंद्र मोदी अहोरात्र कार्यरत आहे. त्यांच्या स्वप्नातील बलशाली भारत जागतिक महासत्ता बनवण्यासाठी एक-एक खासदार महत्त्वाचा आहे. त्यासाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून देऊया. यावेळी तुळशीदास मुळीक, सूर्यकांत पाटील, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य विठ्ठल उत्तुरकर, डॉ. जी. एच. केसरकर, संदीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय मुळीक, संदीप गुरव, प्रविण लोकरे, मंदार हाळवणकर, संदीप पाटील, ज्योतिबा नांदवडेकर, संजय चौगुले, डॉ.बबन बारदेसकर, संदीप देसाई, गणपतराव पाटील, अनिल खोराटे, धनाजी खवरे, राजू इंगळे, श्रीमंत कदम, जालंदर येसणे, प्रदीप लोकरे आदी उपस्थित होते. स्वागत हरीश देवरकर यांनी केले. आभार जिल्हा उपाध्यक्ष शैलेश मुळीक यांनी मानले.
==================

Wednesday, April 17, 2024

लोकसभा निवडणूक मतदानासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्टी

लोकसभा निवडणूक मतदानासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्टी

कोल्हापूर : वृत्तसेवा 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठीचे मतदान दिनांक 7 मे 2024 रोजी होणार आहे. या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली आहे. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच ही अधिसूचना राज्य व केंद्र शासनाची सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील, असेही या अधिसुचनेत स्पष्ट करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.
================

Saturday, April 13, 2024

शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीच्या वतीने आजरा शहरात प्रचार फेरी

 शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीच्या वतीने आजरा शहरात प्रचार फेरी 

आजरा : वृत्तसेवा 

 इंडिया आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीच्या वतीने आजरा शहरात प्रचारफेरी काढण्यात आली. शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रचार पत्रकाचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिकांना इंडिया आघाडीची भूमिका सांगण्यात आली. तसेच आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते  जयवंतराव शिंपी, नगरसेवक किरण कांबळे, संजयभाऊ सावंत, अमित खेडेकर, इम्रान सोनेखान, मंजूर मुजावर, संभाजी पाटील, युवराज पोवार, विक्रमसिंह देसाई , रवी भाटले, कॉ. संपत देसाई , विक्रम पटेकर, ओंकार माद्याळकर यांच्यासह मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते सहभागी होते.
=============

Thursday, April 11, 2024

गोकुळच्या दूध विक्रीचा रमजान ईद दिनी नवा उच्चांक; गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा कर्मचाऱ्यांकडून सत्कार

गोकुळच्या दूध विक्रीचा रमजान ईद दिनी नवा उच्चांक; गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा कर्मचाऱ्यांकडून सत्कार
कोल्हापूर : वृत्तसेवा 

गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी २२ लाख ३१ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली हि सर्वाधिक दूध विक्री आहे. या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन २० लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय, दूध उत्‍पादक व ग्राहकांच्‍या विश्‍वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्‍य करू असा विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलताना चेअरमन डोंगळे म्हणाले कि, गोकुळने उत्‍पादक व ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जास्‍तीत जास्‍त लाभ करून देण्‍यासाठी नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे. याचे फलित म्हणून गोकुळच्‍या दररोजच्‍या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्‍याने वाढ होत आहे. रमजान ईद या दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्‍या दूध विक्रीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित झाला. रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण.  या दिवशी दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावेळी २२ लाख ३१ हजार २८४ लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात झाली. गेल्यावर्षी रमजान ईदला २० लाख ६३ हजार ६९२ लिटर्स दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये १ लाख ६७ हजार ५९२ लिटरची वाढ झाली. तसेच गुढीपाडव्यानिमित्य श्रीखंड व बासुंदी विक्री मध्ये उच्चांकी वाढ झाली.

           “गोकुळने दूध विक्रीमध्ये नवीन मानदंड निर्माण केला असून गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. या यशामध्‍ये गोकुळचे दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक, दुधसंस्था, कर्मचारी, अधिकारी व वाहतूक ठेकेदारांचे मोलाचे योगदान आहे. यामुळे ही सगळी मंडळी कौतुकास पात्र आहेत. म्‍हणून मी त्‍यांना संचालक मंडळाच्‍यावतीने धन्‍यवाद देतो.” असे चेअरमन डोंगळे यांनी स्‍पष्‍ट केले. तसेच रमजान ईद व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, वितरक, व संघाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.पी.पाटील यांनी केले तर डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी आभार मानले. तसेच मार्केटिंग सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संचालक बाळासो खाडे, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील, संगणक व्यवस्थापक अरविंद जोशी, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. प्रकाश साळोखे, संकलन व्‍यवस्‍थापक एस. व्ही. तुरंबेकर, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
=====================

Tuesday, April 9, 2024

आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त ४ कोटी ५१ लाखाच्या ठेवी जमा

आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त ४ कोटी ५१ लाखाच्या ठेवी जमा
आजरा : वृत्तसेवा 

दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ४ कोटी ५१ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाले असल्याची माहिती अध्यक्ष रमेश कुरुणकर यांनी दिली. अध्यक्ष कुरुणकर पुढे म्हणाले, ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेला एकूण ढोबळ नफा १२ कोटी १८ लाख इतका झाला आहे. याबाबत बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले व सर्वांना बँकेच्या वतीने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
===================

काँग्रेसचे चिन्ह घराघरात पोहचवा : सतेज पाटील; आज-यात इंडिया आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

काँग्रेसचे चिन्ह घराघरात पोहचवा : सतेज पाटील; आज-यात इंडिया आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
आजरा : वृत्तसेवा 

 लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी आघाडीवर असून शाहु महाराजांना विजयी करण्यासाठी काँग्रेसचे चिन्ह घराराघरात कार्यकर्त्यांनी पोहचवावे असे अवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले. आजरा येथील इंडिया आघाडीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
                  
आमदार पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यात तीन लाख मतदारांना शाहु महाराज निवडणूकीसाठी उभे असल्याचे सर्व्हेक्षणातून माहीती मिळाली आहे. मात्र त्यांच्यापर्यंत चिन्ह पोहचवण्याची आवश्यकता आहे. आज-यातील कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्याचप्रमाणे संपर्क कार्यालय सुरू करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. यावेळी काँ.संपत देसाई यांनी स्वागत करून प्रचाराची पार्श्वभूमी सांगितली. याप्रसंगी मुकुंदराव देसाई, अंजना रेडेकर, उमेश आपटे, उदयराज पोवार, संभाजी पाटील, अभिषेक शिंपी, अशोक तर्डेकर, संजय सावंत, रशिद पठाण, राजेंद्र सावंत, युवराज पोवार, संजय तर्डेकर, कृष्णा सावंत, नौशाद बुढेखान, विजय गुरव, संकेत सावंत, रविंद्र भाटले, किरण आमणगी, संजय उत्तूरकर, विक्रम देसाई, किरण कांबळे, राजू देसाई, संजय येसादे आदी उपस्थित होते.  राजू होलम यांनी आभार मानले.
==================

Saturday, April 6, 2024

इंडिया आघाडीला आजऱ्याच्या ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद; पश्चिम दक्षिण दुर्गम भागातील ४५ गावांचा संपर्क दौरा पूर्ण

इंडिया आघाडीला आजऱ्याच्या ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद; पश्चिम दक्षिण दुर्गम भागातील ४५ गावांचा संपर्क दौरा पूर्ण

आजरा : वृत्तसेवा 

 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघतील इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आजरा तालुक्यातील पश्चिम-दक्षिण विभागातील ४५ दुर्गम वाड्यावस्त्यांचा इंडिया आघाडीचा जनसंपर्क दौरा पूर्ण झाला. या दौऱ्याचे नियोजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाअध्यक्ष मुकुंद देसाई, राष्ट्रीय कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश आपटे, श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, गोकुळ संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख युवराज पवार, माजी सभापती उदयराज पवार, अभिषेक शिंपी, नौशाद बुडडेखान, राजू होलम, कॉ. संजय तर्डेकर, संजयभाऊ सावंत, राजू देसाई, वंचित बहुजन आघाडीचे संतोष मासाळे,  इंडिया आघाडी समन्वयक रविंद्र भाटले यांनी केले होते. 
        
आजरा तालुक्यातील पेरणोली येथून या दौऱ्याला सुरवात झाली. पश्चिम दक्षिण भागातील ४५ दुर्गम वाड्यावस्त्यांवर मतदारांशी थेट संपर्क साधत गाव बैठका घेऊन इंडिया आघाडीची भूमिका मतदारांपर्यंत पोहाचवण्यावर भर देण्यात आला. या छोट्या बैठकांना लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याने इंडिया आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला आहे. चितळे धनगरवाडा येथून जेष्ठ नेते जयवंतराव शिंपी यांच्या उपस्थितीत चौथ्या दिवसाच्या दौऱ्याला सुरवात झाली. भावेवाडी, चितळे, जेऊर, चाफवडे, कासारकांडगाव, परोली येथे मतदारांशी थेट संपर्क साधत गावबैठका झाल्या. इंडिया आघाडीचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र सावंत, विक्रम देसाई, विलास पाटील, रणजीत देसाई, अशोक पवार, राजू देसाई, संकेत सावंत, उत्तम देसाई, सुरेश कालेकर, प्रकाश मोरुस्कर, युवराज जाधव, जोतीबा चाळके, संतोष पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.
======================

खासदार संजय मंडलिक यांना आजरा तालुक्यातून मताधिक्य देण्याचा शिवसैनिकांचा निर्धार

खासदार संजय मंडलिक यांना आजरा तालुक्यातून मताधिक्य देण्याचा शिवसैनिकांचा निर्धार 
आजरा : वृत्तसेवा 

 विकास कामांचा डोंगर उभा करणाऱ्या खासदार संजय मंडलिक यांना लोकसभा निवडणुकीत आजरा तालुक्यातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. आजरा येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर होते. यावेळी शिवसेनेचे कोल्हापुर लोकसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार संजय मंडलीक यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यात आले.

यावेळी आमदार आबिटकर यांनी लोकसभेसाठी खासदार मंडलिक हेच योग्य उमेदवार असल्याचे सांगत जिल्ह्याला विकासाच्या आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी खासदार मंडलिक प्रयत्नशील असल्याचे सांगितले. संपूर्ण आजरा तालुक्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात आपण जनतेशी संवाद साधणार आहोत. तालुक्यातील प्रत्येक गावातून धनुष्यबाण चिन्हाला जास्तीत जास्त मताधिक्य देऊन खासदार मंडलिक यांना विजयी करण्याची आवाहन त्यांनी केले. तसेच कोणत्याही गावाला विकास निधीसाठी कमी पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

स्वागत व प्रास्तावीकामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील म्हणाले, खासदार मंडलिक यांनी गेल्या पाच वर्षामध्ये आजरा शहराबरोबरच ग्रामीण भागाला 27 कोटी रुपयांचा निधी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेमधून दिला परंतु त्याची कधी जाहीरातबाजी केली नाही. त्याचबरोबर आगामी काळातही निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाला शिवसेनेचे उपतालुका प्रमख काका देसाई, आनिल डोंगरे, विभाग प्रमुख संजय शेणवी, प्रकाश पाटील, युवराज पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य दत्ता पाटील, साळगाव सरपंच धनंजय पाटील, रणजीत सरदेसाई, कृषी कमीटीचे अध्यक्ष इंद्रजीत देसाई, शहर प्रमख विजय थोरवत, संतोष भाटले, संपर्कप्रमुख जितेंद्र भोसले यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. आभार गोविंद गुरव यांनी मानले.
==============

Wednesday, April 3, 2024

लोकशाही टिकवायची असेल तर भाजपला सत्तेतून हद्दपार करा; जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उमेश आपटे यांचे आवाहन

लोकशाही टिकवायची असेल तर भाजपला सत्तेतून हद्दपार करा; जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उमेश आपटे यांचे आवाहन  

 आजरा वृत्तसेवा :
   
लोकसभेची निवडणूक ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ही कांही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, त्यामुळे या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहून लोकशाही टिकवायची असेल तर भाजपला सत्तेतून हद्दपार करा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी  अध्यक्ष उमेश आपटे यांनी केले. ते किटवडे ता. आजरा येथून चालू झालेल्या जनसंपर्क यात्रेत बोलत होते.  ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले कि २०१४ साली लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाने लोकांची फसवणूक केली आहे. महागाईने कळस केला आहे. आरोग्य शिक्षणापासून सर्वच व्यवस्था शासन मोडायला निघाले आहे. हे थांबवायचं असेल तर भाजपा आणि त्यांच्या मित्रापक्षाना सत्तेतून हद्दपार केलेच पाहिजे. 
        
श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. संपत देसाई म्हणाले, भाजप जाती-धर्मात फुट पडून आपली सत्तेची पोळी हे भाजत आहेत. आपल्या जगण्या मारण्याच्या प्रश्नावर लोक एकत्र येउच नयेत यासाठी धर्म जातीचा उपयोग केला जात आहे. याला आवरायचं असेल तर यावेळी भाजपा आणि मित्र पक्षाचा पराभव केलाच पाहिजे. 
        
राष्ट्रवादीचे मुकुंददादा देसाई म्हणाले, इंडिया आघाडीचे उमेदवार राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा असलेले, सर्व जातीधर्मातील स्त्री-पुरुषांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहेत म्हणूनच आपण एक दिलाने त्यांच्या पाठीशी राहून त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवूया...
            
यावेळी गोकुळ संचालिका अंजना रेडेकर, युवराज पवार, अभिषेक शिंपी यांनीही मनोगते व्यक्त केली. किटवडे येथून सुरु झालेली जनसंपर्क मोहीम लिंगवाडी, आंबाडे, घाटकरवाडी, धनगरमोळा, गवसे येथे सभा घेऊन सांगता झाली. या जनसंपर्क यात्रेत उदयराज पवार, रणजीत देसाई, प्रकाश मोरुस्कर, गोविंद पाटील, संकेत सावंत  उत्तम देसाई, शिवाजी पाटील, महादेव हेब्बालकर, सहदेव प्रभू, संतोष पाटील, विक्रम देसाई, दिनेश कुरुणकर,  विलास पाटील, अशोक पोवार हे या जनसंपर्क यात्रेत सहभागी झाले होते. इंडिया आघाडीचे तालुका समन्वयक रवींद्र भाटले यांनी आभार मानले.
=============

Monday, April 1, 2024

आजरा अर्बन बँकेला 12 कोटी 18 लाखाचा ढोबळ नफा

आजरा अर्बन बँकेला 12 कोटी 18 लाखाचा ढोबळ नफा 
 आजरा वृत्तसेवा :

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये आजरा अर्बन बँकेने गतवर्षी पेक्षा १०० कोटी रुपयांने ठेवीमध्ये वाढ केली असून एकूण व्यवसायामध्ये १९२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय १५१८ कोटी झाला आहे. याच बरोबरीने निव्वळ एनपीएचे प्रमाण है शून्य टक्के राखण्यात यश मिळवले असून ढोबळ एनपीए ३.९२  टक्के आहे. या आर्थिक वर्षामध्ये सर्व सेवकाना १० टक्के ते २५ टक्यापर्यन्त भरघोस पगार वाढ देवून सुद्धा नफ्यामध्ये सातत्यपणा ठेवलेला आहे. बँकेचा एकूण ढोबळ नफा १२ कोटी १८ लाख इतका झाला आहे. हे बँकेचे यश सभासद, हितचिंतक, ग्राहक व कर्मचारी यांना समर्पित आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर यांनी दिली. 
अध्यक्ष कुरुणकर पुढे म्हणाले, बँकेची स्थापना झालेनंतर २०१७ साली बँकेला मल्टीस्टेट दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे बँकेचा कार्यविस्तार हा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये झाला आहे. याचबरोबर पुढील आर्थिक वर्षात बँकेच्या २ शाखा महाराष्ट्र राज्यात व १ शाखा कर्नाटक राज्यात सुरू होत आहे. पुढील वर्षात याच्या बरोबरीने शेड्यूल्ड दर्जा प्राप्त करण्याचे ध्येय हे बँकेच्या संचालक मंडळाने समोर ठेवले आहे. अर्बन बँकामधून सर्व निकषामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केले बद्दल (ठेवी रु.८०० कोटी च्या वरील बँक) अविस पब्लिकेशन याचे मार्फत दिला जाणारा "बँको ब्लू रिबन -२०२३" हा पुरस्कार मिळाला आहे. या वर्षी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यामध्ये सातत्य राखण्याचे काम हे बँकेचे हितचिंतक, सभासद, ठेवीदार, कर्जदार यानी दाखविलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले असल्याचे बँकेचे अध्यक्ष कुरुणकर यांनी सांगितले. उपाध्यक्ष सुनील मगदूम म्हणाले, बँकेच्या या यशामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अविरत काम केल्यामुळेच बँकची प्रगती झालेली आहे. 
अण्णाभाऊ संस्था समूहप्रमुख अशोक अण्णा चराटी म्हणाले, सातत्याने विविध नवीन योजना आपल्या सभासद आणि ग्राहकांच्या सेवेसाठी संचालक मंडळ नेहमीच प्राधान्याने उपक्रम राबवत आहेत. बॅंकेने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध अनुदानाच्या योजना राबविल्या आहेत. तसेच नुकतेच बँकेने Whatsapp Banking व Frictionless Customer Onboarding या सुविधांचा शुभारंभ केला असून Whatsap Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्प खात्याचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत. तसेच Frictionless Customer Onboarding च्या माध्यमातून कोणत्याही कागदपत्राशिवाय सेव्हिग व चालू खाते उघडता येईल. भविष्यात याच सुविधेवरून बँकेतील ग्राहकांना मोबाईल वरून खाते उघडणेची सोय करणेचा बँकेचा मानस असल्याचे चराटी यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसायासाठी तयार करणे आणि त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देखील बँकेच्या माध्यमातून देण्याचा संकल्प ज्येष्ठ संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपाडे, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, अस्मिता सबनिस, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅड सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केला आहे. यावेळी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर व सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.

आजरा अर्बन बँकेची 31 मार्च 2024 अखेरची स्थिती :

 भाग भांडवल : 17 कोटी 69 लाख 76 हजार 
 ठेवी : 899 कोटी 2 लाख 90 हजार  
 कर्जे : 618 कोटी 53 लाख 21 हजार 
 मिश्र व्यवसाय : 1517 कोटी 56 लाख 11 हजार 
 सीडी रेशो : 69 टक्के 
 ढोबळ एनपीए : 24 कोटी 27 लाख 15 हजार 
 ढोबळ एनपीए प्रमाण : 3.92 टक्के 
 निव्वळ एनपीए प्रमाण : 0 टक्के 
 ढोबळ नफा : 12 कोटी 17 लाख 98 हजार 

================

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...