Saturday, April 27, 2024

गद्दार खासदारांना उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक मूठमाती देतील : आमदार भास्कर जाधव; आजऱ्यात महाविकास आघाडीची प्रचार सभा

गद्दार खासदारांना उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक मूठमाती देतील : आमदार भास्कर जाधव; आजऱ्यात महाविकास आघाडीची प्रचार सभा 
आजरा वृत्तसेवा :

 भाजप हा सत्तेसाठी हापापलेला पक्ष आहे. विरोधी पक्षातील माणसे फोडून प्राप्त केलेली सत्ता हा भाजपच्या विचारांचा पराभव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदारांनी गद्दारी केली आहे, त्यामुळे गेल्यावेळी त्यांच्या विजयासाठी राबलेला उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकच त्यांना या निवडणुकीत मुठमाती देतील, अशी प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. ते आजरा येथे महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचार सभेत बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
 राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार भास्कर जाधव पुढे म्हणाले, एक पक्ष विरुद्ध अखंड देश अशी सध्याची निवडणूक आहे. यामध्ये देश जिंकला पाहिजे. मणिपूर येथील घटना घडवून कित्येक महिन्यांचा कालावधी लोटला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही मणिपूरला गेलेले नाहीत. देशातील 140 कोटी जनतेला आपला परिवार मानणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या परिवारात मणिपूरमधील भगिनी येत नाहीत का? असा सवाल करत आमदार जाधव पुढे म्हणाले, शेतीशी संबंधित विविध घटकातून वर्षाला लाखो रुपये वसूल करून शेतकऱ्याच्या सन्मानासाठी सहा हजार रुपये दिल्याचा देखावा सुरू आहे. सध्या जातीय दंगली घडवून राजकारण करण्याचा डाव खेळला जात आहे. देशात सगळ्यात जुमला चालू आहे. आमदार बंटी पाटील म्हणाले, आजरा तालुक्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्वाभिमानाच्या लढाईत नेहमी तालुकावासियांच्या सोबत राहणार आहे. विद्यमान खासदारांनी पाच वर्षात आजरा तालुक्यात ढुंकूनही बघितले नाही तसेच तालुक्याच्या कुठल्याही प्रश्नाबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर शेती अवजारांवरील जीएसटी रद्द केला जाईल. या निवडणुकीत पक्ष फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहनही त्यांनी केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, सध्या समाजात निर्माण झालेली विषमता दूर करण्यासाठी समतेचा विचार महत्त्वाचा आहे. आजरा तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहणार आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, डॉ. नंदाताई बाभुळकर, कॉ. संपत देसाई, गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजना रेडेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे, युवा नेते अभिषेक शिंपी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष युवराज पोवार, सर्व श्रमिक संघटनेचे अतुल दिघे, दयानंद भोपळे, भैरवी सावंत, समीर चांद यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुनील शिंत्रे, विनायक उर्फ अप्पी पाटील, जयवंतराव शिंपी, रामराजे कुपेकर, संभाजी पाटील, राजेंद्र सावंत, उदयराज पवार, किरण कांबळे, संकेत सावंत, विक्रम देसाई, रवींद्र भाटले, संजय तरडेकर, राजू होलम, दयानंद कांबळे, डी. के. कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सुधीर येसने यांनी सूत्रसंचालन केले. संतोष मासोळे यांनी आभार मानले.
==============  

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...