आजरा तालुक्यात घनसाळ, बांबू, काजू संशोधन केंद्र निर्माण करणार : शाहू महाराज छत्रपती; आजरा तालुक्याच्या विविध गावात संपर्क दौरा
आजरा : वृत्तसेवा
आजरा तालुका घनसाळ तांदूळ, काजू व बांबू पिकासाठी प्रसिद्ध आहे. या पिकांच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी प्रयत्नशील अजून त्यासाठी आजरा तालुक्यात घनसाळ तांदूळ, बांबू व काजू पिकांचे संशोधन केंद्र निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदार संघांचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी केले. ते पेरणोली (ता. आजरा) येथे संपर्क सभेप्रसंगी बोलत होते. शाहू महाराज गुरुवारी दिवसभर आजरा तालुक्याच्या संपर्क दौऱ्यावर होते. या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शाहू महाराज पुढे म्हणाले, राज्यात सध्या अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्याची अधोगती झालेली आहे. यामुळे सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आजरा तालुक्यातील पर्यटनाला चालना देऊन रोजगार निर्मिती कशी होईल याकडेही लक्ष दिले जाईल. सर्वच पिकांना हमीभाव मिळाला पाहिजेत, याकरिता प्रयत्न करून काजू बोंडू प्रक्रिया उद्योग उभा करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले, जनतेची फसवणूक करून भाजप सरकार सत्तेत आले आहे. गेल्या दहा वर्षात कोणतेही आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले, खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केला आहे. शाहू महाराजांच्या रूपाने कोल्हापूरचा बुलंद आवाज लोकसभेत पाठवूया. प्रास्ताविकात कॉ. संपत देसाई म्हणाले, या निवडणुकीच्या माध्यमातून देशाचे भवितव्य घडणार आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. संविधान बदलण्याचे काम अलीकडच्या दहा वर्षात सुरू झाले आहे. लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचे हात चिन्ह घराघरापर्यंत पोहचूया. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, गोकुळ संचालिका अंजना रेडेकर, उदयराज पवार, शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उमेश आपटे, राजेंद्र सावंत, अभिषेक शिंपी, रवींद्र भाटले, संकेत सावंत, सरपंच प्रियांका जाधव, भारती डेळेकर, विक्रम देसाई, सचिन घोरपडे, युवराज पोवार, हरिबा कांबळे, अशोक तर्डेकर, हर्षल सुर्वे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. पांडुरंग दोरुगडे यांनी सूत्रसंचालन केले. उत्तम देसाई यांनी आभार मानले.
==============
No comments:
Post a Comment