गाडीला पाच-पाच झेंडे लावून फिरणाऱ्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये : संजय मंडलिक; आजऱ्यात महायुतीची पदयात्रा व प्रचार सभा
स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या आमदारकीच्या पहिल्या निवडणुकीत गाडीला पाच-पाच झेंडे लावून फिरत होते. आमदार म्हणून निवडून येण्यासाठी सुरुवातीला हिंदुत्ववाद स्वीकारणारे आता पुरोगामीचा मुखवटा घालून फिरत आहेत. अशा लोकांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, असे टीकास्त्र महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले. ते आजरा येथे महायुतीची पदयात्रा व प्रचार सभेत बोलत होते. खासदार धनंजय महाडिक सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रचार सभेपूर्वी आजरा शहरातून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. स्वागत व प्रास्ताविक अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी यांनी केले. महायुतीचे उमेदवार मंडलिक पुढे म्हणाले, विरोधक इतिहासातीलच गप्पा मारत आहेत. उमेदवारांच्या पेक्षा त्यांचे प्रवक्ते जास्त बोलत आहेत. उमेदवार काहीही बोलत नाहीत त्यामुळे लोकसभेत त्यांच्या नावावर 10-12 माणसे आत येणार का? वयाच्या 75 वर्षानंतर राजकारणात यायचा निर्णय कुणाच्या हट्टापायी घेण्यात आला. विरोधी उमेदवार ज्यावेळी दत्तक आले, त्यावेळी मिळालेल्या मालमत्तेत घट झाली असल्यास आपण खरोखरच वारसदार ठरतय का? याचं आत्मचिंतन होण्याची गरज आहे. आजरा शहराला मिळालेला निधी हा आजऱ्यातील मित्राकडे बघून न देता तमाम आजऱ्यातील नागरिकांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी दिला आहे. संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र, असा टोलाही त्यांनी लगावला. खासदार महाडिक म्हणाले, देश कुणाच्या हाती द्यायचा यासाठी लोकसभेची निवडणूक आहे. काँग्रेसच अजूनही गरिबी हटावचीच भाषा सुरू आहे. काँग्रेसच्या काळात देशात घोटाळ्यांची शृंखला तयार झाली होती. मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही डाग नाही. कागलच्या शाहू ग्रुपचे प्रमुख समरसिंग घाडगे म्हणाले, निवडणूक दोन उमेदवारांची नसून राष्ट्रहिताची निवडणूक आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येकी 10 वर्षाच्या काळातील कार्यकाळाची तुलना होण्याची गरज आहे. आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, नरेंद्र मोदीच्या वाऱ्याचा झंजावत आजरा तालुक्यात वाहत आहे. विरोधकांकडे लोकसभेला उमेदवार नव्हता त्यामुळे तडजोडीचा उमेदवार म्हणून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आजरा तालुक्यातून मंडलिक यांना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी साऱ्यांनी झटून काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजप चंदगड विधानसभा मतदारसंघ प्रमुख शिवाजी पाटील, संग्राम कुपेकर, डॉ. अनिल देशपांडे, विलास नाईक, अनिरुद्ध केसरकर, जितू टोपले, विजय पाटील, दशरथ अमृते, मलिक बुरुड, संजय पाटील, ज्योस्त्ना चराटी, सुधीर कुंभार, अरुण देसाई यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आनंद बल्लाळ यांनी सूत्रसंचालन केले, शंकर टोपले यांनी आभार मानले.
================
No comments:
Post a Comment