संभाजीराजेंना खासदारकी देऊन गादीचा मान कसा राखला जातो हे पंतप्रधान मोदींनी दाखवून दिले : नाथ देसाई; अर्जुन आबिटकर यांचा आजरा तालुक्यात प्रचार दौरा
आजरा : वृत्तसेवा
युवराज संभाजीराजे यांना भाजपने राष्ट्रपती नियुक्त खासदार करून कोल्हापूरचा व कोल्हापूरच्या गादीचा सन्मान केला आहे. त्यामुळे गादीचा सन्मान कसा केला जातो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून दिले आहे. कोल्हापूरच्या गादी विषयी आम्हाला आदर असल्यामुळे गादीच्या मान राखण्याविषयी कोणी आम्हाला शिकवण्याची गरज नाही, असा घणाघात आजरा तालुका भाजपचे युवा नेते नाथ देसाई यांनी केला. ते साळगाव (ता. आजरा) येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार सभेत बोलत होते. जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
केदारलिंग सेवा संस्था अध्यक्ष आनंदराव कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी अर्जुन आबिटकर म्हणाले, खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासनिधी आणला आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूर मधून संजय मंडलिक यांना मोठया मताधिक्याने विजयी करा. मताधिक्य देण्यामध्ये आजरा तालुका अग्रेसर राहिला पाहिजे. नाथ देसाई पुढे म्हणाले, संभाजीराजे लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असताना शाहू महाराजांना उमेदवारी देऊन घरामध्ये भांडणे लावण्याचे काम केले. कोल्हापूरच्या गादीचा जर मानच राखायचा होता तर डी वाय पाटील यांना ज्यावेळी राज्यपाल केले त्यावेळी शाहू महाराजांना राज्यपाल का केले नाही असा सवाल उपस्थित केला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार म्हणाले, पंतप्रधान मोदींनी आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत राम मंदिर उभारणी, 370 कलम हटवणे, 80 कोटी जनतेला पाच वर्षे मोफत रेशन वाटप, शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेचा निधी, आयुष्यमान भारत ही आरोग्याची योजना अशा विविध उपक्रमातून सर्वसामान्यांचे जीवनमान सुखकर करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, शिवसेना तालुकाध्यक्ष संजय पाटील, परशुराम बामणे, प्रकाश पाटील, सरपंच धनंजय पाटील, उपसरपंच उषा नावलकर, ग्रामपंचायत सदस्य बबन भंडारी, स्वप्नाली केसरकर, जितेंद्र भोसले, विजय थोरवत, संतोष भाटले, सुनील दिवेकर, दयानंद निउंगरे, अश्विन डोंगरे, राजू कुंभार, राजाराम पाटील, ज्ञानदेव नावलकर, इम्तियाज शेख, महादेव भंडारी, महादेव कुंभार, शिवाजी कुंभार, पांडुरंग पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
============
No comments:
Post a Comment