आजरा (प्रतिनिधी) :
आजरा तालुक्यातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कोकण आणि गोवाच्या धर्तीवर क्लस्टर योजना लागू करावी. तसेच इतर पिकांप्रमाणे काजूलाही हमी भाव मिळावा अशी मागणी आजरा तालुक्यातील काजू उत्पादक शेतकरी व कारखानदार यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्याकडे केली. आजरा येथे काजू उत्पादक शेतकरी व कारखानदार यांच्याशी भेटीवेळी उत्पादकांनी घाटगे यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अशोक अण्णा चराटी यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी समस्या मांडताना शेतकरी म्हणाले, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काजूला बाजारात मागणी नाही. त्यामुळे कारखानदारांकडून तो कमी दराने खरेदी केली जात आहे. मात्र आर्थिक नुकसान सोसून काजू उत्पादक कमी दराने विकण्यास तयार नाही. गेल्या चार-पाच वर्षात काजू पिकाला चांगला दर मिळाल्यामुळे यावर्षी आर्थिक नुकसान का सोसावे? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. गोवा आणि कोकणच्या धर्तीवर शासनाने क्लस्टर योजना सुरू करावी. त्यामुळे असंघटित शेतकरी संघटित होऊन अशा परिस्थितीत मार्ग निघू शकतो व होणारे नुकसान टळेल अशी मागणी सुद्धा शेतक-यांनी केली.
काजू फॅक्टरी धारकांच्या वतीने सुद्धा त्यांच्या अडचणींचा पाढा घाटगे यांच्यासमोर वाचला. शेतकऱ्यांकडून घेतलेला कच्चा माल प्रक्रिया करून बाजारात विकल्या नंतर त्याचे पैसे मिळण्यास विलंब लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनाही ते देताना विलंब होतो. शिवाय कारखानदारांना बँकेच्या कर्जाऊ रकमेवर व्याजाचा फटका बसतो, तो वेगळाच. याशिवाय शासनाने परदेशातून काजू आयात केला आहे. तो काजू कमी दरात मिळत असल्यामुळे स्थानिक काजू धारकांच्या मालाचा उठाव होत नाही. याविरोधात आवाज उठविण्यासाठी काजू उत्पादकांसह कारखानदार संघटित होत नाहीत. त्यासाठी क्लस्टर सारखी योजना गोवा आणि कोकणच्या धर्तीवर आजरा, चंदगड, गडहिंग्लज तालुका परिसरात लागू केल्यास ते संघटित होतील. त्यामुळे काजू उत्पादक व कारखानदार यांचे नुकसान होणार नाही. कारखानदारांना वाढीव कर्ज मिळावे, व्याज सवलत मिळावी, जीएसटीचा परतावा त्वरीत मिळावा, वीज बिलात सवलत मिळावी अशा मागण्यांचा पाठपुरावा करावा असे साकडे यावेळी घाटगे यांना घातले. काजू उत्पादक व त्यावर प्रक्रिया करणाऱ्या कारखानदार यांच्या या विविध समस्यांवर शासन दरबारी आवाज उठवून पाठपुरावा करण्याचे अभिवचन श्री घाटगे यांनी यावेळी दिले.
शेतक-यांना चार पैसे जादा मिळण्यासाठी काजू माल मार्केट यार्ड मध्ये थेट विक्री व्यवस्था करावी असे जिल्हा बँकेचे संचालक अशोक आण्णा चराटी यावेळी म्हणाले .
यावेळी आजरा तालुका काजू व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कोंडूसकर, विकास फळणेकर, जयसिंग खोराटे, विकास बागडी, डॉ दीपक मेंगाने, रवींद्र घोरपडे, महादेव जाधव, नाना सावेकर, मधुकर चव्हाण, किरण सन्ने, कुमार पाटील, बाळू नाईक, डॉ. दीपक सातोस्कर, विलास नाईक, डॉ अनिल देशपांडे, सरपंच सुरेश मिटके आदी उपस्थित होते.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment