Wednesday, April 1, 2026

ख्यातनाम शाहीर संभाजी भगत यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार; पुरस्कार समितीचे जेष्ठ सदस्य मुकुंददादा देसाई यांची घोषणा


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
शाहिरी ही केवळ मनोरंजनासाठी नसून समाज प्रबोधन हेच तिचे मुख्य प्रयोजन आहे हा विचार केंद्रस्थानी ठेऊन ज्यांनी आपली शाहिरी कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासींच्या मुक्तीदायी राजकारणासाठी वापरली तोच वसा आणि वारसा घेऊन समाज प्रबोधन घडवणाऱ्या शाहीर संभाजी भगत यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार देण्याचा निर्णय आज झालेल्या पुरस्कार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पुरस्कार समितीचे जेष्ठ सदस्य मुकुंददादा देसाई, जि. प. सदस्य सुधीर देसाई, कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, सचिव सुनील पाटील, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, युवराज पोवार, प्रा. मीना मंगळूरकर, रावसाहेब देसाई, मनोहर गव्हाणकर, संजय घाटगे, कॉ. संजय तर्डेकर, प्रकाश मोरुस्कर, दिगंबर लोहार, काशिनाथ मोरे, कृष्णा सावंत, रणजीत कालेकर, अमित सामंत, हिंदुराव कांबळे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
        
आज पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा करतांना मुकुंददादा देसाई म्हणाले, संभाजी भगत यांना एक बंडखोर शाहीर म्हणून अख्खा महाराष्ट्र ओळखतो. लोकशाहीर गव्हाणकरांचा वारसा सांगत त्यांची शाहिरी जातीय, वर्गीय आणि लैंगिक शोषणावर घणाघाती प्रहार करते. लोकगीतातील रसरसीत जिवंतपणा हे त्यांच्या शाहिरीचे वैशिष्ट्य आहे. पोवाडे, भारुडे, ओवी, अभंगासह अनेक लोककलांमध्ये क्रांतिकारक आशय भरत त्यांनी जनप्रबोधनासाठी लोककलांचा अत्यंत प्रभावी वापर केला. त्यांचे कातळाखालचे पाणी (आत्मचरित्र), अडगळ (नाटक), तोड ही चाकोरी (गाण्याचा संग्रह), रणहलगी (लेखसंग्रह), भारुड आणि गिरणीचा वग (मुक्तनाट्य), शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला (नाटक) इत्यादी साहित्य प्रसिध्द आहे. त्यांच्या कोर्ट या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. लोकशाहीर गदर यांची अनेक गाणी त्यांनी मराठीत आणली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत यापूर्वी त्यांना अस्मितादर्श पुरस्कार, प्रबोधनमित्र पुरस्कार, मिफ्ता पुरस्कार, संत तुकाराम पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या या लोकशाहिरीशी असलेल्या नात्याचा विचार करून आम्ही यावर्षीचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी सातारा येथे होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत.
****************************

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...