Monday, March 2, 2026

आजऱ्यातील "कमलकुंज" प्रकरण तापले!, पूर्णत्व दाखल्यावर गंभीर आरोप; अन्याय निवारण समिती व सदनिका धारकांचा उपोषणाचा इशारा....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
आजरा नगरपंचायत हद्दीतील आजरा–गारगोटी मार्गावरील कमलकुंज आवारातील वाढीव ‘ए’ व ‘बी’ विंग इमारतीस देण्यात आलेल्या पूर्णत्वाच्या दाखल्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून परिसरात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. इमारतीस आवश्यक नागरी व सुरक्षिततेच्या सुविधा पूर्ण झाल्या नसताना हा पूर्णत्वाचा दाखला कशाच्या आधारे देण्यात आला, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती व कमलकुंज इमारतीतील सदनिका धारकांनी केली आहे.


अन्याय निवारण समिती व रहिवाशांनी आजरा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,  संबंधित इमारतीतील सदनिकांची खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण झाले असले तरी त्यानंतर विकासकाने त्याच ठिकाणी वाढीव विंगचे बांधकाम केले आहे. मात्र या वाढीव बांधकामात अनेक आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे खालील बाबींची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे....
इमारतीस नियमित व मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आहे का?
सांडपाणी निचरा (ड्रेनेज) व रेनवॉटर हार्वेस्टिंगची योग्य व्यवस्था आहे का?
लिफ्ट बसविण्यात आली असल्यास ती बंद पडल्यास बॅटरी बॅकअप किंवा पर्यायी व्यवस्था आहे का?
कमर्शियल व निवासी भागासाठी आवश्यक त्या प्रमाणात कॉमन टॉयलेट व बाथरूमची सुविधा आहे का?
इमारतीभोवती अग्निशमन वाहन फिरू शकेल इतकी जागा व रस्ता उपलब्ध आहे का?
फायर फायटिंग सिस्टम व स्वतंत्र पाण्याची पाइपलाईन बसविण्यात आली आहे का?
सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा व्यवस्था तसेच सदनिकाधारकांची सोसायटी स्थापन करण्याबाबत कार्यवाही झाली आहे का?
वरील सर्व सुविधा पूर्ण नसताना इमारतीस पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला असल्यास तो चुकीच्या माहितीच्या आधारे मिळविण्यात आला असण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे. त्यामुळे कमलकुंज येथील वाढीव ‘बी विंग’ इमारतीस देण्यात आलेला पूर्णत्वाचा दाखला तात्काळ रद्द करून संबंधित विकासकास सर्व नियमबद्ध व आवश्यक सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी व याबाबतचे अधिकृत स्पष्टीकरण नागरिकांना लेखी स्वरूपात द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात दहा दिवसांच्या आत कार्यवाही करून लेखी अहवाल अन्याय निवारण समिती व सदनिका धारकांना सादर करावा, अन्यथा सर्व सदनिका धारक कुटुंबीयांसह नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर अन्याय निवारण समितीचे सदस्य व कमलकुंज सदनिका धारकांच्या सह्या आहेत.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...