राजकारण करत असताना अशोकअण्णा चराटी व आपण वेगवेगळ्या पक्षात राहिलो. प्रसंगी एकमेकांच्या विरोधात निवडणुका ही लढवल्या, राजकीय मतभेद ही झाले. पण मनभेद होऊ दिला नाही. त्यामुळे राजकीय विचारधारा वेगळी असतानाही अशोकअण्णा व आपली मैत्री आजही कायम आहे. आजरा नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. अशोक चराटी यांच्या आघाडीला बहुमतासाठी एक जागा कमी पडली. माझ्या शरद पवार राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. त्यामुळे अशोक चराटी यांची आजऱ्याच्या विकासासाठीची धडाडी पाहून निकालादिवशीच मैत्रीला साथ देण्याचे निश्चित केले होते. त्यातूनच आजरा नगरपंचायतीच्या नव्या सभागृहात राष्ट्रवादी शरद पवार गट ताराराणी आघाडी सोबत पुढील पाच वर्ष राहील, असे प्रतिपादन आजरा साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आजरा तालुकाध्यक्ष मुकुंददादा देसाई यांनी केले. ते आजऱ्याचे नूतन नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या कार्यालय प्रवेश प्रसंगी बोलत होते.
सुरुवातीला नूतन नगराध्यक्ष अशोक चराटी यांचा कार्यालय प्रवेश फीत कापून झाला. यावेळी आजरा साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंद देसाई, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, मुख्याधिकारी सुरज सुर्वे उपस्थित होते. देसाई पुढे म्हणाले, सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम नूतन नगरसेवकांनी करावे. पक्ष-गटतट बाजूला ठेवून आजरा शहराच्या विकासासाठी काम करावे. सभागृहात सत्ताधारी गटाबरोबर असलो तरी चुकीच्या गोष्टींना विरोध कायम राहील. नूतन नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी म्हणाले, आगामी पाच वर्षात आजरा शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. गेल्या तीन वर्षाच्या काळात नगरपंचायतीवर प्रशासक होता, पण बदनाम आम्ही झालो. मात्र आजरा शहरातील जनतेला विश्वास होता की शहराचा विकास अशोक चराटी करू शकतात. त्यामुळे शहरवासीयांनी सत्ता देण्याचे काम केले आहे. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजरा शहराच्या विकासासंदर्भात भेट घेणार आहे. इथून पुढे कोणीही विकासात राजकारण आणू नये. प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी सर्व नगरसेवकांनी झोकून देऊन काम करावे. विरोधी नगरसेवकांना सोबत घेऊन आजरा शहराचा विकास साधला जाणार आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता यासाठी विशेष काम केले जाणार आहे. शहरातील गंभीर बनलेला वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार आहे. विरोधी आठ नगरसेवकातील काही अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी असणार आहे. ताराराणी आघाडीच्या वतीने उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पद प्रत्येकी एक-एक वर्षासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने चांगले काम करून आजऱ्याचा नावलौकिक वाढवावा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी नूतन उपनगराध्यक्ष पूजा डोंगरे, नगरसेवक परेश पोतदार, अनिकेत चराटी, अश्विनी चव्हाण, निशात चांद, अन्वी केसरकर, पुनम लिचम, आसावरी खेडेकर, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, आजरा साखर कारखाना संचालक रणजीत देसाई, राजू होलम, आजरा बँक व्हा. चेअरमन संजय चव्हाण, विक्रम देसाई, माजी उपनगराध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर, अश्विन डोंगरे, समीर चांद, आरिफ खेडेकर, संयोगिता बापट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
No comments:
Post a Comment