आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजराच्यावतीने डॉ. पूजा सामंत यांच्या 'द. ना. गव्हाणकर यांचे शाहिरी वाङमय' या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक व शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत होते.
यावेळी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या शाहीरी परंपरेतील द. ना. गव्हाणकर हे तेजस्वी पर्व होते. तरीही शाहीर द. ना. गव्हाणकरांसारखा प्रतिभावंत कलावंत उपेक्षीत राहिला. डॉ. पूजा सामंत यांनी गव्हाणकरांच्या वाङमयाचे सखोल संशोधन करून पुढील पीढीसाठी महत्वाचा दस्तावेज निर्माण केला आहे. केवळ सहा महिन्यात या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होते, यावरून या संशोधन ग्रंथाचे महत्व अधोरेखीत होते. शाहीर गव्हाणकरांच्या जीवन चरीत्राबद्दल, जडणघडणीबद्दल, वाङमयाबद्दल कुणाला फारशी माहीती उपलब्ध नसतानाही त्यांच्याबद्दल या ग्रंथात विस्तृत अभ्यासपूर्ण नोंदी करण्यात आल्या आहेत हे या पुस्तकाचे वैशिष्ठ आहे. त्याकाळी मार्क्सवादी साम्यवादी चळवळींचा मोठा प्रभाव गव्हाणकरांच्यावर झाला आणि त्यातूनच प्रबोधनाच्या आणि परीवर्तनाच्या चळवळीत ते सामील झाले शृंगारिक, अध्यत्मिक व कालगी तूऱ्याच्या शाहीरीला छेद देत गव्हाणकरांनी नवी परीवर्तनवादी शाहीरी परंपरा उदयास आणली.
लेखिका डॉ. पूजा सामंत म्हणाल्या, श्रीमंत गंगामाई वाचन ग्रंथालयातील पुस्तकांचा या पुस्तकाच्या निर्मितीसाठी संदर्भ मिळाला. शाहीर गव्हाणकरांच्या जन्मभूमीत व ज्या गावात आपण वाढलो त्या आजोळात या ग्रंथाचे प्रकाशन झाले याचा मनस्वी आनंद आहे. नव्या पिढीने द. ना. गव्हाणकरांच्या साहित्यावर संशोधनासाठी पुढे यावे त्याला आपली नक्कीच मदत असेल. यावेळी वाचनालयाचे देणगीदार ईश्वर गिलबिले, वसुंधरा देसाई व पत्रकार दिनाच्या औचित्याने आजरा तालुक्यातील सर्व पत्रकारांचा डॉ. शिंदे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मुकुंददादा देसाई, कॉ. संपत देसाई, डॉ. मारूती डेळेकर, संदीप ठाकूर, सचिन पावले, आपा पावले, मारूतीराव मोरे, जयवंतराव परूळेकर, मनोहर गव्हाणकर, सुहास पाटील, स्मिता गव्हाणकर, शर्मिला सातोसकर, वैशाली वडवळेकर, रेश्मा शिंदे, डॉ. अंजनी देशपांडे, वासुदेव गव्हाणकर, रविंद्र हुक्केरी, संभाजीराव इंजल, बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विनायक आमणगी, गीता पोतदार, सुचेता गडडी ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर गणपतराव चव्हाण यासह मोठ्या प्रमाणावर आजरेकर रसिक श्रोते उपस्थीत होते. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष वामन सामंत यांनी केले. उपाध्यक्षा विद्या हरेर यांनी सुत्रसंचालन केले. विजय राजोपाध्ये यांनी आभार मानले.
•••••••••••••••••••••••••••••••••••••
No comments:
Post a Comment