Tuesday, January 13, 2026

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांचे बिगुल वाजले; आजरा तालुक्यात राजकीय हालचालींना वेग

आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
ग्रामीण भागाला गेली अनेक वर्ष प्रतीक्षा असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. मिनी मंत्रालयात जाण्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्ते सरसावले आहेत. त्यामुळे आजरा तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

आजरा तालुक्यात पूर्वी जिल्हा परिषदेचे तीन तर पंचायत समितीचे सहा मतदार संघ होते. नव्या पुनर्रचनेत तालुक्यात जिल्हा परिषदेचे उत्तुर व पेरणोली हे दोन गट तर पंचायत समितीचे उत्तुर, भादवण, पेरणोली, वाटंगी चार गण झाले आहेत. गट व गणांची संख्या कमी झाल्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुकांची मांदियाळी झाली आहे. त्यातच निवडणूकाही नऊ वर्षांनी होत असल्यामुळे इच्छुकांच्या जोरदार चुरस दिसून येत आहे. तालुक्यातील उत्तूर व पेरणोली हे दोन्ही गट खुले आहेत. उत्तुर व वाटंगी हे दोन गण खुले आहेत. पेरणोली गण सर्वसाधारण महिलेसाठी तर भादवण गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी चुरस दिसून येत आहे. एका गणासाठी साधारणपणे 22 ते 23 हजार तर गटासाठी गटासाठी 47 ते 48 हजार मतदान आहे. तसेच मतदार संघाचा भौगोलिक आवाकाही मोठा असल्याने मतदारापर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे...
अर्ज भरणे : 16 ते 21 जानेवारी 2026
छाननी : 22 जानेवारी 2026
माघार : 27 जानेवारी 2026 (दुपारी 3 वाजेपर्यंत)
चिन्ह वाटप : 27 जानेवारी 2026 (दुपारी 3.30 नंतर)
मतदान : 5 फेब्रुवारी 2026
मतमोजणी : 7 फेब्रुवारी 2026 (सकाळी 10 वाजलेपासून)
••••••••••••••••••••••••••••••••

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...