आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
संकेश्वर-बांदा महामार्गामधील संकेश्वर ते आंबोली दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आजरा शहराजवळ टोलनाका उभारण्यात आला होता. या ठिकाणी टोल वसुलीला आजरा तालुकावासियांनी जोरदार विरोध केला होता, मात्र तालुकावासियांचा हा विरोध डावलून शुक्रवार (दि. 18 जुलै) पासून या टोलनाक्यावरून टोल वसुली सुरुवात होणार आहे. यामुळे तालुकावासियात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संकेश्वर-बांदा महामार्गामधील संकेश्वर ते आंबोली दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले आहे. 61 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या बांधकामासाठी सुमारे 290 कोटी रुपयांचा खर्च आला. जयपुर स्थित कंपनीने हे बांधकाम पूर्ण केले. त्याचवेळी आजरा एमआयडीसी जवळ टोल नाका उभारण्यात आला. त्यामुळे टोलचे भूत आजरा तालुकावासियांच्या मानगुटीवर बसणार हे स्पष्ट झाले होते. याला तालुक्यातील जनतेने प्रचंड विरोध केला. आजरा शहरात बंद पुकारून विराट मोर्चा काढला, रास्ता रोको करण्यात आले, निदर्शने देखील करण्यात आली. त्यावेळी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जनतेला विश्वासात घेऊन टोलबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. मात्र गुरुवार (दि 17 जुलै) च्या विविध दैनिकात महामार्गावरील आजरा टोल नाक्याचे दरपत्रक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने जाहीर केले. या माध्यमातून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तालुकावासियांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे. यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे.
नव्याने तयार झालेल्या संकेश्वर आंबोली महामार्गावरून जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आता या मार्गावर टोल वसुली सुरू होणार असल्यामुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. या टोलनाक्यावरून आजरा तालुक्यातील वाहनधारकांना सवलत मिळावी अशी मागणी जनतेची होती. मात्र जाहीर करण्यात आलेल्या दर तालुक्यातील जनतेला कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या आजरा शहरापासून या टोल नाक्यानंतर सुमारे 15 किलोमीटरच्या परिघात तालुक्यातील अनेक गावे समाविष्ट आहेत. तसेच साखर कारखाना देखील आहे. तालुक्यातील जनता साखर कारखान्याचे निमित्ताने तसेच विविध कारणासाठी तालुक्यातील या गावात ये-जा करत असते. त्यांनाही आता टोलचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मात्र गेल्या एक दीड वर्षाच्या कालावधीत तालुक्यातील जनतेने टोलविरोधी तीव्र भावना व्यक्त करून ही प्रशासनाने शुक्रवारपासून टोल सुरू करण्याची घेतलेली भूमिका ही तालुक्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असंच म्हणावे लागेल. यातून संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर नेमकी कोणती भूमिका घेणार?
जून 2024 मध्ये आजरा तालुक्यातील नागरिकांनी विराट मोर्चा काढत टोलला कडाडून विरोध केला होता. या मोर्चात तत्कालीन आमदार व सध्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी आजरेकर नागरिक टोल देणार नाहीत. टोल बाबतीत केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची भूमिका बोलून दाखवली होती. मात्र त्यानंतर वर्षभरात या भागाचे लोकप्रतिनिधी असूनही मंत्री आबिटकर यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आता टोल सुरू झाल्यानंतर मंत्री आबिटकर यांची नेमकी काय भूमिका असणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
ती बैठक अजूनपर्यंत झालीच नाही...
टोलविरोधी निघालेल्या विराट मोर्चाच्या वेळी तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलनकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी टोलबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता टोल सुरू होत असताना अजून पर्यंत ती बैठक झालेली नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम?
आजऱ्याजवळील टोलची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. आगामी काही दिवसात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या टोलचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
महामार्गावर सुविधांची वाणवा...
महामार्गावर टोल वसुलीची गडबड सुरू असताना महामार्गाचे बांधकाम पूर्ण होऊन वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतरही महामार्गावर सुविधांची वानवाच आहे. एकही स्वच्छतागृह उभारले गेले नाही. प्रत्येक गावात तसेच तिच्यावर उभारण्यात आलेले पिकपशेड गैरसोयीचेच ठरत आहे.
लोकप्रतिनिधींची भूमिका गुलदस्त्यात...
आजरा तालुक्याला तीन आमदार आहेत. यापैकी दोन राज्यात वजनदार खात्याचे मंत्री आहेत. टोल आंदोलन ज्यावेळी भडकले, त्यावेळी विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या. त्यामुळे तत्कालीन लोकप्रतिनिधींनी टोलविरोधी लढ्यात आपण जनतेबरोबर असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
टोलला विरोध....
संकेश्वर बांदा महामार्ग टोलमुक्ती संघर्ष समिती व शिवसेना ठाकरे गट यांच्यावतीने टोल वसुलीला विरोध दर्शवण्यात आला आहे. टोल वसुली करण्यात येऊ नये याबाबतचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आजर्याच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे. तर टोलमुक्ती संघर्ष समितीने शुक्रवार (दि. 18) रोजी सकाळी आठ वाजता कार्यकर्त्यांनी टोलनाक्याजवळ उपस्थित राहून टोल वसुलीला विरोध करावा असे आवाहन केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment