आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
संकेश्वर-बांदा महामार्गावर आजरा शहरानजीक मसोली येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. या टोलनाक्यावर शुक्रवार (दि. 18 जुलै) पासून टोल वसुलीचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले होते. मात्र आजरा तालुक्यातील जनतेने टोल देणार नाही हा निर्धार करीत टोल नाक्यावर आंदोलन केले. या आंदोलनाची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेत आंदोलकांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर व जिल्हा प्रशासन यांच्या समवेत बैठक घेण्याचे, त्याचबरोबर या बैठकीतील निर्णयानंतरच मसोली टोलनाक्यावरून टोल वसुली करण्यात येईल असे लेखी पत्र आंदोलकांना दिल्यानंतर टोल विरोधातील आंदोलन थांबवण्यात आले. त्याचबरोबर शुक्रवार (18 जुलै) पासून सुरू करण्यात येणाऱ्या टोल वसुलीला देखील स्थगिती देण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनाचे नेतृत्व संकेश्वर बांदा महामार्ग टोलमुक्ती संघर्ष समितीने केले.
संकेश्वर-बांदा महामार्गातील संकेश्वर ते आंबोली पर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. आजरा शहराजवळ मसोली येथे टोल नाका उभारणी करण्यात आली आहे. या टोलनाक्यावर आजरा तालुक्यातील जनतेला टोल मुक्ती मिळावी अशी मागणी आहे. याबाबत यापूर्वी आजरा बंद, रास्ता रोको, मोर्चा, निदर्शने करण्यात आली आहेत. मात्र गुरुवार (दि. 17 जुलै) च्या काही वृत्तपत्रांमध्ये या टोल नाक्यावरील दरपत्रक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रसिद्ध करत शुक्रवार (दि. 18 जुलैपासून) टोल वसुलीचे नियोजन लावले होते. यामुळे तालुक्यात संतापाचे वातावरण तयार झाले होते. याला विरोध करण्यासाठी शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून कार्यकर्ते मसोली येथील टोलनाक्याजवळ जमू लागले. त्यामुळे सकाळच्या सत्रात टोल नाक्याजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या टोलमधून आजरा तालुक्याला पूर्णपणे वगळण्यात यावे, अशी आंदोलकांची मागणी होती. याबाबत सुरुवातीला महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, मात्र सुरुवातीच्या सत्रात योग्य तो तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलकांनी टोल नाक्याजवळच ठिय्या मांडला.
यावेळी बोलताना आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई म्हणाले, आजरा तालुक्यावर सातत्याने अन्याय सुरू आहे. ही लोकप्रतिनिधींसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. संकेश्वर-बांदा रस्त्यासाठी महामार्गाचे नियम पाळले गेले नाहीत त्यामुळे टोल वसुलीची घाई का?. टोलमुक्ती संघर्ष समितीचे परशुराम बामणे म्हणाले, आजरा तालुक्यातील जनतेला पूर्णपणे टोलमुक्ती झाल्याशिवाय संघर्ष समितीचे आंदोलन थांबणार नाही. आजरा साखर कारखान्याचे संचालक अनिल फडके म्हणाले, लोकशाही पद्धतीने टोल बंद झाला नाही तर टोल हिरणकेशी नदीत विसर्जित करण्यात येईल. मराठा महासंघाचे मारुती मोरे म्हणाले, विविध प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेने त्याग केला आहे. मात्र प्रकल्पाचा उपभोग घेणाऱ्यांना तालुक्यातील जनतेच्या त्यागाशी काहीही सोयरसुतक नाही. टोलच्या बाबतीत लोकप्रतिनिधी झोपेचे सोंग घेत आहेत. प्रभाकर कोरवी म्हणाले, विविध माध्यमातून आजरा तालुक्यावर अन्याय करत तालुक्याचे अस्तित्व पुसण्याचा डाव रचला जात आहे. प्रकाश मोरूस्कर म्हणाले, टोलबाबत बैठक घेण्याचे आश्वासन पाळले नाही. पालकमंत्र्यांनी आजऱ्याकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे तालुक्याला कोणी वाली राहिला नाही. शिवसेना ठाकरे गटाचे युवराज पोवार म्हणाले, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने टोल आजरा तालुक्यावर लादला आहे. महामार्ग अपूर्ण असताना शासनाला टोलची गडबड का आहे? निवडणुकीच्या तोंडावर दिलेली आश्वासने लोकप्रतिनिधी विसरले असतील पण जनता विसरलेली नाही. तालुक्याशी संबंधित पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ व आमदार शिवाजी पाटील यांनी टोलबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. सुधीर कुंभार म्हणाले, विकासाला कुणाचाही विरोध नाही मात्र तालुक्यातील जनतेला टोल माफ झाला पाहिजे.
यानंतर आंदोलकांनी तहसीलदार समीर माने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करत आजरा तालुक्यातील जनतेला टोल मधून सवलत द्यावी आणि टोलनाका सुरू करावा अशी मागणी केली. याला अधिकाऱ्यांनी नकार दिला. अखेर आंदोलकांनी टोलबाबत बैठक घ्यावी व या बैठकीनंतरच टोल नाका सुरू करावा, अशी मागणी केली. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून लेखी पत्र देण्याचे मान्य केले. त्यानुसार आगामी काळात पालकमंत्री व जिल्हा प्रशासन यांच्या समवेत आंदोलकांची बैठक घेण्याची तसेच बैठक होत नाही तोपर्यंत टोल वसुली सुरु होणार नसल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी संभाजी पाटील, सुभाष देसाई, रणजीत देसाई, दिगंबर देसाई, राजू होलम, संजय पाटील, इंद्रजीत देसाई, रणजीत सरदेसाई, संकेत सावंत, सुधीर सुपल, महेश पाटील, ओमकार माद्याळकर, धनाजी राणे, शांताराम पाटील, अविनाश हेब्बाळकर यांच्यासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आजरा साखर कामगारांची लक्षणीय उपस्थिती...
मसोली टोल नाक्याचा सर्वाधिक फटका गवसे येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी साखर कारखान्यास बसणार आहे. त्यामुळे या कारखान्याचे संचालक तसेच कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री प्रकाश आबीटकरांच्या सूचनेनुसार टोल बंद...
दरम्यान आजरा तालुक्यातील जनतेला कोणतीही पूर्वसूचना न देता शुक्रवारपासून टोल वसुलीचे काम सुरू करण्यात येणार होते. या विरोधात तालुक्यातील जनतेने आंदोलन केले आहे. हे समजताच पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊन बैठक घेणार आहे. तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा टोल वसूल करू नये, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व तहसीलदार यांना सुचित केले. तशी पत्र टोलमुक्ती संघर्ष समितीला देण्याचे आदेश दूरध्वनी वरून दिले. मंत्री आबिटकर यांच्या सूचनेनंतर लेखी पत्र दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले व टोल देखील बंद राहिला असे प्रसिद्धीपत्रक मंत्री आबिटकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आले आहे.
=================
Subscribe to:
Post Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment