Friday, January 5, 2024

रक्ताच्या पिशवीसाठी पैसे घेण्यावर बंदी; आता फक्त ‘हा’ अधिभार द्यावा लागणार; DCGI चा मोठा निर्णय!

रक्ताच्या पिशवीसाठी पैसे घेण्यावर बंदी; आता फक्त ‘हा’ अधिभार द्यावा लागणार; DCGI चा मोठा निर्णय!

रक्ताची विक्री करता येणार नसल्याचं DCGI ने केलं स्पष्ट


 नवी दिल्ली वृत्तसंस्था :

राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी रक्ताच्या पिशव्यांसाठी रक्तपेढ्यांकडून अव्वाच्या सव्वा किमती आकारल्या जात असल्याची बाब समोर आली होती. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची अडवणूक होत असल्याचेही काही प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे रक्त ही विकण्याची बाब नाही, असा स्पष्ट निर्वाळा केंद्रीय औषध नियामक मंडळानं अर्थात DCGI नं दिला आहे. त्यामुळे आता रक्तपेढ्या किंवा रुग्णालयांना रक्ताची विक्री करता येणार नाही. रक्ताचा फक्त पुरवठा होऊ शकतो, असंही DCGI नं स्पष्ट केलं आहे. तसेच, रक्ताच्या पिशवीवर फक्त प्रक्रिया मूल्य आकारता येईल, असंही DCGI नं जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

नेमका निर्णय काय?

देशभरातील रुग्णालयांमध्ये लाखो रुग्ण उपचार घेत असतात. यातल्या अनेक रुग्णांना रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यामुळे हे रक्त रुग्णालयांकडून किंवा खासगी वा सरकारी रक्तपेढ्यांकडून रुग्णांना उपलब्ध करून दिलं जातं. अनेक स्वयंसेवी संस्थांकडूनही रक्तपेढ्या चालवल्या जातात. अनेक खासगी रक्तपेढ्यांकडून रक्ताची विक्री करताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जात असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे डीसीजीआय अर्थात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं यासंदर्भात सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीतील चर्चेचा संदर्भ देत नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार, रक्ताची कुणालाही विक्री करता येणार नाही. रक्ताचा फक्त पुरवठा होऊ शकतो. असं करताना रक्ताच्या पिशवीवर कोणतंही विक्रीमूल्य आकारता येणार नाही. रक्त रुग्णाला देण्याआधी त्यावर प्रक्रिया करून ते जतन करावं लागतं. त्यामुळे फक्त या प्रक्रियेसाठीचा खर्च रक्ताच्या पिशवीवर आकारता येईल, असं डीसीजीआयनं नमूद केलं आहे.

प्रक्रिया मूल्य नेमकं कोणत्या गोष्टींसाठी?

रक्तदान शिबिरांमधून गोळा करण्यात आलेलं रक्त थेट कोणत्या रुग्णाला चढवलं जात नाही. त्या रक्तावर प्रक्रिया करूनच हे रक्त रुग्णाच्या शरीरात चढवता येतं. रक्तदान शिबिरांमधून गोळा करण्यात आलेल्या रक्तामध्ये दात्याच्या शरीरातील इतरही घटक असतात. हे घटक विलग करून लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा अशा स्वरूपात हे रक्त शुद्ध केलं जातं. त्यानंतर ते योग्य अशा तापमानावर जतनही केलं जातं. या सर्व प्रक्रियेचा खर्च प्रक्रिया खर्चात समाविष्ट होतो. मात्र, याउपर कोणतंही विक्रीमूल्य आकारता येणार नाही, असं डीसीजीआयनं स्पष्ट केलं आहे.

नेमका खर्च किती?

दरम्यान, केंद्राकडून २०२२ मध्ये जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार रक्तदात्याकडून घेण्यात आलेल्या रक्तावरचा प्रक्रिया खर्च हा १५५० रुपयांपेक्षा जास्त असू नये. लाल पेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स यांच्यासाठी अनुक्रमे १५५०, ४०० व ४०० रुपयांची मर्यादा घालून देण्यात आली होती. सरकारी रक्तपेढ्यांमध्ये हे मूल्य ११०० रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे.
----------------------

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...