आहेरला फाटा देत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप
बाळांच्या नामकरण समारंभात मडिलगेच्या गुरव कुटुंबाकडून कौतुकास्पद उपक्रम
आजरा वृत्तसेवा :
घरी कोणताही सणसमारंभ असला की पाहुण्यांना निमंत्रण हे ठरलेलेच असते. निमंत्रित पाहुणे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले की त्यांना आहेर देणे ही प्रथा आपल्याकडे आहे. सध्या हा आहेर कपड्यांच्या स्वरूपात देण्याकडे सर्वांचाच कल असतो. मात्र बाळांच्या नामकरण समारंभात आहेर प्रथेला फाटा देत तब्बल 400 ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप मडिलगे (ता. आजरा) येथील गुरव कुटुंबियांच्या कडून करण्यात आले. गुरव कुटुंबियांच्या या कृतीने वाचन संस्कृतीला बळ मिळणार आहे. गुरव कुटुंबियांच्या अनोख्या व नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मडिलगे गावचे युवा उपसरपंच ह. भ. प. सुशांत महाराज गुरव हे वारकरी सांप्रदायात कार्यरत आहेत. अगदी कमी वयात कीर्तनकार म्हणून ते नावारूपास आले आहेत. त्याचबरोबर भावेश्वरी कॅटर्सच्या माध्यमातून विविध समारंभात स्वादिष्ट व रुचकर भोजन बनवण्यात त्यांचा हातखंड आहे. सुशांत व त्यांची पत्नी पूजा यांना काही दिवसांपूर्वी पुत्र व कन्या अशी जुळी रत्ने प्राप्त झाली. या कन्या व पुत्ररत्नांचा नामकरण समारंभ मडिलगे या गावी पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी आलेल्या पाहुणे व मित्रमंडळींना आहेरा ऐवजी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप करण्याचा मनोदय सुशांत यांच्या मनात आला. त्यांनी असा मनोदय आजोबा आप्पा गुरव, आई वंदना गुरव व पत्नी पूजा यांच्यासमोर मांडला. सुशांत यांच्या या अनोख्या उपक्रमाला घरातील मंडळींनी ही होकार दिला. नामकरण समारंभाच्या दिवशी पहाटे गावचे ग्रामदैवत भावेश्वरी देवीला अभिषेक करण्यात आला. माद्याळ (ता. कागल) येथील लेझीम पथक तसेच चंदगड व मडिलगे गावातील मर्दानी खेळ, तलवारबाजी, दांडपट्टा अशा जल्लोषी वातावरणात कन्या व पुत्राच्या जन्माचे स्वागत करत मिरवणूक काढण्यात आली. दुपारच्या सत्रात पाहुणे व मित्रमंडळी तर सायंकाळच्या सत्रात गावकरी बंधूंनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली. रात्री ह. भ. प. नामदेव महाराज सुतार (भादवण) यांची कीर्तन सेवा झाली. या कीर्तन सेवेसाठी तालुका व परिसरातील सुमारे 20 हून अधिक गावातील दिंड्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुणे व मित्रमंडळी यांना आहेरा ऐवजी सुमारे 400 ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप करण्यात आले. गुरव कुटुंबियांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पाहुणे व मित्रमंडळी यांनीही कौतुक केले.
याबाबत विकास न्यूजशी बोलताना ह. भ. प. सुशांत महाराज गुरव म्हणाले, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप केल्यामुळे वाचन संस्कृतीला बळ मिळणार आहे. तसेच आध्यात्मिक मार्गाने समाधान मिळवता येते याची प्रचिती ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण केल्यानंतर आलेल्या पाहुणे व मित्रमंडळींना होणार आहे.
No comments:
Post a Comment