Wednesday, January 31, 2024

अमोल येडगे कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी

अमोल येडगे कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी


कोल्हापूर वृत्तसेवा : 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याता आल्या आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच जागेवरील अमोल येडगे कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी असतील.

वादग्रस्त भूमिकेमुळे राहुल रेखावार चर्चेत

राहुल रेखावार कोल्हापूर जिल्हाधिकारी असताना अनेकवेळा चर्चेत राहिले. अंबाबाई मंदिरात पत्रकारांना प्रवेश रोखणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवांकडून तत्काळ पदभार काढून घेणे आदी मुद्यांवरून चांगलेच चर्चेत राहिले. कोल्हापूर मनपाला प्रशासक मिळत नसताना त्यांनी काही मनपाची सुद्धा जबाबदारी पाहिली होती. भाजपकडूनही त्यांना हटवण्याची मागणी करण्यात आली होती. गेल्यावर्षी महापूर येऊन नागरिकांना आपत्तीला तोंड द्यावा लागेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. त्यानंतर अनेकांचे स्थलांतर केले. त्यामुळे भीतीचं वातावरणही निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक वादग्रस्त भूमिकेमुळे राहुल रेखावार चर्चेत राहिले.
----  -----

"राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार " प्रशांत गुरव यांना प्रदान

"राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार " प्रशांत गुरव यांना प्रदान


आजरा वृत्तसेवा :

            आजरा तालुका पेन्शनर संस्था आजरा व साहित्य सेवा संस्कृती मंडळ उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'पेन्शनर डे' निमित्त व्यंकटराव हायस्कूल,आजराचे सहाय्यक शिक्षक प्रशांत सुभाष गुरव यांना 'राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. गुरव यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य, तज्ञ मार्गदर्शक, विज्ञान प्रदर्शन, स्पर्धा परीक्षा, विविध उपक्रम अशा विविध क्षेत्रातील केलेल्या अष्टपैलू कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते म्हणून सिंधुदुर्ग मराठा शिक्षक संघाचे सल्लागार अशोक येजरे उपस्थित होते.  कार्यक्रम उत्तुर विद्यालय, उत्तुर येथे संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोड साखर गडहिंग्लजचे माजी कार्यकारी संचालक विश्वासराव देसाई,  सिद्धिविनायक होमीओ फार्मसीचे चंद्रकांत पवार, सेवानिवृत्त संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष हिंदुराव पाटील, उत्तूरचे सरपंच किरण आमनगी, सरस्वती शिक्षण मंडळाचे सचिव बी. जे. पोतदार, पाटबंधारे विभागाचे माजी अभियंता जी. डी. यमगेकर उपस्थित होते. आजरा तालुका पेन्शनर्स संस्थेचे अध्यक्ष बी. डी. ढोनुक्षे ,उपाध्यक्ष महंमदगौस तकीलदार, सरचिटणीस एस. टी. हळवणकर, कार्यकारणी सदस्य एस. जी. इंजल, के. एम. पाकले, व्ही. एस. कांबळे, एस. जी. देसाई, व्ही. आर. बुवा, आशा खटावकर व इतर स्थानिक कमिटी सदस्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी व्यंकटाराव हायस्कुल व ज्यू. कॉलेजचे प्राचार्य आर. जी. कुंभार, मदन देसाई, कृष्णा दावणे, प्रकाश पाटील, अस्मिता पुंडपळ, शोभा कुंभार, किशोर खोत, विलास गवारी,महेश यलगार, प्रकाश आर्दाळकर उपस्थित होते. गुरव यांना आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतरावजी शिंपी व सर्व संचालकांचे प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले.
------   -------

Monday, January 29, 2024

सहकार चळवळीमुळे ग्रामीण भागाला आर्थिक स्थैर्य : जयवंतराव शिंपी; वाटंगी येथे रवळनाथ गृहतारण संस्थेचा शुभारंभ

सहकार चळवळीमुळे ग्रामीण भागाला आर्थिक स्थैर्य   : जयवंतराव शिंपी; वाटंगी येथे रवळनाथ  गृहतारण संस्थेचा शुभारंभ 


 आजरा वृत्तसेवा :

ग्रामीण भागात पसरलेल्या सहकारी संस्थांच्या जाळ्यामुळे  ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी केले. ते वाटंगी (ता. आजरा) येथे रवळनाथ सहकारी गृहतारण संस्थेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष  विजय देसाई यांनी केले. यावेळी प्रास्ताविकात देसाई यांनी गृहतारण सहकारी संस्था स्थापन करण्यामागील उद्देश सांगून पहिल्याच दिवशी 50 लाखाचा ठेवी जमा झाल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी पुढे म्हणाले की, आजरा  हा ग्रामीण व डोंगराळ तालुका असला तरी सहकारी संस्थेच्या योगदानामुळेच येथील भागाचा विकास झाला असून वाटंगी येथील रवळनाथ गृहतारण संस्था संस्थेचे चेअरमन विजयराव देसाई व एकनाथ गिलबिले व त्यांचे सहकारी निश्चितच यशस्वीपणे चालवतील असा विश्वास व्यक्त केला‌. वाटंगीचे  सरपंच संजय पवार म्हणाले वाटंगी गाव सहकारी संस्थांच्या बाबतीत तालुक्यात अग्रेसर असून नव्याने सुरू झालेल्या या गृहतारण संस्थेमुळे गावच्या विकासात भर पडणार आहे. शिरसंगीचे सरपंच संदीप चौगुले म्हणाले, भागातील किणे, शिरसंगी, येमेकोंड, मोरेवाडी, चाफवडे या गावातील नागरिकांच्या आर्थिक गरजा भागवण्यात वाटंगी येथील सहकारी संस्थांचे मोठे योगदान आहे. यावेळी गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर व शिवराज समूहाचे अध्यक्ष शिवाजीराव गिलबिले यांनी मनोगत व्यक्त केले.


यावेळी माजी नायब तहसीलदार सुरेश देसाई, उपसरपंच स्वाती गुरव, माजी सरपंच रोमन करवालो, आप्पासो कुऱ्हाडे, भाजपचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संतोष चौगुले, सी. आर. देसाई, एम. एम. देसाई, शशिकांत थोरवत, सुरेश शिंगटे सर, सुभाष चौगुले, विश्वास गाईंगडे, विलास जाधव, जुझेवाझ नोरोना, धनाजी देसाई उत्तमराव जाधव, रमेश तेजम, बाळू तेजम, सुजित देसाई, रणजीत देसाई उपस्थित होते. एकनाथ गिलबिले यांनी आभार मानले.
----  ----  ----

Saturday, January 27, 2024

मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश; मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मध्यरात्री तीन तासांच्या बैठकीत अखेर तोडगा

मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश; मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मध्यरात्री तीन तासांच्या बैठकीत अखेर तोडगा


मुंबई वृत्तसंस्था :

गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचं घोंगड भिजत पडलं होतं. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल असताना राज्यपातळीवरही हे टिकाणारं आरक्षण देण्याकरता सरकार प्रयत्न करत होतं. अखेर मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. मध्यरात्री तब्बल तीन तास चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगेच्या सर्व मागण्यांचं सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यासंदर्भातल मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले होते. परंतु, त्यांचं हे आंदोलन रोखण्याचा प्रचंड प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, मनोज जरांगेंनी २६ जानेवारी रोजी वाशीत भव्य जाहीर सभा घेतली. त्याआधी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्याबरोबर संवाद साधला होता. या चर्चेतही अंतिम तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटलांनी आजच्या दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन येऊ, अन्यथा आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने कूच करू असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर सरकार पुन्हा कामाला लागलं. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगेंच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली आणि मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या. महत्त्वाचं म्हणजे, या सगळ्या मागण्यांबाबत मनोज जरांगेंनी शासननिर्णय आणि लिखित पत्रे घेतली आहेत.


मध्यरात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे काय म्हणाले? :
“मराठा समाजाच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. सापडलेल्या नोंदींचं प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावं. तसंच त्यांच्या परिवारांना ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावेत, असा आपला लढा होता. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबतचा डाटा सरकार थोड्याच दिवसांत देणार आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले.

“ज्याची नोंद सापडली, त्याच्या सगासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याकरता अध्यादेश पारित करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या मूळ मागण्या पूर्ण झाल्या आहेत. या अध्यादेशावर राजपत्रक काढलं आहे. यावर तीन तास चर्चा झाली. मुंबई हायकोर्टाच्या वरिष्ठ वकिलांनी शब्दान् शब्द वाचून खात्री केली आहे, त्यानंतरच बाहेर पडलो, असंही जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं.

” दोन वेगवेगळ्या बैठका होत्या, मंत्रिमहोदय आणि सचिवांची एक बैठक झाली आणि आमच्या वकिल बांधवाची वेगळी बैठक झाली. सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश घेतला आहे. लढाई आपली यासाठी होती. तिसरा मुद्दा आंतरवालीसह राज्याभर मराठा आंदोलकांवर लावलेले गुन्हे मागे घेण्याचे पत्रही गृहमंत्र्यांनी दिलं आहे”, अशी माहिती जरांगेंनी दिली.

“मराठवाड्यात आणि इतर नोंदी कमी सापडल्या आहेत. त्यामुळे या नोंदी शोधण्याकरता शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, त्यांनी मुतदवाढ करण्याची मागणी मान्य केली असून याबाबत लेखी पत्र घेतले आहे. त्यानुसार, सर्व पत्र आणि शासननिर्णय घेतले आहेत. वंशावळ जोडण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन केली आहे. त्याचाही शासननिर्णय झाला आहे, अशी माहितीही जरांगेंनी दिली.
-----  -----

Monday, January 22, 2024

अयोध्येत श्रीराम विराजमान, भव्य मंदिरात रामलल्लांची प्रतिष्ठापना

 अयोध्येत श्रीराम विराजमान, भव्य मंदिरात रामलल्लांची प्रतिष्ठापना


अयोध्या वृत्तसंस्था  :


संपूर्ण देशाचं स्वप्न आज पूर्ण झालं. अखंड भारत ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होता तो क्षण आज याचि देही, याचि डोळा अवघ्या देशानं अनुभवला. न भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्ण सोहळ्यात प्रभू श्रीरामाची अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. 12.29 या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. 


तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम विधीवत राम मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुष्ठान पूर्ण केलं. यावेळी हेलिकॉप्टरमधून पृष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली होती. कलाकार, खेळाडूंसह देशभरातील नागरिक अयोधामध्ये आले होते. प्राणप्रतिष्ठावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात उपस्थित होते. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा हा आनंदाचा सोहळा जगभरातील लोकांनी 'याची देही याची डोळा पाहिला. हा सोहळा नयनरम्य होता, उपदेशात्मक होता, ऊर्जात्मक होता. जीवनाला दिशा व जगण्याला उद्देश देणारा ठरला.


तो ऐतिहासिक क्षण आलाच... प्रभू श्रीराम हे मंदिरात विराजमान झाले, ज्या क्षणाची सारे राम भक्त गेल्या 500 वर्षांपासून वाट पाहत होते तो क्षण अख्ख्या देशाने अनुभवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी संपूर्ण अयोध्येसह देशाही राममय झाला.


--------    --------

Friday, January 19, 2024

22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी जाहीर

22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी जाहीर


 मुंबई वृत्तसंस्था :

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा  केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यात सर्वांना सहभागी होता यावे तसेच सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 22 जानेवारीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सु्ट्टी जाहीर केली. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी म्हणजे 22 जानेवारीला सरकारी आणि खाजगी कार्यालयं, शाळा-कॉलेजला सुट्टी असेल.

Wednesday, January 17, 2024

आजरा अर्बन बँकेची कर्मचाऱ्यांना ७० लाखाची वेतन वाढ


आजरा अर्बन बँकेची कर्मचाऱ्यांना ७० लाखाची वेतन वाढ


आजरा वृत्तसेवा :

दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि, आजरा (मल्टी-स्टेट) आणि कोल्हापूर डिस्ट्रीक्ट बैंक एम्प्लॉईज युनियन (युनिट दि आजरा अर्बन को-ऑप. बँक) यांचेमध्ये कर्मचारी पातळीवर द्विपक्षीय वेतनाचा करार जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त वि. दि. घोडके यांचे समोर संम्मत झाला. याप्रसंगी कामगार नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे युनियनचे अध्यक्ष  भगवान पाटील, आजरा अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर उपस्थित होते. सदर करारामुळे कर्मचाऱ्यांना एकूण वार्षिक ७० लाखाची भरघोस वाढ देणेत आलेली आहे. सदर वाढ मासिक कमीत कमी रु. ७००/- तर अधिकाधिक रु.६०००/- इतकी आहे.

दि आजरा अर्बन को-ऑप. बँकेचा मिश्र व्यवसाय जवळ जवळ १५०० कोटींच्या घरात असून बँकेने आपल्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ३२ शाखांद्वारे एक सशक्त व सक्षम आर्थिक बँक म्हणून मान्यता मिळवलेली आहे. याप्रसंगी बोलताना कामगार नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरेचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी सदर द्विपक्षीय करार अत्यंत सलोख्याच्या वातावरणात झाल्याचे सांगितले, तर बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर यांनी यावेळी बँकेचे व्यवस्थापन सतत कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असून सदर करार कर्मचान्यांना भविष्यातील नव्या आवाहनांना तोंड देण्यासाठी स्फूर्तीदायक ठरेल असे सांगीतले. सदर द्विपक्षीय करार करण्यासाठी आण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख व बँकेचे जेष्ठ संचालक अशोकअण्णा चराटीसो यांनी विशेष प्रयत्न केले. या कराराच्यावेळी व्यवस्थापनातर्फे व्हा. चेअरमन सुनील मगदुम, संचालक सुरेश डांगसो, विलास नाईक, डॉ. अनिल देशपांडे उपस्थित होते. या ऐतिहासीक करारामुळे मिळालेल्या वेतनवाढीमुळे आजरा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला आणि व्यवस्थापनाला आपला व्यवसायवाढीचे आश्वासन दिले. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर, प्रशासन व बोर्डचे मुख्याधिकारी नितीन बेल्लद, सेवक प्रतिनिधी प्रकाश परळकर, गौतम देशपांडे आदी उपस्थित होते.

Monday, January 15, 2024

आजरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसविणेसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर

आजरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसविणेसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर


आजरा वृत्तसेवा :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा असलेल्या शिवस्मारकाचे आजरा वासियांनी अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न साकार होणार असून हा अश्वारुढ पुतळा बसविणेसाठी नगरविकास विभागाकडून 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.


प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम देशवासीयांसाठी अस्मीता आहे. आजरा शहरामध्ये असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा अश्वारुढ करण्याची मागणी शहर वासियांसह तालुक्यातील नागरीकांच्या वतीने वारंवार होत होती. त्या मागणीच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसून परिसर सुशोभिकरण करण्याकरीता निधी मिळावा याकीरता नगरविकास विभागाकडे गेली अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यास यश आले असून छ.शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा व परिसर सुशोभिकरण करण्यासाठी नगरविकास विभागाकडून 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे बसविण्याचे भाग्य मला मिळाले. त्यामुळे आजरा वासीयांचा मी आभारी आहे. या पुतळ्यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. हा पुतळा शहराचे वैशिष्ट्य आहे असे आपल्याला आता सांगता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा असलेल्या शिवस्मारकाचे आजरा वासियांनी अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न यामध्यमातून साकार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य लाभले आहे.
----  -----

Friday, January 5, 2024

रक्ताच्या पिशवीसाठी पैसे घेण्यावर बंदी; आता फक्त ‘हा’ अधिभार द्यावा लागणार; DCGI चा मोठा निर्णय!

रक्ताच्या पिशवीसाठी पैसे घेण्यावर बंदी; आता फक्त ‘हा’ अधिभार द्यावा लागणार; DCGI चा मोठा निर्णय!

रक्ताची विक्री करता येणार नसल्याचं DCGI ने केलं स्पष्ट


 नवी दिल्ली वृत्तसंस्था :

राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी रक्ताच्या पिशव्यांसाठी रक्तपेढ्यांकडून अव्वाच्या सव्वा किमती आकारल्या जात असल्याची बाब समोर आली होती. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची अडवणूक होत असल्याचेही काही प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे रक्त ही विकण्याची बाब नाही, असा स्पष्ट निर्वाळा केंद्रीय औषध नियामक मंडळानं अर्थात DCGI नं दिला आहे. त्यामुळे आता रक्तपेढ्या किंवा रुग्णालयांना रक्ताची विक्री करता येणार नाही. रक्ताचा फक्त पुरवठा होऊ शकतो, असंही DCGI नं स्पष्ट केलं आहे. तसेच, रक्ताच्या पिशवीवर फक्त प्रक्रिया मूल्य आकारता येईल, असंही DCGI नं जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

नेमका निर्णय काय?

देशभरातील रुग्णालयांमध्ये लाखो रुग्ण उपचार घेत असतात. यातल्या अनेक रुग्णांना रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यामुळे हे रक्त रुग्णालयांकडून किंवा खासगी वा सरकारी रक्तपेढ्यांकडून रुग्णांना उपलब्ध करून दिलं जातं. अनेक स्वयंसेवी संस्थांकडूनही रक्तपेढ्या चालवल्या जातात. अनेक खासगी रक्तपेढ्यांकडून रक्ताची विक्री करताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जात असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे डीसीजीआय अर्थात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं यासंदर्भात सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीतील चर्चेचा संदर्भ देत नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार, रक्ताची कुणालाही विक्री करता येणार नाही. रक्ताचा फक्त पुरवठा होऊ शकतो. असं करताना रक्ताच्या पिशवीवर कोणतंही विक्रीमूल्य आकारता येणार नाही. रक्त रुग्णाला देण्याआधी त्यावर प्रक्रिया करून ते जतन करावं लागतं. त्यामुळे फक्त या प्रक्रियेसाठीचा खर्च रक्ताच्या पिशवीवर आकारता येईल, असं डीसीजीआयनं नमूद केलं आहे.

प्रक्रिया मूल्य नेमकं कोणत्या गोष्टींसाठी?

रक्तदान शिबिरांमधून गोळा करण्यात आलेलं रक्त थेट कोणत्या रुग्णाला चढवलं जात नाही. त्या रक्तावर प्रक्रिया करूनच हे रक्त रुग्णाच्या शरीरात चढवता येतं. रक्तदान शिबिरांमधून गोळा करण्यात आलेल्या रक्तामध्ये दात्याच्या शरीरातील इतरही घटक असतात. हे घटक विलग करून लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा अशा स्वरूपात हे रक्त शुद्ध केलं जातं. त्यानंतर ते योग्य अशा तापमानावर जतनही केलं जातं. या सर्व प्रक्रियेचा खर्च प्रक्रिया खर्चात समाविष्ट होतो. मात्र, याउपर कोणतंही विक्रीमूल्य आकारता येणार नाही, असं डीसीजीआयनं स्पष्ट केलं आहे.

नेमका खर्च किती?

दरम्यान, केंद्राकडून २०२२ मध्ये जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार रक्तदात्याकडून घेण्यात आलेल्या रक्तावरचा प्रक्रिया खर्च हा १५५० रुपयांपेक्षा जास्त असू नये. लाल पेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स यांच्यासाठी अनुक्रमे १५५०, ४०० व ४०० रुपयांची मर्यादा घालून देण्यात आली होती. सरकारी रक्तपेढ्यांमध्ये हे मूल्य ११०० रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे.
----------------------

Thursday, January 4, 2024

आहेरला फाटा देत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप

आहेरला फाटा देत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप 

बाळांच्या नामकरण समारंभात मडिलगेच्या गुरव कुटुंबाकडून कौतुकास्पद उपक्रम


आजरा वृत्तसेवा :

 घरी कोणताही सणसमारंभ असला की पाहुण्यांना निमंत्रण हे ठरलेलेच असते. निमंत्रित पाहुणे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले की त्यांना आहेर देणे ही प्रथा आपल्याकडे आहे. सध्या हा आहेर कपड्यांच्या स्वरूपात देण्याकडे सर्वांचाच कल असतो. मात्र बाळांच्या नामकरण समारंभात आहेर प्रथेला फाटा देत तब्बल 400 ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप मडिलगे (ता. आजरा) येथील गुरव कुटुंबियांच्या कडून करण्यात आले. गुरव कुटुंबियांच्या या कृतीने वाचन संस्कृतीला बळ मिळणार आहे. गुरव कुटुंबियांच्या अनोख्या व नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 मडिलगे गावचे युवा उपसरपंच ह. भ. प. सुशांत महाराज गुरव हे वारकरी सांप्रदायात कार्यरत आहेत. अगदी कमी वयात कीर्तनकार म्हणून ते नावारूपास आले आहेत. त्याचबरोबर भावेश्वरी कॅटर्सच्या माध्यमातून विविध समारंभात स्वादिष्ट व रुचकर भोजन बनवण्यात त्यांचा हातखंड आहे. सुशांत व त्यांची पत्नी पूजा यांना काही दिवसांपूर्वी पुत्र व कन्या अशी जुळी रत्ने प्राप्त झाली. या कन्या व पुत्ररत्नांचा नामकरण समारंभ मडिलगे या गावी पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी आलेल्या पाहुणे व मित्रमंडळींना आहेरा ऐवजी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप करण्याचा मनोदय सुशांत यांच्या मनात आला. त्यांनी असा मनोदय आजोबा आप्पा गुरव, आई वंदना गुरव व पत्नी पूजा यांच्यासमोर मांडला. सुशांत यांच्या या अनोख्या उपक्रमाला घरातील मंडळींनी ही होकार दिला. नामकरण समारंभाच्या दिवशी पहाटे गावचे ग्रामदैवत भावेश्वरी देवीला अभिषेक करण्यात आला. माद्याळ (ता. कागल) येथील लेझीम पथक तसेच चंदगड व मडिलगे गावातील मर्दानी खेळ, तलवारबाजी, दांडपट्टा अशा जल्लोषी वातावरणात कन्या व पुत्राच्या जन्माचे स्वागत करत मिरवणूक काढण्यात आली. दुपारच्या सत्रात पाहुणे व मित्रमंडळी तर सायंकाळच्या सत्रात गावकरी बंधूंनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली. रात्री ह. भ. प. नामदेव महाराज सुतार (भादवण) यांची कीर्तन सेवा झाली. या कीर्तन सेवेसाठी तालुका व परिसरातील सुमारे 20 हून अधिक गावातील दिंड्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुणे व मित्रमंडळी यांना आहेरा ऐवजी सुमारे 400 ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप करण्यात आले. गुरव कुटुंबियांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पाहुणे व मित्रमंडळी यांनीही कौतुक केले.

 याबाबत विकास न्यूजशी बोलताना ह. भ. प. सुशांत महाराज गुरव म्हणाले, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप केल्यामुळे वाचन संस्कृतीला बळ मिळणार आहे. तसेच आध्यात्मिक मार्गाने समाधान मिळवता येते याची प्रचिती ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण केल्यानंतर आलेल्या पाहुणे व मित्रमंडळींना होणार आहे. 

Tuesday, January 2, 2024

रामलिंग सेवा संस्था मेढेवाडीला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान

रामलिंग सेवा संस्था मेढेवाडीला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान


 आजरा वृत्तसेवा :

 रामलिंग विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित मेढेवाडी (ता. आजरा) या संस्थेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. आजऱ्याचे सहाय्यक निबंधक सुजय येजरे यांच्या हस्ते व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या संचालकांना नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आजरा तालुक्याच्या सहकाराच्या लौकिकास साजेसे काम संस्थेने करावे, असे सहाय्यक निबंधक येझरे यांनी सांगितले. नवीन नोंदणीकृत झालेल्या रामलिंग सेवा संस्थेच्या पाठीशी जिल्हा बँक ठामपणे उभी आहे असा विश्वास जिल्हा बँक संचालक देसाई यांनी व्यक्त केला. संस्थेच्या मंजुरीसाठी जिल्हा बँक संचालक देसाई, अमर पाटील, संदेश पाटील यांनी पाठपुरावा केला. यावेळी अध्यक्ष नानासो दिनकर पाटील, उपाध्यक्ष प्रभाकर गुंडू दळवी, संचालक मधुकर जिवबा पाटील, पुंडलिक बाळू पाटील, श्रावण दतू पाटील, मसाजी धोडीबा दळवी, विष्णू  बाळकु कांबळे, शामराव सखोबा गुरव, संचालिका श्रीमती मंगल महादेव पाटील, शेवंता रामचंद्र शेटगे उपस्थित होते.

Monday, January 1, 2024

साखर चोरीसारखी प्रकरणे झाकण्यासाठीच आजरा साखर कारखान्यात राष्ट्रवादीला एकहाती सत्ता गरजेची होती : आजरा येथील पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई यांचा आरोप

साखर चोरीसारखी प्रकरणे झाकण्यासाठीच आजरा साखर कारखान्यात राष्ट्रवादीला एकहाती सत्ता गरजेची होती

 आजरा येथील पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई यांचा आरोप


 आजरा वृत्तसेवा  :

 अध्यक्ष निवडीच्या मुहूर्तावरच आजरा साखर कारखान्यात साखर चोरी प्रकरण घडले आहे. याप्रकरणी केवळ जुजबी कारवाई करण्यात आली आहे. या साखर चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधण्याची गरज आहे. सत्ता आल्याबरोबर साखर चोरी प्रकरण घडवून आणून कारखाना लुटण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आगामी पाच वर्षात याहीपेक्षा भयानक प्रकार घडतील. असे कारखान्याला तोट्यात घालणारे प्रकार झाकण्यासाठीच राष्ट्रवादीला आजरा साखर कारखान्यात एक हाती सत्ता हवी होती, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यांनी आजरा येथील पत्रकार परिषदेत केला.

 देसाई पुढे म्हणाले, साखर चोरी प्रकरणी नूतन अध्यक्ष धुरे यांनी दिलेला खुलासा हास्यास्पद आहे. काटामारी करून बेकायदेशीरपणे तयार करण्यात आलेली साखर जाणीवपूर्वक बाहेर काढण्यात आली आहे. साखर भरलेला ट्रक कोणतीही शहानिशा न करता बाहेर जाऊ देण्यात आला आहे. यामागे मोठे षडयंत्र लपलेले आहे. याप्रकरणी जुजबी कारवाई करून प्रश्न सुटणार नाही तर या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलीस गुन्हा नोंद करून पंचनामा करून साखर उतरून घेतली पाहिजे होती. कारखान्यात पारदर्शी कारभार करणार म्हणून निवडणूक जिंकलेल्या विद्यमान संचालकांचा हा कसला पारदर्शी कारभार सुरू आहे असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. साखर चोरी हा प्रकार विद्यमान संचालक व प्रशासनाच्या सहमतीनेच झाला आहे. मात्र अशा प्रकरणामुळे कारखान्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास कमी होणार आहे ही कारखान्यासाठी मारक ठरणारी गोष्ट आहे, अशीही देसाई म्हणाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष संजय देसाई, श्रीपती गुरव, धोंडीबा सावंत, नरेंद्र कुलकर्णी उपस्थित होते  

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...