Saturday, November 14, 2020

मंत्री हसन मुश्रीफ यांनी बहिरेवाडी येथे शहीद जवान ऋषिकेश जोंधळेच्या घरी भेटून केले कुटुंबीयांचे सांत्वन

 
        
आजरा (प्रतिनिधी) :

शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. वीर जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या हौतात्म्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांना शुक्रवारी रात्री समजताच शनिवारी सकाळी आठ वाजताच बहिरेवाडी (ता. आजरा) या गावात धडकले व कुटुंबीयांचे सांत्वन केले.
        
मंत्री मुश्रीफ घरी पोहोचताच ऋषिकेश यांचे वडील रामचंद्र व आई सौ. कविता यांनी 'साहेब, गेला तो परत आलाच नाही. आमचा एकुलता एक वाघ गेला हो.......'  असा आर्त हंबरडा फोडताच मंत्री मुश्रीफ यांचे डोळे पाणावले आणि ते गहिवरले. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या जवान ऋषिकेश यांच्या शहीद होण्याने त्यांच्या कुटुंबासह गाव, जिल्हा, राज्य आणि  देश दुःखाच्या छायेत आहे. बहिरेवाडी गावाचा आम्हा देशवासीयांना सार्थ अभिमान कारण हे गाव म्हणजे वीर जवानांच्या नररत्नांची खाणच आहे. भारताच्या सरहद्दीत घुसून पाकिस्तान आणि चीनकडून  वारंवार आगळीक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा  काय तो सोक्षमोक्ष लावावाच. संपूर्ण भारत देश त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, अशा संतप्त भावनाही मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले, ऊन, वारा, पाऊस या कशाचीही पर्वा न करता सैनिक जीवाची बाजी लावून भारतमातेचे संरक्षण करीत आहेत. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आजी-माजी सैनिकांच्या व विधवा सैनिक पत्नीच्या मालमत्ता कराची माफी ही सैनिकांप्रतीच्या कर्तव्य भावनेतूनच केले, असेही ते म्हणाले.

तीन लाखांचे अर्थसहाय्य.........

मंत्री मुश्रीफ म्हणाले,  दीपावली सणाच्या पूर्वसंध्येलाच झालेल्या या आघाताने ऋषिकेश जोंधळे यांच्या एकट्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखाच्या परिस्थितीत सर्वांनीच त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे  राहूया. सामाजिक बांधिलकीतून नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने त्यांनी या कुटुंबासाठी तीन लाख रुपयांचे अर्थसाहाय्य  जाहीर केले.

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...