Wednesday, April 15, 2026

हिंदुत्वाच्या जयघोषाने दुमदुमली आजरा शहर, विराट हिंदू संमेलनात जनसागराचा महापूर...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
आजरा येथील श्री शिवतीर्थ परिसरात सकल हिंदू समाज, आजरा आयोजित करण्यात आलेल्या 'विराट हिंदू संमेलना' त शेकडो हिंदू बांधवांनी उपस्थिती दर्शवत शक्तीप्रदर्शन केले. "एकता आणि धर्मरक्षण" या मुख्य उद्देशाने आयोजित या संमेलनात संपूर्ण पंचक्रोशीतून जनसागराचा महापूर लोटला होता. भगव्या ध्वजांनी आणि 'जय श्रीराम'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. संमेलनाची सुरुवात सायंकाळी ५:३० वाजता भव्य शोभायात्रेने व्यंकटराव हायस्कूल पासून झाली. पारंपारिक वेशभूषेतील बालचमु, वारकरी सांप्रदाय, ब्रम्हकुमरिज यांचा लक्ष्मी- नारायण रथ, लेझिम पथक हे या यात्रेचे मुख्य आकर्षण होते.
  
कार्यक्रमापू्वी श्री शिवतीर्थ, आजरा येथील अश्वारूढ मूर्तीस श्री महंत सिद्धेश्वर स्वामीजी, नुल ता. गडहिंग्लज येथील रामनाथगिरी मठाचे श्री भगवानगीरी महाराज, रा. स्व. संघाचे प्रचारक युवराजजी कुलकर्णी व योगी संतोष ऊर्फ बाळ महाराज यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. दरम्यान सव्यसाची गुरुकुलम् वेंगरुळ च्या कोदंडधारी  युद्धकला प्रशिक्षण वर्ग यांच्यातर्फे युद्धकलेचे प्रात्यक्षिक झाले. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मान्यवरांच्या हस्ते गोमातेचे पूजन झाले.त्यानंतर भारत माता प्रतिमापूजन आणि शिवरायांचे मूर्ती पूजन झाले. प्रथमत: गडहिंग्लज येथील बेलबाग आश्रमचे श्री सिद्धेश्वर स्वामी  यांनी मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषेमधून धार्मिक आशीर्वचन केले स्वामीजी म्हणाले, "कितीतरी परकीय आक्रमणानंतरही आपला देश हा अभिमानानं उभा आहे. हिंदू समाज हा सहिष्णू आहे, परंतु स्वधर्माच्या रक्षणासाठी संघटित होणे ही काळाची गरज आहे. जात-पात विसरून आपण केवळ 'हिंदू' म्हणून एकत्र यायला हवे."

त्यानंतर रा. स्व. संघाचा इतिहास आणि संघाची कार्यपद्धती याच्यावर विस्तृत भाषण युवराज कुलकर्णी यांनी केले. पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, स्वबोध, नागरी कर्तव्य आणि सामाजिक समरसता
या पंच परिवर्तनावर मुद्द्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर नुल येथील रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराजांनी  आपल्या संत परंपरेचा आढावा घेतला. उपस्थित सर्व हिंदूंचे आणि एकूणच कार्यक्रम आयोजित करणाऱ्या स्वयंसेवकांचेही कौतुक केले. मुख्य वक्ते बाळ महाराज, इचलकरंजी  यांनी बोलत असताना हिंदू म्हणून आता आपल्याला अधिक डोळसपणे जगाव लागेल. यापूर्वी फार विश्वासाने आपण समोरच्यावर विसंबुन राहत होतो
असं न करता आता पदोपदी सावधानतेने जगावे लागेल अशा पद्धतीचा विचार उदाहरणांच्या सहित उपस्थितांना सांगितला. अभिषेक रोडगी यांनी आभार व्यक्त केले. आणि सामुदायिक वंदे मातरम गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन प्रा डॉ.अशोक बाचुळकर यांनी केले.
नंतर उपस्थित सर्वांसाठी प्रसादाची ही व्यवस्था करण्यात आली होती.संमेलनाला झालेली प्रचंड गर्दी पाहता स्थानिक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने पार्किंग आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सांभाळली. कोणताही अनुचित प्रकार न घडता हे संमेलन शांततेत पार पडले. या संमेलनामुळे संपूर्ण शहरात हिंदुत्वाचे चैतन्य पसरले असून, आगामी काळात अशा स्वरूपाचे उपक्रम गावपातळीवर राबवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. यावेळी सकल हिंदू समाज आजराचे रमेश सुतार, ललित कांबळे, जांभळे गुरुजी, तानाजी बुरुड, नागराज रायकर यांसह वीविध हिंदुत्ववादी संघटना, सर्व तरुण मंडळे, ब्रम्हाकुमारिजचे भाई व बेहेनजी तसेच,हिंदू बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
============================

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...