Wednesday, April 22, 2026

भालचंद्र कांगो यांच्या हस्ते होणार लोकशाहीर गव्हाणकर पुरस्काराचे वितरण, वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची उपस्थिती.....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...  
आजरा येथे लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्काराचे वितरण २ मे रोजी डॉ भालचंद्र कांगो यांच्या हस्ते होणार असून यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती पुरस्कार व स्मारक समितीच्या वतीने कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी दिली. लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेत दिली.


डॉ. भालचंद्र कांगो हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचे केंद्रीय नेते असून भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे ते राष्ट्रीय सचिव आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि हरियाणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.  विद्यार्थी दशेपासूनच डॉ. कांगो हे डाव्या चळवळीत सक्रिय राहिले आहेत. वैद्यकीय पदवी प्राप्त झाल्यानंतर डाव्या चळवळीत पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय त्यांनी केला. आयुष्यभर कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी ते संघर्ष करीत आले आहेत. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राची जबाबदारी समर्थपणे पेलल्यामुळे पक्षाने त्यांना केंद्रीय सचिव मंडळात घेत चार राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. डॉ. भालचंद्र कांगो हे ज्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत, त्याच पक्षात लोकशाहीर गव्हाणकर यांनी आपले आयुष्य घालवले आहे. सातत्याने कष्टकरी, श्रमिक, कामगारांच्या लढयात ते अग्रभागी राहिले आहेत. आपल्या शाहिरीने कामगार कष्टकऱ्यांच्या वेदना दुःख मांडत त्यांच्या मुक्तीची गाणे शाहीर गात राहिले. एक अभ्यासू कॉम्रेड म्हणून त्यांची पक्षांमध्ये नोंद घेतली जात होती. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवण्यात आपले वैचारिक योगदान दिले आहे त्याचप्रमाणे भालचंद्र कांगो हेही कष्टकरी, कामगारांच्या लढ्याबरोबरच डाव्या चळवळीत तरुणांना घडवण्यात पुढाकारात राहिले आहेत. म्हणूनच त्यांच्या हस्ते हा पुरस्कार संभाजी भगत यांना देण्याचा निर्णय पुरस्कार समितीने घेतला आहे.

लोकशाहीर गव्हाणकर हे महागोंड या गावचे असून वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात हे गाव येते. दोन वर्षांपूर्वी वाहरू सोनवणे यांना पुरस्कार प्रदान करताना ना. हसन मुश्रीफ यांनी लोकशाहीर गव्हाणकरांच्या गावी उचित स्मारक उभा करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे जाहीर केले होते. त्यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय पुरस्कार समितीने घेतला आहे. यावेळी जेष्ठ सदस्य मुकुंददादा देसाई, सुधीरभाऊ देसाई, समितीचे सचिव सुनील पाटील, डॉ. नवनाथ शिंदे, मीना मंगळूरकर, युवराज पवार, कॉ. संजय तरडेकर, पुष्पलता  घोळसे, कृष्णा सावंत, काशिनाथ मोरे, रोहित शेंडे, रवींद्र भाटले, संजय घाडगे, रणजित कालेकर, विक्रम देसाई, अमित सामंत यांच्यासह कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकशाही द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार समिती नोंदणी करण्याचा निर्णय करण्यात आला.
===========================

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...