Sunday, April 12, 2026

संगीत क्षेत्रातलं नक्षत्र हरपलं, सूरसम्राज्ञी' आशा भोसले यांचे निधन


मुंबई, न्यूज नेटवर्क....
भारतीय संगीत क्षेत्रातील 'सूरसम्राज्ञी' आशा भोसले यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आशा भोसले यांना शनिवारी श्वास घेण्यास त्रास आणि प्रचंड थकवा जाणवू लागल्यानं तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं, आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. आशा भोसले यांच्या निधनानं संपूर्ण संगीतविश्वावर, सिनेइंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, कधीही न भरून होणारी पोकळी निर्माण झाली आहे. आशा भोसले यांच्यावर सोमवारी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.
  
दरम्यान, आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिनं काल रात्री त्यांच्या तब्येतीसंदर्भात इन्स्टाग्रामद्वारे अधिकृत माहिती दिली होती, आशा आजीला अती थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळं रुग्णालयात दाखल केलं आहे. असं तिनं सांगितलं होतं. मात्र आजची सकाळ आशाताईंच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी घेऊन आली. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकार आणि श्वसनाच्या गुंतागुंतीमुळं आशाताईंची प्रकृती चिंताजनक झाली होती. उपचारादरम्यान 'मल्टी-ऑर्गन फेल्युअर' झाल्यानं आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार आशा भोसले यांचं पार्थिव सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत त्यांच्या लोअर परेल इथल्या 'कासा ग्रांडे' निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क इथं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

वयाच्या ९२ व्या वर्षीही आशा भोसले यांचा उत्साह दांडगा होता. तब्बल ८ दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतावर अधिराज्य गाजवलं. २० हून अधिक भाषांमध्ये १२,५०० हून अधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर होता. त्यांना पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके, महाराष्ट्र भूषण सह अनेक मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत जन्मलेल्या आशा भोसले यांनी वयाच्या ९ व्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. त्यांनी ८ दशकांहून अधिक काळ आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं.त्यामुळं या संगीत क्षेत्रातलं नक्षत्र हरपल्याची भावना व्यक्त होतेय.
===========================

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...