Friday, April 10, 2026

विरोधक आजरा शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत; नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांचा पत्रकार परिषदेत घणाघात


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
आजरा नगरपंचायतीमधील सत्ताधारी आघाडी आजरा शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. विविध कामांचा आपण स्वतः नगराध्यक्ष व नगरसेवक सक्षमपणे पाठपुरावा करत आहोत. मात्र एखादे काम सुरू होण्याच्या अगोदर आंदोलनाचा इशारा देऊन आपल्या पाठपुरावामुळेच कामे सुरू होत असल्याचा कांगावा विरोधक करत आहेत. कोणतेही काम किंवा प्रश्न एका दिवसात मार्गी लागत नसून त्यासाठी सत्ताधारी आघाडीतील नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अनेक दिवसापासूनचे प्रयत्न कारणीभूत ठरतात. त्यामुळे आजरा नगरपंचायतीतील विरोधी नगरसेवक केवळ प्रसिद्धीचे ढोंग करून आजरा शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत, असा घणाघात नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी सत्ताधारी आघाडीतील नगरसेवक उपस्थित होते.
 
नगराध्यक्ष चराटी पुढे म्हणाले, विरोधी मंडळी आपणच काम करून आणले असा दिखावा करत आहेत. त्यांच्याकडून नगरपंचायत च्या कारभारात हस्तक्षेप वाढत चालला आहे. अधिकाऱ्यांच्यावर अरेरावी सुरू आहे. यापूर्वी शहरात अधिकारी नव्हते, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून नगरपंचायतीला अधिकारी मिळाले आहेत. विरोधकांच्या अरेरावीमुळे अधिकारी जर गेले, तर पुन्हा अधिकारी मिळणे कठीण होऊन बसेल. शहरात सध्या सुरू असलेली विकास कामे मागील सभागृहाची आहेत. त्याचे सर्व श्रेय पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना आहे. आत्ता मंत्री आबिटकर यांना पत्रे देऊन फोटो काढून विरोधक प्रसिद्धीचे ढोंग करत आहेत. शहराच्या विकासाबाबत शहरवासीयांना विश्वास असल्यामुळेच माझ्या आघाडीकडे सत्ता देऊन मला नगराध्यक्ष केले आहे. आम्ही कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करत आहोत. पाणी, रस्ते व कचरा या प्रश्नांची बऱ्यापैकी सोडवणूक केली आहे. निवडणुकीत दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नगराध्यक्षांना वगळून विकास कामांचे नारळ फोडायचे हे योग्य आहे का? अधिकाऱ्यांवर दादागिरी करण्यापेक्षा नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रश्नाची सोडवणूक होऊ शकते. गतसभागृहात आम्ही समझोता एक्सप्रेसने काम करीत शहराचा विकास साधला आहे, सध्याची विरोधक शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत. यातून शहराचीच बदनामी होत आहे. त्यामुळे भांडत बसण्यापेक्षा समन्वयातून शहराचा विकास साधू या असेही नगराध्यक्ष चराटी म्हणाले. यावेळी उपनगराध्यक्ष पूजा डोंगरे, नगरसेवक परेश पोतदार, अनिकेत चराटी, नगरसेविका अश्विनी चव्हाण, निशाद चाँद, आसावरी खेडेकर, पूनम लिचम, बाळ केसरकर, संजय चव्हाण, समीर चाँद, आरिफ खेडेकर, महेश खेडेकर उपस्थित होते.
**************************************

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...