Tuesday, February 27, 2024

बुधवारी मिळणार पीएम किसानसह नमो शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता

बुधवारी मिळणार पीएम किसानसह नमो शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता

 मुंबई वृत्तसंस्था :

पीएम किसानसह नमो शेतकरी सन्मान या दोन्ही योजनांच्या हफ्त्यांचे वितरण बुधवारी (28 फेब्रुवारी) रोजी करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या दिवशी महाराष्ट्र दौऱ्यावर असून यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात या हफ्त्यांचे वितरण केले जाणार आहे. राज्यातील जवळपास दोन कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी 2 हजार रुपयांची अर्थात वार्षिक 6 हजारांची मदत करण्यात येते. अनेक दिवसांपासून या योजेनच्या 16 वा हफ्ता वितरित होणार असल्याची चर्चा होती. अखेर पीएम किसान या योजनेचा 16 वा हप्ता राज्यातील 87 लाख 96 हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. या हप्त्याच्या माध्यमातून 1 हजार 943 कोटी 46 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी हा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. दुसरीकडे राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे 3 हजार 800 कोटींचेही वितरण देखील याचवेळी होणार आहे.

या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील 16 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरीत होणार आहे. तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभही वितरीत होणार आहे. पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याच्या 1 हजार 943 कोटी 46 लाख रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण 87 लाख 96 हजार शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे.

राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकरी कुटुंबाना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 1 हजार 712 कोटी रुपयांचा पहिला हप्ता यापूर्वीच दिला आहे. तर दुसरा व तिसरा हप्ता याच समारंभात वितरित केला जाणार आहे. राज्याच्या योजनेमधून सुमारे 3 हजार 800 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहेत. दरम्यान पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील 1 कोटी 13 लाख 60 हजार शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये 27 हजार 638 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
==========================

Sunday, February 25, 2024

सलाइनमधून विष देण्याचा डाव, हे सारं फडणवीसांचं षडयंत्र; जरांगेंचे उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

सलाइनमधून विष देण्याचा डाव, हे सारं फडणवीसांचं षडयंत्र; जरांगेंचे उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप


मुंबई वृत्तसंस्था :
    
मला संपवण्याचा डाव देवेंद्र फडणवीस करताय, मी मरावं अस देवेंद्र फडणवीसांना वाटतं, असे गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केले आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर बसले आहेत. आज अंतरवालीसराटीत त्यांनी महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी फडणवीसांवर गंभीरस्वरुपाचे आरोप केले. तसेच, बैठक संपल्यानंतर ते स्वत: पायी चालत मुंबईतील फडणवीसांच्या सागर बंगल्याच्या दिशेने निघाले.

मनोज जरांगे काय म्हणाले?

'मी एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा म्हणून बसलो आहे. माझी समाजावर निष्ठा आणि प्रेम आहे. म्हणून हे घडलं आहे. मी स्वार्थी, लबाड असतो तर कधीच उघडा पडलो असतो. मी एक सामान्य म्हणून तुमच्यासाठी काम करतोय. माझा देव समाज आणि समाजावर माझी निष्ठा आहे. आजची शेवटची आणि निर्णायक बैठक आहे. मराठ्यांना हरवण्याचं स्वप्न बघत आहेत, म्हणून ही बैठक लवकर घ्यावी लागली'. 'छत्रपतींच्या समक्ष बसून सांगतो, मी कुठल्याच पक्षात नाही, कुठल्याही पक्षाच्या वतीने काम करत नाही, उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हाही त्यांना बोललो होतो आता यांचं आहे तरी बोलतो. म्हणजे मी कुठल्याच पक्षाचा नाही, मी माझ्या समाजाचा आहे. समाजापुढे कोणीच नाही'. 'सरकार देतंय १० टक्के आरक्षण आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण. तुम्हाला सरसकट द्यायचं नसेल तर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्यांच्यासाठी सगेसयोऱ्यांचा कायदा पारित करा. त्यांच्याच म्हणण्यावर आपण ही मागणी केली. त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं की सरसकट ते देत नाही. मग आपण नवा पर्यायी शब्द काढू सगेसोयरे'. 'हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवेंद्र फडणवीस', असं म्हणत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर घणाघात केला. पुढे ते म्हणाले, 'मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे. मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आहे. हा दरारा संपवण्याचं त्यांचं (फडणवीस) स्वप्न आहे. त्यात एकनाथ शिंदेंचेही एक-दोन लोक आहेत. अजित पवारांचेही दोन आमदार आहेत. सगेसोयऱ्यांचं होऊ द्यायचं नाही, काहीही करुन १० टक्के मराठ्यांवर लादायचं आणि हे पोरगं ऐकतच नाही, हे पोरगं इथंच संपलं पाहिजे, नाहीतर याचा गेम तरी करावा लागेल. याला बदनाम तरी करावं लागेल, याला उपोषणात मरु द्यावं लागेल, म्हणून सोळावा दिवस उजाडला. याचं काहीतरी करावं लागेल, सलाइनमधून विष देऊन, म्हणून मी परवा रात्रीपासून सलाइन बंद केलं. नाहीतर याचं एन्काउंटर करावं लागेल, हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे' असे गंभीर आरोपही त्यांनी केले. 'देवेंद्र फडणवीसला एवढीच कुणकुणी आहे ना तर मी बैठक संपल्यावर सागर बंगल्यावर येतो मला मारून टाका. माझा बळी पाहिजे ना, मी येतो सागर बंगल्यावर घे बळी. समाजाशी इमानदारी मी नाही विकू शकत', असं म्हणत जरांगेंनी फडणवीसांना थेट आव्हान दिलं. 'त्यांचं नाही ऐकलं तर ते माणूस संपवतो. त्याला पुढं गेलेलं खपत नाही. एखादी जात मोठी झाली तर त्यांना जमत नाही. मराठे जर एका बाजुने झाले आणि हा पोरगा राहिला तर आपला विषय संपला. मग याला बदनाम केल्याशिवाय पर्याय नाही'. 'फडणवीस यांचं ऐकलं नाही तर काय होतं हे सांगतो, एकनाथ खडसे कधीच भाजप सोडू शकत नाही, त्यांना जावं लागलं. अजित पवार राष्ट्रवादी सोडू शकत नाही, त्यांना जेलची भीती दाखवून पक्ष फोडायला लावला. विनोद तावडेंना दिल्लीला जावं लागलं. पंकजा मुंढे हे पक्षात असून नसल्यासारखं आहे. एकनाथ शिंदे कधीच शिवसेना सोडू शकत नाही, नाइलाजाने सोडावी लागली. अशोक चव्हाण पक्ष सोडू शकत नाही, तरी सोडला. भुजबळांचं अजित पवारांशी जमत नसूनही ते त्यांच्या गटात, दुसऱ्यांदा जेलमध्ये टाकेल या भीतीने ते अजितदादांसोबत गेले'. माझा बळी घ्यायचा आहे ना, उपोषण करत मी पायी सागर बंगल्यावर येतो. मेलो तर त्याच्या दारात नेवून टाका, असंही मनोज जरांगे यांनी बैठकीत सांगितलं.
=======================

Saturday, February 24, 2024

सोमवारी काळभैरी यात्रा; गडहिंग्लजमध्ये रविवारी पालखी सोहळा

सोमवारी काळभैरी यात्रा; गडहिंग्लजमध्ये रविवारी पालखी सोहळा


गडहिंग्लज वृत्तसेवा : 

महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गडहिंग्लज येथील काळभैरीची यात्रा सोमवारी (दि. २६) होणार आहे. रविवारी (दी. २५) रोजी सायंकाळी गडहिंग्लज शहरात पालखी सोहळा होणार आहे. या यात्रेची प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

 काळभैरी यात्रेला अनेक वर्षांची मोठी परंपरा आहे.  यात्रेच्या पूर्वसंध्येला रविवारी पालखी सोहळा होणार आहे. गडहिंग्लज  परिसरातील भाविकांकडून  पालखी सोहळ्यावेळीच काळभैरीचे  दर्शन घेण्याला प्राधान्य दिले जाते. पालखीवेळी सासनकाठ्यांना गोंडे बांधण्याची परंपरा आहे. त्यामुळे सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. गडहिंग्लज शहरातून पालखी काळभैरीच्या डोंगरावर जाईल. रात्री बारा वाजता प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होऊन मुख्य यात्रेला प्रारंभ होईल. पहाटेपर्यंत मंदिरात वस्त्रालंकार, महाआरती व इतर विधी होणार आहेत. दुपारी बाराला सबिना फिरणार आहे. यात्रेदिवशी काळभैरी डोंगर भक्तांच्या गर्दीन फुलून जातो.
========================

आजरा तालुक्यातील रिक्त अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

आजरा तालुक्यातील रिक्त अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन


 आजरा वृत्तसेवा : 

एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय पंचायत समिती आजरा विभागाकडील रिक्त असलेले खालील अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रीया राबविणेत येणार आहे तरी इच्छुक उमेदवारानी दि. २६ फेब्रुवारी २०२४ पासुन दि. ११ मार्च २०२४ अखेर बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आजरा कडे आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन करणेत आले आहे. अंगणवाडी मदतनीसांची नेमणुक करण्यात येणारी महसुली गावे पुढीलप्रमाणे : मौ. पेरणोली पैकी नावलकरवाडी, मौ. कोरीवडे पैकी नार्वेकर वस्ती, मौ चितळे धनगरवाडा, मौ. खानापुर पैकी कासारशेत, मौ. वाटंगी शाहुवसाहत, मौ. आवंडी धनगरवाडा १, धनगरवाडा २ व धनगरवाडा ३, मौ. लाटगाव पैकी सातेवाडी, मौ.होन्याळी पैकी करडेवाडी, मौ. धामणे पैकी इळकेवाडी, मौ.कोवाडे पैकी दाभेवाडी, मौ. किणे पैकी चाळोबावाडी, मौ. वेळवटी पैकी पेठेवाडी, मौ. वेळवटी क्रशर, मौ. शेळप पैकी शेळप गावठाण, मौ हाळोली पैकी पोवारवाडी, मौ. पारपोली गावठान इत्यादी ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अर्ज मागविणेत येत आहे. अटी शर्थी व अर्ज बालविकास प्रकल्प कार्यालय आजरा येथे उपलब्ध आहे.

==============

Friday, February 23, 2024

राष्ट्रवादी काँग्रेसची कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसची कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर


 कोल्हापूर वृत्तसेवा :

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली 194 जणांचा समावेश या कार्यकारणीत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी दिली.


 या कार्यकारणीत  जिल्हाध्यक्ष, १ जिल्हा कार्याध्यक्ष, १० उपाध्यक्ष, ९ सरचिटणीस, ८ चिटणीस, १ खजिनदार, ७ संघटक सचिव, १५ कार्यकारिणी सदस्य, ८ विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, १२ तालुकाध्यक्ष, १३ नगरपालिका क्षेत्र शहराध्यक्ष, १८ सेल जिल्हा अध्यक्ष यांच्यासह ११ कायम निमंत्रित सदस्य यांच्यासह १९४ इतक्या क्रियाशील कार्यकर्त्यांचा समावेश या जिल्हा कार्यकारिणीत करण्यात आला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी जिल्हा सेल कार्यकारिणी, विधानसभा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी व नगरपालिका क्षेत्र शहर कार्यकारिणी होणे गरजेचे होती त्यासाठी जिल्हा कार्यकारीणी जाहीर करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.


 कोल्हापूर जिल्हा कार्यकारीणी २०२४-२०२७ पुढील प्रमाणे : जिल्हाध्यक्ष : बाबासाहेब पाटील-असुर्लेकर (असुर्ले, पन्हाळा). कार्याध्यक्ष : अनिलराव साळोखे (बोरबेट, गगनबावडा). उपाध्यक्ष, गणपतराव फराकटे (बोरवडे, कागल), सुभाषसिंग राजपूत (आगर, शिरोळ), संतोष पाटील (कडलगे,गडहिंग्लज), मधुकर जांभळे (बालिंगा, करवीर), अभय देसाई (अडकुर, चंदगड), निवास ढोले (पोहाळ, पन्हाळा), सर्जेराव देसाई (म्हसवे, भुदरगड), प्रविता सालपे (पेठवडगाव, हातकणंगले), जयसिंग चव्हाण (नूल, गडहिंग्लज), परशराम पाटील (शिनोली, चंदगड).


सरचिटणीस : मंजुषा कदम (गडहिंग्लज), विष्णू केसरकर (किणे, आजरा), इक्बाल बैरागदार (औरवाड, शिरोळ), महाबळेश्वर चौगुले (माध्याळ, गडहिंग्लज), संजय कलिकते (शिरगाव, राधानगरी), सतीश पाटील (गिजवणे, गडहिंग्लज), शेखर देसाई (गारगोटी, भुदरगड), अर्जुन चौगुले (पोर्ने तर्फे ठाणे, पन्हाळा), मधुकर देसाई (सरोळी, आजरा).

खजिनदार : पंडितराव शेळके (डोणोली, शाहूवाडी). चिटणीस : चंद्रकांत नेर्ले (मुडशिंगी, करवीर), सर्जेराव पाटील-गवशीकार (गवशी, राधानगरी), काशिनाथ तेली (होनाळी, आजरा), आनंदा लाड (आळवे, पन्हाळा), मुन्नासाहेब नायकवडी (नेसरी, गडहिंग्लज), राजाराम चव्हाण (येळवणजुगाई, शाहूवाडी), संजय फराकटे (कागल), विकास पाटील (भादोले, हातकणंगले).

संघटक सचिव : नेताजी पाटील (मांगोली, राधानगरी), प्रविणसिंह भोसले (कागल), संग्रामसिंह देसाई (मडिलगे, भुदरगड), अनिल फडके (सुळे, आजरा), महादेव पाटील- साळशीकर (साळशी, शाहूवाडी), रंगराव कोळी (सांगरूळ, करवीर), किरण पाटील (माले, पन्हाळा).

सदस्य : विजय बोरगे (साळशी, शाहूवाडी), शामराव पाटील (बाळेघोल, कागल), चंद्रकांत चौगुले (निगवे ख||, करवीर), दिनकर चौगुले (मुरगूड, कागल), विलास हळदे (खामकरवाडी, राधानगरी), संजय मगर (पिंपळे, पन्हाळा), मोहन पाटील (लाटवडे, हातकणंगले), अजित पाटील (शिंपे, शाहूवाडी), अंगद शेवाळे (पोर्ले ठाणे, पन्हाळा), दादासाहेब पाटील (थेरगाव, शाहूवाडी), रघुनाथ जाधव (बाचणी, करवीर), राजेंद्र देसाई (पुष्पनगर, भुदरगड), बाबासो पाटील (राक्षी, पन्हाळा), संदीप चव्हाण (भेंडवडे, हातकणंगले), सुरेश चौगुले (शहापुर, पन्हाळा).


विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष : चंदगड : रामप्पा करीगार (भडगाव, गडहिंग्लज), कागल : वसंतराव धुरे (उत्तूर, आजरा), राधानगरी : पंडितराव केणे (गंगापूर, भुदरगड), द. कोल्हापूर : आप्पासाहेब धनवडे (गडमुडशिंगी, करवीर), करवीर : संभाजी पाटील-भूयेकर (भुयेवाडी, करवीर), शाहूवाडी : संतोष धुमाळ (बांबरवाडी, पन्हाळा), हातकणंगले : संभाजी पोवार (लाटवडे, हातकणंगले), शिरोळ : अमरसिंह माने- पाटील (शिरोळ).

 तालुका अध्यक्ष : चंदगड : भिकू गावडे (नागनवाडी), गडहिंग्लज : बाबासो पाटील (मुगळी), आजरा : सुधीर देसाई (वेळवट्टी), भुदरगड : विश्वनाथ कुंभार (पिंपळगाव), राधानगरी : किसन चौगुले (चाफोडी), कागल : विकास पाटील-कुरुकलीकर (कुरुकली), करवीर : शिवाजी देसाई (भामटे), गगनबावडा : दिलीप पाटील (कोदे), पन्हाळा : दाजी पाटील (वाघवे), शाहूवाड़ी : गणी ताम्हणकर (वालुर), हातकणंगले : शिरीष देसाई (पट्टणकोडोली), शिरोळ : प्रकाश पाटील (टाकवडे).

शहर अध्यक्ष (नगरपालिका क्षेत्र) : चंदगड : बाळासाहेब पिळणकर, गडहिंग्लज : सिध्दार्थ बन्ने, मुरगूड : रणजीत सूर्यवंशी, कागल : संजय चितारी, आजरा : निसार लाडजी, पन्हाळा : सद्दाम मुजावर, मलकापूर : राजाराम पाटील, पेठवडगाव : सतीश जोगदंडे, हातकणंगले : अमित खोत, हुपरी : अभिजित देसाई, जयसिंगपूर : असलम फरास, कुरूंदवाड : राजेंद्र धारे, शिरोळ : विजय माने-देशमुख.


विविध सेल अध्यक्ष : युवक राष्ट्रवादी : नितीन दिंडे (कागल), महिला राष्ट्रवादी : शितल फराकटे (फराकटेवाड़ी, कागल), विद्यार्थी राष्ट्रवादी : निहाल कलावंत (इचलकरंजी), सेवादल राष्ट्रवादी : बाळासाहेब देशमुख (इचलकरंजी), अल्पसंख्यांक सेल : यासीन मुजावर (तारदाळ, हातकणंगले), सामाजिक न्याय सेल : सुनिल कांबळे (मडिलगे, भुदरगड), प्रवक्ता प्रशिक्षण सेल : रामराव इंगळे (क|| वाळवे, राधानगरी), जेष्ठ नागरीक सेल : बाळासाहेब खैरे (हुपरी, हातकणंगले), सहकार सेल : भिकाजी एकल (पनोरी, राधानगरी), ओ.बी.सी. सेल : अल्बर्ट डिसोझा (वाटंगी, आजरा), डॉक्टर सेल : हरिश्चंद्र पाटील (कालकुंद्री, चंदगड), मिडिया सेल : युवराज पाटील (कुडित्रे, करवीर), भटक्या-विमुक्त जाती-जमाती : कृष्णात पुजारी (वाशी, करवीर), ग्रंथालय सेल : सुनिल भुईगडे (कागल), माजी सैनिक सेल : रवींद्र देसाई (तळेवाडी, गडहिंग्लज), वकील सेल : किरण पाटील (महे, करवीर), अपंग सेल : बाबू जांभळे (पाचगाव, द. कोल्हापूर), शिक्षक सेल : रमेश हुद्दार (करेकुंडी, चंदगड).

कायम निमंत्रित सदस्य : नाम. हसनसो मुश्रीफ (पालकमंत्री, कोल्हापूर), माजी आमदार के. पी. पाटील (जिल्हा समन्वयक), आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील (प्रदेश उपाध्यक्ष), मानसिंगराव गायकवाड (प्रदेश उपाध्यक्ष), युवराज पाटील (बापू) (गोकुळ संचालक), प्रताप उर्फ भैया माने (संचालक, के.डी.सी.सी.), नविद मुश्रीफ (गोकुळ संचालक), रणजीत पाटील (गोकुळ संचालक), धैर्यशील पाटील-कौलवकर (माजी चेअरमन भोगावती), रणवीरसिंह गायकवाड (संचालक, के.डी.सी.सी.).
=======================

Thursday, February 22, 2024

राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारीवाला माणूस हे चिन्ह

राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारीवाला माणूस हे चिन्ह


मुंबई वृत्तसंस्था  :

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारीवाला माणूस हे चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना हे चिन्ह दिलं असून शरद पवार आता या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. आता चिन्हही बहाल केलं आहे. वटवृक्ष हे चिन्ह शरद पवार गटाने मागितल्याची माहिती होती. पण निवडणूक आयोगाने तुतारीवाला माणूस हे चिन्ह दिलं.

=========================

आजरा तालुक्याच्या ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या वाढवा; अन्यथा उपोषणाचा इशारा

आजरा तालुक्याच्या ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या वाढवा; अन्यथा उपोषणाचा इशारा


 आजरा वृत्तसेवा :

 आजरा एसटी आगारामार्फत आजरा तालुक्याच्या ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत, याचा फटका तालुकावासियांना बसत आहे. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या वाढवण्याबरोबरच सर्व मार्गावरील मुक्काम बस सुरू करण्यात याव्यात, अन्यथा 4 मार्चपासून आजरा बस स्थानकाच्या आवारात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा आजरा तालुका एसटी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन इंदुलकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन आजरा आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे यांना देण्यात आले आहे.


 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आजरा तालुकावासियांच्या सोईसाठी 1998 मध्ये आजरा एसटी आगाराची निर्मिती करण्यात आली. या माध्यमातून आजरा तालुक्याच्या डोंगरकपारीत व वाड्यावस्त्यावर एसटी सेवा मिळू लागली. यातून तालुकावासियांचा प्रवास सोईचा व सुखकर झाला. मात्र कोरोना काळ व त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे आजरा एसटी आगाराचे कोलमडलेले वेळापत्रक अद्यापही सुरळीत झालेले नाही. याचा फटका तालुकावाशीय व विशेष करून विद्यार्थी यांना बसत आहे. तालुक्यातील बहुतांश नागरिक व विद्यार्थ्यांना प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून राहावे लागते. त्यातच आजरा आगारामार्फत कोल्हापूर पुणे येथील बसच्या फेऱ्या वाढवण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागात फेऱ्या वाढवण्यास सांगितल्यानंतर बसेसची संख्या कमी असल्याचे कारण सांगितले जाते. मुळातच तालुकावाशीयांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या आजरा आगाराच्या भोंगळ कारभाराचा फटका तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात 1 मार्च पर्यंत पुरेशा प्रमाणात व नागरिकांची सोय होईल अशा स्वरूपात एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यात याव्यात अन्यथा 4 मार्चपासून आजरा बस स्थानकाच्या आवारात बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नाथ देसाई, राजू विभुते, आनंदा घंटे, विकास सुतार, सुयोग बेळगुंदकर, अजित आजगेकर, दयानंद भोपळे, विशाल जाधव, दत्तात्रेय सावंत, नितीन गावडे, जावेद आगलावे यांच्या सह्या आहेत.
=======================  

Tuesday, February 20, 2024

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण कायद्याच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी; विशेष अधिवेशनात होणार चर्चा

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण कायद्याच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी; विशेष अधिवेशनात होणार चर्चा 



 मुंबई वृत्तसंस्था :

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली, मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत १० टक्के आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची सूत्रांची माहिती. या मसुद्यावर विशेष अधिवेशनात चर्चा होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळू शकते.


 मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी आज, मंगळवारी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत साधारणतः १० ते १२ टक्के स्वतंत्र आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले जाणार असल्याने विधेयकातील तरतूदींकडे राज्यातील मराठा समाजाप्रमाणेच ओबीसी समाजाचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, यापूर्वीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले नाही. त्यामुळे आताचे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे असावे, असा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे. सकाळी ११ वाजता विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होईल. या आधी सकाळी १० वाजता विधानभवनात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं बैठकीत मंजुरी दिली आहे. आता हा मसुदा विशेष अधिवेशनात चर्चेसाठी मांडला जाईल.
======================

Sunday, February 18, 2024

वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणल्याचे समाधान : आमदार प्रकाश आबिटकर; विविध धनगरवाड्यावर जाणाऱ्या रस्ते कामाचा शुभारंभ

वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणल्याचे समाधान : आमदार प्रकाश आबिटकर; विविध धनगरवाड्यावर जाणाऱ्या रस्ते कामाचा शुभारंभ


 आजरा वृत्तसेवा :

 अनेक वर्षापासून विकासापासून वंचित असणाऱ्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी देत विकासाची प्रकाश वाट निर्माण केली आहे. राजकारण करत असताना चांगले घडू शकते याची उदाहरणं म्हणजे आवंडी धनगरवाड्याचा  विकास होय. वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणल्याचे या माध्यमातून समाधान मिळाले असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले ते आजरा तालुक्यातील विविध धनगरवाड्यांवर जाणाऱ्या 4 कोटी 7 लाखांच्या रस्ते कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. तहसीलदार समीर माने यांची प्रमुख उपस्थिती होती.


आमदार आबिटकर यांच्या हस्ते आवंडी धनगरवाडा, नावलकरवाडी धनगरवाडा, किटवडे धनगरवाडा कडे जाणाऱ्या विविध 4 कोटी 7 लाखाच्या रस्ते विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. आमदार आबिटकर पुढे म्हणाले, धनगरवाडे हे जैवविविधतेचे प्रतीक आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या निसर्गाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यामुळे या ठिकाणच्या विकासाबरोबरच पर्यटन संधी देखील निर्माण होण्याची गरज आहे. विकास कामासाठी निधी मिळत असताना दर्जेदार विकास कामे होणे देखील तितकेच गरजेचे आहे, यासाठी स्थानिकांनीही कटाक्षाने लक्ष द्यावे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी एक ही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याची त्यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई,  बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेंद्र सावंत, वनविभागाचे संजय निळकंठ यांच्यासह उपसरपंच कोकरे, बाबू येडगे, संजय पाटील, दत्ता पाटील, विजय थोरवत, इंद्रजीत देसाई, जितेंद्र भोसले, संतोष भाटले, रणजीत देसाई उपस्थित होते. गंगाराम येडगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सत्यवान सोने यांनी सूत्रसंचालन केले.
============== 

Saturday, February 17, 2024

धनगरवाड्यावर निर्माण होतेय विकासाची प्रकाशवाट; ४ कोटी ७ लाखांच्या विकासकामांचा रविवारी शुभारंभ

धनगरवाड्यावर निर्माण होतेय विकासाची प्रकाशवाट; ४ कोटी ७ लाखांच्या विकासकामांचा रविवारी शुभारंभ


आजरा वृत्तसेवा :

आजरा तालुक्यातील विविध धनगरवाड्यावर आमदार प्रकाश आबिटकर यांनी विकासाची नवी प्रकाशवाट निर्माण केली आहे. विविध धनगरवाड्यावर होतं असलेल्या 4 कोटी  7 लाख रुपयांच्या रस्ते कामाचा शुभारंभ रविवारी होतं आहे. या माध्यमातून स्वातंत्र्यानंतर प्रथमच या धनगरवाड्यावर पक्क्या रस्त्याची सोय होत असल्याने या समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून आजरा तालुक्यातील नावलकरवाडी ते धनगर वाडा रस्ता (2 किमी) 1 कोटी 42 लाख ,  किटवडे ते धनगरवाडा रस्ता (3 किमी) 1 कोटी 42 लाख, आवंडी ते धनगरवाडा रस्ता 1 कोटी 23 लाख असे एकूण 4 कोटी 7 लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ रविवार, (दि.18) रोजी सकाळी 11.00 वाजता आवंडी धनगरवाडा, (ता. आजरा) येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार आबिटकर प्रेमी व सर्व ग्रामस्थ, नावलकरवाडी, किटवडे, आवंडी यांनी केले आहे.

=======  ====

Thursday, February 15, 2024

भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालयास मान्यता

भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालयास मान्यता


मुंबई वृत्तसंस्था : 

भुदरगड तालुक्यात मौजे पाल येथे युवा ग्रामीण विकास संस्था, गारगोटी या संस्थेस कायमस्वरुपी विना अनुदानित तत्त्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्यास बुधवार (दि. 14) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड, राधानगरी, आजरा, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, गडहिंग्लज हे १०० टक्के डोंगरी तालुके असून येथील विद्यार्थ्यांना समाजसेवेच्या शिक्षणासाठी परिसरात कोणतीही शैक्षणिक संस्था नसल्यामुळे ८० ते ९० कि.मी. दूरवरील कोल्हापूर सारख्या ठिकाणी जावे लागते.  त्यामुळे विशेष बाब म्हणून या संस्थेस अटी व शर्तींच्या अधिन राहून मान्यता देण्यात आली. या नवीन महाविद्यालयामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाचा लाभ मिळणार आहे.

-----   -----

Tuesday, February 13, 2024

माघी गणेश जयंती विशेष : अष्टविनायक दर्शन

माघी गणेश जयंती विशेष : अष्टविनायक दर्शन 

माघ मासात शुक्ल पक्षात येणार्‍या चतुर्थीला गणेश जयंती असते. पौराणिक मान्यतानुसार, माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या विनायक चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. या दिवसाला माघी गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. यंदा गणेश जयंती सोमवार, 13 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी होत आहे, या निमित्ताने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपतीच्या अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आठ स्वयंभू स्थानांची तसेच मंदिराची संरचना, बाप्पाच्या मूर्तीचे वैशिष्ट्ये तसेच तिथल्या आख्यायिका यांची माहिती देत आहोत.


गौरीपुत्र गणेश म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बाप्पा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या प्रथम पूजनीय बापाला अनेक नावाने संबोधले जाते. अशा या बाप्पाचे स्वयंभू ऐतिहासिक तसेच भक्ती परंपरेतील महत्त्वाची स्थाने म्हणजेच अष्टविनायकाची महाराष्ट्रातील आठ मंदिरं. महाराष्ट्रातील रायगड, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात मोरगाव, सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री ओझर व रांजणगाव या ठिकाणी आठ पवित्र व स्वयंभू गणपतीची विविध रूपे आहेत. प्रत्येक मंदिराला त्याचे-त्याचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व आहे. प्रत्येक मंदिरातील मूर्तीचे स्वरूप हे विलोभनीय आहे तसेच तिथल्या मंदीरातील ऐतिहासिक बांधकाम व कलाकुसर उल्लेखनीय आहे. भक्तांमध्ये अष्टविनायक यात्रेचे विशेष महत्त्व आहे या यात्रेची सुरुवात मोरगावचा मोरेश्वरापासून सुरू होऊन पुन्हा इथे येऊन या यात्रेचा शेवट केला जातो. तर अष्टविनायक प्रत्येक स्थानाचे महत्त्व, तिथली आख्यायिका व मंदिर याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.


१. मोरगावचा मयुरेश्वर :-


पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे असणारे हे बाप्पाचे मंदिर अष्टविनायकातील यात्रेत पहिल्या स्थानावर आहे. पुणे जिल्ह्यातील हे गाव बारामती तालुक्यामध्ये स्थित आहे. व पुणे शहरापासून हे 55 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी या गावात मोरांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असायचे म्हणून याला मोरगाव असे नाव पडले.


मयुरेश्वर (मोरेश्वर) :-

मोरेश्वर किंवा मयुरेश्वर हे गणपतीची स्वयंभू मुर्ती पुर्वाभिमुख असून सोंड डावीकडे वळलेली आहे. बाप्पाच्या या लोभस व आकर्षक मुर्तीच्या डोळ्यांमध्ये व नाभीमध्ये हिरे जडविलेले आहेत तसेच मूर्तीवर नागाच्या फण्याचे सुंदर छत्र आहे. इथल्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी व सिद्धी उभ्या आहेत तसेच पुढे उंदीर व मोर उभे आहेत. अष्टविनायक यात्रेला सुरुवात मोरेश्वराच्या दर्शनाने होते व असे सांगितले जाते की या यात्रेचा शेवटही जर येथे झाला तर ही यात्रा खऱ्या अर्थाने सफल होते.

मंदिर :-

मोरगावातील कऱ्हा नदीच्या काठावर असलेले हे उत्तराभिमुख मंदिर संरक्षक भिंतीनी वेढलेले आहे. सध्याच्या या मंदिराचे बांधकाम आदिलशाहीच्या काळात सुभेदार गोळे यांनी पूर्ण केले. मंदिरांवर मोघल सैन्याने आक्रमण करू नये म्हणून या मंदिराचे बांधकाम वरकरणी मुस्लिम मशीदी सारखे करण्यात आले. या मंदिरासमोर नंदीची एक भव्य मूर्ती व मोठ्या आकाराचा दगडी उंदीर आहे. गणपती समोर नंदी असलेले हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे.

आख्यायिका :-

गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी आणि राणी उग्रा यांचा पुत्र सिंधू याला सूर्यदेवाने अमरत्वाचे वरदान दिले होते. त्याने अहंकार व असुरी वृत्तीने देवांवर आक्रमण करवून आणले. त्यामुळे सिंधूसुराचा नाशिक करण्यासाठी देवांनी विघ्नहर्त्या गणपती कडे प्रार्थना दिली तेव्हा मोरावर आरूढ झालेल्या गणपतीच्या मोरेश्वर अवताराने सिंधूसुराचा वध केला व देवांना व पृथ्वीला त्याच्या जाचातून मुक्त केले.

२. सिद्धटेकचा सिद्धिविनायक :-


सिद्धटेकच्या टेकडीवर स्थित असलेले सिद्धिविनायकाचे हे मंदिर म्हणजे अष्टविनायक यात्रेतील दुसरा गणपती. अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या तीरावर वसलेले आहे.

सिद्धिविनायक :-

उत्तराभिमुख असलेली अष्टविनायकांपैकी एकमेव अशी मूर्ती आहे जीची सोंड उजवीकडे आहे. उजवीकडे सोंड असलेला गणपती हा खूप शक्तिशाली असतो तसेच त्याचे सोवळेही कडक असते. तसेच या गणपतीला प्रसन्न करणेही कठीण समजले जाते. बाप्पाची ही मूर्ती तीन फूट उंच आहे व त्याने एका पायाची मांडी घातली असून त्यावर रिद्धी व सिद्धी विराजमान आहेत. भक्तांमध्ये असे समजले जाते की या देवळाच्या डोंगराला एकवीस दिवस 21 प्रदक्षिणा पूर्ण केल्या की आपल्या महत्त्वाच्या कामातील विघ्न दूर होऊन ते काम पूर्णत्वास जाते.


मंदिर :-

सध्या अस्तित्वात असलेल्या या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला गाभाऱ्यात असलेल्या सिद्धिविनायकाच्या मखर पितळी आहे तसेच त्यावर चंद्र सूर्य तसेच गरूडची कलाकृती साकारली आहे.

आख्यायिका :-

भगवान विष्णू ध्याननिद्रेत असताना त्यांच्या कानातून उत्पन्न झालेले मधु आणि कैटभ दानव ब्रह्मदेवांच्या सृष्टी निर्माणाच्या कार्यात अडथळा आणीत होते. त्यामुळे भगवान विष्णूंना त्यांची ध्याननिद्रा भंग करून मधु व कैटभ यांना थांबवण्यासाठी त्यांच्याशी युद्ध करावे लागले पण भगवान विष्णू त्यांना पराजित करू शकले नाही व त्यामुळे त्यांनी हे युद्ध थांबवले त्यावर भगवान शंकरांनी मधु व कैटभाला पराजित करण्यासाठी भगवान विष्णूंना गणपतीची आराधना करायला सांगितली. त्यानंतर सिद्धटेक येथेच भगवान विष्णूंनी गणपतीशी मूर्ती निर्माण करून त्यांची आराधना केली व येथेच गणपतीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना अनेक सिद्धी प्रदान केल्या व त्यानंतर भगवान विष्णूंनी मधु व कैटभाचा पराभव केला.

३. पालीचा बल्लाळेश्वर :-


रायगड मधल्या सुधागड तालुक्यातील पाली हे अष्टविनायक यात्रेतील तिसरे स्थान. बल्लाळेश्वर म्हणजेच बल्लाळविनायक हा एकमेव असा गणपती आहे जो भक्ताच्या नावाने ओळखला जातो.

बल्लाळेश्वर :-

पूर्वाभिमुख श्रीगणेशाची हि मूर्ती अरुंद असून तिचे कपाळ मोठे आहे. तसेच सोंड डाव्या दिशेला वळलेली आहे आणि मूर्तीच्या डोळ्यात व नाभीत हिरे जडविलेले आहेत. या मूर्तीच्या मागच्या बाजूला चंदेरी महिरप आहे व त्यावर रिद्धी-सिद्धी यांची कलाकृती साकारली आहे.

मंदिर :-

सध्या पाली येथे स्थित असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार नाना फडणवीस यांनी केला. व तिथल्या लाकडी मंदिराचे रुपांतर दगडी मंदिरात केले. या ठिकाणी सूर्याच्या दक्षिणायनाच्या काळात म्हणजेच हिवाळ्याच्या काळात सूर्याची किरणे बल्लाळेश्वराच्या मूर्तीवर पडतात.

आख्यायिका :-

त्रेता युगामध्ये कल्याण नावाचा वाणी त्याच्या पत्नीसमवेत या गावी राहत होता. कालांतराने त्यांना बल्लाळ नावाचा पुत्र झाला. बल्लाळ हा लहानपणापासूनच निस्सीम गणेशभक्त होता. त्याची व त्याच्या मित्रांची गणेशावर अपार श्रद्धा होती. हे सर्व जण गणेश भक्तीमध्ये तल्लीन होऊन तहान भूकही विसरून जात असत. ते जंगलामध्ये एका धोंड्याला गणपती स्वरूप मानून पूजा करीत असत.‌ त्यामुळे एके दिवशी बल्लाळ हा आपल्या मुलांना बिघडवत आहे अशी तक्रार घेऊन गावकरी कल्याण वाण्याकडे गेले होते. व त्यामुळे संतप्त झालेला कल्याण रागाने बल्लाळला शोधण्यासाठी जंगलात निघून गेला. तिथे गेल्यावर त्याने तिथली पूजा उधळून लावली तसेच गणपती म्हणून पुजलेला धोंडाही फेकून दिला. तिथली बाकीची मुले पळून गेली पण बल्लाळ मात्र नामस्मरणात व्यस्त होता. पण चिडलेल्या कल्याणने कोणताही विचार न करता बल्लाळला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले व तिथल्याच एका झाडाला बल्लाळला बांधून तो तिथून निघून गेला. तेव्हा बल्लाळने मनाशी ठरवले की जोपर्यंत प्राण जात नाही तोपर्यंत गणेशाचा जप चालू ठेवायचा. बल्लाळची निस्सीम भक्ती पाहून गणपती ब्राह्मणाचा अवतार घेऊन त्याच्याजवळ आला. गणपतीने स्पर्श करताच बल्लाळच्या शरीरावरील सर्व जखमा नाहीशा झाल्या व त्याचे शरीर पुन्हा आधी सारखे झाले प्रसन्न झालेल्या गणेशाने बल्लाळला वर मागण्यास सांगितले. तेव्हा बल्लाळाने इच्छा व्यक्त केली की गणपतीने इथेच राहून भक्तांची इच्छा पूर्ण कराव्यात. तेव्हा गणपतीने बल्लाळला वचन दिले कि, “माझा एक अंश इथे कायम वास्तव्य करेल व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करेल तसेच इथले माझे हे स्थान बल्लाळविनायक म्हणून ओळखले जाईल”. असे म्हणून गणपती जवळच्या एका शिळेत अंतर्धान पावला.

४. महडचा वरदविनायक :-


रायगड जिल्ह्यातील महड येथील वरदविनायकाचे मंदिर हे अष्टविनायक यात्रेतील चौथे स्थान आहे. भक्तांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा व नवसाला पावणारा अशी या बाप्पाची ख्याती आहे.

वरदविनायक :-

इसवी सन १६९० साली धोंडू पौढकर या गणेश भक्ताला स्वप्नांमध्ये देवळाच्या मागे स्थित असलेल्या तळ्यामध्ये ही मूर्ती असल्याचे कळले. त्यानंतर त्याने तळ्यामध्ये या मूर्तीचा शोध घेऊन त्या मूर्तीची स्थापना केली. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे व मूर्तीजवळ एक अखंड दिवा तेवत ठेवलेला आहे. हा दिवा इ.स. १८९२ पासून अखंड तेवत ठेवलेला आहे.

मंदिर :-

इ.स. १७२५ मध्ये सुभेदार रामजी भिवलकर यांनी हे मंदिर उभे केले. हे मंदिर कौलारू आहे व मंदिराच्या घुमटाला सोनेरी कळस आहे. तसेच या देवळाच्या चारही दिशांना हत्तीची प्रतिकृती साकारली आहे.


आख्यायिका :-

राजा भीम व त्याच्या पत्नीला श्री गणेशाच्या कृपेने रुक्मंद नावाच्या पुत्र प्राप्त झाला. राजा रुक्मंद एकदा अरण्यात शिकारीसाठी गेला असताना ऋषी वाचक्नवी यांच्या आश्रमात विश्रामासाठी गेला होता. तेव्हा ऋषी वाचक्नवींची पत्नी मुकुंदा राजाच्या प्रेमात पडली. परंतु राजाने तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही व तो तिथून निघून गेला. इंद्रदेवाला ही गोष्ट कळल्यावर तो रूक्मंदाचे रूप घेऊन मुकुंदाकडे गेला व इंद्रदेवांपासून मुकुंदाला ग्रित्सम्द नावाचा पुत्र प्राप्त झाला. ग्रित्सम्दाला त्याच्या जन्माबद्दल सत्य समजल्यानंतर त्याने आईला शाप दिला व स्वतः पापक्षालन करण्यासाठी जंगलात निघून गेला. तेथे त्याने श्री गणेशाची प्रार्थना करत घोर तपसाधना केली. त्यावर गणेशाने प्रसन्न होऊन त्याला वर दिला व ग्रित्सम्दाने गणपतीला तेथेच राहून भक्तांचे विघ्न दूर करण्याची विनंती केली.

५. थेऊरचा चिंतामणी :-


अष्टविनायक यात्रेतील पाचव्या स्थानावर असलेले बाप्पांचे हे मंदिर पुणे जिल्ह्यातील थेऊर या गावी वसलेले आहे. भक्तांच्या चिंता दूर करणाऱ्या या गणपतीच्या रूपाला चिंतामणी असे म्हणतात.

चिंतामणी :-

थेऊरचा या मंदिरातील बाप्पाची मूर्ती पूर्वाभिमुख असून ही मूर्तीसुद्धा डाव्या सोंडेची आहे. तसेच या गणपतीचे डोळे रत्नजडित आहेत. थोर संत मोरया गोसावी यांनी तपसाधना करून या ठिकाणी सिद्धी प्राप्त केली.


मंदिर :-

सध्या अस्तित्वात असलेले मंदिर हे पेशवे काळात बांधले गेले. हे मंदिर लाकडापासून उभारले गेले आहे तसेच मंदिरात पितळेची मोठी घंटा आहे.

आख्यायिका :-

गणासुर या असुराने कपिला ऋषींकडे असलेले चिंतामणी हे रत्न चोरले होते. ते रत्न परत मिळवण्यासाठी दुर्गादेवीने कपिला ऋषींना गणपतीची आराधना करून त्यांची मदत मागण्यास सांगितले. यामुळे गणपतीने गणासुराचा वध करून ते रत्न मिळवले व कपिला ऋषींना परत केले. पण कपिला ऋषीने ते चिंतामणी रत्न गणपतीच्या गळ्यात घातले. तेव्हापासून इथल्या गणपतीला चिंतामणी हे नाव प्राप्त झाले.

६. लेण्याद्रीचा गिरिजात्मज :-


शिवनेरी नजीकच्या लेण्याद्रीच्या कुशीत वसलेले गिरीजात्मजाचे मंदिर म्हणजे अष्टविनायकातील गणपतीचे सहावे स्थान आहे. देवी पार्वतीने पुत्रप्राप्तीसाठी येथेच तपसाधना केली होती म्हणूनच पार्वतीचा म्हणजेच गिरीजेचा पुत्र गिरीजात्मज म्हणून इथल्या गणपतीला ओळखले जाऊ लागले.

गिरीजात्मज :-

उत्तराभिमुख असलेल्या बाप्पाच्या या मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली आहे. तसेच कपाळावर व नाभीत हिरे जडविलेले आहेत. तसेच या मूर्तीच्या उजव्या बाजूला महादेवाची व डाव्या बाजूला मारुतीची मूर्ती आहे.

मंदिर :-

अष्टविनायकांपैकी पर्वतावर असणारे हे एकमेव मंदिर आहे. जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री या डोंगरावर एकूण अठरा गुहा आहेत त्यातील आठव्या गुहेत गिरिजात्मजाची मूर्ती आहे तसेच मंदिरातील खांबांवर वाघ, सिंह, हत्ती यांची कलाकृती कोरलेली आहे.

आख्यायिका :-

गणेश आपला पुत्र म्हणून जन्माला यावा यासाठी देवी पार्वतीने याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली व त्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी देवीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून गणेशाची मूर्ती बनवली व त्या मूर्तीतून श्रीगणेशाची निर्मिती केली.

७. ओझरचा विघ्नेश्वर :-


जुन्नर या तालुक्यातील ओझर हे अष्टविनायकातील सातव्या गणपतीचे ठिकाण. विघ्नासूराचा नाश करण्यासाठी गणपतीने विघ्नेश्वराचा अवतार घेतला होता.

विघ्नेश्वर :-

पूर्वाभिमुख असलेल्या या गणपतीची सोंड डावीकडे आहे तसेच डोळ्यांमध्ये माणिक व कपाळी हिरे जडविलेले आहेत. तर दोन्ही बाजूला रिद्धी व सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. इंद्र देवाने निर्माण केलेल्या विघ्नासूराचा नाश करण्यासाठी श्री गणेशाने हे अवतार घेतले होते. तसेच अष्टविनायकातील हा गणपती सर्वात श्रीमंत समजला जातो.

मंदिर :-

सध्या अस्तित्वात असलेले हे मंदिर चिमाजी आप्पा यांनी इ.स. १७८५ च्या काळात बांधले या देवळाला चारही बाजूंनी सुरक्षित तटबंदी आहे व मंदिराच्या मुख्य दरवाजावर चार द्वारपाल उभे आहेत तसेच मंदिराचा कळस व शिखर सोनेरी आहे व मंदिराच्या पुढे मोठे सभागृह आहे.

आख्यायिका :-

राजा अभिनंदन याच्या इंद्रस्थान प्राप्तीच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी देवेंद्राने विघ्नासूराला पाचारण केले. त्यामुळे विघ्नासुराने तेथील यज्ञात विघ्न आणायला सुरुवात केली. तसेच पृथ्वीवर विध्वंस करायलाही सुरुवात केली त्यामुळे त्रस्त झालेल्या ऋषींनी ब्रह्मदेव व भगवान शंकरांच्या आज्ञेप्रमाणे श्री गणेशाकडे प्रार्थना केली. तेव्हा श्री गणेशाने विघ्नासुराने बरोबर युद्ध करून त्याचा पराभव केला. शरण आलेल्या विघ्नासुराने आपले नाव श्री गणेशाच्या नावाबरोबर घेतले जावे अशी इच्छा व्यक्त केली तेव्हापासून या गणपतीला विघ्नहर असे म्हटले जाऊ लागले.

८. रांजणगावचा महागणपती :-


पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील रांजणगाव या गावात महागणपतीचे मंदिर आहे. अष्टविनायक यात्रेतील हे गणपतीचे आठवे ठिकाण आहे. तसेच हा अष्टविनायकापैकी सर्वात शक्तिशाली गणपती आहे.

महागणपती :-

डाव्या सोंडेची बापाची ही लोभस मूर्ती कमळावर आसनस्थ आहे. तसेच दोन्ही बाजूस रिद्धी व सिद्धी उभ्या आहेत त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकर यांनी या ठिकाणी गणपतीची आराधना केली होती. तसेच भक्तांमध्ये नवसाला पावणारा गणपती म्हणून महागणपतीची ख्याती आहे तसेच इथे असा समज आहे की या गणपतीची मूळ मूर्ती ही तिथल्या तळघरात असून तिला महाउत्कट असे संबोधले जाते.


मंदिर :-

पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचा गाभारा माधवराव पेशवे यांनी बांधला या मंदिराची संरचना अशी केली आहे की सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायनाच्या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीवर पडतात. रांजणगावच्या मंदिरातले भव्य सभामंडप सरदार किबे यांनी बांधले होते.

आख्यायिका :-

त्रिपुरासुर हा असुर गणपतीच्या निस्सिम भक्त होता. त्याने गणपतीला प्रसन्न करून त्याच्याकडून वरदान प्राप्त करून घेतले होते की भगवान शंकराशिवाय त्याचा विनाश कोणीही करू शकणार नाही. त्यानंतर त्याने देवांना तसेच पृथ्वीतलावरील ब्राह्मणांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या व घाबरलेल्या देवांना नारद मुनींनी गणपतीची आराधना करून मदत मागण्यास सांगितले. त्यामुळे देवांची मदत करण्यासाठी गणपतीने ब्राह्मणाचा वेश धारण केला व त्रिपुरासुराकडे जाऊन आपण चौसष्ट कलांमध्ये पारंगत असल्याचे सांगितले व जर त्रिपुरासुराने जर कैलासावरील चिंतामणीची मूर्ती आपणास आणून दिली तर त्याला तीन विमान बनवून देऊ असे आमिष दिले. त्यामुळे उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले आणि त्रिपुरासुर व भगवान शंकर यांच्यातील युद्धाला सुरुवात झाली. युद्धात त्रिपुरासुराला पराजित करणे शक्य होत नसल्याने भगवान शंकर यांनी रांजणगाव येथे गणेशाची प्रार्थना केली त्यानंतर श्रीगणेशाच्या सूचनेप्रमाणे भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला.
-----  -----

Monday, February 12, 2024

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आमदारकीसह काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजपात जाण्याची शक्यता

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आमदारकीसह काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजपात जाण्याची शक्यता


मुंबई वृत्तसंस्था :

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा चालू आहे. अशातच चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे चव्हाण आता भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.


  
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी आमदारकीचाही (विधानसभा सदस्यत्वाचा) राजीनामा दिला आहे. तसं पत्र त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिलं आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पटोले हे काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब करणारं एक पत्र सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या पत्रात चव्हाण यांच्या नावापुढे माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे. याचाच अर्थ चव्हाण यांनी आधीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, त्यापाठोपाठ त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नाना पटोल यांना लिहिलेल्या पत्रात अशोक चव्हाण यांनी लिहिलं आहे की, महोदय, मी दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे.
त्यापाठोपाठ अशोक चव्हाण यांनी स्वतः समाजमाध्यमांद्वारे सर्व घडामोडींची माहिती दिली. चव्हाण यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आज सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.” तसेच चव्हाण यांनी समाजमाध्यमांवरील त्यांच्याबाबतची माहिती अपडेट केली आहे. वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर असलेल्या त्यांच्या प्रोफाईलवरील काँग्रेससंबंधीची सर्व माहिती हटवण्यात आली आहे.
------   ------

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...